महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६१

By Discover Maharashtra Views: 1274 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६१ –

सुधागडहून सुभेदार जिवाजी हरींचा माणूस निरोप घेऊन आला, “शहजादा अकबर पालीजवळ धोंडश्याला पोहोचला आहे. महाराजांच्या भेटीचा आग्रह धरून आहे. त्यांच्याजवळ चारशेच्या आसपास घोडा, दोन-एकशे उंट आणि मामुली हशमांची शिबंदी आहे. तो रसदीची मागणी घालत आहे. काय करावं हुकूम व्हावा.”

महाराजांनी निळोपंतांना पत्र पाठवून रायगडाहून हिरोजी फर्जंद यास पन्हाळ्याला बोलावून घेतले. हिरोजी आग्रा दरबार बघून आलेला जाणता असामी म्हणून अकबराकडे धाडण्यासाठी महाराजांनी त्याची निवड केली होती. हिरोजी मनचा मागमूस न देता कान पाडून महाराजांना पेश झाला. त्याला आज्ञा देण्यात आली, “फर्जंद, तुम्ही वकुबाचे म्हणून आम्ही तुम्हाला शहजाद्याच्या भेटीसाठी पालीला पाठवीत आहोत. जाताना एक हजार रुपये, रत्न-हिरेजडित मोतीकंठा आणि हिरे मढविलेला तुरा शहजाद्याला नजराणा म्हणून घेऊन जा. जिवाजींना शहजाद्याला रसद देण्यास सांगा. एक खलिता आम्ही सिद्ध केला आहे तो कविजींच्याकडून घ्या. आपला आब ठेवून शहजाद्याची भेट घ्या.”

“जी.” हिरोजीच्या मनात काळे शिवार पोटरीला आले होते, तरीही अदबमुजरा देत तो कमरेत लवला.

शहजाद्याला द्यायच्या नजराणा-तबकाला हात लावणाऱ्या छत्रपतींच्या उजव्या हाताच्या तर्जनजीत खवली-अंगठी चढली आहे, हे हिरोजीच्या ध्यानी यायचे कारण नव्हते! हिरोजी मुजरा देऊन बाहेर पडला, महाराजांच्या भेटीसाठी बत्तीस शिराळ्याचे कृष्णाजी भास्कर आले. त्यांनी विनंत घातली, “शिराळा भागात सैन्यसंचणी जारी आहे. साहेबस्वारीने एकदा त्यावर नजर टाकावी.”

संध्याकाळ धरून महाराज कृष्णाजी भास्कर, बापूजी त्रिंबक, खंडोजी, कविजी यांच्यासह पन्हाळा उतरून शिराळापेट्याच्या वाटेला कूच झाले. वारणा ओलांडून त्यांनी शिराळा गाठला. भुईकोटासमोरच्या मैदानात संचणी होणाऱ्या मावळजवानांची भेट घेतली. एक दिवस शिराळ्यात मुक्काम करून छत्रपती सर्वांसह मलकापूरला आले.

बापूजी त्रिंबकांच्या वाड्यात सदरेला मांडलेल्या बैठकीवर महाराज बसले होते. त्यांना बापूजींनी, “तुलाजी देसाई निकम भेटीला आल्याची” वर्दी दिली.

तुलाजींचा चेहरा त्रासिक, चिंताक्रांत दिसत होता. महाराजांना मुजरा घालून तो चिडीने बोलला, “धनी, आमी आपल्या सावलीला हाव का मोगलाईत?”

“काय आहे देसाई? नीट सांगा.” महाराजांनी त्याला सुमार केला.

“आमाकडं बिळाशी तर्फेच्या बारा गावांच्या देशमुखीचा भोगवटा हाय. तो शिराळापेट्याला जोडून असता बळेच वारणखोऱ्याला जोडून आमासत्री गोत्यात घातलंया स्वामी.’

“कुणी?” छत्रपतींची चर्या ताठर झाली.

“वारणखोऱ्याचं देशमुख सोमाजी बांदलांनी.”

“काय म्हणताय हे देसाई? एका तर्फेचा बारा गाव तोडून दुसऱ्या पेट्याला घेतला आहे बांदलांनी?” महाराजांनी बापूजी व कृष्णाजी यांच्याकडे वळून विचारले.

“जी, निकमांचा गाव शिराळा पेट्याचा हे खरं आहे.” कृष्णाजी भास्करांनी इतबार दिला.

“आम्ही बांदलांना हे अन्यायाचं आहे, करू नका म्हणून सांगून थकलो. ते जुमानत नाहीत महाराज.” बापूजी बोलले. महाराजांची चर्या लालावून आली. त्यांनी कडक शब्दांत तुलाजीच्या खटल्याचा निवाडा दिला. ज्यात बांदलला “भिक्षा नको कुत्रं आवरा” म्हणण्याचीच पाळी यावी. छत्रपती बापूजी त्रिंबक आणि कृष्णाजी भास्करांना म्हणाले, “आम्ही तुमच्या नावे आज्ञापत्रे देऊ. या देसायांचे बारा गाव शिराळा पेट्यालाच जोडून चालवा. दुसऱ्याच्या

स्थावराला मनचाहा हात घालण्याऱ्या सोमाजी बांदलांना कळू द्या की, तसे झाले की कशी कोंडमार होते. कविजी, बांदलाची वारणखोरीची देशमुखी सरकारी दिवाणात अमानत झाल्याचा हुकूम द्या!”

तुलाजी देसाईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. बापूजी, कृष्णाजी, कविजी साऱ्यांनाच समजून चुकले की, महाराज केवळ न्यायालाच कौल देण्यात तत्पर नाहीत, तर अन्यायाला खोडा घालण्यातही तयार आहेत!

मलकापूरहून पन्हाळ्याला येऊन महाराजांनी दोन दिवस मुक्काम केला. म्हलोजींचा निरोप घेऊन, जावळी, मलकापूरच्या सुभेदारांना सुभ्यावर परत पाठवून, महाराजांनी कोकणदरवाजा उतरत, पन्हाळा सोडला. राजापूर, कुडाळ जवळ करण्यासाठी तो खंडोजी, येसाजी गंभीर, कविजी यांच्यासह दौडू लागले. हिरोजी मात्र कुणाकुणाच्या एकांती भेटीगाठी घेत चार दिवस पन्हाळ्यावरच रेंगाळला.

राजापूरला सुभेदार देवाजी विठ्ठलांच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या वखारीचे आताषीचे जाणकार उचलून महाराज कुडाळमार्गे डिचोलीला आले. फिरंगी दरबाराचा वकील नारायण शेणवी महाराजांच्या भेटीस आला. त्याने नजराणा पेश करून डिचोलीच्या मोरो दादाजींबद्दल तक्रार महाराजांच्या कानी घातली,

“सुभेदार फिरंगी दरबाराशी जमवून घेत नाहीत.”

महाराजांनी मोरो दादाजींना कडक समज दिली, “सुभ्याला आताषीचे कारखाने उठवायचे आहेत. फिरंग्यांशी सुलूख राखल्याशिवाय ते चालते कसे होणार? कारखान्यास लागणारा सोरा, गंधक कारवारातून दर्यामार्गे येणार. तो फिरंगी मुलखातूनच घेतला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध राखले, तर ठीकच आहे, ना तर तुमची सुभेदारी सूत्रेच आम्हाला काढून घ्यावी लागतील.”

नारायण शेणव्याने आणखी एक महत्त्वाची बाब महाराजांना पेश केली,

“ह्छ्त्रपतींच्या पत्राप्रमाणे पन्हाळ्याहून आलेला वकील रामजी ठाकूर कैद केला आहे. नव्या वकिलाची नामजादी व्हावी.” रामजी पहिल्या कटाचा हस्तक असल्याने त्याला कैद करण्याबद्दल महाराजांनी फिरंग्यांना लिहिले होते.

छत्रपती क्षणैक विचारात पडले. काही ठरवून त्यांनी शेणव्याला निर्णय दिला, “येसाजी गंभीर येतील तुमच्याबरोबर आमचे दरबारी वकील म्हणून.” महाराजांनी विजरईला द्यायचा नजराणा आणि कारवारभागातून येणारा गंधक, सोरा दर्यामार्ग सोडण्याची विनंती करणारा खलिता देऊन येसाजी गंभीरांना गोव्याकडे पाठविले. कारखान्यांसाठी सोयीच्या जागांची पाहणी केली. कुडाळचे धर्माजी नागनाथ आणि मोरो दादाजींचा निरोप घेऊन महाराजांनी डिचोली सोडली. पुन्हा पन्हाळ्याचा रोख ठेवून दौडणाऱ्या छत्रपतींना एक गोष्ट खोलवर जाणवली होती, कुडाळचे खेमसावंत आणि फोंड्याचे दळवी, हे दोघे काही भेटीला आले नव्हते.

पन्हाळ्याच्या पुसाटी-बुरुजावरून मावळतीला दूरवर दिसणाऱ्या कोकणपट्टीत छत्रपतींची नजर गुंतून पडली होती. मृगाचे नक्षत्र कोरडे गेल्याने अजून आभाळ स्वच्छ होते. नुकताच नागोठण्याला हाराकारा धाडून महाराजांनी आरमाराच्या खाशा सारंगांना आणि दर्यावर्दीना नागोठण्यात एकजाग येण्याचा हुकूम दिला होता.

पश्चिमेच्या आभाळकडेवर उधळलेली केशरी, नारिंगी, गुलाबी, रूपेरी ढगांची रंगपंचमी निरखणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द थडथडू लागला. “जंजिरा – जंजिरा!” सांजावून आले. कासारी नदीचा पट्टा दिसेनासा होताच महाराजांनी बुरूज सोडला.

तर्जनजीतील अंगठीशी बोटे चाळवीत चालणाऱ्या महाराजांना बरोबर असलेल्या म्हलोजी, खंडोजी, कबिजी यांचे कुणाचेच भान नव्हते. चौवाटांनी उड्या घेत आलेले पाणलोट एकाच कुंडात कोसळावेत, तसे विचारच विचार त्यांच्या मनात एकवटून आले. “बापावर हत्यार चालवायला निघालेला, फसगत होऊन दख्खनेत उतरलेला अकबर.

त्याच्या मागनं येऊ घातलेला औरंग. कधीतरी निसटता बघितलेला औरंग आणि कधीही न बघितलेला गोव्याचा विजरई, जंजिऱ्याचा हबशी, भागानगरचा कुतुबशहा, विजापूरचा बालराजा शिकंदर, मुंबईचा टोपीकर. हा सर्वांचा खासगतीचा खेळ आहे! की अज्ञात शक्तीने मांडलेला हा भव्य असा शतरंजी पट आहे? का खेळतो आहोत आम्ही तो? दिला असता आमचा हा डाव रामराजे, मासाहेब, अण्णाजींच्या हाती आणि या पन्हाळ्यावर सुभा मोडून खात निवांत बसलो असतो तर काय बिघडते? का वाटते हा खेळ खेळावा? कुठली शक्ती आम्हाला रेटून या मैदानावर उतरविते आहे? की आमचा जन्मच यासाठी आहे?

“तो धनगर आम्हाला “बिरोबा’ म्हणाला, बऱ्हाणपूरची बातमी ऐकलेला बादशहा “सैतान’ म्हणाला असेल! सती गेलेल्या मासाहेब आम्हाला ‘पुत्र आहात’ म्हणाल्या.

रायगडच्या मासाहेब आम्हाला शत्रू मानतात! अकबराला आम्ही धडाडीचे वाटलो, समर्थांना उग्र!

“लिंगाण्यावरून कुडी फेकलेल्या गोदावरीला काय वाटले असेल आमच्याबद्दल? भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना काय वाटले असेल? अंती भेटीसाठी तळमळलेल्या आबासाहेबांना काय वाटले असेल? आणि – आणि नगरच्या कोठीत दिवस मोजणाऱ्या आमच्या स्त्रीला काय वाटले असेल?’ सुन्न मनाने महाराज पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यात परतले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment