धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०१ –

ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटकस्वारीच्या वेळी अबुल हसन तानाशाहाने आगवानी करून, त्यांना नजराणे देऊन मैत्रीची ऊरभेट दिली होती, त्याच भागानगरात तानाशाहाच्या दंडात औरंगजेबाच्या ‘शाही’ काढण्या पडल्या! आता विजापूर, गोवळकोंड्याच्या फौजाच दिमतीला घेऊन औरंग केव्हाही मराठी मुलखावर उतरणार हे साफ होते. कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. सारेच श्रींचे राज्य राखून कसे चालवावे, याच विचाराने घेरले होते.

“आता कुणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कुणास फुरसत नाही. दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या. गनिमाचा डोळा तर पहिल्यापासून आम्हांवरच. बागलाण, खानदेश, कोकण, देश दौलतीच्या चहूबाजूंच्या सुभेदार, हवालदारांना साऱ्यांवर केवढी जोखीम पडते आहे, याचं कलम द्या. मिळेल तेवढी तवानी संचणी तातडीनं करण्यास लिहा. आम्ही चौलच्या नाडल्या रयतेला सवलती देण्यासाठी खासा चौलात उतरतो आहोत. कळवा तसं सुभेदार रायाजी सदक प्रभूंना.” कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती, पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते.

आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले. कधी त्यांच्या प्राणावर, तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे बाके प्रसंग गुदरून गेले. आज नेमके काय केले असते त्यांनी? चारी कवाडांवर शंभूमन धडका घेऊ लागले.

निळोपंत, येसाजी, रामचंद्रपंत सर्वांनी धीरा-इमानाचे वचन वाटावे, असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखविला. आपल्याच विचारात गढलेल्या राजांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळोपंतांना सांगितले, “पंत, कर्नाटकात हरजींना फौजा तयारीनं सीमेवर पेरण्याचा खलिता द्या, औरंग आहे तो! नेम नाही देता येत कुठं वळेल याचा.”

ते ऐकताना पेशवे विचारात पडले. आज सर्वाना वाटून गेले की, “मुलूख थोडा जिकडे पुढा,’ म्हणत राज्य उठविणे एक वेळ केवढे सोपे, पण उठविले ते राखणे केवढे यातायातीचे! तुम्ही सारे कदीम, जाणते आहात. मर्दानगीचे आहात. प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल, बागलाणपासून जिंजीपर्यंत पसरलेला हा मुलूखपट्टा राखायला. हे एकल्या आबासाहेबांचं नव्हतं, आमचं नाही, ते साऱ्यांचं जिवामोलाचं राज्य आहे. कुणीच कचदिल होऊ नका. एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्ऱ्याच्या कोठीत अडकून पडलो होतो. बऱ्या जाणतेपणी अवघे समजून घ्या, आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचं भय समोर आहे. चला आमच्यासह. मेळानं जगदीश्वराचं दर्शन घेऊ.” आपल्याच लयीत सिंहासनसदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही. सारे त्यांच्या पाठीशी चालले. फक्त एकले न्यायाधीश प्रल्हादपंत रामराजांच्या वाड्याकडे, कुणाला न कळेलसे वळले. कसला न्यायनिवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक!

स्रान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती. सकाळपासून मनाला नाकळेल अशी चुटपुट लागून राहिली होती. दुपारचा थाळा घेताना श्रीसखींना ते म्हणालेही होते, “कळत नाही, पण जिवाची उलघाल होते आहे आज. औरंगच्या फौजा हरजींच्या प्रांतात घुसल्या की काय; असा शक येतो आहे.”

दिवस कलतीला लागला तसे राजे राया-अंता, पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले. इथून पायतळी गंगासागराचा तलाव दिसत होता. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या फांदीवर मान आखडती घेऊन बसलेला एक खंड्यापक्षी राजांना दिसला. निश्वल खड्या असलेल्या त्या पाखराला, राजे एकटक निरखू लागले. त्यांना काय होत आहे, ते कळले नाही. डोळ्यांचे पाते लवायच्या आत खंड्या उडाला. त्याने थेट पाण्यात सूरझेप घेतली. गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला. त्याच्या लांबट, काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली, तडफडती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरिपेत चांदवा उठवून क्षणात चोचीआड झाली. याच तलावाकाठी, असाच खंड्यापक्षी कधीकाळी पाहिल्याचे त्यांना आठवत होते. पण कधी? काही गवसत नव्हते. खंड्याच्या सूरझेपेने गंगावर्तावर पाणलहरी उठल्या तशा राजमनात विचारलहरी उठू लागल्या. मनाच्या काठाळीत विरू लागल्या.

जगदीश्वराच्या मंदिराकडे सांजदर्शनासाठी चाललेल्या राजांना येसाजी कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. येसाजी-खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले.

खंडोजी म्हणाले, “रामसेज – एवढी सालं निकरानं आपला रामसेज….” चालते राजे थांबले. खंडोजी चरकले. कसे बोलावे, विचारात पडले.

“पडला… हेच ना चिटणीस?” राजांनीच त्यांना विचारले.

“जी. लढून नाही. कपटी चालीनं. फितवा करून पाडला. एवढ्या ताकदीचा रामसेज, धनी.” क्षणभर खंडोजींनी गर्दन खाली घातली. लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटावा म्हणून ते म्हणाले, “पण हरजींची खबर आहे स्वामी, पडल्या गोवळकोंड्याचा शक्‍य तेवढा मुलूख कब्ज धरून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात.”

खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते. मनाला न डुचमळता सांजवाऱ्यात मुरत होते. साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले. त्यांनाच कळली नाही, पण आज त्यांची नजर कशी कुणास ठाऊक समोरच्या गाभाऱ्यातल्या शिवरपिंडीवरच्या अभिषेकपात्रावरच खिळून पडली. वाऱ्याने पात्र मंद डुलत होते. त्याबरोबर अभिषेकधारही डुलत होती.

दर्शन करून सारे जण बालेकिल्ल्यात परतले. सूर्य आता डुबला. गडाच्या लहाना दरवाजात, महाद्वारात सांजनौबती दुडदुडल्या. पुरते सांजावून आले. नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले. ते दरवाजे पार करीत आलेला तळबीडचा एक स्वार पाच-सहा सोबत्यांसह महादरवाजा पार करून बालेकिल्ल्यात आला. त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते, चेहरा पार कळंजून गेला होता. देवडीवाल्यांना हातानेच थोपवत काही न सांगता तो कसेतरी दरवाजे मागे टाकत बालेकिल्ल्यावर आला.

महाराज नुकतेच परतले होते. डुईचा टोप त्यांनी उतरून तबकात ठेवला होता. मुलूखभर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कसकसा करावा, याची कल्पना ते मुजुमदार हणमंत्यांना देत होते. येसाजी-खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते.

“महाराज, घात झाला.” राजांसह सर्वाचे काळीज थरकून उठावे, असे पिळवटते बोल वाड्याचे सदरीदालन चिरत गेले. गड चढून आलेला स्वार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायांवर देह टाकत गदगदू लागला. ते होते, तळबीडचे शंकराजी मोहिते.

पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले. शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकराजींना विचारले, “काय झालं शंकराजी?”

राजांच्या हातस्पर्शाने गदगदून गेल्या शंकराजींना काही क्षण बोलवेना. तुटक- तुटक बोल कसेतरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले, “आम्ही – आम्ही झालावंच पर हुबी दौलत पोरकी झाली. धनी तुमचं… तुमचं मामासाहेब – समद्यांचं सरलष्कर – आमचं भाव…” असह्य-असह्य कढाने शंकराजींनी घट्ट मिटल्या डोळ्यांनी तगमगती गर्दन इकडे – तिकडे झटकली. त्यांच्या डुईची पगडी उडून रुजाम्यावर उतरली. “सरलष्कर ग्येलं धनी!!”

वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकून लावण्यासाठी झालेल्या हातघाईच्या लढाईत सरलष्कर हंबीररावांच्या भरदार छाताडावर तापला जडशीळ, लोखंडी तोफगोळा येऊन अचानक आदळला होता. त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे, तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून टाकली होती. भुईवर कोसळताना हंबीरराव जिवाच्या पिळाने ओरडले होते, “आमच्या ताराऊला सांबाळा धनी. जै वागजाई” आणि वाईच्या माळरानावरूनच त्यांनी अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता.

फराशीच्या रुजाम्यावर पडल्या शंकराजींचे ‘गेले!’ हे बोल ऐकताच राजांनी आपले दोन्ही हातच कानांवर घेतले.

“दिली आमची धरसोबा – ताराऊ रामराजास्री’ म्हणणारे, आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचीत सापडलो तेव्हा ‘बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं’ म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे, आम्हास कैद करायला निघालेल्या सुरनीस-पेशव्यांनाच कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले, वऱ्हाड-बऱ्हाणपूर, भडोच तुडविणारे, चाकरीने सरलष्कर असलेले, पण क्रणानुबंधाने आम्हास आबासाहेबांच्या ठायीच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते!’ त्यांची रूपेच रूपे राजांच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. शंकराजींना उठते करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ते आपोआपच उठते व्हावेत, येसाजी- खंडोजी, राया-अंता, पुरुषा, पहारे सारेच चक्रावून जावेत असे, आपले तोंड ओंजळीत घेत राजे कुडीभर हलत मुसमुसु लागले. एवढे घनदाट प्रसंग कोसळले, छत्रपती कधीच नव्हते डोळ्यांवाटे फुटले. आज मात्र फुटले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here