धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३० –

साज धरून दिलेर सर्जाच्या फौजा ऐनापुराकडे कूच झाल्या. अथणीलगतच्या डोंगरपायथ्याला संभाजीराजांचा तळ पडला. ख्िदमतगारांनी उठविलेल्या डेऱ्यात संभाजीराजे बेचैन फेऱ्या घेत होते. राख झालेली अथणी अंधारात डुबत होती. विचारच विचार माणसांचे रूप घेऊन हातच्या कोरड्यांनी संभाजीराजांना निर्दयपणे फटकारून काढू लागले –

“तुम एक मामुली मन्सबदार हो! किसकी रय्यत? ये काफरोंका जनाना नहीं है…! दिलेर – दिलेर – कोण, कुठला, कुठल्या मुलखाचा?… मांजऱ्याच्या तळावर कलम झालेले, बळवळणारे शेकडो हात!… तिकोट्याच्या विहिरी-आडांत फुगून तरंगणारी शेकडो अश्राप जनानी प्रेतं!… जळून राख होणारी घरटी-झोपडी!… कळवळून हंबरडा फोडणाऱ्या, ‘मेलो वाचवा!’ म्हणून ऊर पिटणाऱ्या दशदिशा!… युबराज – युवराज, कशाला आलात या खातेऱ्यात? मायेनं विचारणारी तिकोणी पगडी… पस्तवाल एके दिवशी!… तुम एक मामुली मन्सबदार हो!… होश रख्खो – तुम्हारा कबिला हमारे जनानेमें है! गड जिंकून आलात. तुमची आरती कशी उतरावी उमजत नाही आम्हास!… भावनेपोटी काहीतरी करून बसता तुम्ही. मग ते निपटणं नाही साधत… अक्कासाहेब….“तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम न्हाई.” या मायेच्या बोलांना दिलेला बेगुमान जाब… “नरसाळा… गड घेतल्याखेरीज हटणार नाही आम्ही!”

“..नको – नको ही मन्सब! ही जखडून टाकणारी ख्रिल्लत! निघावं. येथून आणि कुठं जावं? मुलखात – आमच्या – तिथं कुणी तुम्ही ‘मामुली’ आहात म्हणणार नाही. जावं – पण कुठल्या तोंडानं? या अपेशी हातांनी पिछाडीचे सारे दोर तर आम्हीच तोडून टाकले… त्या थोर पुरुषाला निरोप दिला… ‘परतू ते तुमचा सह्याद्री जिंकण्यासाठी!’

“सह्याद्री जिंकू म्हणणाऱ्याला कधीच मिळत नसतो. शरण आलेल्याला कधीच परत सारीत नसतो. त्याला तरी कुठल्या तोंडानं शरण जावं? आज हयातीची पुरती-पुरती शिकस्त घेतली आम्ही. काय – काय करून बसलो हे आम्ही.’ सुन्न, बधिर झालेले, ठणकते मस्तक तळहातांनी गच्च आवळीत संभाजीराजे खाटल्यावर बसले. चारी पायांत दातेरी गोमचाप करकचून बसलेला हत्ती जागीच कोंडून पडावा, यातनांनी तळमळत राहावा, तसे त्यांचे वाट चुकलेले राजमन कोंदून-कोंदून पडले.

“युवराज…” डेऱ्याच्या दारातून कातर साद आली. ते मान उठवून संभाजीराजांनी बघितले. मेहुणे महादजी निंबाळकर दारात उभे

“या वेळी. तुम्ही इथून जा. आम्हास मेहेरबानीनं एकले सोडा. आमच्या जखमांवर मीठ फासू नका.” संभाजीराजे तिडिकेने बोलले.

महादजी दबक्या आवाजात म्हणाले, “आता तुम्हाला आम्ही एकले सोडूच शकत नाही. मीठ फासण्यासाठी नाही, तुम्हाला मिठाची आण देण्यासाठी आलो आहोत आम्ही.”

“मतलब?”

होता तोही आवाज दबका-घोगरा करीत महादजी जवळ आले. “युवराज, तुमचा घात झाला आहे! पठाणाला दिल्ली दरबारचा हुकूम आला आहे. तुम्हाला जेरबंद करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहे!! तुमच्या झगड्याचं निमित्त करून केव्हाही पठाण तुमच्या दंडात काढण्या घालायला कमी करणार नाही. दिमाग शांत ठेवा. जे करायचं ते सावधानगीनं आणि तातडीनं करा. रातोरात हा तळ सोडा. कुठंही जा. सावध असा. निघतो आम्ही.” महादजी जायला निघाले.

“दाजीसाहेब!” कळवळून संभाजीराजांनी त्यांना दबकी साद घातली. “आम्ही तुम्हाला टाकून बोललो. शरमिंदे आहोत आम्ही.”

“ते मनात ठेवू नका. सावध असा.” महादजी बाहेरच्या अंगणात गडप झाले.

आता आग्ऱ्यातील कोठडीतल्या आबासाहेबांचे सावध शहाणपण स्मरत विचारांचे दुसरेच चक्र संभाजीराजांच्या मनात फिरू लागले. एकसारखे डेऱ्याच्या दारात येऊन ते मागून येणाऱ्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंच्या मेण्याचा माग घेऊ लागले. खानसाम्याने डेऱ्यात आणून ठेवलेला थाळा तसाच चौरंगीवर पडला होता. काहीतरी सुचल्याने संभाजीराजांनी बाहेरच्या पठाणी पहारेकऱ्याला याद फर्मावले, “नायक, तुम्हारे हशमोंको आराम दो। दुसरा पेहरा हम फर्मयिंगे।”

“जी” नायकाने डेऱ्याभोवतीचे थंडीत पहारा देणारे पठाण आरामाला सोडले.

सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यांतील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आगट्या पेटवून घोळक्‍्यांनी त्यावर हात शेकीत बसले. रात्रीचा पहिला प्रहर परतला. धापावल्या भोयांनी अक्कासाहेबचे मेणे संभाजीराजांच्या डेऱ्यासमोर आणून थोपे देत थांबविले. अक्कासाहेब मेणाउतार झाल्या.

मावळी पहारा देत असलेल्या मुजऱ्यांची दाद न घेता तरातर चालत अक्कासाहेब डेऱ्यात घुसल्या. सते शालनामा पांघरलेले, केस विसकटलेले संभाजीराजे खाटल्यावर जागत बसले कोरडा फुटावा, असे डेऱ्यात जरबी बोल उमटले, “बाळ महाराज, शरम वाटते तुमच्या करणीची आम्हास!”

“अक्कासाहेब – तुम्ही?”

“होय आम्हीच. तुम्हाला निकडीचं बजावण्यासाठी आलो आहोत आम्ही उरीफुटी. तुमच्या फौजेचा तिकोट्यावरचा पराक्रम डोळ्यांनी बघून आलोत. आम्हाला नाही जमणार तुमच्या असल्या पराक्रमाची साथ करणं!” थंडी होती तरी संतापाने अक्कासाहेब नुसत्या थरथरत होत्या.

चेहरा ओढलेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. पडल्या गर्दनीने म्हणाले, “तो पराक्रम सर्जाखानाचा आहे अक्का आम्ही पुरते फसलो आहोत! घात झाला आहे आमचा. ही एकच रात्र आमच्या हाताशी आहे.”

क्षणात अक्कासाहेबांचा संताप चिंतेत पालटला.

“मतलब? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते.”

“कुठल्याही क्षणी दिलेर आम्हाला जेरबंद करून दिल्लीला धाडू शकतो. त्याला बादशहाचा तसा लेखी हुकूम आला आहे.”

“बाळमहाराज.” भयाने अक्कासाहेबांना नीट चीत्कारताही आले नाही. “शांत व्हा! आम्हाला आमच्या करणीचं बक्षीस पावलं, तर त्याचं काहीच वाटणार नाही. चिंता आहे ती तुमची. तुम्ही सुखरूप या तळाबाहेर निघणं आहे. दिवस फुटायच्या आत.” अक्कासाहेब सुन्न झाल्या. बघत कळवळ्याने म्हणाल्या, “काय करून बसला आहात हे तुम्ही बाळमहाराज?”

“तुम्ही वाटचाल केलीय, आराम घ्या. आम्ही आहोत.” संभाजीराजे कसल्यातरी धीराने म्हणाले. नाळेच्या त्या तिघांना घेरून टाकणारी, काळजांना जाणवणारी भयाण शांतता डेऱ्यात पसरली.

अक्कासाहेब खाटल्यावर टेकल्या. दोघेही विचारांच्या डोहात बुडत चालले. काय करावे सुचत नव्हते. रात्र काळपावलांनी पुढे-पुढे सरकत होती. हताश डोळे एकमेकांना निरखत होते. पुन्हा कुठेतरी जाऊन स्थिरावत होते. मध्यरात्रीचा समय झाला. बाहेर पहारा देणारा एक धारकरी डेऱ्यात आला. वर्दी देत म्हणाला, “धनी, मुलखाचा हारकारा हाय. पाठवू?”

“पाठव.”

अर्जोजी यादवांच्या गोटातील एक जासूद संभाजीराजांच्या समोर पेश झाला. तिवार मुजरा देत, त्याने काही न बोलता दोन खलिते पेश केले. एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा – आणि दुसरा होता त्यांच्या सूनबाई येसूबाईसाहेबांचा!

छत्रपतींनी लिहिले होते – “मोगलाईत, इदलशाहीत वा कुत्बशाहीत तुमच्या मनाजोगते ते कधीच घडणार नाही. देखत पत्र स्वार होऊन दौलतीत निघोन यावे. आम्ही तुमचा साजेल तैसाच मरातब करू! कसलाही शक-अंदेशा मनी ठेवो नये.”

येसूबाईंनी लिहिले होते – “जे ऐकतो आहोत, ते सोसण्यापलीकडे जहाले! इकडे यावे. ते घडले नाही, तर आम्हासच चढे घोड्यानिशी स्वारीच्या दर्शनास यावे लागेल! आपला नाही तो नाही, संगती असलेल्या जनान्याचा खयाल बरा धरावा.”

“कुणाचे?” जवळ आलेल्या अक्कासाहेबांनी दबके विचारले.

शालनाम्याने पापणीकडा टिपत खलितेच संभाजीराजांनी त्यांच्या हाती दिले. “मुलखाचे. आबासाहेबांचा आणि युवराज्ञींचा. परत यावे म्हणून.”

पाझरलेले युवराज बघून जासुदाची आशा पालवली. धाडसाने त्याने जबान खोलली, “धनी, आमी चाकर मान्सं. पर जीव ऱ्हात न्हाई. म्हाराजांचा अंत बगू नगासा. गाव वेशीवर आपला जमाव ठाण हाय. निगायचं म्हटलंसा तर..”

“तेच करणार आहोत आम्ही. याच पावली जमावात जा. सांगावा दे आमचा. दिवसफुटीला कबिल्यानिशी आमची वाट बघा म्हणावं. सावधानगीनं निघ.”

“व्हय जी.” जासुदाचे कान भरून पावले होते. तो लगबगीने बाहेर पडला.

रात्र चढू लागली. बाहेरच्या पहाऱ्याला संभाजीराजांनी सूचना दिली. “मावळा तेवढा एक जाग तय्यार ठेवा. आम्ही निघा म्हणताच दौडायचे आहे.”

अंगावरचा शालनामा संभाजीराजांनी उतरून ठेवला. मन्सबीची वस्त्रे काढून डेऱ्याच्या कोनाड्यात फेकून दिली. सादिलवार कपडे अंगी चढविले. डेऱ्याच्या अंत:पुराकडे बोट दावीत, ते अक्कासाहेबांना म्हणाले – “आतल्या पेटाऱ्यातला मर्दाना पेहराव अंगी घ्या अक्कासाहेब. या वेषात तळाबाहेर निघणे नाही साधणार.”

अक्कासाहेब, अंतःपुरात गेल्या. अंगचा जनानी साज उतरून त्यांनी मर्दाना पेहराव चढविला.

एकवार डेऱ्याबाहेर येत संभाजीराजांनी अंदाज घेतला. तीन-एकशे मावळा हळूहळू एकजाग होऊन डेऱ्याभोवती जमला होता. त्यातले दहा-बारा हुन्नरबाज पटाईत पुढे घेण्यात आले. त्यांना इशारत मिळाली. “आम्ही निघताच आमची पिछाडी धरून या. वरकड सारे इथेच थांबा. वर्दी मिळताच तळ सोडायच्या तयारीनं.”

उत्तररात्र सुरू झाली. बोचरा पहाटवारा सुटला. जागजागी राहुट्यांत पठाण शांत सुख झाले.

छातीवरच्या भवानीमाळेला हातस्पर्श देऊन संभाजीराजे पुटपुटले – “जगदंब!”

“चला.” डेऱ्यातून तीन मर्दाने बाहेर पडले. त्यातील एकाच्या छातीशी दुपेटे होते. निवडल्या धारकऱ्यांनी तळाचा मेणा उचलला. झपझप चालणाऱ्या संभाजीराजांचे पायठसे वेचीत दोन मर्दाने तळाबाहेर पडले. गाववेशीवरचे देऊळ आले.

यादवांच्या जमावाचा म्होरक्या लगबगीने सामोरा आला. मुजरे देत म्हणाला, “निघायचं?”

“सबूर.” संभाजीराजांनी मेणेवाल्यांना पुढे घेतले.

“अक्कासाहेब, बसा आत.” मेण्याचा आडपडदा हटला.

मर्दानी वेषातल्या अक्कासाहेब पुढे आल्या. संभाजीराजांनी वाकून राणूअक्कांच्या पायांना हाताची बोटे भिडविली. “बाळमहाराज!” आवेगाने राणूअक्कांनी त्यांना उठवून छातीशी बिलगते घेतले. “सांभाळून या.” अक्कांचा आवाज धरला होता. “जपून असा.”

मर्दाना वेषातल्या राजस्त्रि मेण्यात बसल्या. धारकऱ्यांनी मेणा उठविला. हत्यारबंदांनी त्याभोवती चटकन घेर धरला. मेणा पन्हाळ्याच्या रोखाने धावू लागला.

पहाटेच्या अंधूक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेणा संभाजीराजे कितीतरी वेळ एकटक निरखत राहिले. तळावर वर्दी गेली. जमले मावळे सशांच्या पावलांनी तळावरून उडाले. पाठीशी तीन-एकशे मावळा घेऊन पहाटेचा गारठा फोडत संभाजीराजे थेट विजापूरच्या रोखाने निघाले. होय विजापूरच्याच!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here