महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,465

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८६

By Discover Maharashtra Views: 2439 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८६ –

दोन दिवसांनंतर पाचाडी परतलेल्या राजांना शामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्यावेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकल्स शामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी शामजीने तोंड खोलले – “दोन दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे.” शामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे शामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, “शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही! आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ!”

राजांनी शामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते! शामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले, हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये, यासाठी ते कळणे आवश्यक होते! जसे संभाजी राजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमससाहेबाच्या हातात काहीही पडले नाही! ‘शिव’ आणि शंभो” यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमससाहेब अळणी तोंडाने मुंबईला परतला!

पावसाने रिकीब भरले. धारा उधळीत मावळी आभाळ गर्जू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गर्जते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हारकारा त्या पाणघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, “गारठ्याने मासाबांचं सांदं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्लीया.”

आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख-चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यांत तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले. न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशव पंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्द-मौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम, भगवे उपरणे लपेटलेल्या केशव पंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धूपाची वळी महालभर फिरली होती.

स्वच्छ, संथ वाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ, संभाजीराजे, पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकूमत केवढी बेलगाम आहे, हे सांगताना समर्थांनी म्हटले होते –

“सरता संचिताचे शेष। नाही क्षणाचा अवकाश।
भरता न भरता निमिष। जाणे लागे।।
मृत्यू न म्हणे हयपति। मृत्यू न म्हणे गजपति।
मृत्यू न म्हणे नरपति। विख्यात राजा।”

मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोदंडासारखी टणत्कारी झाली होती.

“मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वा क्रूर
न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी बलाढ्य वा धनाल्य।।
न म्हणे हा चक्रवर्ती करामती वा भूपती।
न म्हणे हा मुद्राधारी व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ।।
न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न धूर्त बहुश्रुत वा पंडित।
न जाणे हा वेदज्ञ, शास्त्रज्ञ सर्वज्ञ वा महाभला।”

केशव पंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ हे टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता. धरल्या आवाजाने केशव पंडित पुढे वाचू लागले –

“गेले बहुत वैभवाचे। गेले बहुत आयुष्याचे।
गेले अगाध महिमेचे। मृत्युपंथे।।
गेले बहुतां बळांचे। गेले बहुतां काळांचे।
गेले बहुत कुळांचे। कुळवंत राजे।।”

मृत्यूचे विकराल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्तिमार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली –

“बहुतां जन्माचे सेवटी। जेणे चुके अटाटी।
तो हा नरदेह भेटी। करी भगवती।।
देह परमार्थी लाविले। तरीच याचे सार्थक जाले।
नाही तरी हे वर्थचि गेले। नाना आघाते मृत्युपंथे।।
जीव जीवांत घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा।
राह राहो शोध घ्यावा। परांतराचा।।
जो जगदंतरे मिळाला। तो जगदंतरेचि जाला|
आरत्री परत्री तयाला। काय उणे
काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी।
चटक लावुनी सोडावी। काही एक।।”

स्वत: जगल्या-भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पुजल्या-भजल्या श्रीरामाच्या वर्णासारखे निळे आकाशबोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले –

“बहुतां जन्माचे सेवटी। नरदेह सापडे अवचट!
येथ वर्तावे चोखट। नीतिन्याये।।
कीर्ति पाहता सुख नाही। सुख पाहता कीर्ति नाही।
केल्यावीण काहीच नाही। कोठे तरी।।
उत्कट, भव्य तेचि घ्यावे। मिळमिळीत अवघेचि टाकावे।
निःस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी ।।”

एवढे काळीजवेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते –

“सरली शब्दांची खटपट। आला ग्रंथाचा शेवट।
येथे सांगितले स्पष्ट। सद्गुरू भजन।।”
“जय जय रघुवीर समर्थ!”

केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांतून पाझरलेले अश्चू कुणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भणभणत राहिला –

“मृत्यू न म्हणे चक्रवर्ती प्रतापी मुद्राधारी।
गेले बहुत कुळांचे। कुळवंत राजे।।
काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी।
जीव-जीवात घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा।।
उत्कट भव्य तेचि घ्यावे। मिळमिळीत अवघेचि टाकावे।
बहुतां जन्माचे सेवटी। नरदेह सापडे अवचट।।
येथ वर्तावे चोखट। नी तिन्याये।।”

आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीच होते. पावसाळी लाल पाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या.नेहमी प्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हातांनी देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, “बरेच दिवस झाले. तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता?”

“थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामुली निमित्तानं गैरमेळ पडतो, असं आमच्या कानी येतंय.” जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजी राजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, “आपल्या पायांची आणबेल मासाहेब. आम्ही त्यांना खूप मानतो. पुष्कळ अदब ठेवतो.”

“अदब हा जनान्याचा रिवाज. पुरुषांनी सोशीक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली, तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं, तोवर आमचा हात तुमच्या पाठाशी राहिला. आता आम्ही थकलोत.” दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, “हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही! असेल त्या वकुबानिशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं. हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा, पण तिचेसुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही! लहान-थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हांस सांगतो आहो.”

“जी.” संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला.

“जा. बाहेर झड सुमार झालीय काय बघून या.” जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली.

थोड्याच वेळात रायगडच्या मावळमाचीवर बार्दाराने धरलेल्या भगव्या जरीपटकक्‍्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, “मासाहेब, महाराजसाहेब माचीवर आले.”

ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठांतून सहजी शब्द सुटले – “औक्षवंत व्हा!”

माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले मात्र; त्यांना वाटले – “जसं आबासाहेबांचं केलं आहे, तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील. इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे!’

पावसाळी नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलांच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान दोन घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोलखान यास जीवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती. आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता.

दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. चारच दिवसांत त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठांआड रिचवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, “यादवराव, आमच्या संगती या.” त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या, पंजा उगारलेल्या, पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. “आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी.” राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले –

“काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी! ”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment