सरस्वती | आमची ओळख आम्हाला द्या

सरस्वती

सरस्वती | आमची ओळख आम्हाला द्या –

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ,देगलूर पासून १५ किमी अंतरावर येरगी हे गाव आहे .या गावात एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात प्रस्तुत शिल्पात काली नावांनी पुजले जाते. काली म्हणून पुजली जाणारी हि मातृदेवता आहे. मूर्तीशास्त्रानुसार काली नसून सरस्वती आहे .परंतु स्थानिक लोक हिची पूजा कालीदेवी म्हणून करतात.

अर्धपर्यकासनात स्थित असणारी ही देवता चतुर्भुज आहे. प्रदक्षिणा क्रमाने खालच्या डाव्या हातात जपमाळ ,वरच्या डाव्या हातात टंक, वरच्या उजव्या हातात वीणा, खालच्या उजव्या हातात पुस्तक ही आयुधे धारण केलेली आहेत. देवीच्या मस्तकी कलाकुसरयुक्त करंडक मुकुट आहे. कानात चक्राकार कुंडले, गळ्यात ग्रीवा, स्तनहार, स्तनसूत्र  हिक्कासूत्र , कटीसूत्र ,करवलय ,केयुर पादवलय व पादजालक इत्यादी आभूषणे अतिशय कोरीव व ठसठशीतपणे कोरल्यामुळे मूर्ती सुबक व सालंकृत वाटते. उजव्या वरच्या हातात धारण केलेली वीणा देवीने उभी पकडली असल्याने प्रथम दर्शनी ती वीणा वाटत नाही. उजवा पाय काटकोनाकृती  दुमडून ,डावा पाय जमिनीकडे सोडला आहे. डाव्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकविल्याने  इतर बोटांची झालेली सुबक रचना शिल्पी ने अतिशय खुबीने या ठिकाणी अंकित केलेली आहे.

पिदपिठावर देवीच्या वस्त्राचा सोगा व नेसूच्या वस्त्राची मोती युक्त नक्षीदार किनार पाषाणात अंकीत करताना शिल्पीस आपले कसब पणाला लावावे लागले असेल. मूर्तीच्या पादपिठावर डाव्या पायाजवळ सरस्वतीचे वाहन मोर दाखविले आहे. मूर्तीचे  श्रृंग नक्षीयुक्त आहे. देवीच्या चेहर्‍यावर प्रचंड तेज आहे. पाहणाऱ्यास देवी आपल्याकडे पाहून स्मित हास्य करते की काय? हा भाव निर्माण झाल्यावाचून राहत नाही. अशीही काली नावाने पुजली जाणारी सरस्वती होय.

देवीच्या मूर्तीच्या मागील बाजूच्या भिंतीत सप्तमातृकापट त्यांच्या वाहनांसह सुस्थितीत आहे. ही मूर्ती खरी ओळख आणि अस्तित्वाची लढाई देत उभी आहे.डॉ. माधवी महाके यांनी या मूर्तीचे अवलोकन केले असून, त्यांनी छायाचित्र उपलब्ध करून दिले आहे. मूर्तीला निवाऱ्यासाठी सिमेंटच्या साध्या भिंती व त्यावर पत्रे आहेत.मूर्तीचे योग्यरित्या संवर्धन होणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी असा प्राचीन वारसा जतन करणे ही काळाची गरज आहे हे ओळखले पाहिजे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here