धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२४

By Discover Maharashtra Views: 103 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२४ –

बघ्यांचा कालवाही खरोखरच ‘शैतान’ वाटावेत असे कैदी समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर! तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुक्‍्म करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता!

कधी, कधीच नव्हती एवढे हालहाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फर्मावली.

लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक-एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले. सापते आणि मीठपाण्याची तस्तीभांडी तिथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले. इखलास तेवढाच उरला. त्याच्यावर सोपविलेल्या सजेची एक जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती. कैदी पुरते गतप्राण होताच, दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडावेगळी करणे! भाल्याच्या टोकावर ती खोचती ठेवून, वाजतगाजत उभ्या तळभर ती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे. शेवटी, धडे एकीकडे साखळदंडात पडलेली; ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी, कोल्ह्या-कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे. पण या इखलासच्या आखरी जोखिमेला अद्याप अवकाश होता.

सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की, क्षणभर त्यालाच वाटले, आपणही जखडलो गेलोत न दिसणाऱ्या एका खांबाला! तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिता. आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच-दहा हशमच होते बाकी त्याच्या भोवती. काय वाटले त्याचे त्यालाच; कुणास ठाऊक. संथ पावले टाकीत तो राजांच्यासमोर आला. भयाण दिसणाऱ्या मरहट्र्‍यांच्या बागी सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखले. इखलासची एरव्ही क्रूर, मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐक येईल एवढे हलके तो पुटपुटला – “दे दो हमे ये सुबेदार।” त्याने त्या रक्त, मीठपाणी, घाम यांनी न्हाऊन निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला!

राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले. ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले. खांब हिंदकळू लागला. जसा पुढं गेला तसाच इखलास हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला. का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सूरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता ती इखलास! त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती. “नको – घेऊ नकोस ती.” हा संकेत त्याला कळला होता.

आपल्या खिदमती पथकाच्या हशमांवर तो कसातरीच ओरडला – “सब चले गये नजारा देखनेवाले नाबकार लौंडे यहांसे! तुम क्यों रुके? निकल जाव.” आणि स्वतः: इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला.

आता वर निळेभोर आभाळ, पायांखाली वढू बुद्रुकाची कितीतरी पुराणी मावळमाती, न दिसणाऱ्या, पण जवळच, खांद्याला खांदा मिळवून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा, त्यांच्या काठांवर जगाला एकले वाटावेत, असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले! आता राजांचा स्वत:चा स्वत:च्या मनाशी चाललेला वादही थांबला. सुरू झाला – सुरूच झाला फक्त जिवाचा शिवाशी चाललेला आखरीचा शांत, संथ जाबसाल!

“राजा म्हणजे कोण? सजा भोगणारा राजा म्हणजे कोण?’ यांसारख्या सवालांची उत्तरे शोधत संभाजीराजे भोसले या माणसाचा “जीव” मनही मागे टाकून “शिव” मुठीत पकडायला आपल्या उभ्या हयातीचा कानाकोपरा धुंडाळू लागला.

“कोण होत्या आम्हास जन्म देत्या मासाहेब? का नाही याद येत त्यांचा चेहरा? का नाही वाटलं कधी आम्ही अंधारातून जन्मास आलो असं?’ आली असेल नक्कीच आबासाहेबांसह थोरल्या आऊंची याद अखेरच्या क्षणी. आणि – आणि नक्कीच येईल शेवटच्या क्षणी, एवढा कठोर आणि हवस असलेला असला तरी औरंगलाही त्याच्या जन्मदात्या आऊंची याद! कोण होते आबासाहेब? कोण आहे औरंगजेब?

आबासाहेब म्हणजे आमच्या मावळमातीने, डोंगरदऱ्यांनी फेकलेला उष्ण श्वास! मरगळलेल्यांना जगण्याची, कष्ट करत मानाने जगण्याची ऊब देणारा. न होते तेच तर? औरंगला दख्खनेत उतरायची नौबतही ना येती.

केवढे पल्ल्याचे बोलले होते ते अखेरच्या भेटीत पन्हाळ्यावर – “एवढीशी असते डोळ्याची पापणी, पण ती सुद्धा नाही घेत कधी साधं कस्पटसुद्धा डोळ्यांत. तुम्ही तर आजचे युवराज आहात – उद्याचे राजे. बरे ध्यानी ठेवा. अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं! राजे होऊ नका मावळा व्हा.” आबासाहेबांच्या बोलांनी जसा त्या भेटीच्या वेळी उसासला होता युवराज म्हणून, तसा आता एक मावळा म्हणूनच उसासला त्यांचा जीव.

आम्हाला, मनाचे क्षणाक्षणाला टवके उडावेत म्हणून अशी प्राणकठोर सजा देणारा, आता पार बुढा झाला तरी पिळदार मनाचा औरंग कोण? पुरा हिंदोस्थान इस्लाम करायला निघालेला, माणुसकीला फुंकरीने विझवू बघणारा. उभा केला असाच, आत्ता या क्षणी त्याच्याच बापाने उठविलेल्या सफेद ताजमहालासमोर त्याला तर! तर याच्या नजरेची वीज अंगी पडताच काळीठिक्कर पडून जाईल, ती देखणी कबरसुद्धा!

नाही. आबासाहेब आणि औरंग यांची तुलनाच नाही होऊ शकत. आम्ही नाही, रायगडाच्या सातमहालातल्या आमच्या एकाही मासाहेबांनी नाही, कुणीच नाही पारखले आबासाहेबांस. असेलच पारखले त्यांना तर फक्त तिघांनीच. एक थोरल्या आऊसाहेबांनी आणि दुसरे समर्थांनी आणि… आणि होय, तिसऱ्या फक्त औरंगजेबाने!

आम्ही – आम्ही कोण या तिघांत? थोरल्या आऊ आणि समर्थाच्या दृष्टीने आबासाहेबांची फक्त सावली आणि औरंगच्या दृष्टीने? त्याच्या दृष्टीने तर आबासाहेब नेमके कोण होते, हे नीट पारखता यावयासाठी या क्षणी त्याने नजरेसमोर धरलेला एक दर्पण! पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात, त्या हिंदोस्थानच्या शहेनशहास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप? असता त्याचा एकही शहजादा अशा आमच्या जागी तर?

का वाटले आमचे कोंडाजी, सरलष्कर, म्हलोजीबाबा गेले तेव्हा आमचे एकेक अवयवच गेले असे? का केली प्राणपणाने आमची सोबत निळोजीपंत, खंडोजी, रामचंद्रपंत, हरजीराजे, रूपाजी, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे आणि – आणि एवढ्या दूरच्या कनोजदेशीच्या कुलेशांनी? आम्ही केवळ राजे होतो म्हणून? नाही – नाही.

माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात. तळहातावर जिवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात, ती अशी सुखासुखी नाही. ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठलेल्या गोरगरीब रयतेच्या राज्याला राखण्यास त्यांचा अभिमान वाटतो, या क्षणी आम्हास. जे फितवेखोरीने पाठमोरे झाले त्यांची एवढीसुद्धा खंत नाही वाटत. खरेच आहे, राजा म्हणजे उपभोगपारखा स्वामी. आणि – आणि वेळोवेळी कटावांच्या काट्यांतून चालत गेलेला, आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना, औरंगसारख्या माणसाच्या हाती फसलेला, ही अशी सजा अंगांगावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण?

सजेचा राजाही असतो, पण ‘स्वामी’ नव्हे तर ‘सेवक.’ वेदनांचेच उपभोग करून जित्या देही भरपेट भोगलेले असतात, ते त्याने! सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक!!

केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आता. वढूची मावळी सांज आता उतरली. पण दोन्ही कैद्यांना एवढीसुद्धा कल्पना नव्हती की, आता सांज आहे, सकाळ की दुपार? आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की, हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे. मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पार फेसाळलेय, थकदिल झालेय ते. त्याला टाच मारावी असेसुद्धा नाही वाटत आता.

दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळकिरणे मायेने जवळ घेत, त्यांच्या थकल्या पाठवानांवरून, आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांतसंथ वाहतच होत्या, फक्त इंद्रायणी आणि भीमा!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment