धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९९ –

“चला, जिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू.” बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले. सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरूजन्बुरूज पाहिला. किल्ला भक्कम तटबंद होता. बुरुजाबुरुजांवर मारगिरीची तोफभांडी नीट मांडली होती. चौक्या, पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता. त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना, अंबारकोठार, खजिना, दारूकोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हरजींना म्हणाले, “हा कोट गाठीचा आहे, असे आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरीच्या भेटीत म्हणाले होते. तुम्ही ही गाठ चावरसारखी खूब बंदिस्त आवळली आहे; राजे. आम्हास संतोष आहे.”

दोन दिवस झाले. इक्केरीच्या राणी चन्नम्माचा, राजांना भेटण्यासाठी दूत आला. राणीचा नवरा वेडसर असल्याने तीच इक्केरीचा राज्यकारभार बघत होती. तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता. तसा चिक्कदेव पुरा धोरणी होता. थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलूख कब्ज केला, ही बाबच त्याला खटकत होती. तो आपल्या भोवतीच्या इक्केरी, रामनाड, मदुरा येथील नायकांचे प्रांत कुरतडत होता. एकोजीकाकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हलल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरच डोळा होता. चिक्कदेवाविरुद्ध हरजींना मदत करण्याची आज्ञा व्हावी, असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता. त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला.

बाईमाणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नमाराणीला मदतीचा शब्द देऊन राजांनी तिला आदरपूर्वक फेरनजराणा पाठवून दिला. हरजींच्याकडून त्यांनी जिंजीभोवती असलेल्या मदुरा, म्हैसूर, रामनाड ह्या नायकांची काय-काय चाल आहे, याची माहिती घेतली. मोरस, तिगुड, कोडग, मलेय येथील दूतही येऊन राजांना भेटून गेले. त्यांना मरातब देऊ करून लवकरच आपण एक मोठी मोहीम खोलणार त्यात मदत करावी, असा त्या दूतांकरवी सर्व नायकांना राजांनी शब्द टाकला.

दिवस उकाड्याचे होते. रात्रीच्या भोजनानंतर राजे हरजींच्यासह दिवाणीमहालात चोपाळ्यावर बसले होते. हरजींना राजांचा पुढचा बेत काय असावा, याचा साधारण अंदाज आला होता. पण मध्येच राजांनी बेंगळ्रबद्दल एकदा विचारले असल्याने तो अंदाज पक्का झाला नव्हता. अचलोजीच्या फितव्याने संतापून ते बेंगळुरावर उतरतात की काय, अशी एक शंका हरजींना होती.

चोपाळ्याच्या लोखंडी सळया कुरकुरत होत्या. जागोजाग टेंभ्याखाली हत्यारी पहारे उभे होते. राजांच्या मनचा हेतू जाहीर व्हावा म्हणून हरजींनी वित्तारले. “बेंगळूर “बेंगळ्र किती मजलांवर आहे, असं विचारलं होतं राजांनी. अचलोजी , काकासाहेबांच्याकडं बघता आम्हांस वाटतं….”

फिरता चोपाळा पायाने रोखत हरजींचा बोलत तोडत राजांनी विचारले, “आता श्रीरंगपट्टण किती मजलांवर ते सांगा.”

हरजींनी बांधला होता, तोच अंदाज राजांच्या तोंडून बाहेर आला. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचे मातब्बर ठाणे असलेल्या श्रीरंगपट्टरणची आता गय नाही, हे हरजींनी ताडले.

“जी. तेही असेल सात-आठ मजलांवरच.”

“आम्ही खासाच घ्यावं म्हणतो, चिक्कदेवाचं श्रीरंगपट्टण घेरात. तुमच्या दिमतीची निवडक लढाऊ असामी फौजसुद्धा द्या आमच्यासंगती. मोरस, तिगुड, कोडग व मलेयच्या नायकांना आम्ही घेर टाकताच श्रीरंगपट्टणवर चालून येण्यास हरकारे द्या. बेंगलूरवर डोळा ठेवणाऱ्या चिक्कदेवाचे त्याशिवाय नाही उघडायचे डोळे.”

हे बरं झालं. इतरांस नडतो, तसा हा चिक्कदेव आम्हालाही जागोजाग नडतोच आहे. आम्हीही येऊ तुमच्या संगती त्याच्या समाचारास.” हरजी हुरुपाने म्हणाले.

“गरज नाही त्याची राजे. तुम्ही जिंजी राखून असा. कासम-रणमस्ताच्या फौजा दौडताहेत प्रांतात. मोहिमेच्या सिद्धतेला उद्याच लागा. प्रांताचे जाणकार खबरगीर मात्र द्या, तुमच्या फौजफळीबरोबर.” बराच वेळ राजे श्रीरंगपट्टणच्या घेराचा आराखडा मनाशी बांधत राहिले. हरजी मोहिमेच्या तयारीची आखणी करत राहिले.

श्रीरंगपट्टणभोवती “हरहर महादेवा’च्या किलकाऱ्यांचा लोळ उठला. संताजी घोरपडे, त्रिबकजी भोसले, दादाजी काकडे, केसो त्रिमल, धनाजी, खंडोजी अशा मर्दान्यांच्या संगती राजे श्रीरंगपट्टणला भिडले. चिक्कदेवरायाला या हमल्याची अगोदरच कुणकुण लागल्याने तो उगवतीच्या प्रदेशाकडे निसटला. तेथील रयतेकडून बळजोरीने खंडणी वसूल घेण्याचा त्याने सपाटा लावला. या जुलमाने हैराण झालेल्या त्याच्याच रयतेने आणि काही मंत्रिगणांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. रयतेने एकजाग होत

आपल्यातीलच एक ‘वैष्णव’ आणि एक ‘शैव’ असे सेनाप्रमुख नामजाद करून दोन फळ्यांचे सैन्य उभे केले. त्यातील एक सत्यमंगलमवर चालून गेली. दुसरीने खुद्द म्हैसूरलाच घेर टाकून प्रत्यक्ष चिक्कदेवरायालाच त्यात कोंडले.

राजांच्या फौजेने चिक्कदेवाचे श्रीरंगपट्टण लुटीवर घातले. मदुरेकडून त्याच्या कुमकेला जाणाऱ्या शिबंद्यांवर छापे मारून त्याला एकाकी पाडले. राजांच्या फौजेतील कर्नाटकची फळी श्रीरंगपट्टणच्या कोटाला घेर टाकून बसली. मराठी मुलखातून आलेली फळी म्हैसूर राज्यातील प्रदेश लुटत चालली. म्हैसूरच्या कोटात अडकलेल्या चिक्कदेवरायाला काय करावे सुचेना. आता त्याला शेजार सुचला! त्याने रामनाडच्या नायकाला मदत करण्यासाठी खलिता धाडला.

राजांनी हमल्यावर जातानाच जिंजीपासून श्रीरंगपट्टण पावेतो खबरगीर पेरले होते. ते खुद्द श्रीरंगपट्टणच्या घेरावर देख ठेवून होते. राजांची प्रांत गोवे, जंजिरा, बऱ्हाणपूर येथील कीरत ऐकून असलेला चिक्कदेव पुरता सटपटला होता. श्रीरंगपट्टण हातचे जाणार याची तर त्याने खूणगाठच बांधली होती. या घेराच्या खबरा ऐकून भोवतीचे नायकही हबकले होते. संताजी, धनाजी, खंडोजी यांच्या चपळ तुकड्या म्हैसूर राज्यात चौफेर पसरल्या. श्रीरंगपट्टणचा किल्लेदार निकराने कोट झुंजवीत होता. पण त्यानेही आशा सोडली होती.

कोटाबाहेरच्या मैदानावर राजांसाठी खास डेरा उठवण्यात आला होता. म्हैसूरभर दौडणाऱ्या मावळी तुकड्या त्या डेऱ्यासमोर हररोज लुटीचा ऐवज आणून त्याची रास लावीत होत्या. घेरातील दोरबाज कोटाला लोखंडी गळांचे दोर टाकून तट पार करू बघत होते. आपल्या चंद्रावतावर मांड घेऊन राजे रोज तटाभोवती फेर टाकत होते. पण – हा पणच नडत आला होता, त्यांना हयातभर. एके दिवशी त्यांच्या डेऱ्यात शिरलेल्या खबरगिराने येऊन त्यांच्या कानी घातली ती कर्नाटकची नव्हती, मराठी मुलखाची खबर होती – “औरंगजेब थेट किल्ले पन्हाळ्याला वेढा देण्याच्या बेतात आहे!”

पन्हाळा! पाखराच्या कोटरागत वाटणारा गड! आबासाहेबांची अखेरची भेट झाली ते ठिकाण! हंबीरराव – म्हलोजीबाबा – राजांच्या डोळ्यांसमोर ठकाठक चित्रे फिरली. त्यांनी संताजी, केसो त्रिमल यांना घेरातील फौज एकवट करण्याची आज्ञा दिली.

आता कर्नाटकात आलेल्या राजांना तातडीने परतणेच भाग होते. तरीही त्यांनी हरजींच्या सोबत जिंजीभोवतीचा वांदीवाश, वृद्धाचलम, तिरुवनमलाई हा प्रदेश नजरेखाली घातला. परतीच्या प्रवासाला दोन दिवस असताना हरजींच्या खासेवाड्यात दिवाणी दालनात ते हरजींना प्रांतराखणीच्या महत्त्वाच्या सूचना देत होते. दालनात फक्त केसो त्रिमल आणि संताजी याच वरकड असामी होत्या.

द्यायच्या त्या सर्व सूचना देऊन होताच राजांनी मनी रेंगाळणाऱ्या मुद्दयाच्या बाबीला तोंड फोडले. “तुमचा केसोपंतांचा काही गैरमेळ कानी येतोय राजे.” ते ऐकताच हरजी व केसो त्रिमलांनी गर्दनी टाकल्या.

“कारण कोण याचं संताजी?” राजांनी घोरपड्यांना मध्येच घेतले. संताजींनी दोघांच्या बिनसण्याचे कारण बयाजीने सांगितले. ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, “मनाच्या गैरमेळानं काय-काय सोसावं लागतं, ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की, आपुलकीचा देठच खुंटतो. कार्यी लावायची ती मोठी कामे बगलेलाच पडतात, नको तिथं माणसाचं बळ खर्ची पडतं. तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो. तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून.” राजे क्षणैक थांबले. समर्थांच्या नुसत्या आठवणीनेही कातर झाले त्यांचे मन. ते हरजींच्याकडे बघत, स्वत:ला हरवल्यागत बोलले, “मागील अपराध क्षमावे। कारभारी हाती धरावे। सुखी कर्रूने सोडावे। कामाकडे।”

ते ऐकून हरजी विचारगत झाले. बैठकीवरून उठत केसोपंतांजवळ जात राजांनी त्यांना हलक्या शब्दांत समज दिली, “केसोपंत, आबासाहेबांनी पहिले पेशवे शामराज यांना कोण धडा दिला, ते कानी असेल तुमच्या. खुद्द आम्हास काय-काय निवाडे घ्यावे लागले, ते याद करताना मनची घालमेल होते आमच्या. जगदंब करो तसा प्रसंग न येवो, तुमच्या आणि हरजींच्या मधे! बरे हुशारीने, राजांच्या एकविचारे असा.”

केसोपंत, हरजी, संताजी भारावून राजांच्याकडे बघत राहिले. क्षणमात्र त्यांना थोरले महाराज तर समोर नाहीत ना, असा भास झाला.

“झालं गेलं जनावराच्या टापेगत मागं टाकून तुम्ही दोघांनी एकमेकांस पक्‍क्‍या दिलजमाईची आमच्या सामने खांदाभेट द्या.” राजांनी हरजी व केसोपंतांवर आपली पुखरनजर फिरविली. क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पसरत्या हातांनी एकमेकांस स्वामींसमोर खांदाभेट दिली. ती बघताना राजांच्या मुखावर समाधानाची लकेर तरळून गेली. संताजी भरून पावले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here