धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६९ –

“कोंडाजी, तुम्ही खास हुन्नराचे. आबासाहेबांच्या सेवेत कुल साठ असामीनिशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही. हे काम त्याहून जोखमीचं. पन्हाळा डोंगरी किल्ला. हा जलकोट. दर्याच्या लाटा हबश्याच्या बसकणीत बोट शिरकू्‌ देत नाहीत.” महाराज थांबले. त्यांचे डोळे कोंडाजींच्या कंगणी पगडीभर फिरले. पेटत्या टेंभ्यातील फुटती ठिणगी उसळून उठावी, तसे कोंडाजी एकाएकी मांड मोडीत उठले. तिबारीचा मुजरा भरत दबक्या, खरखरीत बोलीत ठाशीने म्हणाले, “घ्येटला ह्यो पानकोटाचा इडा आमी, खंडुबांच्या आनभाकीनं धनी. ह्या कोंडाजीचं पाय हबश्याच्या बसकटीवर पडलं म्हून खातर धरावी. दारवंच्या कोटाराबराबर जंजिऱ्याच्या भंडारा दर्यावर उदळूनच पायधूळ घ्याया येवू आमी.” तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजींनी झटकन लवून महाराजांच्या पायांना हात भिडवला.

“शाब्बास, भले फर्जद. आमची हीच उमेद होती तुमच्याकडून.”

कोडाजींना मानवस्त्र॑ बहाल करण्यात आली. खलबतातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले, “जो काय मानूस चालीत घ्यायचा, त्यो इमान- इस्वासाचा उचला. दर्याच्या पान्यावर हात मारतील, असं ताट पवणीचं गडी निवडा.”

कोंडाजी त्या मायेला दाद देत गर्दन हुलवून नुसते हसले. खलबत उठले. हटत्या शिळेतून बाहेर पडताच थंडीच्या झपकाऱ्याने महाराज खलबताच्या दारातच थांबले. त्यांच्या मनचे हबश्याचे विचार क्षणभर तुटल्यासारखे झाले. त्यांची जागा घरगुती नात्याने घेतली. शिळेबाहेर आलेल्या हंबीररावांना ते लगावाच्या बोलीत म्हणाले, “मामासाहेब, तुमच्याकडं आहे, ती आमची कामगिरी जरा वेगळी.”

“बोलावं की -” दाद भरताना हंबीररावांच्या मिश्यांखालून वाफारा सुटला. कोंडाजी त्यांना अवसर देण्यासाठी निघून गेले.

“मामासाहेब, मासाहेब गेल्या. नको त्या वाटेनं. आमचे रामराजे उघडे पडले. त्यांचे हात पिवळे करावेत, हे योजून त्यासाठीच तुमची वाट बघत होतो आम्ही.”

सोयराबाईच्या आठवणीने हंबीररावांचे मनही धरल्यासारखे झाले. ते काहीच बोलले नाहीत तसे छत्रपती थांबत म्हणाले, “बोलला नाहीत तुम्ही…”

“काय बोलावं धनी? असं का क्येलं त्येती न्हाई उमगत. बाळराजांस्री भ्येटलाव आमी तर बिल्गून म्हनलं त्ये…” हंबीरराव ते चित्रच डोळ्यांसमोर ठाकल्याने पुढे बोलूच शकले नाहीत. “काय… काय म्हणाले ते?” महाराजांचा आवाज चिंबला होता.

“ह्येचे की आमास्री नजरकैदेत टाकू नका म्हून सांगा दादामहाराजांस्री!” बऱ्हाणपूर, वऱ्हाड मारणाऱ्या निधड्या हंबीररावांच्या गळ्याची घाटी दाटून आली, थंडीने गोठल्यासारखी. न उलगडणारी विचित्र कोंडी, त्या दोन बीर मनांवर पसरली. समोर सात-आठ पावलांवर उभ्या असलेल्या मशालजींच्या रोखाने तरातर चालत छत्रपतींनी त्याच्या हातची मशाल आपल्याकडे घेतली. तसेच हंबीररावांसमोर येत फरफरती मशाल आपल्या मुद्रेजवळ नेत दुखऱ्या कळवळीने ते म्हणाले, “बघा, मामासाहेब, आमची नजर बंधूंना जरबेत ठेवणारी दिसते की मायेत ठेवणारी?”

हंबीरराव गडबडून गेले. आपल्या धन्याचा तडक स्वभाव त्यांना माहीत होता. मनात असते तर रामराजांना त्यांनी थेट कैदेतच टाकले असते. आणि त्या बाबीने कुणाचीही रदबदली ऐकूनसुद्धा घेतली नसती.

मशालीच्या फरफरीत मिसळत छत्रपतींचा घोगरा साद हंबीररावांच्या कानी आला, “असते तर आवबासाहेबांनी जे केलं असतं, तेच आम्ही करणार आहोत आमच्या रामराजांसाठी. त्यासाठीच तुमच्याकडं एक मागणं घालतो आहोत आम्ही मामासाहेब.”

“मागणं’ हा शब्द ऐकताच हंबीरराव चपापले. आता समोर काय येणार यासाठी ते माग घेऊ लागले.

“मासाहेबांच्या वागण्यानं जेव्हा-जेव्हा काय करावं, हा प्रसंग आला आमच्यासमोर, तेव्हा तुम्हीच पाठराखणीला धीरानं उभे राहिलात. छत्रपती म्हणून नव्हे तर, रामराजांचे दादामहाराज म्हणून आम्ही मागणं घालतो आहोत. मामा,, तुमची मुलगी भोसल्यांच्या कबिल्यात आणावी म्हणतो आम्ही. बाळराजांसाठी!”

हे असे काही समोर येईल याचे भान नसलेले हंबीरराव समोरच्या धन्याकडे बघतच राहिले. ‘कधीकाळी सरलष्करीची मानवस्त्रे खांद्यावर ठेवणारे थोरले तर समोर उभे नाहीत?’ असाच त्यांना भास झाला.

त्यांना गुमानच बघून महाराजांनी झटकन भाषा पालटत आवाहन घेतले, “शब्द द्या आम्हास सरलष्कर!”

“जी. दिली आमची घरसोबा बाळराजांचं कुंकू लेवाय. आन वागजाईची.” कुलदेवतेची साक्ष ठेवत शब्द देऊन हंबीरराव महाराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. त्यांना तसेच थोपवून खांद्याशी लावीत महाराज म्हणाले, “तुम्ही रामराजांचे सासरे झालात तरी आमच्यासाठी मामा आहात तसेच असा.”

सजल्या रायगडावर रामराजांचे लग्नकार्य थाटात संपन्न झाले. वाजतगाजत हंबीररावांची कन्या ताराऊ भरल्या शिगेचे माप लवंडून भोसल्यांच्या घरात आली. नव्या वधूचे नाव जरी ‘सीताबाई’ ठेवण्यात आले, तरी सर्व जण तिला माहेरच्या नावाने “ताराऊ’च म्हणू लागले. या शुभकार्याची सांगता झाली नाही तोच महाराज वाट बघत होते, ती खबर रायगडावर पोहोचली. जंजिरा भागात टेहळ घेत फिरणारा विश्वास मुसेखोरेकर छत्रपतींना रुजू होत जोहार देऊन म्हणाला, “कोंडाजी फरजन हबश्याच्या जलकोटात घुसलं म्हाराज! संगट पन्नास एक डुया हाईत. लई कसबाच्या चालीनं राजरोस भिडल्यात कोंडाजींची मान्सं जंजिऱ्याला. थेट चाकरीच धरलीया त्येनी हबश्याची! कुनी पाचरूट म्हून, कुनी व्हडकी दुरुस्त करनारं सुतार म्हून, कुनी चुन्याच्या घान्या फिरवनारं घानारी म्हून जंजिऱ्यावर पाऊल ठिवलंय.”

ते ऐकताना चर्येवर समाधान पसरलेले छत्रपती पुटपुटले, “आमच्या ताराऊंचा गोमटा पायगुण आहे हा.”

जोहार देत विश्वास रामोशी निघून गेला. जंजिऱ्याबाबत निर्धास्त झालेल्या छत्रपतींनी काही बेताने पेशवे निळोपंतांना याद घेतले.

“पंत, आमच्या कबिल्याची गड-उतारीची व्यवस्था तुम्ही जातीनिशी बघा. गांगोलीला जायचं म्हणतात त्या.” समोर पेश झाल्या पेशव्यांना महाराज म्हणाले.

बाळंतपणासाठी गांगोलीच्या निवांत वाड्यावर जाण्याचे येसूबाईच्या मनाने घेतले होते. खरे तर निवांतपणापेक्षा त्यांना माहेरच्या शृंगारपूरची भावेश्वरी जवळपास येणार हा दिलासा यात होता. कारण खुद्द शृंगारपुरी जाणे त्यांना शक्‍यच नव्हते!

जी.” म्हणत निळोपंतांनी छत्रपतींच्या आज्ञेला दुजोरा दिला. काही बोलण्यासाठी निळोपंत खोळंबलेत हे ताडलेले महाराज त्यांना चाल देण्यासाठी म्हणाले, “बोला. काय आहे?”

“महाराज, नगरहून शहजादा आझमनं हसनखानास सैन्यबंदीनं धाडला आहे. आपण घाटबंदी केल्याचं हेरून, कोकणवर येण्याचा बेत पालटून हसनखान सासवड खोरीकडं सरकला आहे. आपल्या पुरंदरतर्फेच्या मन्सबदार शेख इब्राहिमशी बोलणी लावून त्याला फितव्यानं फोडण्याचा प्रयत्न चालला आहे खानाचा!”

महाराज अस्वस्थ झाले. तरीही शांतपणे म्हणाले, “पंत इभ्रामभोवती आपले विश्वासाचे खबरगीर पेरा.”

“जी. पुण्याजवळचा पेठ शिवापूरचा कसबाही बहादूरखानानं लुटला आहे स्वामी.” निळोपंतांनी दुसरी कटू बाबही महाराजांच्या कानी घातली.

“ठीक आहे. पेशवे, पुण्याच्या सरसुभा दामाजी रघुनाथांना तातडीनं हारकारा द्या. गनीम जोरावारीनं टापांखाली घेणार आहे, प्रांत पुणे. त्यास अहोरात्र फिरते राहण्यास लिहा. दोन मोगली कुमकांचा मेळ पडणार नाही, याची खबरदारी घेण्याची समज द्या.”

“जी.” निळोपंतांना आपल्या स्वामींचे थंडे, शांत निर्णय घोटाळ्यात टाकीत होते.

“स्वामी, फिरंगी विजरई ताव्हेरानं कोळवलवर कोट बांधून पुरा केला. थोरल्या स्वामींची या कोळवलवर फार नजर होती.”

महाराज विचारात गेले. फिरंग्यांचा नवा विजरई आपली कर्तबगारी लिस्बनला आपल्या बड्या दरबारला रुजू करण्यासाठी उचल घेणार हे साफ झाले होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here