महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८९

By Discover Maharashtra Views: 2411 12 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८९ –

छत्रस्थापनाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळे घेऊन दुपार टळतीला टाकून संभाजीराजांच्यासह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले. गडाच्या मोक्याच्या जागा बघून स्वाऱ्या ‘अब्दुल-बुरुजा’वर आल्या. दूरवर हंड्याएवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले.

“महाराजसाहेब, आपणास जीवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले. त्याची कबर बांधविली. ही कोण विचाराने?” अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजांनी विचारले. राजांचा धरला विचार त्याने तुटला. संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर, गालाकडे फिरलेल्या मिश्यांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, “आमचा झगडा करणीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली, असे आम्ही मानतो.” “पण गनीम तसे मानीत नाहीत! आपल्या गुजरकाकांचा पडला देह मिळाला नाही. त्यांचे दहन झाले नाही! कामी आलेल्या आपल्या माणसांची धडे छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातात. टाकली जातील! हे कसे?”

तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मग शांतपणे म्हणाले, “मोगलाईत आणि आमच्या ‘श्रीं’च्या राज्यात फरक आहे, तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठविली – उठवू. पण कुणाची धर्मस्थानं धूळदोस्त करावी, तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हांस आता जसं वाटतं, तसं एकेकाळी आम्हांसही वाटत होतं. पण मासाहेबांनी आमचा भ्रम दूर केला. विचार उदात्त केले.” जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद, निसूर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांजआरतीची तडतडणारी संबळ ऐकू येऊ लागली.

क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळमाचीवरच उभे असल्यासारखे बाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल – बुरुजाच्या पायऱ्या उतरू लागले. ओघळत्या उपरण्याचे शेव मुठीत धरून अण्णाजी दत्तांनी रायगडाच्या सातमहालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला. राणीसाहेबांना बघताच त्यांनी अदबीने झुकून मुजरा दिला.

“या सुरनीस, अभिषेकविधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो.” सोयराबाईंनी मुद्दयाला हात घातला.

रायगडावर राजे, युवराज नव्हते, म्हणून मनातील एका पेचाची उकल करण्यासाठी अण्णाजींना सोयराबाईंनी चंद्राकडून महाली याद केले होते. “जी. सर्व तपशील सिद्ध झालेत.” अण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नाचा जाब दिला. एवढ्यात महालाच्या अंत:पुरातून चंद्रा कुणबिणीच्या हाती हात दिलेले रामराजे बैठकी दालनात आले. त्यांना बघताच अण्णाजींनी त्यांना मुजरा दिला.

रामराजांना जवळ घेत सोयराबाईनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोतीकंठा उगाच पुन्हा ठीक केला. तसे करताना अण्णाजींना नेमक्या मुद्दयावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला. “मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्यासाठी कसले विधी आहेत?” सोयराबाईंची जरबी नजर अण्णाजींच्या थोराड पगडीभोवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंधटिळ्यावर बसली.

अण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमानेने गप्पच उभे राहिले. “का? सुरनीस, यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत? तुम्ही गप्प का?” सोयराबाईचा आवाज बांधील झाला. “जी. आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेकप्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही!” अण्णाजी तोलून बोलले.

“मतलब? हे स्वारींचे कुणीच नाहीत? मग यांना मुजरे तरी कशाला?”

“गैरसमज होतोय राणीसाहेब. यात आमची काहीच कसूर नाही. खुद्द स्वामींनीच आचार्यांना अभिषेकविधी ठरविण्याचे सर्व अधिकार दिले आहेत.” “तेच आम्ही म्हणतो. आचार्यांना गडाची ओळख दोन दिवसांची. त्यांच्या कामात काही वाण राहिली, तर ते बोलणार कोण? तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय?” अण्णाजींना फिरवून-फिरवून सोयराबाईंनी नेमक्या तिवड्यावर आणले.

“जी. आम्ही हे बोलू. पण आचार्य ते मान्य करतीलच, असा विश्वास कसा द्यावा?”

“तुम्ही बोला तर खरे जी.” अण्णाजींची पगडी मंद डुलली. सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा देत, ते पिछाडीच्या कदमांनी महालाबाहेर पडले. काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा, मंत्रिवाडीतील अण्णाजींच्या घरी जाऊन हळीदकुंकवाचे आमंत्रण देऊन आली.

सायंकाळी महाली आलेल्या अण्णाजींच्या कबिल्याची सोयराबाईंनी खण-शालूवर मोतीबंद नथ ठेवून ओटी भरली! आणि ती भरत असताना त्या हसून म्हणाल्या,

“आपल्या माणसांचा असा राबता असला, म्हणजे मनास बरं वाटतं!” सरंजाम-शिंबदी पाठीशी घेत राजे-संभाजीराजांसह शिवथरघळीच्या वाटेला लागले. ओढे, पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन:पुन्हा फेर टाकू लागला – ‘कसे, कसे दिसत असतील स्वामी समर्थ? सूर्यभक्त. रामसेवक संन्यासी. संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठांत नांदवणारे! केवढ्या मानतात मासाहेब त्यांना!

लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानच कुदणीला पडलेय, असे वाटावे, तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ, शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते.

“जय जय रघुवीर समर्थ!” या खडया बोलामागोमाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले – “शंभू$ खुद समर्थच येताहेत! आघाडीचे. उतार व्हा.”

राजांनी रिकीब सोडली. मोजडया उतरल्या. चटक्या पावलांनी तरातर पुढे होत, त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला. “रामरूप व्हा!” राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले. कमळपाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भुंगे घुमून उठले. “बहुतां जन्माचे सेवटी। नरदेह सापडे अवचट।”

“रघुदास व्हा!” जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला.

उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत, तेजवान मुद्रेवर नजर जोडली. पाऊसधारांत निथळलेला नि श्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा, तशी ती मुद्रा होती! निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली, चारी पुरुषार्थ जिंकलेली, संन्यासी! गोसावी! बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे, अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित बर घेत ते म्हणाले –

“तुम्ही – युवराज… संभाजीराजे. अं!”

“जी.” संभाजीराजांच्या कानातील सोनचौकडा मंद डुलला.

“रघुकृपा.” डोळे मिटते घेत, समर्थ पुटपुटले.

“स्वामींनी पुढं येण्याची तसदी घेतली.” राजे प्रेमभावाने म्हणाले.

“अवघा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे राजे! चला.” समर्थांनी घळीच्या रोखाने हात उभारला. दुतर्फा जगदंबेचे भुत्ये घेऊन तो गिरिकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंखांचे नाद उठले. त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगांची थरथरती ललकारी मिसळली. घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले.

“स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत.” चौथरावजा एका दगडी वैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत-मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता. समर्थांच्या समोर अंथरलेल्या घोंगडीवर राजे-संभाजीराजे पलख मांडयाची बैठक घेऊन बसले होते. मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले. मग गुहेवरची धोंड हटावी, तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठांतून आशय पाझरू लागला.

“तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे. त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो! आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात. आम्ही धन्य झालो! सिवबाराजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे – आमच्या तप:सामर्थ्याचे! डोंगरदरीत राहणारे आम्ही गोसावी. आम्हाला लौकिकाचे बंध नाहीत. जनलज्नेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे. नाहीतर तो भारच आहे! आम्हाला लौकिकात गुंतवू नका.”

“तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा. मनी किंतू न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे.” डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाशगुहेत शिरले.

“जी.” घोंगडी थरथरली.

समर्थांच्या दाट दाढीमिश्यांनी मखर धरलेल्या ओठांतून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पिता-पुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर-गाभारा झाली. रामबाण शब्दांनी भरू लागली.

“जयास वाटे जिवाचे भय। त्याने क्षात्रधर्म करू नये|
काहीतरी करून उपाय। पोट भरावे।।
नजर करार राखणे। कार्य पाहून खत्तल करणे|
तेणे रणशुरांची अंत:करणे। चकित होती।।
देखोनी व्याघ्राचा चपेटा। मेंढरे पळती नानावाटा।
मस्त तो रेडा मोठा। काय करावा?
उदंड मुंडे असावी। सर्व ही एकत्र न करावी।
बेगळाली कामे द्यावी। सावधपणे।।
मोहरा पेटला अभिमाना। मग तो जीवास पाहेना।
मोहरे मिळवून नाना। मग चपेट मारी।।
अमर्याद फितवेखोर। त्यांचा करावा संहार।
शोधिला पाहिजे विचार) यथायोग्य।।
मर्दे तकवा सोडू नये। तेणे प्राप्त होतो जय।
कार्य, प्रसंग, समय। ओळखावा।।
दोन्ही दळे एकवटे। मिसळताती लखलखाटे।।
युद्ध करावे खणखणाटे। सीमा सोडूनिया।।
देवमात्र उच्छादिला। जित्यापरीस मृत्यू भला।
आपला स्वधर्म बुडविला। असे समजावे।।
महाराष्ट्र देश थोडका उरला। राजकारणे लोक शोधिला।
अवकाश नाही जेवायाला। उदंड कामे।।
लोक पारखून सोडावे। राजकारणे अभिमान झाडावे।
पुन्हा मेळवून घ्यावे। दुरील दोरे।।
देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा|
मुलूख बडवा की बडवावा। धर्मसंस्थापनेसाठी।।
जय जय रघुवीर समर्थ!”

रामनांदी उठवून समर्थांनी डोळे उघडले. बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्तीजवळ गेले. खांद्याएवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हातसरावाचे होते. समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे-युवराज घोंगडीवर खडे झाले होते. राजांच्यासमोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, “आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. हा आमचा कोदंड घ्या राजे! तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी-भेट! आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे. आणि या प्रसंगी ते योग्य आहे. घ्या. विजयवंत व्हा!”

हातांतील कोदंड समर्थांनी पुढे केला. राजांच्या पापणीकडा दाटून आल्या. झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला. कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला. तसाच तो संभाजीराजांच्या हाती दिला. डोळे मिटून तो ‘गोसावी-कोदंड’ कपाळीच्या शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला – कधीही न हटण्यासाठी –

“जयास वाटे जीवाचे भय। त्याने क्षात्रधर्म करू नये।”

धनुष्य-भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काहीएक बोलू गेले. पुन्हा थांबले. त्यांनी राजांना नजर दिली. नटी “बोला. नि:संकोच बोला युवराज.” समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही.

“नाही – आम्ही म्हणणार होतो की -” संभाजीराजे अडखळले.

“सांगा. काय आहे?” समर्थ हसले.

“स्वामींनी जसे महाराजसाहेबांचे रूप श्लोकांत उभे केले आहे, तसे – तसे आमच्या मासाहेबांचेही केले, तर आमचे कान धन्य होतील!”

न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली! निर्धाराने त्यांनी ती परतविली.

“युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही! केवळ ऐकले आहे! आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही गब्दांत उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला. पण -पण त्यांनी हा समस्तास जिताजागता ‘शिवबोध’ घडविला आहे!” समर्थांनी राजांच्याकडे हात केला. “बाल्मिकींनी रामायण रचले, पण त्यांनाही कौसल्यामातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू?”

राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले. संभाजीराजांनी द्रोणागिरिधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवसफुटीला राजे-संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पायसोबत द्यायला समर्थ घळींच्या कुंपणापर्यंत आले. निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, “राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा! आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे, हे सांगा. या, रामरूप व्हा! जय जय रघुबीर समर्थ!” समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोहोचले होते –

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment