महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,835

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४७

By Discover Maharashtra Views: 2437 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४७…

कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊसाहेबांनी आपला “बाळकृष्ण’ राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना रजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे

राजांनी आता जवळ-जवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले.

संभाजीराजांना नजर केलेल्या अन्वर हत्तीवर झूल, हौदा चढविण्यात आला. खासा किरतसिंग संभाजीराजांना अदब-सोबत करण्यासाठी निघणार होता.

नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीक-सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या

होत्या. त्यांचे सावधपण, इमान त्यांनी नकळत हेरले होते.

खासा पेहराव अंगावर चढविलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्यापान पायांना हात लावताना म्हणाले, “आम्ही मुजरा करतो आहोत, दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमचं,आमच्या महाराजसाहेबांचं नव्हे! येतो आम्ही.”

त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झाला भरून आले. एवढ्या कमती वयात एवढी बेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी

अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा रजपूत होता. साठ पावसाळे त्याने बघितले होते.

संभाजीराजांचे खांदे थोपटत तो स्वत:शीच बोलल्यासारखा म्हणाला, “गल्लत किसका है, सही कौन है, वो चंडी जानती है! लेकिन आपको बिदा देते वख्त हमें हमारे मुल्कके राजस्थानका अरवली पहाड याद आ रहा हे! पैरोंमें जलता रेगिस्तान लेकर कळलेच नाही. पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले

आहेत, हे त्यांनी जाणले.

मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या, पराक्रमी,

राजकारणी, रसिक आणि रजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला! मिर्झा राजाच्या शामियान्यातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतीलग बघताना रजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल-खोल जाणवून गेले की – “आपल्या हयातीची मोतीलग तुटून गेली आहे. आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठे केव्हाच विखरून गेले आहेत! मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड

दिलेरखानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, “जिथं मानूस उपाजतं ती जागा साद घालती मानसाला!” त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला!

तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडवीत अन्वर हत्ती पालखीच्या सामने धिमा चालू लागला.

▶ राजगडच्या पाली दरवाजाची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या

महाराजसाहेबांना धुंडीत होती. पण राजे या वेळी पद्यावतीवर आले नव्हते. येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले. सदरजोत्यावर जिजाऊसाहेब उभ्या होत्या. त्या बालेकिल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते! संभाजीराजांच्या

पोटऱ्यांत भिंगरी उतरली. तरातर चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदरजोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊसाहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते.

जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठवून जिजाऊ त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यांत उभ्या राहिलेल्या पाणपडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता!

उंच कडेकपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊसाहेबांना बिलगले होते! शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले.

“महाराजसाहेब नाही आले थोरल्या आऊसाहेब?” जिजाऊंकडे बघत मान उठवून संभाजीराजांनी विचारले.

“नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत. आम्हालाही टाळू बघतात. कुणाशी बोलत नाहीत. चला, त्यांच्याकडेच जायचे आहे.”

जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्यावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. चार टेंभेकरी हातात पेटते टेंभे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी-सिदोजी आत गेले.

नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्यासह पुढे झाल्या. पलोत्यांच्या या धूसरमंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्यांमागून पायऱ्या मागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराजसाहेबांचा विचार करीत होते. रजपुताच्या गोटाला

जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढविलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवीत होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले, कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले – “भुयारं कधीच संपत नसतात! चाल कधीच थांबत नसते!”

चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते

एकाएकी असे का थांबले, कुणालाच कळले नाही.

“काय झालं शंभूबाळ?” त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूद घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला… “काय झालं शंभूबाळ?”

तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असे – असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहवून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले, “काही नाही

आऊसाहेब. आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते!”

क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या – “अशा वाटा चालताना पायमाग किती मागं पडला, ते नसतं बघायचं! त्यानं मग दमगीर होतं. किती पायमाग माग टाकायचा आहे, यावरच आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिंमतबंद होतं. चला.” जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला

जागवीत परतत होते! ते कानभरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणताहेत ते एकच आहे! तेगीची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे!

▶ बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ, संभाजीराजे, नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्यासाठी मनातले सगळे कढ, सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराजसाहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे

संभाजीराजे धावत सुटले. आणि क्षणात त्यांच्या हातांचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या

पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यांवर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील चौसष्ट कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले, “महाराजसाहेब आम्ही कमी बोललो. जरूर तेव्हाच बोललो!”

राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा ऊरताण कुठच्या कुठं निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोके टेकले.

“जा, आईचं दर्शन करून या.” देवमहालाच्या रोखाने हात करीत राजे म्हणाले.

जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमहालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती.

संभाजीराजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती.

राणीवबशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली. पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या

पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत तीन वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकले. त्या वेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले!! भिरभिरले कोंबडे कसेतरी केकाटले! धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या घडीव दगडावर रुतवून काटकन मोडली! डावा पाय दाणकन भुईवर आपटला!

संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंभ भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले

ते रसवंत कोंभ त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसलेकुळीच्या रक्तरसरशीत कोंभाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंभ शोभून दिसू लागले..

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४७…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment