महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७०

By Discover Maharashtra Views: 2440 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७० –

अण्णाजी दत्तोंच्या मदतीने मुलखाची ऐनजिनसी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानुजाबता घालून दिला. कडक नियम जारी केले.

“लष्कराने पाऊसकाळात चार मास आपल्या राहणीच्या मुलखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेबकामावरी रुजू व्हावे. आठ मास मुलूखगिरी करोन पोट भरणे ते भरावे. स्वारीत बायाबापड्यांनी बदअमल करू नये. मुलूखगिरीस जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यांबर जमेनिसास झाडा द्यावा. गैरवाका वर्तू नये. कानुजाबत्यास बाध आणील, त्याचे हात जल्लादाकरवी कलम होतील. ‘ असा लष्कराचा कडक जाबता राजांनी घालून दिला.

जमीनधाऱ्याबद्दल मलिकंबरला मागे टाकील, असे धोरण राजांनी घालून दिले. “गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि चार जाणते कदीम गावकरी अशा सात असामींनी मिळून जमिनीचा वकूब बघून प्रत ठरवावी. एकपिकी, दुपिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्यामानाने सरकारी धारा बसवावा. जे रयतेस धारा नगद पैक्याचे रूपाने देणे निभत नसेल, त्याजकडून ऐनजिनसी धान्यरूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर, बैल, बियाणे जो वस्तभाव कसणुकीस लागेल, तो सरकारफडातून कुणबियांस वख्ती द्यावा. ‘ हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजीराजांच्या समक्ष ते सारे घडत-बनत होते.

सदरेवर बसलेले राजे, आपल्या कुणबी आणि धारकरी यांच्यासंबंधी बोलताना केवढ्या मायेने भरून येतात, हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधीमधी त्यांच्या मनी विचार येत होता – “तसा फावला समय हाताशी आलाच, तर महाराजसाहेब उठतील. आम्हास संगती घेऊन एखाद्या बाडीत जातील. अंगचा निमा-टोप-चोळणा उतरवून ठेवतील आणि धोतराचा काच मारून, मुंडं अंगी चढवून बैलजोडीचा माग धरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील!! आम्हास म्हणतील – शंभूराजे, तो कोढता घ्या. आम्ही केलेल्या नांगरटीतील ढेकूळबाब सपाटीस लावा.”

राजगडाची सदर मंत्रिगणांनी सजली. पेशवे मोरोपंतांनी दर्पणासारखी कापडी अस्तरावर चिकटवलेली खलित्याची उलघडती वळी धरली होती. त्यांनी डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लोंबून हिंदोळत होता. सदरबैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवशाच्या दालनात पडद्याआड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईच्या शेजारी खालच्या मानेने येसूबाईंनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. “या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील? ‘ पण त्या मान वर घेण्याऐवजी अधिकच खाली ठेवून नुसत्या ऐकत होत्या. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसूबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता, राजांची नजर – इशारत मिळताच वाचू लागले. संथ, धिमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले.

“मशहुरल अनाम, दाम दौलतहु शाहजादे मुअज्जम, सुभे दख्खन यासी – प्रति सिवाजीराजे दंडवत उपरी विशेष –

“प्रस्तुत ल्हेयावयास प्रयोजन की, आम्ही आगरियाहून प्राणभयाने आमचे देशी निघोन आलो. आमचे फर्जद शंभूराजेही जातगतीने देशी पावते जहाले. आला हजरत साहेबाची गाठीभेटी घेवोन निघणे, ते काही घडले नाही! ते कोण कारणे, हे तुम्ही जाणता. हर प्राणिमात्रास आपला जीव प्यार!

“हे गोष्टी जरी घडली, तरी आम्ही हजरतसाहेबांचे बंदे चाकर! सेवेसी हरभातेने तत्पर आहोत. तुम्ही येविशी हजरतसाहेबांची समजूत पाडली पाहिजे! आमचे फर्जंद संभाजीराजे पादशाही लष्करी चाकरच असत! आमचे गडकोट दौलतबाब पादशहांचे चरणी अर्पणच आहे! हे समजोन फर्जंदास चाकरीस समय दिल्हा पाहिजे! मुलूख बनेल, तो बनवून आणिला पाहिजे! बहुत काय ल्याहावे, जाणिजे.”

औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंतसिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांशी दुष्मनगिरी नको होती. राजकारण म्हणून नव्हे, सुरक्षितता म्हणून! त्याला वाटत होते, आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजीच्या तोंडी घातले आहे. आणि समोर येईल, त्या शाही तेगबहाद्दराचे शिवाजी ‘तोंडीलावणे’ कसे करतो हे तो बरे पारखून, समजून होता. राजांनाही आपला मुलूख उभा राहीपर्यंत मुगलशाहीची हातघाई नको होती. त्यांना दख्खनसुभा मुअज्ममशी तहाची बोलणी लावायची होती.

तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रिगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले एवढे आग्ऱ्यातील प्राणसंकट टळले नाही, तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थ ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी आवजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश आले. त्यांनी मुजरा रुजू घातला. राजांचे ‘हेजिब ‘ म्हणून बाळाजी औरंगाबादेला जाणार होते. मोरोपंतांनी खलित्याची बळी थैलीत सरकविली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हातस्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखर खडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लख्खन उतरले.

येसूबाईंनी मोठ्या धीराने पडद्याआड राणीवशात मान उठवली. कुणालाही कळणार नाही अशी! पलीकडच्या बैठकीवरचे झिरझिऱ्या पडद्यातून टोप बघण्यासाठी! पण त्यांना काहीच दिसू फावले नाही! वाकून थैली हाती घेणाऱ्या बाळाजींच्या आड टोप दडले होते!

“बाळाजी, सारे शांतपणे कार्यी लावा. हा सुलूख बनला पाहिजे.” राजांनी बाळाजींना बोल दिले.

“आज्ञा स्वामी!” स्वत:चाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले.

“शंभूराजे, हा सुलूख मान्य झाला तर… तर तुम्हास शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल, औरंगाबादेस. एकटे! जाल?” राजांनी शांतपणे विचारले.

“हां, जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेस पडली. संधी मिळाली, तर ती आणखी नजरेखालून घालू!” संभाजीराजांनी उत्तर दिले. राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊ गंभीर होत्या.

वेरूळच्या आठवणीबरोबर संभीजीराजांना आपली नजर चिकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही! पण त्यांनाही पलीकडचे काहीच दिसू फावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेले. औरंगाबादेची, वेरूळच्या लेण्यांची!!

“म्हाराज, नाईक आल्यात!” महालीच्या खिदमतगाराने आत येत वर्दी दिली.

“पेश येऊ देत.” राजांच्या पायफेऱ्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी थांबले. बहिर्जी नाईक महाली पेश आला. मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांच्या दशा झुकताना डुलडुलल्या.

“धनी, मोगलाईत अडकलेलं रघुनाथपंत आन्‌ त्रेंबकपंत सलामतीनं सुटलं. गड पायथ्यालगट आल्यात. पर पार दशा झाली त्येंची.” बहिर्जी खिनभर थांबला. राजांना आठवले –

“आम्ही आग्ऱ्यातून निसटलो, पण रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. फौलादखानानं त्यांना मरणयातना देऊन त्यांचे हाल-हाल केले, कानावर आले. खरे तर ते मरायचेच, पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलुखाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामांसानिशी सोडून दिलं… त्या अर्थी सुलूख होऊन तह होणार हे नक्की झाले…. ‘

“धनी, त्येररी पांघराय धडुती धाडाय पायजेत. पार रया ग्येलीया त्येंची. आन्‌…”बहिर्जी अडखळला.

“बोला नाईक आणि काय?”

डुईचे मुंडासे डावे-उजवे होलपटून टाकणाऱ्या बहि्जींचा गळा गन्च झाला –

“न्हाई धनी, खबर पायवं घालाय जबान उचलत न्हाई.”

संथ पावले टाकीत राजे बहिर्जींजवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला.

“नाईक, आम्ही कैदेत असता आमचे काही बरे-वाईट झाले असते, तरी ती खबर तुम्हास मासाहेबांच्या कानी घालावी लागलीच असती! खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावे लागते. बोला. कोण खबर?”

“म्हाराज… दिल्लीच्या जुम्मा मसुदीत नेताजींचा सुंता जाला! नाव पालटलं. माहमद कुलीखान क्येलाय त्येंचा. नेताजी मुशिनमान जालं. त्येंचं कबिलं निसारखानानं मुलखातनं दस्त करून दिल्लीला धाडलं. त्येंस्री बाटवून त्येंच्यासंगट मौलानांनी पुन्यान त्येंच निकं लावलं.” बहि्जींचा रामोशी आत्मा नेताजींच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यांतून इमानी पाण्याचे थेंब टपकले.

बहिर्जींच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी! घोड्यांच्या टापांनिशी उसळत फिरणारा एक धगधगत्या आगीचा झंझावात! “नेता ‘ आज “नव्हता ‘ झाला! अंगाराचे कोळसे झाले. बहिर्जी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मूठ नकळत परजात जमदाडीवर अट नावळली गेली होती. तापल्या शिसाचा रस ओतल्यागत कानपाळी रसरसून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तसबीहच्या माळेचा हात! आणि – आणि क्षणाक्षणाला त्यांची परजावरची मूठ घट्ट-घट्ट आवळली जात होती! नकळत!

राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरगजेबाने राजांचा सुलूख मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शहाआलम मार्फत राजांना औरंगजेबाचा हस्बुल हुक्म आला. शंभूराजांच्यासाठी! तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मन्सबदारी देण्यात येणार होती. चार हजार स्वारांची! वऱ्हाड, खानदेशीच्या जहागिरीचा पंधरा लक्ष होनांच्या मुलखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता!

औरंगजेब धोरणी! त्याने ही हत्तीची दाखवीत, उंटाची चाल टाकली होती! शांतपणे वाकडी! जहागिरीचा मोकासा वऱ्हाड-खानदेशचा. म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल! “मन्सबदार ‘ म्हणून शिवाजीचा बन्चा पुन्हा आपल्याकडे “ओलीस ‘च राहील! नाहीतर त्याला संभाजीराजांना, पुरंदरच्या तहात मिळालेल्या मावळमुलखाचा मोकासा देत आला नसता का? ते केले तर, तो ‘औरंगजेब ‘ कसला?

“मोरपिसांचा जुडगा ‘ म्हणून तो आपल्या तोंडावर ‘खाजकुयरीची पाने ‘ फिरवू पाहतो आहे हे राजांनी हेरले. त्यांनी दिल्ली दरबारला स्पष्ट कळवून टाकले, “जहागिरीचा मोकासा घेणे, तो आमचे फर्जंद संभाजीराजे अदबगर्जीने घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजी रावजी मुतालिक रवेशीने पाहतील! फर्जंद जहागिरीवरील मुक्कामास असणे, ते होणे नाही!!”

राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्ञमचे पत्र आले -“जहागिरीची वस्त्रं आणि फर्मान घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादेला पाठवून द्यावे!”

राजांचे बहिर्जी, कर्माची, विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रोखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला. हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते. ते स्वत: असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे! एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवायला तयार झाले होते! या चालीचे यश मुअज्ञमचा स्वभाव कसा आहे, यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७०.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment