धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४२

By Discover Maharashtra Views: 1247 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४२ –

संध्याकाळ उतरायला झाली. अण्णाजी-मोरोपंतांची बाट बघून हंबीरराव तळबीडात कंटाळले. आपली एवढीही मुर्वत हरघडी खांद्याला लावून असणाऱ्या सुरनीस- पेशव्यांनी ठेवू नये, याची त्यांना मनस्वी चीड आली. मनोमन काहीतरी पक्के ठरवून त्यांनी आनंदराव, रूपाजी, महादजी आणि आपले बंधू शंकराजी व हरीफजी यांना एकजाग करून हुकूम फर्मावला, “चटक्या जनावरांवर मांडा घ्या – आन्‌ कऱ्हाडच्या फौजेत घुसा.

लतेवडी मान्सं फोडून तळबीडाच्या वाटेला लावा! निगा.”

रात्र धरून हंबीररावाची माणसे अण्णाजी-मोरोपंतांच्या फौजेत घुसली. लागेबांधे लावून एक-एक गोट फोडून तळबीडाकडे धाडू लागली.

ती खबर लागताच अण्णाजी बिथरले. मोरोपंतांसह रात्रीचे घोड्यांवरून तळाचा फेर टाकीत माणसे थोपविण्यासाठी फिरू लागले. हंबीरराव माणसे फोडताहेत याचा अर्थ काय तो अण्णाजी अचूक उमगले. फौज दुबळी करून सरलष्कर चालून येणार; ती अधिक दुबळी होण्याची वाट न बघता त्यांच्यावरच चालून जाणे भाग आहे.

रात्रभर अण्णाजी-मोरोपंतांनी विचार करून निर्णय घेतला – हंबीररावांवर चालून जाण्याचा! आता कट बहकत चालला. दिवसफुटीबरोबर अण्णाजी-मोरोपंतांनी हाती असलेल्या फौजेनिशी तळबीडावर हल्ला चढविलाही!

हंबीरराव तयारच होते. त्यांचे सेनाबळही भक्कम होते. हाउ हाउ म्हणता पंधरा हजार मावळ्यांनी, फौजेसकट अण्णाजी-मोरोपंतांना घेर टाकला. प्रसंग परतला आहे, हे ओळखून पंतांनी हातातील हत्यार टाकले. ते बघून अण्णाजींचाही हात लटका झाला.

शेलक्या माणसांच्या मेळासह हंबीरराव खासे येऊन थेट अण्णाजी-मोरोपंतांना भिडले. मांड न मोडता घोड्यावरूनच झुकून हाताचा झोला तिवार कपाळाकडे नेत कडवेपणाने म्हणाले, “पंत-सुरनीस, मुजरा… मुजरा हाय तुमच्या इमानदारीला आन्‌ श्यानपनाला! आरं, ज्या हातानं शेलं-पागुटी घ्यावीत, त्या हातात काडन्या चडवाय निगाला! छत्र धरावं त्या डुईवर हत्यार धराय निगाला! धन्यारतीरी जाऊन म्हयना बी झाला न्हाई – तर त्येंच्या पोटच्या गोळ्याला घेरायला निगाला! त्ये असतं तर – तर जाली असती काय ही छाती तुमची?” हंबीरराबांच्या डोळ्यांतून ठिणग्याच ठिणग्या उधळल्या. त्या खाली माना घातलेल्या पंत-सुरनिसांच्या पगड्यांवर उतरल्या.

“आनंदराव, रूपाजी, काडन्या बसल्या म्हंजी मानसाला कसं मेल्यागत शरमिंदं वाटतं हये कळू द्या हेली! दोरखंडांनी दस्त करा हेरी! कसला रं दिस दावला ह्येंनी!” स्वत:वरसुद्धा खट्टा झालेल्या हंबीररावांनी जनावराला तिडिकेची टाच भरली, ते तळबीडच्या रोखाने उधळले. पाठोपाठ चाळीस-पन्नास टापा उधळल्या. अण्णाजी-मोरोपंतांसह, प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ कैद झाले!

दाला ज्या हाताने मुजरा केला होता, त्याच हाताने काढण्या चढविताना एक धारकरी गलबलून म्हणाला, “असं कसं फसलिसा या फंदात?” आणि ते ऐकताना मोरोपंतांच्या नेत्रकडा थरथरणारी आसवे टप-टप टपकली आणि कऱ्हाडच्या भुईत मिसळली.

युवराज पन्हाळगडावर होते, रामराजे रायगडावर होते आणि मराठी दौलतीच्या छत्रपतिपदाचा निवाडा कऱ्हाडच्या माळावर लागत होता – हंबीररावांच्या हातांनी! कैलासवासी स्वामी तर नेहमी म्हणतच आले होते – “श्रींची इच्छा!” तेच खरे. दुसरे काय?

पन्हाळ्याच्या चौ-दरवाजात हंबीररावांच्या आगवानीसाठी सामोरे आलेले संभाजीराजे उभे होते. त्यांच्या पाठीशी कापशीहून आलेले म्हलोजी घोरपडे, त्यांचे पुत्र संताजी, बहिर्जी, कोकणसुभा रावजी पंडित, उमाजी पंडित, परशरामपंत, रायाजी- अंतोजी अशा असामी होत्या.

आनंदराव, शंकराजी, रूपाजी अशा माणसांच्या मेळातून कदमबाज जनावरांवरून येणारे, घेरमुद्रेचे, तगडे हंबीरराव दृष्टीस पडताच संभाजीराजांच्या काळजात खळबळ माजली. अशी खळबळ फक्त आबासाहेबांच्या दर्शनाच्या वेळीच आजवर उठत आली होती. खेचल्यासारखे संभाजीराजे दहा-बारा कदम सरासर पुढे झाले. त्यांना बघताच हंबीररावांनीही घोड्याची चाल तेज केली. जवळ येताच झेपेनेच मांड मोडून ते पायउतार झाले.

मुजरा देण्यासाठी ते झुकू बघताहेत हे पाहताच संभाजीराजे गलबलले. झटकन त्यांचे हात आपल्या हातात तोलून, त्यांना रोखून वर घेत, नजरेला नजर देऊन थरथरत्या ओठी संभाजीराजे घोगरट बोलले, “मामासाहेब!” – आणि दुसऱ्याच क्षणी भोसल्यांचे छाताड मोहित्यांच्या छातवानाला बिलगले. हंबीररावांच्या इमानदारीने भरून गेलेल्या संभाजीराजांचे डोळे दाटले. हलक्या हाताने हंबीररावांनी त्यांचा खांदा थोपटला. चार महिन्यांपूर्वी आबासाहेबांनी असेच थोपटले होते हे जाणवताच फारा दिवसांनी आज प्रथमच संभाजीराजांना वाटले – “आम्ही एकले नाही!’

माणूसमेळ चौ-दरवाजात शिरताच कितीतरी दिवसांनी प्रथमच पन्हाळ्यावर आज नौबत दुडदुडली. हंबीररावांची प्रचंड सेना कटवाल्या कैद्यांना घेऊन पन्हाळ्यात शिरली. सात वर्षांपूर्वी हाच पन्हाळा कोंडाजी फर्जदाच्या मदतीने जिंकून, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जिंकला गड बघण्यासाठी येणाऱ्या थोरल्या छत्रपतींवर, याच चौ-दरवाजात अण्णाजींनी ओंजळीने सोनफुले उधळली होती! त्याच दरवाजातून हाती काढण्या घेऊन अण्णाजी पन्हाळा चढले! माणसाची बुद्धी फिरली की, दिवस परततात हेच|

रंगरूपी पिंडीचे दर्शन घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे बालेकिल्ल्यात आले. मोहितेमामांना आदराने सदरी बैठकीवर बसवीत म्हणाले, “मामासाहेब, पुढील निर्गत कशी करायची? तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करणार नाही.”

कैद्यांचे तोंड बघणे संभाजीराजे टाळताहेत हे ताडलेले हंबीरराव म्हणाले, “त्येम्होरं ठरवायचं हायंच की! पर दस्त केल्याली ती जोखीम त्येवडी घ्या बगू ताब्यात!”

संभाजीराजे अस्वस्थ झाले. नको तो विषय सामोरा येत होता.

“आम्हास त्यांचे तोंड बघणेही नको वाटते, तुमच्या दर्शनानंतर!” संभाजीराजे कडवट बोलले.

“असं म्हनून कसं चालंल? करनाऱ्यांस्री न्हाई तर बोलणाऱ्यांस्री शरमून कसं भागंल? रूपाजी, पेश घाला त्या इमानदारांस्री.” हंबीररावांनी रूपाजीला फर्मावले.

चार-चार धारकऱ्यांनी घेर घातलेले, काढणीबंद अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हादपंत, राहुजी संभाजीराजांच्या समोर पेश आणण्यात आले. सर्वांच्या गर्दनी खाली होत्या.

आघाडीला असलेले अण्णाजी दृष्टीस पडताच संभाजीराजे ताडकन उठते झाले. त्यांच्या अंगभर लाह्याच लाह्या फुटल्या. कानशिले संतापत लालेलाल झाली. डोळ्यांच्या कडांत रक्त उतरू लागले. कपाळावरची शीर थडथडत तट्ट फुलून उठली. विस्फारल्या नाकपुड्यांखालचे ओठ थरथरले. मनात असूनही अनावर संतापाने त्यांना धड बोलवेना. अण्णाजी समोर आलेलेही त्यांना सोसवले नाही. सर्रकन वळून त्यांना पाठमोरे होत ते गर्जले, “जा, पुन्हा यांना आमच्या सामोरंही आणू नका कधी. आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच निखारे ठेवले आहेत. सिताब उचला यांना इथून आणि द्या फेकून कोठडीत!” संतापाने अंगभर थरथर कापणाऱ्या संभाजीराजांकडे हंबीरराव बघतच राहिले. कधी काही वावगे समोर आले की, संतापणारे थोरले धनीही बघितले होते त्यांनी. पण हा माटच वेगळा वाटला हंबीररावांना!

धारकरी कैद्यांना घेऊन जायला निघाले. त्यात मोरोपंत आहेत, याचे भान होताच संभाजीराजे म्हणाले, “थांबा!”

कैद्यांसकट सर्वांच्या अंगावर ते ऐकताना काटा सरकला. संथ चालीने मोरोपंतांच्यासमोर येऊन संभाजीराजे पडेल बोलले, “तुम्ही तुम्हीसुद्धा आम्हाला दस्त करण्यासाठी यावं पंत! काय पारख केलीत आमची? सांगावा धाडला असता, तर आम्ही आपणहून आलो असतो बांधल्या हातांनी तुमच्या भेटीसाठी! सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी राहून कसली प्रधानकी निभावलीत ही त्यांच्या माघारी? खुद्द आम्ही दस्त झालो असतो तरी वाटलं नसतं, एवढं दु:ख दौलतीचे पेशवे जेरबंद झालेले समोर बघताना वाटतं आहे आम्हास!” संतापापेक्षा खंतच संभाजीराजांच्या मनी दाटली.

शरमेने, अपार पश्चात्तापाने मोरोपंतांची घेरदार पगडी डुलली. दंडात काढण्या चढल्या तेव्हाच मनाने संपलेला तो मानी पुरुष काही-काही बोलेना. गैरवाका करणीचा पश्चात्ताप वाटण्यासाठी लागणारे जातिवंत मन त्यांच्याकडे अद्याप शाबूत होते! मन पिळवटणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यांतून अश्रुरूपाने टपटपू लागल्या.

“ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्या भल्यांना हातानंही कधी उकलायची नाही, त्या या सुरनिसांच्या नादी कसे लागलात पंत?”

संभाजीराजे अण्णाजींच्या समोर आले. त्यांच्या स्थूल देहयष्टीवर नजरेचा पल्रिता फिरवीत कडाडले, “गर्दन का उठत नाही वर सुरनीस अण्णाजी दत्तो तुमची? की खालमानेनं पायालगतच्या, उभ्या राहिलेल्या भुईविरुद्धही कटाचे बेतच रचताहात? बोला. खूप जुने बरे मनी धरता तुम्ही! काय करणार होतात आम्हास जेरबंदीनं रायगडी नेऊन! देणार होतात टकमकीवरून लोटून की तोफेच्या तोंडी? जाब द्या.” राजबोलाचा कोरडा कडकडला.

आता मरणाशिवाय दुसरे काहीच सामोरे येणार नाही याची खूणगाठ बांधलेले अण्णाजी अंतिम धैर्याने म्हणाले,

“तो आमचा अधिकार नाही. आम्ही स्वामींच्याच वारसांना मंचकारोहण केलं आहे. दौलतीच्या हिताच्या दृष्टीनं ते योग्यच आहे, असं या क्षणीही आमचं मत आहे. दस्त झालो तरी जे केलं त्याचा आम्हाला पश्चात्ताप वाटत नाही! प्रत्यक्ष स्वामी असते, तर त्यांनीही हेच केलं असतं.”

“खामोश, पश्चात्ताप वाटायलाही शरमणारं मन लागतं! तो तुमचा भाग नाही. आम्ही बाळराजांना का मंचकारोहण केलं ते विचारलं नाही. आबासाहेबांनी काय केलं असतं ते तुमच्या तोंडून ऐकण्याची बिलकूल इच्छा नाही आमची. आम्ही ते बरं उमगतो! त्यांनी काही लहानास, दस्त केल्या थोरल्यांचा नजराणा देऊ केला नसता तुमच्यासारखा!

शरम कशी येत नाही तुम्हाला केल्या बेमुर्वतीची?”

टोकदार शब्द अण्णाजींच्या काळजाला भिडले. गर्दन उठवून ते कडवटपणे म्हणाले, “का वाटावी शरम आम्हाला? आम्ही काही चोरी-बळजोरी केली नाही की दौलतीशी फतवा करण्यासाठी गनिमाच्या गोटात गेलो नाही!”

“अन्नाफजी!” बैठकीवर बसलेले हंबीरराव उडत्या सुरुंगासारखे उसळले. अण्णाजींच्या समोर थरथरत तडकले, “जबान संबाळत्येय का उतरून देऊ हातात?”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment