धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११९ –

स्वतःवरच खुशनिहाल झालेल्या संभाजीराजांनी अंगावरचा शालनामा एकदा झटकून पुन्हा लपेटून घेतला आणि ते बैठकी दालनात आले. त्यांना बघताच काही तरी लिहीत बसलेले कवी कुलेश अदबीने उठले.

“काय लिहिता कविराज?”

“संस्कृत की कुळ समस्यापूर्ती हिंदोस्तानीमें हल करनेका यत्न कर रहा था, स्वामी।”

संभाजीराजे बैठकीवर बसण्यासाठी चालू लागले. त्या दालनाच्या दगडबंद भिंतीला लागून काही हारे मांडले होते. ते तोंडल्यांनी भरलेले हारे कुणब्यांनी वाड्यावर पाठविले होते. मुदपाकाकडे पाठविण्यासाठी ते एकसरीने मांडून बगलेला ठेवले होते. सहज म्हणून संभाजीराजांनी त्यातील एक टपोरे, पिकू घातलेले तोंडले उचलले व ते बैठकीवर जाऊन बसले.

“कविराज, एक समस्यापूर्ती सोडवाल?” संभाजी राजांनी हसत विचारले.

“जी. यत्न करेंगे” कविराज हात बांधून उभेच होते.

“र्‍या फळास ‘तोंडलं’ का म्हणतात?”

कुलेशांनी ते फळ थोडा वेळ निरखले. त्यावर विचार केला नि जाब दिला, “हिंदोस्तानी मे इस को “बिंबफल’ कहते है स्वामी। सूर्य के बिबसमान यह पका हुआ फल लाल दिखाई देता है।”

मान डोलबीत संभाजीराजे म्हणाले, “नाही कविराज, आम्हास वेगळेच वाटते. सांगू कधीतरी.” हसत-हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. तोंडले मुठीत ठेवूनच थाळा घेण्यासाठी निघून गेले. थंडीला कवेत घेऊन दाट चांदणे वाड्यावर उतरले. मध्यरात्रीचे प्रहरटोल पडून गेले. शाल पांघरलेल्या संभाजी राजांचा डोळ्यास डोळा लागला नव्हता. महालात फेऱ्या घेऊन ते त्रस्त झाले होते. शमादानाखाली कितीतरी पतंग पंख जाळून घेऊन, निवांत पडले होते. काहीतरी मनी बांधल्यासारखे संभाजीराजे सुखमहालातून बाहेर पडले. त्यांची पावले दरुणीमहालाच्या रोखाने चालू लागली. पहाऱ्यावरचे गडी त्यांना देत असलेल्या मुजऱ्यांवर त्यांचे लक्ष नव्हते. नेमकी त्यांची पावले येसूबाईंच्या सुखमहाला समोर थांबली. पहाऱ्यावरची अर्धवट पेंगुळलेली कुणबीण त्यांना बघताच धडपडत उठली. पदर सावरू लागली.

“आत वर्दी दे. आम्ही आलोत.” कसल्यातरी आकाशी विजेने संभाजीराजांचे डोळे वर्ख देऊन काढले होते.

“जी.” कुणबीण पाकोळीगत आत सटकली. क्षणभरातच परत फिरली. म्हणाली, “जाग्याच हाईत.”

संभाजीराजे महालात आले. दरवाजाला आडबंद पडला. गज पावलांनी बांडे संभाजीराजे भोसले येसूबाई उभ्या असलेल्या मंचकाजवळ आले. थेट मंचकावर बसले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची वरखाली लपापणारी माळ त्यांनी उतरली. चौरंगावरच्या तबकात ठेवली नि मंचकाची काठाळी धरून उभ्या असलेल्या येसूबाईना नजर दिली. खाली मान घालून, चंद्रकळी शालूचा मुखभर पदर पेलून उभ्या असलेल्या येसूबाई अष्टमीची चंद्रकोर भवानीच्या भंडाऱ्याच्या परडीत डुबवून काढल्यावर दिसेल, अशा दिसत होत्या! आपली स्वारी कधी नव्हे ते, मध्यरात्र टळल्यावर थेट आपल्याच महाली आली आहे, हे त्यांना खरेच पटत नव्हते. त्या पार गोंधळून गेल्या होत्या.

धडधडती शांतता काही काळ कुचमून गेली. मग घोगरट बोलीत संभाजीराजे म्हणाले, “आमचं एक काम कराल?”

“जी.” खानदानी पदर नाजूक हलला.

“काम सादिलवार नाही.” राजरक्ताने पेच टाकला.

“आम्ही सारी कोशिस करू.” जाब आला.

“हे एवढं “तोंडलं’ आम्हास तोडून पाहिजे. ”

संभाजीराजांनी मुठीत धरलेले पाडाचे लालावलेले तोंडले येसूबाईच्या समोर धरले. “हुंउ” स्वारी आपली थट्टा तर करीत नाही ना, अशी शंका येसूबाईंना आली. त्या हसत-हसत म्हणाल्या, “फार जोखमीचं काम खरं. पण आम्ही ते हमखास करू.”

“बघा. शब्द परताल!” संभाजीराजांचे डोळे लखलखले.

“तो भावेश्वरीच्या लेकरांचा रिवाज नाही.” येसूबाईनी कडवी आण दिली.

“ठीक आहे. तोडा हे तोंडलं. मात्र अट एकच आहे. हातानं वा हत्यारानं नाही तोडायचं हे. फार नाजूक आहे ते. उत्तरेकडं “बिंबफळ’ आणि आपल्याकडं ‘जनाना फळ’ म्हणतात याला.” संभाजीराजे हसले.

“अलबत. या फळास हवे कशाला हात आणि हत्यार?” येसूबाई फसगतीने सहज बोलून गेल्या. “आम्हास वाटलंच होतं, तुम्ही कधी माघार नाही घेणार! अं?” म्हणत संभाजीराजे हसले. “बघू या भावेश्वरीच्या लेकरांचा निर्धार!” म्हणत संभाजीराजांनी हातातील तोंडले चटकन आपल्या दातांच्या पकडीत घट्ट धरले नि हुंकार दिला. “हं!” तरीही त्यांचा कावा येसूबाईंच्या ध्यानी काही आला नाही. भाबडेपणी त्या पुढे झाल्या. पटकन त्यांचे हात चाळवले. मग पुटपुटतच पुन्हा स्थिरावले. त्या पार गोंधळल्या. ‘तोंडले’ एवढे साधे. कसे तोडावे काहीच उमगेना! त्यांच्या चर्येवर अनेक भावनांची रंगपंचमी सजली.

दातीचे फळ बाहेर घेत संभाजीराजे खळाळून हसले. म्हणाले, “आम्ही नव्हतो म्हणालो, काम सादिलवार नाही म्हणून!” येसूबाई त्या बोलांनी खोलवर डिवचल्या गेल्या. शरमल्या. शमादानाच्या ज्योतीकडे बघत तोंडले कसे तोडावे, या विचारात पडल्या. ज्योतीवर घालून घेणारे पतंग फडफडताना त्यांना दिसले. त्यांच्या काळजात कसलीतरी खोलवर धडधड उठली. अंगभर रोमांचक काटा उठला. “केवढा चावटपणा करायचा तो.” अशा अर्थाची एक कृतक्कोपाची नजर त्यांनी संभाजीराजांच्या फरीसारख्या खोल, पुष्ट मुद्रेवर टाकली. त्यांचे उभे अंग मोरपिसांचे झाले. डोळे निर्धारी, तेजवान झाले.

दातांत फळ पुन्हा धरून संभाजीराजे डोळ्यांनी हसत होते. येसूबाईंचा चंद्रावळी, गोल मुखडा हळूहळू तोंडल्याकडे सरकू लागला. एका आगळ्या जगात जाताना त्या कुलस्त्रीचे डोळे अंगभूत लज्जाभावाने आपोआप मिटते झाले. येसूबाईच्या कुंदकळी दातांची पकड तोंडल्यावर पडली. त्या छळवादी फळाचा आवेशाने येसूबाईनी लचका तोडला. गुंजलाल रसरशीत रस चार राजओठांवर पाझरला. लाजून चूर-चूर झालेली रात्र शृंगारपुरावर चढत चालली!

दिवसांनी रात्रीशी हातजमाई करून थंडीला पिटाळून लावले. पौषाचे दिवस आले. पंडित मंडळींच्या संगतीत काव्यशास्त्र, राजकारण, धारावसुली यावरची चर्चा संपवून संभाजीराजे खबरा घेण्यासाठी सदरेवर आले. त्यांना अदब देत परशरामपंत खडे झाले. खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी यांनी सदरेच्या बगला धरल्या.

“बोला चिटणीस.” सदरी बैठकीवर आसन घेत संभाजीराजांनी सवाल घातला.

“रांगणा, विशाळगड, तर्फ कोल्हापूर असा पन्हाळा सुभ्याचा बहुतेक सारा धारा जमाबंद झाला आहे, युवराज. पावसाच्या महामूर झडीनं मावळतीच्या मुलखातील काही शिवारं धुपणीला लागलीत. ते कुणबी तेवढे धारामाफीची अर्जी करताहेत.” परशरामपंतांनी दफ्तरी करीणा पेश केला.

“त्या मुलखाचा देख करून, शहानिशा घेऊन त्यांना धारा माफ करा.”

संभाजीराजांनी निवाडा दिला.

“कर्नाटक देशाहून हे खबरगीर रुजू झाले आहेत. त्यांनी थोरल्या स्वामींच्या फत्तेच्या खबरा आणल्या आहेत.” परशरामपंतांनी खबरगिरांकडं नजर दिली. गिर्दीला रेललेले संभाजीराजे पुढेसे झाले.

“सरकार, थोरल्या धन्यांनी होदिगिरीच्या रानात कै. स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. दानधर्म केला.” एका खबरगिराने पुढे होत मुजरा भरला.

“भृशत्‌ बलान्वय सिंधुसुधाकर:।’ म्हणजे ‘सिंधुसागरासारखे बलशाली असलेले राजे शहाजी.’ संभाजीराजांच्या मनी ‘बुधभूषणम्‌’ फेर टाकून गेला. एका दगडी छत्रीसमोर गुडघे टेकून छत्रीला माथा भिडविलेले आबासाहेब त्यांना दिसू लागले. “आम्ही या मोहिमेत आपल्या दिमतीला असतो, तर आबासाहेब, आम्हासही आमचा माथा त्या छत्रीसमोर नमता करण्याचं भाग्य लाभलं असतं.’ एक दुखरा नि:श्वास सदरेवर उमटून विरला.

“कोलार, अरणी, तोरगळ, गदग असा मुलूख मारून थोरलं धनी बेलवाडीला भिडलं. वाडीच्या गढीची राखण मल्लमा देसायणीनं नेटानं करण्याची शिकस्त केली. ईश्वर प्रभुदेसायाच्या या विधवा अस्तुरीनं एक हस््यांवर आपल्या फौजेसंगं मुकाबला दिला. आखरी सखुजीराव या आपल्या सरदारनं गढीवर कब्जा केला. पर…” दुसरा खबरगीर बोलता-बोलता अडखळला.

“पर काय?” संभाजीराजांची उत्सुकता ताणावर पडली.

“पर सखुजी घसारला. त्येनं रांडमुंड बाईची बेइज्जत करायची खटपट केली. थोरल्या धन्यांनी समद्या तळाम्होरं त्येचं तावल्या सांडशीनं डोळं जाळण्याची सजा फर्मावली.”

ते ऐकताना साऱ्या सदरेवर शांतता पसरली.

“बेलवाडी मल्लमाला म्हाराजांच्या म्होरं पेश करण्यात आलं. तिच्या काखेत तिचं एकुलतं याक पॉर हुतं. बाई धीराची हुती. थेट महाराजांच्या बैठकीपत्तूर पुढं झाली.

महाराजांच्या मांडीवर काखेतलं पॉर ठिवून पिळानं म्हणाली – “गढी जिंकलासा, ह्यो गढीचा वारस बी सांबाळा आता. आम्हाला काढण्या घालून टाका कोठीत.” त्ये ऐकताना महाराजांचं डोळं पाझरलं. मांडीवरच्या पोराला थोपटीत धनी म्हणालं, “बाई, तुम्ही थोर आहात. आम्हास भैनीसारख्या आहात. ही गढी आम्ही तुम्हास चोळी-खणासाठी बहाल करतो आहोत!” महाराजांनी मल्लमाची सुटका केली.” खबरगिराचा आवाज धरल्यासारखा झाला.

“जगदंब! जगदंब! चिटणीस, भाग्यवान… भाग्यवान आहे तो बच्चा, ज्याला आबासाहेबांच्या मांडीवर बसण्याचा मान मिळाला. या खबरगिरास पेहराव बक्ष करा!”

संभाजीराजांनी खबरगिरांची कदर केली. ते निघून गेले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here