धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९३ –

अभिषेकसंपन्न झालेल्या राजमंडळाने उंची राजपेहराव परिधान केले. काशाच्या परातीतील कढीव तुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे, युवराजांनी अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांच्या कोदंड खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला बोध टंकारला – “मराठा तितुका मेळवावा! महाराष्ट्रधर्म वाढवावा! देवद्रोही तितुके कुत्ते! मारून घालावे परते! अवघा हलकल्लोळ करावा!”

युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागाभट्टांमागून चालले दरबारीचौकाकडे. सिंहासनाच्या रोखाने. त्यांच्यामागून मंत्रिगण, शास्त्री, जमलेला बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगररांगांआड नवा उष:काल भवितव्याची वाट चालला. राजे, युवराज, सोयराबाई दरबारीचौकांत आले. मुंगी रिघायला वाव मिळणार नाही, असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौबाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते! पुष्पमालांनी सारा दरबार शिणगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते, राजमंडळावर. टाचा उंचावून माणसे धडपडत होती, राजदर्शनासाठी!

राजे, सोयराबाई, युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे घंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्तपात्र सोडले होते. आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजांनी भकले दुहाती फेकली. सिंहासनाची सविध पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याची मूठ उधळली. “जगदंब, जगदंब” कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करीत राजांनी सोनपत्र्याने मढविलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई, संभाजीराजे चौथरा चढले. मोतीलगाच्या छत्राला धरून असलेल्या, व्याघ्रदंडी हिरे-रत्नजडित, प्रशस्त, सुवर्णसिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजांनी वंदन केले. पाय न लावता, उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर बीरबैठक घेतली.

सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असलेल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असलेल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईंनी बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक-एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरे, गुर्शबदार, चवरीवाले, पंखावाले यांनी आपापल्या जागा घेतल्या. आचार्य गागाभट्टांनी राजे-युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभ्रवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसाद उठू लागले. मुहूर्तपात्र घंगाळात डुबताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्थापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणू लागला. उखळी, बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे, नगारे, शाजणे यांचा राजडंका घुमू लागला. गुर्थबदारने हातचा गुर्थब उचलून धरीत ठणठणीत अल्काब दिला –

“राजश्रियाविराजित, सकळगुणमंडित, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो्राह्मण- प्रतिपालक, हिंदुपदपातशहा श्रीमन महाराज छत्रपती शिवाजी महाराज…!”

“जय! जय जय!” उभ्या दरबाराने तो अल्काब वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्णी न्यायतुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यांत नाचण्याएवढीही तफावत नाही ना, याची खातरजमा करून घेत स्थिर झाली! कानी पडलेला जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी! उगवतीवर आलेल्या सूर्याची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली!

सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले. त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले. कारण त्यांच्या आवतीभोवती रोमांचक खणखणाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या! सिंहासनमंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत ओंजळींनी ‘सुवर्णत्रान’ घालीत होते. राजांच्या मस्तकावरून उड्या घेत उतरलेल्या मोहरांचा, पायगतीला बसलेल्या संभाजीराजांच्या भोवती सडाच सडा पडू लागला. एकलगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरा साहेब हेत्री ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला. डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे-युवराजांना कमरेत झुकून अदब देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला –

“युवर एक्सलन्सी राजा सेवाजी मे पॉवर हिज मर्सी टू अँक्सेप्ट धि गिफ्ट्स ऑफ कंपनी!”

त्याच्या तबकधाऱ्यांनी आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडित शिरपेच, दोन किमती मोती आणि दोन हिरेजडित सलकड्या होत्या. संभाजी राजांच्यासाठी दोन हिरेमंडित सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती. नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना, गोसावी, उत्पात, वासुदेव, भुत्ये, पोतराज, बैतेदार, फकीर, बैराग्यांना राजे-युवराज दान करू लागले, दान घेणारे भरल्या तोंडाने दुवा-आशीर्वाद देऊ लागले – “तथास्तु! भोलानाथ सुखी ठेवील.”, “खुदा सलामत रख्खे!” देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वांत शेवटी वज़कवी भूषण कमरशेला आवळून सिंहासनाच्या सामोरा आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी थडथडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले.

“जै जयंती, जै आदि सकति।
जै चमुंड, जे मुंड भंडासुर खंडिनी।
जै सुक्त, जै रक्तबीज बिड्डाल बिहंडिनी।।”

ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी छळकत थडाडू लागली –

“दशरथ जू के राम, भै वसुदेव के गोपाल
सोई प्रगटे साई के, श्री सिवराज भुपाल।।
सिव हि औरंग जिति सकै, और न राजा राव।
हत्यि मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव।।
औरन को जो जनम है, सो याको यक रोज।
औरन को राज है सो, सिर सरजा को मौज।”

भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दांचे पोतचे पोत नाचवू लागला –

“जीवन मैं नर लोग बडो, कवि भूषण भाषत पैज अडो है।
है नर लोगन मैं राज बडो, सब राजनमें सिवराज बडो है।।
को दाता? को रन चढो? को जग पालनहार?
कवि भूषण उत्तर दिखो सिव नृप हरि अवतार।॥।”

युवराजपण विसरून संभाजीराजे हात उठवून कवी भूषणच्या तेजरसी, रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती. पुढे शब्दांची कारंजी उसळू लागली – राजांचे यश वर्णन करताना बेभान भूषण स्वत:ला विसरला.

“तेरे तेज है सरजा दिनकर सो।
दिनकर है, तेरो तेज के निकर सो।।
तेरो जस हे, सरजा हिमकर सो।
हिमकर है तेरो जस के अकर सो।।
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरू चंद कहॉ।
सरजा जस आगे?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ
तेरो साहस के आगे?”

“व्वा! भले.” संभाजीराजांच्यातील कविमन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणसमोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला.

राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनसाठी निघाले. “श्रीमान छत्रपती शिवाजीमहाराज की” “जय जय जय!” जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडळाच्या कदमा-कदमांबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले. नगारखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापा फडफडविणारा, सोंड, गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी, किरणांत झळझळती सोनअंबारी घेतलेला ‘त्रिशूल’ हत्ती ‘राजऐरावत’ म्हणून अलमस्तपणाने झुलत होता.

त्याच्यासमोर पांढराशुभ्र, जातवान घोडा, आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन, गळ्यात सोनकोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोनतोडा मिरवीत लाभाचा “राजअश्व’ म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्यांनी दुहाती शिस्त धरली होती. अब्दागिरे, निशाणबार्दार, चवरीवाले, गुर्शबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देत राजऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फीलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राजऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोनअंबारीत स्थानापन्न झाले. सोनमोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठीशी वीरबैठकीत बसले.

हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात. लेझमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या, ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशीळ उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरीगदगा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुर्झबदार राजअल्काब देऊ लागले –

“राजश्रिया विराजित… सकळ गुणमंडित…” दाटल्या कंगणी पगड्यांचा लालदर्या सरकू लागला. त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला, मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्यही क्षणभर थरथरला! लपकन कमरेत झुकला!!! “शिव’ आणि ‘शंभो’ शंकराच्या दर्शनाला निघाले. रथयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली.

एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौकआवारात आले. देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासेमहालाकडे निघाले, राजमातेच्या दर्शनासाठी!

“छत्रपती महाराज येत आहेत.” वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरारले. त्यांच्या बैठकीच्या भवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या. जिजाऊंच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराजांनी गुडघे टेकले. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडाएवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविली. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यांतून सुटलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले. झालेला अभिषेक पावन झाला!

जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात होलपटू बघत होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्यातरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांमुळे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्तिधवल राजटोप उतरून सरळ जिजाऊंच्या पायांवर ठेवला! आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गदगदू लागले.

“शिवबा!” डोळे पदराने निपटून टाकीत जिजाऊसाहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादा ऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, “शिवबा!”

जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरीकोयरीवर, उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी; पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला – आणि – आणि महाराज- जिजाऊंनी अंगाखांद्यावर खेळवून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना!!

राज्याभिषेकाचे उत्तगविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना सव्वालक्ष होनांची दक्षणा देऊन, पहाऱ्यासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here