धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४८ –

“आम्हास चूड द्या.”  जी.

“येतो आम्ही! बाळराजांना-सूनबाईना सांभाळा! कधी प्रसंग आलाच तर आमचे हे रूप ध्यानी ठेवा! तत्र आहात तुम्ही आमचे. जगदंब!” ओलेत्या, भरल्या मळवटाच्या पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या. पूर्वाभिमुख होत त्यांनी सतीबैठक घेतली. महाराजांच्या मोजड्या क्षणभर मस्तकी भिडवून त्यांनी समोर ठेवल्या.

कुलदेवीचं स्मरण करीत डोळे मिटले. पुन्हा कधीच न उघडण्याच्या निर्धारानं! चहूबाजूंनी चढत्या माणसांनी सतीचा देह चंदनकाष्ठांनी गळ्यापर्यंत रचला. मणामणाचे पाषाण छातीवर तोलीत संभाजीराजे शिडीची एक-एक पायरी चढून गेले. रचल्या काष्ठांतून न स्थिर ओंजळ फक्त दिसत होती. उमाळा फुटू नये म्हणून ओठ दातांखाली दाबत मागून आलेल्या राजोपाध्यांनी उचलून धरलेल्या तबकातील कर्पूरवड्यांची मूठ संभाजीराजांनी भरली. पाझरत्या डोळ्यांनी ती मूठ सतीच्या ओंजळीत सोडली. तिला तेवते निराजंन भिडविले. मुठीमागून मुठी त्या ओंजळीत पडू लागल्या. सतीला रक्ताच्या हातून चूड मिळाला!! पेटत्या चंदनकाष्ठांतून अग्निपक्षी आभाळाकडे झेपावू लागले.

शेवटची भरली मूठ तशीच घेऊन सुन्न संभाजीराजे शिडी उतरले. कुणाकडेही न बघता थेट बालेकिल्ल्याकडे खालमानेने चालू लागले. सतीला मानाची सलामी देणाऱ्या तोफांच्या बारांनी रायगडाला कानठळ्या बसू लागल्या. महाराज गेले त्या दिवशीच रायगडाने डोळे मिटून घेतले होते – आज त्याचे कानही जायबंदी होत होते.

सातमहालाच्या जोत्याशी आलेल्या शंभूराजांनी अपार वेदनेने सुन्न झालेला आपला माथा सतीच्या खांबाला असहायपणे टेकविला. त्यावरच्या ओल्या कुंकवाचा शिवगंधाला स्पर्श होताच मात्र; त्यांच्या अंगावर सर्रकन काटाच फिरला. भरल्या मुठीतल्या कर्पूरवड्या खाली विखरून पडल्या. आत्तापर्यंत निकराने दाबून ठेवलेला उमाळा उसळून आला. मुक्‍यापणीच, चूड लागलेले मन आक्रंदले – ‘मासाहेब, मासाहेब!’ ते त्या खांबाला माथा टेकवून तसेच कितीतरी वेळ सुन्न उभे राहिले.

“स्वारीनंच असं काळीज टाकलं, तर इतरांनी काय करावं?” त्यांच्या पाठीशी येसूबाई केव्हा येऊन उभ्या राहिल्या होत्या, तेही त्यांना कळले नव्हते.

खांबावरचा माथा उठवून पायतळीच्या कापूरवड्या बघताना संभाजीराजांच्या तोंडून बोल आले, “नाही येसू, तुम्ही आमच्या पत्नी असलात तरी आमचा सल तुम्हाला उमगायचा नाही. ज्या हातानं रायगड सोडताना आजवर आम्ही दह्माच्या कवड्या घेत आलो होतो, त्याच हातावर कापराच्या वड्या सोडून आलो आज आम्ही!!! मोठे अभागी आहेत आमचे हे हात! आम्हाला एकले सोडा.” आपला गुन्हेगार वाटणारा तळवा निरखीत ते आपल्या महालाकडे चालू लागले.

जाता-जाता त्यांची नजर सोयराबाईंच्या महालावर पडली. त्याचे झरोके, दरवाजे बंद बघून एक खोलवर कळ त्यांच्या काळजात फिरली. “आबासाहेबांच्या पायांपासून दूर राहिलेल्या मासाहेब त्यांच्या मोजड्या घेऊन चितेवर चढतात आणि त्यांच्या शेजारी बसून महाराणीपदाचा अभिषेक घेणाऱ्या या मात्र महाली बसतात! सतीला अखेरचा मान द्यायलाही त्या काळ्या हौदावर येत नाहीत! काय आहे हा जगदंबेचा खेळ?” त्यांच्या या सवालाचे उत्तर जगदंबेकडेही नव्हते.

उपोषणाचे व्रत मोडून आषाढी एकादशीचा दिवस पुतळाबाईचा घास घेऊन मावळत होता. अजाण रामराजांना कुणीही हाताशी धरून काही उलघाल करू नये म्हणून संभाजीराजांनी थोरल्या महालावर चौकीपहारे बसविले. नेमक्या याच बाबीने सोयराबाई खोलवर दुखावल्या गेल्या. कुणी भेटीस आले की म्हणू लागल्या, “आम्ही महाराणी नाही. कैदी आहोत.”

याची कुणकुण कानी आलेल्या संभाजीराजांनी येसाजी दाभाड्यांना बोलावून घेतले. येसाजी रामराजांच्या खासगी तैनातीचे महाराणींचे विश्वासू सरदार होते. त्यांना समजावून देण्यासाठी युवराज म्हणाले, “येसाजी, थोरल्या महाली चौकी पहारा बसविला आहे, तो सुखासुखी नाही. तो निर्णय घेताना आम्हाला काय वाटलं ते आमचं आम्ही जाणतो. बाळराजे पोर उमरीचे आहेत. तुम्हास पूर्वीलप्रमाणे त्यांच्या तैनातीतच आम्ही ठेवत आहोत. त्यांच्या भल्यावर नजर ठेवून असा.”

“जी. आम्ही त्यांना कुणा बुऱ्यांच्या हाती लागू देणार नाही.” येसाजी निघून गेले.

थोड्याच वेळात हंबीरराव, कुवी कुलेश, केशव पंडित, उधो योगदेव आणि खंडोजी बल्लाळ महाली पेश झाले. मुजरा देणाऱ्या खंडोजींना बघताच शंभूराजांच्या कपाळी आठी धरली. तिचा मतलब ध्यानी आलेले खंडोजी मान लवती करून तातडीने म्हणाले, “स्वामींचा गैरसमज नसावा. आम्ही आमच्या चिटणीस बंधूंच्या वा वडिलांच्या रदबदली साठी नाही आलो! प्रसंग बाका आहे. चाकर सेवेस चरणी तत्पर आहे, हे सांगण्यासाठी आलोत आम्ही.” बाळाजी खंडोजींचे वडील होते.

ते निर्धारी बोल ऐकून संभाजीराजांचे डोळे उजळले. खंडोजींसमोर येऊन आपला हात त्यांच्या खांद्यावर चढवीत ते म्हणाले, “हीच उमेद होती आमची तुमच्याकडून खंडोजी! तुम्ही आम्ही साऱ्यांनीच खूप शिकण्यासारखं आहे, या मामासाहेबांच्याकडून. नातीगोती दौलतीच्या सेवेआड येता कामा नयेत.” संभाजीराजांनी हंबीररावांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

ते बोलणे तसेच उचलत हंबीररावांनी आपल्या आणि गडावरच्या लोकांच्या मनसुब्याकडे फिरविले, “निस्ती नातीगोतीच का, काय बी सामने आलं तरी थोरल्या धन्यांच्या ह्या दौलतीची आबदा हुता कामा न्हाई. तुमीच आता निवाडा कराय पायजे का त्या.”

“कसला म्हणता सरलष्कर?” शंभूराजांना त्यांचा अंदाज लागला नाही. “धन्याविना मुलूक असा किती दिसऱ्हायाचा? कारबारी शिक्का हाती घ्याया पायजे तुमास्री.” हंबीररावांनी असंख्यांची इच्छा आणि कारभाराची अडचण पेश घातली.

“सेनापती ठीक सलाह देते है। जबतक युवराज मंचकारोहण नहीं करते कारोबार कैसे चलेगा?” कवी कुलेशांनी तिला जोड दिली.

अर्थातच हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा होता. अजाण रामराजांच्या हाती कारभाराची सूत्रे देणे शक्‍य नव्हते. त्यांना हाताशी धरून सोयराबाई काय करतील याचा नेम नव्हता.

तसेच महाराजांच्या आसनासमोर नतमस्तक होणे सोपे होते, पण त्यावर आरूढ होणे सोपे नाही, हे संभाजीराजे जाणून होते. गंभीर होत ते म्हणाले, “आम्हाला विचार करू द्या यावर. उधो योगदेव, सध्या प्रधानकीचे दफ्तर खोळंबून आहे. तुम्ही ते हाती घेऊन राबते करा.”

“जी.” उधो योगदेव हात जोडत लवले.

“मामासाहेब, आता पन्हाळ्याहून कैद असामी येतील. त्यांच्या निवाड्याची मसलत काय?” संभाजीराजे आपल्या मनच्या विषयावर आले.

“तपास घेऊन युवराजांनी आपल्या मर्जीनुसार निवाडा करावा त्येंचा.”

“आम्ही तपास घेतला आहे. या घालमेलीत प्रल्हाद निराजी आणि राहुजी हकनाक गोवले गेलेत. याची खातरजमा झाली आहे आमची. त्या उभयतांना मुक्त करावे म्हणतो आम्ही.”

“जशी मर्जी.” हंबीररावांना कुठेतरी हायसे वाटले.

“चला कविजी, जगदीश्वराचे दर्शन घेऊन येऊ.”

कवी कुलेश आणि केशव पंडित यांना बरोबर घेऊन राजे बालेकिल्ल्याबाहेर पडले. साऱ्या गडभर श्रावणी उन्हाची उबदार, पिवळी किरणे उतरली होती. त्यात पावसाने निथळली हिरवाई चमकत होती.

“पुराचे शिवयोगी आणि त्यांचा मठ कसा आहे?” संभाजीराजांनी विचारले.

“जी; ठीक आहे सगळं. गणेशभट जांभेकर मठाचे बरे चालवून आहेत.” केशव पंडितांनी शृंगारपूरच्या शिवयोग्यांचे कुशल दिले.

जगदीश्वराचे मंदिर आले. मोजड्या उतरून कविजी आणि पंडितांना पाठीशी घेत संभाजीराजे मंदिरचौकात आले. मान वर करून त्यांनी घंटानाद दिला आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले. ते फरसबंदीच्या दगडी कासवावर पडणार होते, ते सावरून बाजूला ठेवीत त्याच्याकडे एकजोड बघताना राजे एकदम विचारगत झाले.

“पंडित, या दगडी कासवाची मंदिरात काय हेतूने स्थापना केली जाते?”

“ते कूर्मावताराचं प्रतीक असावं स्वामी.” केशव पंडितांनी जाब दिला.

अगदी हेच उत्तर, आबासाहेबांना एकदा मोरोपंतांनी दिलं होतं. त्या वेळी स्वतःला वाटणारा या कासवाचा वेगळाच मतलब आबासाहेबांनी सांगितला होता.

“पंडित, कविजी, आम्ही या हमचौकातील दगडी कासवासारखे आहोत! आमचे आबासाहेब त्या समोरच्या गाभाऱ्यातील देवमूर्तीसारखे आहेत! हे कासव कधीच गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे नमस्कार रुजू होतात ते गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांशी – तेच योग्य. आणि – आणि जाणते-अजाणतेपणी का असेना पाय पडतात, ते या कासवाच्या पाठीवर!”

ते ऐकून केशव पंडित आणि कविजी पुरते अस्वस्थ झाले. अर्थ न लावता येणारी गहरी वेदनाच वेदना राजांच्या डोळ्यांत दाटून आलेली त्यांना स्पष्ट दिसू लागली. त्या कासवाला डोळ्यांत भरून घेत राजे कातर म्हणाले, “आम्हाला खंत पाठीवर पडणाऱ्या पायांची कधीच वाटली नाही! नमस्कार घेण्याचा तर आमचा वकूब नाही! खंत एकाच बाबीची वाटते, या कासवाची नजर गाभाऱ्यातील त्या मूर्तीच्या चरणाशी अहोरात्र खिळून पडलेली असते, हे जाणणारा या उभ्या दौलतीत एकही जाणकार नसावा! आम्ही आबासाहेबांना काय मानतो, हे पारखण्याची एकाचीही कुवत नसावी!” एक लोंबता, दीर्घ नि:श्वास हमचौकात विरला.

“चला.” म्हणत संभाजीराजे गाभाऱ्यापाशी गेले. पिंडीवर बेलफुले बाहून तीर्थ घेऊन मंदिराबाहेर पडले. युवराज खासेवाड्यात येताच सदरेवरच्या गिरजोजी आणि अर्जोजी या यादव बंधूंनी त्यांना मुजरा दिला.

“केव्हा आलात गिरजोजी?”

“हा असाच गड चढतोय आमी. नगरची खबर उचलली त्ये निगालोच.” “कोण खबर आहे? बोला.”

गिरजोजी जरा घुटमळला. मग तुटक-तुटक टप्प्याने त्याने खबर पेश घातली – “नगरच्या कोठीत… धाकल्या युवराज्ञीस्त्री….” अंगभर शहारलेले संभाजीराजे ताडकन उठत म्हणाले, “काय झालं त्यांचं?”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here