धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९० –

पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात.

“जे असेल ते बोला निळोपंत. काहीसुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हांस. आणखी कोण-कोण फिरले? सांगा.” खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले.

“फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी – पण – पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही…!” पंतांनी हाती धरले उपरणे भावावेगाने चुरगळले.

“मतलब?” राजांचा पायफेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यांत खोलवर बघत राहिले. “गंभीर आहे ही बाबत महाराज. कटावाची!!” पेशव्यांनी आपलीच गर्दन खाली टाकली. पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले, ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी, सुक्च होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच.

“काय – बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणा कुणास कमी वाटले? कशासाठी आणि कुणी-कुणी केला कटाव?”

“महाराज, शरम वाटते पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपले – आपले मानाजी मोरे! राहुजी सोमनाथ, गंगाधरपंत, वासुदेवपंत….”

“बस्स – बस्स पेशवे. ऐकवत नाही.” उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले.

“महाराज फिरंगाणाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली.” पेशवेच सांगताना व्याकूळ झाले. “कशासाठी? काय मनसुब्यानं?” महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले. हा तिसरा कटाव होता!

“रामराजांना गादीवर बसवून आपल्या हाती कारभार घ्यावा, असा बेत आहे या मंडळींचा. पुरी शहानिशा केलीय आम्ही. यामागे कोणीतरी बडी असामी असावी, अशी पक्की खातरी आहे आमची. पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप.”

“निळोपंत, तुम्ही जा आणि असतील तसे घेऊन या रामराजांस आमच्या सामने.” आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज.

“जी आज्ञा.” म्हणत निळोपंत गेले.

“मानाजी मोरे! रामसेज, बागलाण भागात दौलतीसाठी तळहाती शिर घेऊन घोडा फेकणारे! कसे पडले या नको त्या समयास या भरीला? राहुजी? केवढे वयस्क! आम्ही त्यांनी गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा तर सल नसेल त्यांना?’ राजमन स्वत:शीच जणू बोलत होते.

निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले. ऐन भरीच्या तोंडावर आलेले रामराजे गोरेपान; पण नाजूक दिसत होते. नुकतीच ओठांवर लव फिरली होती. त्यांच्या पुढे होत, मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वत:बरोबर चालवीत आपल्या शेजारी बसवून घेतले. ताराऊंची चौकशी करून राजांनी रामराजांना, कुणालाही जाणवावे अशा हल्लक आवाजात विचारले, “रामराजे, आम्ही एक विचारू? शांतपणे बोलाल आमच्याशी?”

“जी. दादामहाराजांना असं का वाटावं आज? आम्ही जाणतो, दौलत चौतर्फेनं संकटात आहे. जशी हरजीराजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास. लहान नाही आम्ही आता!” रामराजांच्या बोलण्यात बरीचशी झाक त्यांच्या मातोश्रींची उतरली होती. चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते.

“देऊ. समय येताच तुम्हासही साजेशी कामगिरी देऊ आम्ही. आम्ही नाही दिली तर जगदंब देईल!” रामराजांना कटावाची सुतराम कल्पना नाही, याची खातर झाली होती. काही क्षण स्वत:शीच झगडले महाराज.

“येसाजी, आमच्या रामराजांना घेऊन जा. तुम्हावर फार जोखीम आहे यांची. आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता.” येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली. ते रामराजांसह निघून जाताच निळोपंतांना आज्ञा झाली, “पेशवे, मानाजी, राहुजी सारे कटाववाले दिसतील तेथे दस्त करण्याची आज्ञापत्रं द्या. कटावाची सूत्रधार “बडी’ असामी कोण याचा सावधपणे शोध घ्या.” राजांचे मन गलबलले.

कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला. फोंडा, भीमगड, मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूख पक्का केला.

तहात अनेक अटी होत्या. फिरंग्यांनी मोगली जहाजांना आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये. दोन्ही दरबारांनी आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावे. परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी. फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजांनी गडकोट बांधू नयेत! अशा मुख्य अटी होत्या. मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली. राजांनी तहाच्या कागदपत्रावर शिक्केमोर्तत करण्यासाठी अकबर, राय किरनसिंह, महादजी नाईक यांना पणजीला पाठविले. तह पक्का झाला.

शहजादा अकबरसंगती फिरंगी विजरईने राजांना नरमाईचा खलिता धाडला. त्यात लिहिले होते – “राजांनी सुलुखाची कलमे पाळावीत. आम्ही ती काटेकोरपणे पाळू.

दोन्ही दरबारांत खुला व्यापार व मुख्य म्हणजे ‘शांतता’ राहावी.” फोंड्यावर अचानक चालून येणारा विजरईच हे लिहीत होता. तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजांनी काढून घेतल्या. वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला – पण रोगराईचा सुरू झाला. वसईत प्लेगाची लागण पसरली.

टोपीकर दरबारचे काम बघणाऱ्या प्रल्हादपंतांना राजांनी बोलावून घेतले. पंत चलबिचल झाले होते – पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले.

“न्यायाधीश, टोपीकरांच्या सुलुखाचं….”

“जी. पुरा करून दिलाय तो आम्ही त्यांच्या हेजिबांकडं.” प्रल्हादपंतांनी प्रथम सुस्कारा सोडला. मग ते तहाचा कलमबार तपशील सांगू लागले, “तह दोन बाबींचा मोर्तब केला आहे. कर्नाटकप्रांती ते वखारी घालायला परवानगी मागताहेत ती आणि दौलतीशी त्याचे संबंध कसे राहावेत ही.”

न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तहकलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वत:शीच विचार करीत त्यांनी विचारले, “टोपीकर पाळेल हा सुलूख पंत? तुम्हास काय वाटतं? मोठी बसकण झालेय मुंबईत हबशी, मोगल, फिरंगी यांची त्याच्या आसऱ्यानं.”

“जी. कलमातच मान्य केलंय टोपीकर विजरईनं की, तह बरकलम पाळू असं. शिवाय बोलवा आहे, विजरई केजविन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची. कुणी ग्रांथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी आल्याचंही कळतं.”

राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हादपंतांसमोर आले. पंतांच्या छातीभर सरकलेले उपरणे नाकळेलसे थरकले.

“तब्येत सुमार दिसत्येय न्यायाधीश तुमची. खूप तापदरा झाली तुमची गोऱ्या हेजिबांशी बोलणी करण्यात.” बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांना राजांनी घरोब्याने विचारले.

“जी. तशी खास नाही – पण मुंबईहून परतताना हबशांनी केलेल्या दर्याछाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा.”

“राजकारण रोजचंच आहे पंत. तुम्ही न्यायाधीश. तुम्हास थंडी सोसली नाही, तर तुम्ही दिलेला न्याय रयतेस सोसायचा नाही. मोगली फौजा परतल्या आहेत आता. थोडा विश्राम घ्या तुम्ही.”

“जी.” म्हणत प्रल्हादपंत निघून गेले. जाताना ते कसल्यातरी विचारात खोलवर बुडून गेले होते.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here