महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६६

By Discover Maharashtra Views: 2405 11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६६ –

काळाने दिवसरात्रीचे काळे-पांढरे ‘गरुड-पाख’ आपल्या टोपात खुपसले! दीड महिन्यांचा काळ मागे पडला. मजल, दरमजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्यासी वेषात! उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गडपायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली, “आईसाहेब, राजे… राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत – संन्यासी वेषात! पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरलो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे!” भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले! मिरमिरटताना क्षीण आवाज उठला, “जगदंब! जगदंब!”

भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का, ते पाहिले! ती दिसत नव्हती! जिजाऊ काळीजभर चरकल्या. ‘आई, मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो. कोप करू नको. आम्ही लेकरू!’ जिजाऊंनी दाटल्या नेत्रकडा निपटल्या. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला सोशीक माथा टेकविला मोरोपंत आज्ञेसाठी खोळंबले होते, याचे भान जिजाऊंना उरले नाही पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले “आम्ही निघावं आईसाहेब?”

त्यांना हात-इशारतीने जवळ बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक-एक शब्द म्हणाल्या, “पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगती! संन्याशाच्या वेषात आऊसमोर येऊ नये म्हणतात! या!” जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती. पायथ्याशी कोण-कोण आले आहे, याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावांची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले.

गडपायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या वैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यांनिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले, खांदाभेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोना पाझरावा, तसे पंतांचे डोळे पाझरू लागले.

“राजांनी तातडीने चलावे. मासाहेब…” मोरोपंतांचे शब्द घशातच घुटमळले. “निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये, असा शास्त्रबंध आहे.” पंतानी जिजाऊंचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्म-पट्टे वर चढले. ‘हे ध्यानी नव्हते राहिले!’ राजांनी भस्मपट्टयांना मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले. तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छाटीला त्यांनी ती उतरण्यासाठी हात घातला. लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाटी चढली – “आम्ही ही छाटी उतरतो आहोत… पण… पण शंभूबाळांच्या अंगी ती आजही असेल! हे असे विचार, असे क्षण पाठलागावर पडले की, वाटते अंगची छाटी कधी उतरूच नये! पुत्र संन्यासी वेषात, पिता राजपेहेरावात हा कसला खेळ! काय आहे आईच्या मनी?”

“जगबंद, जगबंद!” राजांनी छाटी उतरली. अंगी चढवावा म्हणून त्यांनी घोंगडीवर मांडलेल्या एका तबकातील जामा उचलला. आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाभळीचे बनचे बनच फुलले! डोळे ताणून ते हातातील आखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले! तो शंभूराजांचा होता! त्याच्या एका दर्शनाने राजांचे ‘राजेपण’, ‘संन्यासीपण’ घुसळून दूर फेकून दिले. नको तो विचार राजांच्या ‘आबा’ म्हणविणाऱ्या मनात चौखूर घुसला – ‘शंभूबाळ सलामत आले नाहीत तर?’ पेहराव करून, कपाळी शिवपट्टे भरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी, मंत्रिगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ-माणूस गर्दीने पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यांवर टेकू लागल्या. इमानी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. बाराबंद्यांचे बंद ताणव देऊ लागले. माणसे “हरवलेला राजा” डोळ्यांच्या म्यानात तलवारीगत आबादानीने साठवून घेऊ लागली. त्या कल्लोळात एकट्या मोरोपंतांखेरीज, बैरागी सोडले तर, शंभूराजांचे भान कुणालाच आले नाही.

पेहरावाचे एक तबक तसेच परत आलेले पाहून मोरोपंत मनी चरकले होते. आपल्या माणसांना राजदर्शन देऊन राजे पालखीत चढले. त्यांनी पालखीचा राजगोंडा हाती धरला. आणि एका पेचाने त्यांच्या मनाचा राजगोंडा करून मुठीत घट्ट धरला! “आता मासाहेब विचारतील – आमचे शंभूबाळ कुठे आहेत?’ आमची वाट पाहून शिणल्या-थकल्या त्यांच्या कानी काय घालावे? राजांच्या मनाला पालखीच्या चाली बरोबर हिसके हिंदोळे बसू लागले. मन सुन्न झाले

फार दिवसांनी पाली दरवाजावरची नौबत दुडदुडली. राजे बालेकिल्ल्यावर आले. त्यांची मुद्रा निर्धारी दिसत होती. डोळे मासाहेबांना शोधण्यासाठी हरणाचे पायखूर लावून दौडत होते. सदरजोत्यावर जिजाऊ उभ्या होत्या. पाठीशी, उडू बघणारी डोळ्यांची मावळपाखरे गोंदल्या मनाने मुश्किलीने थोपती करून धाराऊ उभी होती. खाशांच्या संगतीत राजे सदरचौकात प्रवेशले. समोर जिजाऊ उभ्या होत्या. आसवांची अगणित सफेद फुले जगदंबेच्या चरणांवर गाळून आता देहच तिथे टाकावा काय, या विचाराने थरारलेल्या प्राजक्ताच्या कुलवंत झाडासारख्या! परिस्थितीच्या घोडेटापांनी निर्दयपणे तुडवून टाकलेल्या, मंदिराकडे जाणाऱ्या समर्पित पायवाटेसारख्या! भवानीने उधळलेला भंडारा मिठीत सामावून घ्यायला आसावलेल्या परडीसारख्या!

क्षणभर राजांचे पाय फरसबंदीला जागीच चिकटल्यागत झाले. दुसऱ्याच क्षणी भरतीच्या समुद्राचा उसळता भावकल्लोळ उरी घेऊन राजे झपाझप चालले. टोपाची मोतीलग हिंदकळली. तिचे डुलते फुलोर तेवढे जिजाऊंना कसेबसे दिसले. मग डोळ्यांवर आसवांची सफेद तावदाने सरसरून दाटत उतरली! त्या तावदानांतून एक धूसर सोनस्वप्न समोर येत होते. एक थरथरता तेजाळ पोत जवळ येत होता. बाकीचे काहीच दिसत नव्हते. दिसावेसे वाटत नव्हते. राजांनी पायांवर ठेवलेल्या कपाळाच्या स्पर्शाने जिजाऊ उभ्या देही थरारून उठल्या. त्या थरथरीने त्यांच्या डोळी उतरलेली आसवांची तावदाने खळळकन निखळली!

जिजाऊसाहेबांचा तुळजाई सोशीक आत्मा नेत्रांच्या महाद्वारांनी पाझरू लागला! झुकते होऊन त्यांनी थरथरत्या हातांनी राजांना उठते केले. आणि पहाटवाऱ्याच्या झमकीत सुगंधाचा गुंतवा व्हावा तसे – यमुनेच्या पाणपाठीला सूर्यरस बिलगावा तसे – राजे जिजाऊंच्या मिठीत विसावले!

पुत्रपण भरून पावले. मोहरले. मातृपण मुके, मुके झाले! कृतार्थता कृतार्थ झाली!! चौकात दाटलेल्या हर असामीला ते बघताना वाटले – आपणच “’आऊसाब’ आहोत! राजे’ आपल्याच हातमिठीत आहेत! फक्त एकच कुणबाऊ मनाने शंकेला सुपात घालून थडाथड पाखडायला सुरुवात केली. उडणारे भूस डोळ्यांत चरचरत शिरू लागले. धाराऊच्या!

“ल्येकरू कुटं हाय?’ म्हणत तिचे भिरभिरते डोळे राजांच्या बरोबर आलेल्या बैरागी तांड्यांच्या काखेतील झोळ्या झटकू लागले! तटबंदीचे थोराड बुरूज उचलून ते कुणीतरी क्षणाक्षणाला आपल्या उरावर रचत आहे, असे धाराऊला वाटले! मिठीतल्या राजांच्या रोखाने एक – फक्त एकच शब्द जिजाऊंच्या दाटल्या कंठाला चकवा देऊन निसटला! जन्माष्टमीच्या दिवशी दुधाच्या धारेत न्हाऊन निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या बैठया लंगडमूर्तीसारखा!! मायेने चिंब – चिंब थबथबलेला –

“शिव ब बा!”

त्या सुटल्या शब्दाचे मायाळ थबथबीतपण जिजाऊंचे जिजाऊंनाच जाणवले! त्याने तर त्यांचे कान क्षणात सुन्न झाले, मन भिन्न झाले. त्या सुत्न-भिन्नतेत सारे सारे भाव गुदमरून उठले. आणि क्षणातच आभाळीच्या निळाईत इथून तिथवर विजेची नागीण सळसळत जावी, तशी जिजाऊंच्या भरल्या मनी शंकेची कातरी नागीण वळवळत गेली – “आमचे शंभूबाळ?’

कधी-कधी आठी हातांनी पूजेच्या भरल्या साजाचे तबक परते सारणाऱ्या निग्रही भवानीगत जिजाऊंनी झटकन राजांना विलग केले! त्यांचे खांदे हाततळव्यात घट्ट धरून ठेवीत थरथरत विचारले, “राजे, आमचे शंभूबाळ कुठं आहेत?” त्या बोलांतील मायेचा ओलावा धरून आलेली जरब ऐकताना राजे सुन्न झाले. निशाणकाठीवरून सरसरत खाली जरीपटकक्‍्यासारखे राजांनी डोळे जिजाऊंच्या पायावर टाकले!

राजांचे निसूरपण असह्य झालेल्या जिजाऊंनी आपल्या हाततळव्यातील त्यांचे खांदे गदगद घुसळून टाकीत थरका फेरजाब केला – “बोला राजे बोला!” त्या लटलट्या शब्दांतच नको ती शंका उतरली होती. आपल्या नाकाचा गड्डा हात-चिमटीत धरून, मिटल्या डोळ्यांनी, डुईचा टोप डावा-उजवा झटकीत, मोतीलग होलपटून टाकीत राजे घोगरल्या आवाजात म्हणाले,

“मासाहेब – मासाहेब – आपल्या शंभूबाळांझचा – काळ झाला! ते -ते गेले!!”

ते नको ते बोल उच्चारताना राजांच्या पोटात लख्खकन खड्डा पसरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना दिसला, एक “सावळा हात!’ ‘जगदंबेच्या पोतावर दाटलेली काजळी माखून घेत, तो हात पुढे येतो आहे. आमच्याच रोखाने!’ हा विचार मनी येताच राजे काळीजभर गलबलले!

कानांवर थरथरते हात ठेवणाऱ्या जिजाऊंच्या तोंडून रणशिंगाच्या काळीजमार ललकारीसारखा एकच चीत्कार उठला – “शंभू बाळ! -” उभी सदर गरगरली. बैठकीचा पायचौथरा काढून घेताच जगदंबेची आवेशी मूर्तीसुद्धा खाली ढासळू लागावी तशा जिजाऊ ढासळू लागल्या! “द्येवा रं माज्या!” म्हणत पायच ठार गेलेली धाराऊ तर धाडकन खालीच पडली. तिचे अंग गदगद हलू लागले.

झटकन राजांनी पुढे होत जिजाऊंना सावरले. चौकातल्या पगड्या थरथरून डुलल्या. खाली माना टाकलेल्यांचे इमानी डोळे बाराबंद्या भिजवू लागले. क्षणात सदरेचा नूर पलटी घेत गदगदला. देठ नसलेले फूल हाती असावे तसे झाले! राजे आले म्हणून हसावे की धाकटे राजे गेले म्हणून रडावे, तेच कुणाला सुधरेना.

“आमचे ऐकता… मासाहेब!” राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुन:पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते.

“पंत, धाराऊलाही पाठवून द्या.” राजांनी देवमहालाची इशारत देत, मोरोपंतांना सदर सोडताना आज्ञा केली. देवमहालात आणून राजांनी जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडात पदराचा बोळा कोंबून फुटू बघणारा काळजाचा इस्कोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजांनी दाराला आडबंद टाकला. पूजल्या भवानीच्या पायांवरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्याजवळ आले. “मासाहे$ब!” राजांनी जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साद घातली.

“आमची शपथ आहे. मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे.” भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर घेतली. हातीचे बिल्बदल मासाहेबांच्या हातात देत, तो ‘श्रींच्या’ राज्याचा संकल्प-पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला,

“मासाहेब काळीज टाकू नका! शंभूबाळ मथुरेत सुखरूप आहेत!! औरंगजेबाच्या चौकीपहाऱ्यातून ते सुखरूप सुटावेत म्हणूनच आम्ही ही चाल टाकली आहे! आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून! असे केले, तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत!!” राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बघत पडल्या आवाजात म्हणाले, “यासाठी कधी नव्हे ती आम्ही तुम्हास तापदरा दिली. पण हे समजून घेतले पाहिजे. थोर मनी आम्हास क्षमा केली पाहिजे!”

वेगवेगळ्या भावनांचा काना-उरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मान डोलावीत त्या कसेबसे म्हणाल्या, “शिवबा, तोड काढता; पण ती आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभूबाळांना आमच्यासमोर जलद हजर करा!” डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले, “कसं, कसं म्हणायचं हो?” पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मुथेरत ती केव्हाच जाऊन पोहोचली होती!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६६.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment