महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,934

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७३

By Discover Maharashtra Views: 2466 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७३ –

नेहमीसारखी धाराऊ येसूबाईना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊंच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड-रायगडाकडे कूच झाले होते. रोषणनाईकाने महालीची शमादाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊसाहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी शमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डुईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक-एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊंना सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या.

संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी,अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि जोत्याजी केसरकर अदबीने उभे होते.

“शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज! येसू, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या!” जिजाऊंनी धाराऊकडे हसून बघत येसूबाईना साद घातली. धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवट्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, “औक्षवान व्हा! जे करणं-भोगणं असेल, ते जोड-साथीनं भोगा!”

येसूबाईंच्या हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले. आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, “नातसूनबाईंचा चेहरामोहरा त्यांच्या आबा-आऊसारखा शिर्क्यांच्या माटानं आहे, पण – पण डोळे आहेत, साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे! टपोरे – दूरचे बघणारे! ‘

जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक-एक करता राजांच्या गोतावळ्यातील असामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे, त्या सोयराबाई आपल्या चंद्रा दासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या! महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईच्या जवळ येत, त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, “येता आमच्या महाली?”

येसूबाईनी मान डोलावली – होकाराची. आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या “लेकी ‘ची पाठ धरली. सोयराबाईच्या मागून चालणाऱ्या येसूबाईना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले- ‘आपण स्वत:च जावं सूनबाईना सोबत -‘ पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या!

आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रा दासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कडपेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईच्याजवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, “हे आमचे डाग आहेत तळबीडाहून माहेरकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा.” पेटीत बाजूबंद, मोत्याचे सर. पैंजण्या, रजपुती धाटणीच्या बिद्या, वाक्या, टिका होत्या. सोयराबाईचे मूळ मोहिते घराणे राजपुतान्यातील. रजपुती रक्ताचे म्हणूनच त्यांचा वर्ण केतकगौर होता. त्यांना दागिन्यांचा षौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती.

येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसूकच त्यांची नजर धाराऊकडे वळली. “काय करावे? ‘ ते विचारण्यासाठी. सोयराबाईच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, “धाराबाई, सांग सूनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात.”

“हो त्येच्यावर ठेवा हात सूनबाई. ह्यो, आपलाच म्हाल हाय.” धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला! ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी, कसलीतरी एक छटा होती.

झटकन ती टिका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली. आणि खुद्द आपल्या हातांनी ती टिका येसूबाईच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत, ओढून ती टिका येसूबाईच्या गळ्यात नीट बसती केली.

मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. “आम्ही एकट्याच बोलतो आहोत. तुम्ही काहीच बोलत नाही, सूनबाई!” सोयराबाईंनी मध्येच थांबून, घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईनी मान उठवून त्यांच्याकडे नुसते पाहिले. पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

“आम्ही तरी कशा वेड्या? आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता! तुमची बोली शृंगारपुरी – कोकणी – कुणबाऊ! अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही म्हणूनच तुम्ही संकोचता!! तसे करू नका. बोलत चला.” जे सांगायचे होते, ते सोयराबाईनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले!

ते ऐकताना येसूबाईना स्वत:ला कधी जाणवला नव्हता, तो दोष जाणवला! आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला – ‘आपणास गडाची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे. जिभेवर बसती केली पाहिजे! ‘

सोयराबाई आता टिकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही, हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईचा पालटलेला मुखडाही जाणला. ती म्हणाली, “दोपारचा उपास सोडायचा हाय न्हव? निगू या सूनबाई!”

ते ऐकून येसूबाई उठल्या. “येतो आम्ही,” म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महालाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टिकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा मघासारख्याच! त्यांना येसूबाईंचे हसू आले. पेटीत एवढे रजपुती माटाचे मोत्याहिऱ्यांचे डाग असताना येसूबाईनी हात ठेवला, तोही कोकणी टिकेवरच!

धाराऊला मात्र वाटले की, मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे – “बोली कंची असती यापरीस मायेचा पीळ कंचा असतो, त्येला लई धारण असती रानीसरकार! ‘ पण ती काही बोलली नाही. येसूबाईच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली, “कुंकू-हळद सोडून तरी चढवायचा हुता डाग सूनबाईच्या गळ्यात!!”

बालेकिल्ल्याच्या सदरचौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्‍याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध प्िंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनीन धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता.

पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पायपंजांवर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भवत्याने गोमाजीबाबा, जोत्याजी, महमद सैस, अण्णाजी, वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. महमद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरणुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत खुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवबर केपाची टाप बसती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले.

उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बसता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बार फेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता. त्याने सावचित्ताने “धाकल्या राजां ‘नी पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून जोत्याजीने तो खाली टाकला.

बावट्याची खूणगत मिळताच पटांगणातील खरिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले! हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुरांची बळी उठली. आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छऱ्यांबरोबर पिंजराच्या गवतकाड्या उसळल्या. जोत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण-चाळण होऊ लागली. बार टाकून-टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता.

एकसुराने पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली, त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच बर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणिसांकडे बघितले. सा य व गवर सिद्दी फत्तेखानाच्या जंजिऱ्याबर चालून गेलेले राजे, फौजेसह गड चढत होते. उसळते लोळ मावळत्या लांबट किरणांत पसरलेले संभाजीराजांना दिसले. महमद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की, गडावर आले की महाराजसाहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात.

जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊ राजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते, शमादाने पाजळली तरी राजे येत नव्हते! त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले, विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली.

“काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो.” जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले.

“हबशांवर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फत्तेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण – पणदी संबूल, कासम आणि खैरतखान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला.” बोलते राजे थांबले.

“मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलंत? राजे, हार कुणाला चुकली? देवादिकांनाही ती चुकली नाही.” चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा, तशी जिजाऊंची नजर वाचली.

“मासाहेबांच्या कानी आलं तर सारं?” घोगऱ्या सादात राजे म्हणाले.

“कशाबाबत म्हणता?” जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली.

“देवादिकांच्याबद्दल?” राजांचे बोल जडावू लागले.

“बोला राजे. काय झाले?” जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या.

“आमचे राजेपण व्यर्थ आहे मासाहेब. आपले पुत्र म्हणवून घेण्यास आम्ही शरमिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता, जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्यातरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास.” राजे थांबले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७३.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment