धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०२

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०२

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०२ –

कुठं आहेत मामासाहेब? का गेले असे न बोलता, न भेटता? कुणाकडे पाहावे आम्ही?” भरून आल्या डोळ्यांनी राजे कसेतरीच पुटपुटले. एव्हाना बातमी गडभर पसरली होती. माणसे खासेवाड्याकडे लोटत होती. पोरवयाच्या ताराऊंना घेऊन येसूबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे, ताराऊंच्या जवळ गेले. काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे थोपटत श्रीसखींच्याकडे बघितले. मोठ्या निकराने डोळ्यांतले पाणथेंब रोखत राजे शंकराजींना म्हणाले, “चला, संगती या.” मशालधाऱ्यांनी वेढलेल्या पालखीत बसून येसाजी, निळोपंत, खंडोजी यांच्यासह राजे महाडघाटाकडे चालले. आणल्या जाणाऱ्या सरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी.

हंबीररावांच्या देहाला अगीनडाग देण्यात आला. हंबीरमामा गेले आणि एका भयाण पोकळीने राजमन घेरले. ते कुणाशीच खुल्या मनी बोलेनात. रोजनेमाचे त्यांचे सरान, स्फटिकपूजा, दफ्तर, गडदेख, थाळा हे चुकार होऊ लागले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. स्रानाला हमामखान्यात बसले, तर डुईवर पडणाऱ्या पाणधारेबरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या. सरशीने कपाळी शिवगंध रेखून घेताना छत्रपतींना ती सरशीच रक्तमाखल्या फरशीसारखी दिसू लागली. दफ्तरात खंडोजी, चिमणगावकर यांना खलित्याचा मजकूर सांगताना ते मध्येच म्हणू लागले,

“राहू द्या. चिटणीस, कुणासच नका धाडू खलिता. बेतले असतील ते रद्द करा.”

थाळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवडलेले राहू लागले. मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यावरून. विचार – विचार! नुसत्या विचारांनी मेंदूची निशाणकाठी थरथरू लागली त्यांच्या.

“श्रींचे राज्य’ म्हणजे नेमके काय? कोण होते आबासाहेब? थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, समर्थ हे सारे कोण? कोंडाजी, कृष्णाजी, हंबीरमामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलंसुद्धा नाही ते लढायांत देह ठेवून गेलेले असंख्यात धारकरी, औरंगला तसलीम करून खिल्लत पांघरणारे शिर्के, निंबाळकर, अचलोजी, अर्जुनजी, बंडाळी करणारे कोकणपट्टीचे वतनदार. कसला शतरंज चालला आहे हा? का खेळतो आहोत आम्ही तो? कोण खेळेल आमच्या माघारी तो? रामराजे? आमचे बाळराजे? केवढा पाताळयंत्री, निर्दय औरंग! तख्तासाठी सख्ख्या भावांचे काटे काढणारा, बापाला विषमालिश करवून आईच्या कबरीलगत दफन करणारा. तगेल आबांची-आमची ही नवथर गादी त्याच्यासामने? की? जशी इदलशाही, कुत्बशाही पडली तसे हे राज्य…? नाः्ही. नाःही. जिवाचे चाळ करून बांधलेत त्यासाठी आम्ही पायांत. एकल्या आम्हालाच ही आच लागून काय कामाचे?’

रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भणभणू लागले. माणसे येत होती, नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती. हात उठवून त्यांना थोपते करीत राजे तुटक बोलत होते – “बस्स. थोडक्यात बोला. अमक्यातमकक्‍्यास भेटा.” असे तुटक बोल त्यांच्या तोंडून ऐकू आले की, माणूस चक्रावत होते. चालत्या हत्तीच्या पायांत रानवेलींचा चिवट गुंतवा अडकावा तसे झाले होते. भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले. एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना.

एक दिवस दुपारचा थाळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहवून येसूबाईंनी अखेर विचारलेच, “स्वामींचं कशातच लक्ष नाही. हे कोण थाळा चिवडणं? किती दिस?”

येसूबाईना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थाळ्याला देत ते म्हणाले, “आम्हासच कळत नाही – असं का? तुम्ही एकदा म्हणाला होता – तुटलंय आमचं शृंगारपूर आजपासून. त्या वेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हास – आमचंही शृंगारपूरच तुटल्यागत!” बसल्या चौरंगीवरूनच झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे, दूरवरचे गडशिखरांचे टोक न्याहाळत राजे पुटपुटले.

एवढ्या बोलक्या – साफ, तडक येसूबाई त्याही गुमान झाल्या ते ऐकताना. काय बोलणार होत्या त्या तरी? आबासाहेबांचे बागलाणपासून जिंजीपर्यंतचे “शृंगारपूर’

सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे, हे त्यांनाही फार जाणवले. मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजांनी रामचंद्र पंतांना याद घेतले. त्रस्त, कातावून गेलेली दिसत होती त्यांची चर्या. रामचंद्रपंत शंकराजींच्यासह भेटीस आले. शंकराजी थोडे कचरतच आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले, “देवरूखचा पिलाजी देसाई गडावर आला आहे स्वामी. त्याची… त्याची वतनाबाबत….”

“बस्स शंकराजी, त्याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुम्हास वाटेल तो निवाडा करा! आमच्या… आमच्या सामनेसुद्धा आणू नका कुणाला – ” राजे तुटक बोलले. प्रत्येकाला कुचंबून ठेवणारी शांतता पसरली.

“कोकणात केव्हा उतरणार रामचंद्रपंत तुम्ही?” राजांनी विचारले.

“जी. आजच.” रामचंद्रपंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही.

“जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा. तिथं कुलेश आहेत. आम्ही टाकोटाकीनं याद केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना!”

“जी. आम्ही खासच जाऊ.” सदरेबाहेर पडणाऱ्या रामचंद्रपंतांना राजांच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे, याचा अंदाज आला नाही. त्यांना, शंकराजींना खासा राजांना कल्पना नव्हती की, मराठ्यांचा “सालार’ गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती. “ सुबहान अल्ला!” न अल्ला!” असं पुटपुटत त्यानं ही खूशखबर स्वीकारली होती.

जिंकलेल्या बंदिस्त कोटात बादशहाने मरातबाचा दरबार भरविला होता. कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना बादशहानं मन्सबी बक्ष केल्या, खिल्लती पांघरल्या. सर्वांत शेवटी आपला शहजादा मुहम्मद आझम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला, “शहजादे, लईम संभा को नेस्तनाबूत करने हम बडे उम्मीदसे तुमको नामजाद करते है। फते के खबर की राह ताकते है।”

आपल्या आब्बाजानांच्या तलम जाम्याचे, गुडघे टेकून चुंबन घेत आझमने अदबीने त्याला दिलासा दिला – “बेफिक्र रहिये मेरे आब्बाजान। जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईमको कदमों के सामने।”

आता औरंगच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या!!! बेळगाव, सोलापूर, मिरज, अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या. मातब्बर खानाने तर मोठीच उचल खाऊन किल्ले पट्टागड कब्ज केला. बादशहाचे रुहुल्ला, शाबदी, झुल्फिकार, रणमस्त, नेकनाम असे वीस-एक खास जागोजाग पांगले. खिल्लत, मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावोगावच्या सरदारांना चुचकारू लागले. त्यांच्या पडेल खबरा येऊन रोज गडावर थडकू लागल्या.

हुकुमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले. ते स्वत:च “का याद फर्मावलं असावं? ‘याचा विचार करून थकले होते. दुपारच्या निवांत वेळी ते राजांना पेश झाले.

“सालार की बात सुनी. हुक्‍्म होते ही, सेवामें पेश आये स्वामी।” हंबीररावांच्या आठवणीने कुलेशही गंभीर झाले.

“त्यासाठीच याद घेतलंय आम्ही तुम्हाला कविजी. आम्हास वाटतं… वाटतं. ”आपल्याच विचारगुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकांवर घासत बराच वेळ नुसते फेरच घेत राहिले.

“कुलेश -” बऱ्याच वेळाने राजे बोलले. “आम्हाला वाटतं – वाटतं कुठंतरी बळ कमी पडतंय आमचं. फौजांचं नाही. आशीर्वादाचं.” ते ऐकताना कुलेशही विचारात पडले. म्हणाले, “हुक्‍्म क्या हे, स्वामीका?”

“पाठीशी दैवीशक्ती पाहिजे कुलेश. काळ बाका आहे. आम्ही आग्ऱ्यात होतो तसा.” “धर्मस्थल का तो अच्छा चलाते है, स्वामी। फिर भी हमें लगता है – कुछ कठोर उपासना की जरूरत है)” “कठोर? कसली? कोणतीही कठोर उपासना करावयास तयार आहोत आम्ही.”

कुलेश विचारात पडले. रुकले.

“बोला. कसली कठोर उपासना?”

“जी. देवी की उपासना! शाक्त पंथ की धारणा… लेकिन…” कुलेश चाचपडले.

“बोला काय अडचण?” राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले.

“स्वामी का अभिषेक हुआ है। यह गड अभिषेकस्थळ है। छोडना पडेगा.”

राजे विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे. सोडू रायगड. गांगोली आहे, संगमेश्वर आहे. तिकडे जाऊ. पण कठोर म्हणालात ती उपासना कसली?”

“स्वामी इस उपासनासे रणचंडी को प्रसन्न किया जाता है। उसके लिये बली देना, उपोषण, पूजा आदि विधि रहते है- और -” “आणि काय? बोला कुलेश. आम्ही काहीही करण्यास राजी आहोत.”

“जो अन्य देव देवता का लेते है, वैसा जल का नहीं सोमरस का तीर्थ लेना पडता है, इस उपासनामें। राजासाब यह करेंगे तो गहजब होगा। इसलिये.”

“कुलेश, तुम्ही म्हणता ती उपासना आम्ही करू! तुम्हाला माहीत नाही, पण दिलेरच्या गोटात गेल्यापासून – आमचा – आमचा कबिला मागे अडकून पडल्यापासून घेतो आम्ही कधी-कधी मद्य. त्यानं गहजब माजायचं कारण नाही. तुम्ही तयारीला लागा चंडी-उपासनेच्या – उद्याच गड उतरून गांगोलीला जाऊ.”

“जी. इस उपासना के उपचार शृंगारपूरके शिवयोगी जानते है।” शृंगारपूर! राजांच्या कपाळी आठी धरली. तरीही ते म्हणाले, “बोलावून घ्या त्यांना. मनी आलं आहे, तर करून टाका उपासनेचं.”

कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले. राजांच्या उघड्यापुखर डोळ्यांसमोर हाती शस्त्र पेललेली रणचंडीची मूर्ती फिरत राहिली.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here