धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७३

By Discover Maharashtra Views: 1243 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७३ –

खालगर्दनीत उभ्या असलेल्या पंतांच्या डोळ्यांतून हातच्या पगडीवर थेंब टपटपले. तुटक, धरले, छत्रपतींचे काळीजचिरे घोगरे बोल शामियान्यात घुसमटले, “स्वामी! माघ वद्य नवमीस… समर्थांनी… समर्थांनी सज्जनगडी पूर्णावतार केला!!”

ते ऐकताना शंभूनेत्र गपकन मिटले. समर्थांची सतेज, सात्त्विक रूपेच रूपे त्यांच्यासमोर गरगरली. कानांत, दर्याच्या घरघरीत मिसळून आल्यागत नांदीचे गोसावी बोल घुमू लागले –

“जय जय रघुवीर समर्थ!
अखंड सावधान असावे….
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा….
पाटांतील तुंब निघेना, तरी मग पाणीच चालेना
सकळ लोक येक करावे, गनिमा निपटून काढावे!
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे!
शिवराजाचे आठवावे रूप, साक्षेप-प्रताप!
जीवित तृणसमान मानावे, कीर्तिरूपी तरावे!
त्याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे “पुरुष’!
याउपरि आता विशेष, काय ल्याहावे?”

दर्याच्या लाटांच्या तडाख्यांनी मशार मातीचा किनारा सुन्न व्हावा, तसे त्रयतींचे मन सुन्न झाले. त्यातच छत्रपतींच्या कानांवर रामचंद्रपंतांचे चिंतातुर बोल पडले –

“स्वामी, आम्ही हुकूम घेण्यास आलो आहोत. कल्याण-भिवंडीचा मुलूख हसनअली खानानं मातबर फौजेनिशी घेरला आहे. संगती लोधीखान आहे. आम्ही कोण चालीनं जावं?”

समर्थांच्या जाण्याच्या दु:खाला डोळ्यांआड ठेवीत छत्रपतींना समर्थ निर्णय घ्यावा लागला. त्याच दिवशी जंजिरा मोहीम दादाजी व विसाजी रघुनाथप्रभूंच्या खांद्यांवर सोपवून तळ सोडताना महाराज त्यांना म्हणाले, “आम्ही नाही असे मानू नका. समयास पडेल ते मोल देऊन जंजिरा कब्ज केल्याची खबर द्यायला या.” छत्रपतींनी दोघाही प्रभूंना खांदाभेट दिली. रामचंद्रपंतांना समर्थांची साजेशी समाधी सिद्ध करण्यास सज्जनगडी पाठवून – येसाजी कंकांसंगती छत्रपती गांगोलीचा रोख धरून निघाले.

शहजादा अकबर दुर्गादासाला घेऊन शहानपुराकडे कूच झाला. पाठमोऱ्या छत्रपतींना बघताना जंजिरा आणि खाडी या दोघांनीही नि:श्वास टाकला!! गांगोलीचे गावठाण टप्प्यात आले. आगे वर्दी नसता छत्रपती अचानक येताहेत हे ऐकलेला येसूबाईचा राहता वाडा खडबडून उठला. गांगोलीचे नामजाद सरसुभे महाराजांच्या आगवानीसाठी गाववेशीवर आले. येसाजी काकांसह धारकऱ्यांच्या मेळाने महाराज गांगोलीत प्रवेशले.

मुजरे घेत गांगोलीच्या वाड्यात पाऊल टाकताच छत्रपतींना ‘आबा’ म्हणत छोटी भवानीबाई बिलगली. तिला भुजेवर घेतलेले महाराज सर्वाशी नुसते सादिलवार बोलत होते. त्यांचे मन कशाततरी गुंतले आहे, हे सहजी उमगत होते. हातापायांवर पाणी घेऊन, वर्दी देऊन महाराज जनानामहालात आले. आत येसूबाई, धाराऊ आणि रूपा होती. महाराजांना बघताच रूपा महालाबाहेर झाली. आता कंबरेत वाकलेली धाराऊ, आधारासाठी कंबरेला हाताची टेकण देत पुढे आली. महाराजांनी तिची पायधूळ कपाळी घेता-घेता विचारले, “कशी तब्येत आऊ?”

“किती रोजानं मुखोटा दिसला ल्येकरा! रोज दर्याकडची गोष्ट कानावं पडायची. काळजाचा ठाव उडायचा.” म्हातारीने आपली खुशाली न सांगताच खुबीने राजांची चिंता बोलून दाखविली. तिच्या थकल्या खांद्यावर हाततळवा ठेवून छत्रपतींनी काही न बोलताच तो हळुवार थोपटला. समोर उभ्या असलेल्या येसूबाईकडे नजर देत महाराज म्हणाले, “खबर कळली का?….”

“जी. हसनखान तळकोकणाला ठाण झालाय. पुरंदरतर्फेला शहजादा आझम भिडला आहे. पण स्वारी अशी अचानक….”

येसू… येसू – सज्जनगडी समर्थांनी हयातीचा रामदासबोध ग्रंथ पुरा केला!कालच्या माघ वद्य नवमीस….”

“काय!” क्षणभर येसूबाईची मान चमकून वर उठली. समोरची दुखरी चर्या बघताच अपार वेदनेने पुन्हा खाली गेली. ते ऐकताना ‘देवा रं  खंडुबा’ म्हणत म्हाताऱ्या धाराऊने कपाळाला बोटे लावली आणि ती तशीच बाहेर पडली. पाठीशी हात गुंफून संथ फेर टाकणारे छत्रपती आणि सुन्न उभ्या असलेल्या येसूबाई असेच काही क्षण कुचमले. मग निर्धारपूर्वक छत्रपती म्हणाले, “आमचं एक मागणं आहे तुम्हाकडं. तुमच्याखेरीज ते कुणीच पुरतं करणारं नाही.”

“जी मागणं काय म्हणावं? असेल ते सांगावं. करू आम्ही.” “थोरल्या मासाहेब गेल्यापासून समर्थांचा बोध पाचाडच्या देवमहालात नुसताच पूजला जातो आहे. गंध-फुलं वाहून, बासनात बांधून देवघरात ठेवला जातो आहे. येसू, तुम्ही तो आता मुहूर्त पाहून, पूजनासह बाहेर घ्या. जशा थोरल्या आऊसाहेब करीत तसं त्याचं रोजाना रायगडी पठण करून घ्या. कराल एवढं?”

“जी. जेव्हा शृंगारपुराहून पाचाडी आम्ही आलो, तेव्हा थोरल्या आऊंच्या बैठकीचं दर्शन घेतानाच हे आम्हाला वाटलं होतं. वाटलं होतं, पदराची झोळी करून त्यात ही त्यांची आठवण जपून घ्यावी आणि मगच गड चढावा. पण आम्ही मन रोखलं… आजवर,”

“का?” चकित झालेले छत्रपती बोलून गेले.

“तेव्हा आऊंच्या देवमहालातून आम्ही बोध बाहेर घेतला असता तर… तर आमचा भाव न पारखता गडावर आवई उठायला वेळ लागला नसता की – ‘नातसून आपला हक्क आडून शाबीत करते आहे!’”

त्या एवढ्या खोलीच्या बोलाने भारलेले छत्रपती येसूबाईंच्या जवळ आले. त्यांच्या हनुवटीखाली तर्जजीची आकडी धरून ती उठवीत म्हणाले, “आबासाहेबांनी तुम्हाला शिक्केकट्यार दिली. श्रीसखी अशी मुद्रा आम्ही तुम्हास भरल्या दरबारी अभिषेकसमयी दिली. थोरल्या आऊ तुम्हास हा बोध देऊन गेल्या आहेत. हे सारं सांभाळण्याचं बळ जगदंबेनं तुम्हाला द्यावं.”

येसूबाईंची पापणी ते ऐकताना वर उठता उठत नव्हती. दोन दिवस गांगोलीला मुक्काम ठेवून येसूबाईंची सर्व व्यवस्था जातीनिशी नजरेखाली घालून महाराजांनी कबिल्याचा निरोप घेतला. याच वेळी हंबीरराव पन्हाळा भागात पंधरा हजार घोडा व पाच हजारांचा पावलोकांच्या बळावर शहजादा अजमच्या तळावर चालून गेले. फिरोजखान, किलीचखान, हसनअली, अनुपसिंग व अनिरुद्ध हाडा यांच्याशी त्यांची तुंबळ झुंबड पडली. किलीचखान बंदुकीच्या बाराने जाया झाला.

रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरीबैठकीत छत्रपती कारभारी तपशील घेत होते. “कब्ज केल्या अंजदीव बेटावर कोट बांधण्याकामी पुढील हुकूम व्हावा स्वामी.” पेशवे निळोपंतांनी तातडीचे काम पुढे घेतले.

“पेशवे, अर्जोजी यादवांना म्हणावं, बेटावरच्या कोटाचा बांधकाम तपशील सिद्ध करून आम्हास दाखवा. कोटघडाईला लागणारा चुना, विटा, शिसे यांचा बारदाना हरयत्ले पैदा करून पावता करण्यास कारवारच्या सुभेदारास लिहा. दर्यावर देख ठेवणारे जलकोट केवढ्या भक्कमीचे पाहिजेत याचा मासला आबासाहेबांनी सिंधुदुर्ग उठवून ठेवलेला आहे. आणि…” “हुकूम व्हावा महाराज.” पेशवे लवले.

“आणि जंजिऱ्यावर नुकतेच आम्ही पारखले आहे, जलकोट दर्याला कशी पालाण घालतो. त्यासाठीच एलफंटा बेटावरचा कोट पुढे चढविण्यासाठी अरब सारंगांशी जमेल तेवढा दोस्ताना ठेवणे आहे. हे लक्षात घ्या.”

“रामनगर प्रांताचा एक खोडा फिरंगी दरबारानं उभा केला आहे स्वामी. आपण प्रांत कब्ज केला, पण तिथल्या नायक राण्याला देत होता तशी चौथाई, आपल्या दौलतीला द्यायला फिरंगी राजी नाही.” खंडोजींनी दफ्तरी अडचण पेश केली. “मतलब?”

“स्वामी, फिरंगी दरबारचा खलिता आहे की, रामनगर तर्फेचे तुम्ही पुरते मालक व्हा. मगच मागणी घाला चौथाईची!”

ते ऐकताना महाराज बैठकीवरून उठलेच. त्यांच्या तोंडून जळजळीत बोल फुटले, “या फिरंग्यास एकदा दावावेच लागणार चिटणीस की, मुलूख आमचा आहे. त्याची चौथाई तर नकोच; पण त्याची बसकणही नको या मुलखात! चौल भागात तो शिद्द्याला पाठीशी घालतो, त्यास कोट बांधण्यास मुभा देतो. खुद्द आड राहून जुना गनीम थेट आमच्या उरावर आणतो. चौलच्या सुभेदार बहिरो त्रिमलांकडे माणसं पाठवून हबश्याच्या उठत्या कोटावर बारीक नजर ठेवण्याची समज द्या.”

“मुंबईच्या टोपीकरांनी आपल्या मागणीवर हत्यारे आणि दारूगोळा पावता केला आहे महाराज!” त्या दरबारच्या वकील प्रल्हाद निराजींनी आपला करीणा ठेवला.

“ठीक! प्रल्हादपंत, टोपीकर काय, हबशी काय, फिरंगी काय, नाक दाबल्याविना तोंड खोलणारे नव्हते. आतल्या अंगाने ते एकमेकांस हातजोड देतात. आम्ही भिडलो की नाक मुठीत धरून ‘आम्ही तुमचेच’ म्हणून वायले होतात!” महाराजांच्या मनात काय चालले असेल, याचा माग जमल्या मंत्रिगणांना येऊन चुकला.

“लोधीखानासह हसनअली तळकोकणातून नाशिककडे सरकला स्वामी. तुकोजी पालकर आणि रूपाजी भोसले यांच्या शिबंद्यांनी चांदवडच्या खिंडीत त्यांच्या गाफील फौजेवर छापे घातले. खासा हसनखान जखमी झाला. बुंदेला रजपूत, महासिंह, जाधवराव असे खानाच्या दिमतीने बाकेही जाया झाले लोधीखानाचा मुलगा मोहम्मद कामी आला.” निळोपंतांनी उमेदीची खबर दिली.

“पंत, तुकोजी, रूपाजींना असतील तेथे मानाची वस्त्रे पोच करा. निरोप द्या – याहून मर्दानगीची उमेद आम्ही तुम्हा उभयतांकडून धरली आहे.” महाराजांनी समाधानाने बैठक घेतली.

“कऱ्हाडहून वऱ्हाडात गेल्या हंबीररावांनी अकोला, कारंजा पटात घेतले आहे सरकार. मलकापूर भागात खंडणी वसुलीची सुगी पिकली आहे. त्याने चिडल्या रहुल्ला खानाशी त्यांच्या हपस््यावारी चकमकी झडताहेत. नांदेड भागात इरजखाँ आणि अब्दुलबेग यांच्याशी सरलष्करांची हातघाई झाली. हूल देत सरलष्कर वऱ्हाडभर धुमाकूळ घालताहेत.” निळोपंतांनी हंबीररावांची रणगाजी महाराजांच्या कानी घातली. ऐकताना छत्रपतींच्या मनात उमेद उभरून आली. वऱ्हाडालगत बऱ्हाणपूरला तळ ठेवून बसल्या औरंगची मनात दाटून आलेली चिंता तोडत महाराज पेशव्यांना म्हणाले, “पंत, दोन दिवसांत आम्ही गड उतरणार आहोत, गांगोलीकडं कूच होण्यासाठी. तिकडील देशाधिकाऱ्याला तोफांची भांडी सिद्ध ठेवण्यास लिहा. आमचा जाण्याचा इंतजाम ठेवा. या!” हात उठवून महाराजांनी बैठक तोडली. बरोबर आणल्या येसाजी कंकांना जंजिऱ्याच्या मोहिमेला कुमक करण्यासाठी तिकडे जाण्याचा निरोप देऊन दोन दिवसांनी त्यांनी रायगड सोडला. महाराज गांगोलीकडे पुन्हा का चाललेत, कुणालाच कळले नाही.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment