धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६३ –

“धनी, धोंडश्यार् शाजाद्यांची दोन मान्सं आल्यात. मुशीनमान हाईत. खासगीनं भ्येटायची झ्यायली धरलीया त्येनी.” म्हलोजींनी छत्रपतींची विचारधारा तोडली.

महाराजांची चर्या त्रासिक झाली. अकबराची माणसे म्हणजे कसलीतरी मागणी असणार. त्यांना वाटले नकारच द्यावा म्हलोजींना; पण पडत्या पावसातून माणसे आलीत या एकाच विचाराने महाराज म्हणाले, “घेऊन या त्यांना.”

शहजाद्याच्या खास मर्जीचा सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद यांना घेऊन म्हलोजी आले. त्यांना आत पेश घालून म्हलोजी बाहेरच उभे राहिले.

“अस्सलामें सलाम.” मिर्झा शुजाई आणि अब्दुल महाराजांना तसलीम देत लवले. हात उठवून त्यांना दाद देत महाराज म्हणाले, “बोलो, क्या हे?”

दोघींनीही दालनभर नजर फिरवून कुणी नाही याची खातरी करून घेतली.

“राजाजी की खैर हो। हम शहेनशाहके खरिदमतमें आये है।॥” अकबराचा उल्लेख “शहेनशाह’ असाच शुजाईने केला.

“ठीक.” महाराजांनी त्याला अधिक महत्त्व दिले नाही.

“आला हजरत की तर्रफसे राजाजीको खलिता है खलबत का!” शुजाईने अब्दुलकडे बघितले. अब्दुलने खिल्लतीआडची हिरवीचार थैली बाहेर घेतली. पुढे होत ती महाराजांच्या हाती दिली. फासबंद उकलून महाराजांनी आतल्या तीन वळ्या बाहेर घेतल्या. वेगळ्या माटामुळे अकबराच्या मोगली पत्राची वळी ओळखू येत होती.

महाराजांनी ती खोलली. आत मोडी लिखावटीचा मजकूर होता.

“महाराजांचे अग्रणी संभाजीराजे यासी – मी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. सोबत आपल्या राजधानीहून आलेली काही अस्सल पत्रे आहेत. ती शांतपणे वाचून त्याचा निवाडा करावा. आमच्याबद्दल इतबार धरावा.”

कोड्यात पडलेल्या छत्रपतींनी दुसरी वळी खोलली. रायगडाच्या दफ्तरी शिक्कामोर्तबाचे ते पत्र चिटणीस बाळाजींनी गोमट्या हस्तलेखात रेखले होते. शहजादा अकबराला! सोयराबाईंच्या नावे. त्याचा मजकूर वाचताना महाराजांच्या मस्तकास मुंग्याच मुंग्या धरल्या. दोन्ही पत्रे त्यांनी सरासर वाचून काढली. हाती तावले निखारेच असावेत, तसे ते त्या पत्रांकडे बघतच राहिले. ती पत्रे नव्हतीच – मराठी दौलतीला बेमान झाल्या कोत्या, कारस्थानी मराठी मनांचा तो फितूर जाहीरनामाच होता!

महाराज रायगडावर नाहीत, हा भांगा साधून सोयराबाई, अण्णाजी, बाळाजी, हिरोजी, सोमाजी आदी मंडळींनी, कुणालाही त्यांची कीव वाटावी, असे कपटी कारस्थान शिजविले होते. कसले? तर – “संभाजीराजांना जीवे मारून अकबराच्या पक्षाला मिळण्याचे! प्रसंगी त्यासाठी अकबराला मराठी मुलूखपट्टा तोडून देण्याचे!” त्या पत्रात कटप्रमुखांचा नावानिशी स्पष्ट उल्लेख होता. तो लिहून आजवर केल्या कलमी सेवेवर बाळाजींनी स्वहस्ते पाणी फिरविले होते. आग्ऱ्यात थोरल्या महाराजांच्या बदली कोठडीत वेष पालटून झोपलेल्या हिरोजी फर्जंदानेच ती पत्रे पोहोचविण्याचे थोर स्वामिकार्य केले होते. छत्रपतींनी एकवार सलामत सोडलेल्या थोर, जाणत्या, वडीलधाऱ्या असामींनी आपण सर्पकुळीचे वारस आहोत, हे शाबीत केले होते! माणसे माणसेच उरली नव्हती. त्यांचे पाय उलटे फिरले होते. महाराजांच्या हातातील खलितावळ्या राजक्रोधाने थरथरू लागल्या. डोळ्यांत रक्त उतरले. मोठ्या निकराने संताप रोखत त्यांनी, “हम देखते है।” म्हणून अकबराच्या माणसांना निरोप दिला.

सारा बालेकिल्ला आपल्याभोवती फिरतो आहे, असेच त्यांना वाटले. कटाची दिशा बघून तर त्यांच्या अंगाची लाही फुलली होती. विषप्रयोग हा पूर्वार्ध होता. अकबराला मिळणे हा उत्तरार्ध. पहिला काळाकुट् आणि दुसरा त्याचीच थेट सावली!

“कोण आहे?” छत्रपतींनी दरडावून पहारा याद घेतला.

“कलमी सरंजामासह त्रिबकजींना पाठव.” आज्ञा सुटली.

खासगी कारभारी त्रिबकजी महाराजांसमोर रुजू झाले. जखमी संतप्त मनाने महाराजांनी त्यांना हुकूम केले, “चिटणीस, आजच्या आज कुडाळ-डिचोलीच्या धर्माजी, मोरो दादाजींना आज्ञा द्या. दिसेल तिथे त्या मुजुमदार अण्णाजीला जेरबंद करून आमच्यासमोर पेश घाला! सुधागडला जिवाजी हरींना पत्र द्या. रायगडी निळोपंतांना कळवा, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो यांना दस्त करून थोरल्या महालावर चौक्या जारी करा.”

सगळीकडे हुकूम सुटले. अकबराच्या माणसाबरोबर संतोषाचा खलिता पाठवून “आम्ही भेटीस येऊ’ असा त्याला निरोप देऊन दोन दिवसांनी छत्रपतींनी पन्हाळा सोडला. कोसळत्या पावसाचा गुमान न धरता, आडव्या येणाऱ्या नद्या, होड्यांनी ओलांडण्याचा निर्धार केलेले महाराज रायगडाकडे चालले. रायगडी आलेल्या महाराजांना कळून चुकले की, आज्ञा नसता अण्णाजी डिचोली प्रांतात का गेले आहेत. कटापासून नामानिराळे दाखवण्याचा धूर्त डाव होता, तो अण्णाजींचा. अकबराला त्र्यंबयकहून पालीला आणण्यासाठी महाराजांनी धाडलेले बाळाजी तर त्याच्याशी संधान बांधूनच परतले होते. रायगडावर दहा- वीस असामी हाताशी धरून सोयराबाई, अण्णाजी, पालीत अकबराशी संधान बांधणारे बाळाजी, सोमाजी दत्तो व बाळाजींचे पुत्र आवजी आणि फिरता हिरोजी अशी ही बनावाची साखळी होती. तिचे धागे, ‘कर्नाटकसुभा’ शामजी नाईकाला देण्याची लालूच दाखवून, मंडळींनी कर्नाटकापर्यंत नेऊन भिडविले होते!

या वेळी छत्रपतींना सर्वांत मोठी गरज भासली, ती हंबीररावांची. ते गडावर नव्हते, कट खंदून काढल्याशिवाय महाराजांना स्वस्थता लाभणार नव्हती. प्रल्हाद निराजी, आवजी, खंडोजी बल्लाळ यांच्यासह पेशवे निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. त्यांनी उंदेरीचा वृत्तान्त दिला, “चार दिवसांपूर्वी आपल्या सारंगांनी पहाट धरून उंदेरीवर निकराचा एल्गार केला महाराज, आठ घंटा तुंबळ झटापट झाली दर्यावर; पण यश नाही आले सारंगांना. हबश्यानं निकरानं हमला हटविला. आपला बराच दर्यावर्दी कामी आला आहे.”

ते ऐकताना महाराजांची चर्या व्यथित झाली. काही चांगली खबर कानी पडावी, असा काळच नव्हता. महाराज आवजींच्या जवळ आले. आवजींना तपासून घेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, “एक सल्ला द्याल आवजी?”

“जी.” आवजींना छत्रपतींचा रोख कळला नाही.

“आम्हावर अभक्ष्याचा प्राणघाती प्रयोग करून अकबराशी संधान बांधण्याचा बनाव झाला आहे. तो पुराव्यानिशी शाबीत झाला, तर संबंधितांना काय शासन करावं आम्ही?” आवजी अंगभर थरारले.

“देहदंड!” खंडोजींनी संतापून मध्येच रोकडा सल्ला दिला. त्यांना कल्पना नव्हती की, आपले वडील त्यांपैकीच एक असतील! काही न बोलता महाराजांनी खंडोजींनी खांदा हलकेच थोपटला आणि वर्माचा सवाल केला, “आमच्या राणीसाहेब, सरलष्कर हंबीरराव असले त्यात तर?” “ते -ते कसं शक्‍य आहे महाराज?” खंडोजी पार गोंधळून म्हणाले.

“सर्व शक्‍य आहे खंडोजी! सूर्यास वाळवी डसण्याचे दिवस आलेत! तुमचा सल्ला विचार करून सांगा आम्हास.”

खंडोजींना वाटले स्वामींना आपलीच तर शंका आली नसेल! ते बांधीव म्हणाले, “कुणीही असो – प्रत्यक्ष आम्ही असलो, तरी अशा गुन्ह्याला शिक्षा देहदंडच!”

खंडोजी महाराजांच्या कसोटीला पूर्ण उतरले होते.

“तुमचा काय सल्ला आहे, निळोपंत आणि न्यायाधीश!” महाराजांनी प्रल्हादपंतांना जाणीवपूर्वक ‘न्यायाधीश’ म्हटले.

“खंडोजी म्हणतात ते रास्त आहे.” पेशवे, न्यायाधीश, खंडोजी सर्वांनाच कळून चुकले की, ज्यांचे हात या प्रकरणात गोवले आहेत, त्यांची आता मुळीच गय व्हायची नाही.

“ठीक आहे. खंडोजी, जरा रामराजांचे कारभारी येसाजी दाभाड्यांना याद करा आमच्याकडे.” निळोपंत, प्रल्हाद निराजींना वाटले, रामराजेच यात सर्वांत पहिले घेतले जाणार!

सर्वांना निरोप दिलेले महाराज पाठीशी हातांची गुंफण चाळवीत फेर घेऊ लागले. पावलागणिक विचारांची जाळी गुरफटून येऊ लागली – “भय वाटते आम्हाला मरणाचे? नाही. मग ही काळजाचा देठ चिंबून टाकणारी कसली वेदना? ही वेदना मृत्यूच्या भयाची नाही. मरणापेक्षाही भयानक असते, ते नेकीचे मरण! निष्ठा, नेकी मेली की उरते काय? ही वेदना त्याची आहे.

“राजा एकला असतो. त्याच्या मस्तकीचे छत्र तोलणारे हात अनेक असतात. तेच फिरले तर?… मग ‘जाणावे फावले| गनिमासी।।’ समर्थ, परके गनीम हत्यार भिडवून थेट भुईला मिळविता येतात. पण अस्तनीतले गनीम मन:शांतीची माती करून टाकतात.’

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here