महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,527

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३६

By Discover Maharashtra Views: 1288 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३६ –

सुरतेपासून जिंजी पेड्डापोलमपर्यंत दौड घेणारे महाराज बंदिस्त गडामुळे रयतेपासून, मावळ्यांपासून तुटले होते. गडावरचा महाल महाराणींनी आपल्या देखरेखीखाली घेऊन गडावरच्या माणसांनाही आपल्या धन्यांना भेटणे मुश्कील केले होते. सांजवेळ असल्याने “दिवट्याचा मुजरा’ देण्यासाठी सोयराबाई रामराजांना घेऊन छत्रपतींच्या महालात आल्या. महालावर आता खंडोजी नाईक, कान्होजी भांडवलकर, गणोजी कावळा अशा खास सोयराबाईच्या माणसांचा हत्यारबंद पहारा बसला होता. खुद्द पहारा देणाऱ्या दरखदारांनाही कल्पना नव्हती की, महाराणींच्या मनी काही काळेबेरे उगवले आहे!

सोयराबाईंनी झरोक्‍्याचे कवाड मिटले. हलक्‍या पावलांनी त्या मंचकाजवळ आल्या.

“राणीसाहेब, आमचं एक काम कराल?” राजे म्हणाले.

“हे काय विचारणं? सांगावं, जरूर करू.” सोयराबाईंनी काय सांगणे होणार ते ऐकायला कानांत महाराणीपण एकवट केले.

“उद्याच हारकारे गडाखाली धाडा. पन्हाळ्याहून युवराजांना बोलावून घ्या. पाचाडच्या धाकट्या राणीसाहेबांना गडावर घेऊन या. बाळाजींना सांगा आमच्या शरीरी व्यथा झाल्याची खबर हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी यांना खलिते देऊन कळवा. आम्हाला साऱ्यांशी बोलायचं आहे.” एवढ्या बोलण्यानेही छत्रपतींना थकल्यागत वाटले.

“तवढंच ना. आम्ही जरूर करू ते. स्वारीनं निवांतपणा घ्यावा. बाळाजींनाच इकडं पेश पाठवून देतो आम्ही.”

सोयराबाई रामराजांना घेऊन महालाबाहेर पडल्या. छत्रपती चिराखदानांच्या ज्योतींवर डोळे लावून विचारगत झाले.

“विठ्ठलपंत, रायगडचा काही खलिता…” चिंतावल्या संभाजीराजांनी पन्हाळगडाचा देख घेण्यासाठी फेर टाकताना किल्लेदारांना विचारले.

“काही नाही युवराज. आम्ही त्याचीच वाट बघतो आहोत.” विठ्ठलपंतांनी पगडी डुलवीत जाब दिला.

समोर कोकणदरवाजा आला होता. त्याच्या दगडबंद पायऱ्या चढण्यापूर्वी संभाजीराजे थांबले. “पंडित, काय वाटतं तुम्हाला? आबासाहेब आम्हाला रायगडी का याद फर्मावीत नाहीत? की बंदिस्त झाल्या गडावरून खालीही कुणी उतरत नाही?” संभाजीराजांनी पाठीशी असलेल्या उमाजी पंडितांना विचारले. बहिर्जी इंगळे आणि कृष्णाजी बंकी यांच्याशी काहीतरी बोलत असलेले उमाजी पंडित “जी” म्हणत पुढे आले. अदबीने म्हणाले, “आम्हाला नाही तसं वाटत युवराज. गडावर बाळाजी चिटणीस आहेस. ते डाक देण्यात कुचराई नाही करायचे. कदाचित स्वामींना आरामही पडला असेल एव्हाना. माणसं चिंतातुर होतात म्हणून छत्रपतींनीच खलिते दिले नसतील.”

“तसं असेल तर साखर पडो तुमच्या तोंडात. पण मनासारखा खेळ्या जगात दुसरा नाही. नको त्या शंकांचा खेळ खेळतो तो. आम्हाला रायगडाशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यांची खुशाली कानी पडेतो, आम्हाला चैन नाही.” जडावल्या पायांनी संभाजीराजे कोकणदरवाजाची एक-एक पायरी चढत माळवदावर आले.

“विठ्ठलपंत, शृंगारपुराहून आमच्या चिटणीस परशराम पंतांना बोलावून घ्या.” काहीतरी मनी योजून संभाजीराजांनी आज्ञा केली.

“तसं लिखाणाचं काही कामकाज असल्यास गडाचे चिटणीस आहेत. तेव्हा.” मनोमन चमकल्या विठ्ठलपंतांनी घोळ धरला. “आम्ही सांगतो तेवढंच करा. दोन दिवसांत परशरामपंत गडावर आमच्यासमोर रुजू झाले पाहिजेत.” करडी नजर विठ्ठलपंतांबर रोखली गेली. तिला नजर देणे विठ्ठलपंतांना पेलले नाही. “जी.” म्हणत त्यांनी सुटका करून घेतली.

“पंडित, आमचे रायाजी-अंतोजी परतेपर्यंत आम्ही असेच टांगते राहणार.” माळवदाच्या दगडी तटावर तळहात टेकीत संभाजीराजांनी न दिसणाऱ्या रायगडाच्या रोखाने नजर जोडली.

“युवराजांनी धीर धरावा. भावेश्वरीच्या प्रसादानं सर्व ठीक होईल.” उमाजी पंडितांच्या तोंडून भावेश्वरीचे नाव निघताच संभाजीराजांना शृंगारपूरचा वाडाच समोरच्या क्षितिजकडेत दिसू लागला. एका विलक्षण विचाराची चिरती कळ त्यांच्या काळजात सरकली – ‘शुंगारपुरात आपणहून, बंदिवास पत्करलेल्या आमच्या युवराज्ञी, बंदिस्त रायगडावर आजारी पडलेले आबासाहेब, नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेल्या आमच्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई… आणि इथं कुणासाठीही काहीच न करता येणारे, आबासाहेबांच्या शब्दांनी जखडलेले, साऱ्यांच्या चिंतेनं कोंडलेले… बंदिवान झालेले आम्ही… काय स्थिती ही! तोडावा – या क्षणी आबासाहेबांचा शब्द तोडावा. पन्हाळा सोडून थेट रायगड गाठावा. ते बोलतील ते ऐकण्यासाठी का होईना, त्यांचं दर्शन घ्यावं. नाही नको. आमच्या दर्शनानं आबासाहेबांना आराम पडण्याऐवजी वेदनाच होतील. काहींच्या कपाळी आम्हाला बघताना आठ्या चढतील. बघवणार नाहीत त्या आम्हाला.’

तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबानीवर घेतलेल्या बाळाजी आवजींनाही आपल्या स्वामींच्या कपाळी धरलेल्या आठ्या बघवेनात. ज्वर चढलेले, डोळे लालावलेले महाराज त्यांना विचारत होते – “ही चिटणिसी केलीत हयातभर? आम्ही तुम्हाला युवराजांना, मोरोपंतांना, सरलष्करांना खलिते देण्यास बजावले होते. अंगी ज्वर असता मायने-मजकूर सांगितले होते. एकाही खलित्याचा जाब येत नाही याचा मतलब काय? ही माणसे मुजोर झाली की तुम्ही चुकार झालात?”

गोंधळलेल्या, भयकातर बाळाजींनी आपल्या कुलदैवताची शपथ घेत जाब दिला, “स्वामींनी विश्वास धराबा. आम्ही खुद्द आमच्या हातानं खलिते सिद्ध करून स्वारांना सुपुर्द केले आहेत. सर्व त्या सूचना जातीनं दिल्या आहेत.”

“मग जाब का येत नाही कुणाचा? कुणी भेटीला का येत नाही आमच्या?”

गोंधळलेल्या चिटणिसांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते. देता येणारच नव्हते.

सोयराबाईंनी आपली माणसे गडाचा चितदरवाजा, पालखी दरवाजा, नाणे दरवाजा सर्व दरवाजांवर पेरून ठेवली होती. थैलीस्वारांकडचे खलिते त्यांनी मध्येच दस्त केले होते. फक्त स्वार गडाखाली उतरले होते. आपापल्या गावाकडे निघून गेले होते. कारण ते सारे तळबीड भागातील महाराणींच्या माहेरचे होते. बाळाजी आवजींनी सिद्ध केलेले खलिते थैल्यांनिशी तसेच सातमहालात महाराणींच्या महाली टाळेबंद झाले होते!

बाळाजींना बगलेला टाकण्यासाठी पुढे येत मानभावीपणे सोयराबाई म्हणाल्या, “यात बिचाऱ्या चिटणिसांना कसूर तो काय? स्वारी कशी उमेद धरतेय की, पन्हाळ्याहून जाब येईल वा युवराज जातीनं येतील इथं? एवढी कदर असती, तर साऱ्यांना पारखं होऊन ते गनिमाच्या गोटात जातेच कशाला? पेशव्यांना-सरलष्करांना तर स्वारीनंच मोहीमशीर धाडलंय. त्यांचा तळ कुठं पडलाय कसं सांगणार? येतील ते. धीर धरावा. आपले बाळराजेही विचारताहेत “आमचे दादामहाराज कुठं आहेत म्हणून.’ काय सांगायचं त्यांना?” सोयराबाईंनी रामराजांना जवळ घेत छत्रपतींच्या पुढे केले.

आडव्या आलेल्या महाराणींना तिवड्यावर घेण्यासाठी महाराजांनी प्रश्न केला, “पाचाडच्या राणीसाहेब तर कुठं मोहिमेवर नाही गेल्या? का त्याही गनिमाच्या गोटात दाखल झाल्या? तुम्हाला त्यांना बोलावून घ्यायला सांगितलं होतं आम्ही.”

“आम्ही माणसं पाठविली होती पाचाडात. स्वारी अंथरुणावर आहे याची धाकटया बाईंनी एवढी हाय घेतल्येय की, त्यांनीच अंथरूण धरलं आहे!” सोयराबाई शब्दही न पाडता चक्क खोटं बोलल्या. नाकगड़्डा चिमटीच्या पकडीच घेत, हताश छत्रपती “जगदंब, जगदंब’ असे पुटपुटत मंचकावर लेटले.

रायगडावर एक भयानक कारस्थान शिजू लागले. त्याच्या सूत्रधार झाल्या महाराणीपदाच्या अखत्यारीत गड ताब्यात घेतलेल्या प्रत्यक्ष महाराणी सोयराबाईसाहेब!

लक्ष्य झाले महाराज आणि संभाजीराजे. हेतू झाला रायगडाचे सुवर्णी सिंहासन. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही तालेवार सेवाभावीच माणसे आता बाहुली होणार होती.

मनामनांचा मेळ पाडून, अपार कष्ट उपसून, कैक जिवाभावाचे लाख मोलाचे मोहरे खर्ची घालून, प्राणबाजीने छत्रपतींनी जमविलेला मराठी दौलतीचा शतरंज, पटासकट उधळण्यासाठी सोयराबाईंनी आपला पाताळयंत्री हात चालविता केला होता.

महाराणीपदाच्या अधिकारात!!

खानसाम्यानं सज्जाकोठीत समोरच्या चौरंगावर ठेवलेला जेवणाचा थाळा, महाराजांच्या आठवणीमुळे तसाच परता सारीत संभाजीराजे उठले. गेले दोन दिवस ते असेच थाळे दूर सारीत आले होते.

कोठीत उभ्या असलेल्या रायाजी-अंतोजीने त्यांच्याकडे कळवळून बघितले. त्या गाडेबंधूंनी पाचाडात चार दिवस तळ ठोकून रायगडावरची खबर उचलण्यासाठी जंग-जंग पछाडले होते. वारा-उजेड आणि रानपाखरे यांशिवाय गडावर कुणाचाही शिरकाव होत नव्हता! महाराजांना बघण्यासाठी नागपूरहून आलेले साबाजी भोसलेही पाचाडात अडकून पडले होते.

“चिटणीस, आम्हास काही कळेनासं झालं आहे. आबासाहेबांनी गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा का फर्मावावी? आम्ही – आम्ही रायगडी येऊ अशी धास्त वाटत असावी त्यांना.” शृंगारपूरहून आलेल्या चिटणीस परशराम पंतांना संभाजीराजे चिंतेने म्हणाले.

“आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेलसे.”

“इतर कुणाची शामत आहे राजधानीचे राबते दरवाजे बंद करण्याची?”

“बोलू नये. पण – पण महाराणी हे करू शकतील?” पूर्ण विचाराने परशरामपंतांनी अंदाज दिला.

“काय म्हणता तुम्ही? महाराजसाहेब जातीनं गडावर असता त्या हे करतील?” “स्वामी पडून आहेत.”

“तरी ते स्वामी आहेत. आम्ही जाणतो आबासाहेबांना.”

“पण युवराज, विसरणं होतंय, स्वामी – स्वामी असले तरी महाराणी – महाराणी आहेत!”

“छेड! पंत, आज जिवाला नाकळती हुरहुर ग्रासून टाकते आहे. हनुमान जयंती आहे. चला, रामभक्ताचं दर्शन करू.”

सैरभैर झालेले संभाजीराजे परशरामपंतांना पाठीशी घेत सज्जाकोठी उतरले. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या, महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या हनुमानाच्या घुमटीजवळ आले. शेंदराचा तवाना लेप दिलेली आतील मूर्ती बघताच त्यांना वाटले -“त्या पावन लेपावर तळहात फिरवून त्यानं मळवट भरून घ्यावा. उड्डाणी पवित्र्यात असलेल्या वायुपुत्राला विचारावं. आजचा दिवस तुझा. आज आकाशी घेण्याऐवजी रायगडी उड्डाण घेशील काय? आमच्या आबासाहेबांच्या तब्येतीस आराम पडल्याची परती

खबर आणशील काय?”

मनच्या कढाने वायुपुत्राशी मूकपणाने तळमळून बोलणाऱ्या संभाजीराजांना काही सुद्धा कल्पना नव्हती की, तिकडे चैत्री पुनव असूनही उभ्या रायगडाला अवसेचा काळाकुट्ट काळलेप चढत होता! गेले दोन दिवस गडाच्या मुदपाक खान्याची चुलवाणेही पेटली नव्हती.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment