धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १११

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १११

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १११ –

“आम्ही एक काव्य बांधलं आहे. अष्टनायिकांचे भेद सांगणारं ‘नायिकाभेद’ नावाचं. त्या अष्टप्रकारांपैकी कुठल्यात तुम्ही बसता, हे ताडून बघत होतो आम्ही.”

संभाजीराजांनी त्यांना अधिकच गोंधळात टाकले. पुढचे ऐकायला येसूबाईची कानपाळी लालावली. टप्पोऱ्या डोळ्यांवरच्या पापण्यांच्या चवऱ्या नुसत्याच फडफडल्या. संभाजीराजे हसले आणि म्हणाले, “पण… पण आम्ही बांधलेल्या नायिकांच्या कुठल्याच प्रकारात तुम्ही नाही बसत. तुम्ही सामने आला की वाटतं, पाजळता पोतच आला आहे! अशी “पोतनायिका’ ना केशव पंडितांना, ना कवी कुलेशांना, ना आम्हाला काव्यशास्त्रात आढळली!”

ते ऐकताना येसूबाई अंगभर मोहरल्या. आता त्यांना समोर उभे राहणेच अवघड पडले. दरुणीदालनाच्या दिशेने त्या लगबगीने निघून गेल्या. स्वत:वरच खुशीला पडलेले संभाजीराजे एकटेच महाली फेर टाकीत राहिले. फुलपरडी घेतली धाराऊ आली. संभाजीराजांना बघून हसत म्हणाली, “धाकलं, तुमी हतं हाईसा व्हय! तकडं खंडुजीनं धुंडोळा मांडलाय न्हवं. धन्यानी याद क्येलंया तुमास्री.”

तिचे बोलणे ऐकताना संभाजीराजे तिच्या कपाळभरचे गोंदणाचे हिरवे व्रण निरखत हसले. धाराऊला ते हसणे नेहमीचे वाटले… पण ते तसे नव्हते.

“धाराऊची ही कुणबाऊ बोली कशी गावरान मायेनं भरलेली आहे. हिला बोलताना बघितलं की, भाताचं हिरवंगार चोंडकंच मावळवाऱ्यावर सळसळतं आहे, असं बाटतं! कोशिस केली तरी आम्हाला नाही असं बोलता येणार!’ या बिचाराने ते हसले होते. महादरवाजात भाताचे मुटके ओवाळून टाकणारी, ‘घ्येवा’ म्हणून गुळ-खोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवणारी, बोलण्यापूर्वी “धाकलं’ म्हणून खिनभर खोळंबणारी अशी धाराऊची अनेक रूपे मनाशी घोळबीत संभाजीराजे महाराजांच्या साहेबवाड्याच्या बैठकी दालनात रुजू झाले.

अदब देऊन महाराज काय बोलतील याचा अजमास घेत खडे राहिले. “तुमचा जनाना वाढला. जोखीम वाढली, हे रास्त. पण दिवसाच्या दोन वेळच्या मुजऱ्याखेरीज आमच्या भेटीस तुम्ही आला नाहीत युवराज!” महाराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी मोर्चा धरला.

जी… आम्ही

कसल्या बेतात होतात?”

“आम्ही… आम्ही एका काव्याच्या बांधणीत होतो.”

“अस्सं? ठीक केलंत तुम्ही. कसलं काव्य बांधलंत? रामायणावरचं? महाभारतावरचं?”

गडबडलेल्या संभाजीराजांनी गुमान धरला.

“सबूर झाला? आम्हास काव्य बांधता येत नाही. पण विश्वास ठेवा जाणता येतं!” क्ृचित पसरणारी हास्याची मिश्कील लकेर महाराजांच्या ओठांवर पसरली. “तसं नाही आबासाहेब…” मान डुलवीत संभाजीराजांनी जहाली केली.

“मग?” महाराजांनी छोट्या शब्दानेसुद्धा मूळ धरले.

“आम्ही… आम्ही अष्टनायिकांचे स्वभावीभेद सांगणारं काव्य बांधलं आहे. “नायिकाभेद’ म्हणून.”

“अष्टनायिका? स्वभावी भेद!” ते शब्द कानांवर पडताच महाराज मनाने कुठेतरी दूरवर गेल्यासारखे झाले. काही न बोलता पाठीशी हात गुंफून फेर टाकू लागले. एक निळे-सावळे मोरपीस त्यांच्या मनात फडफडले!

वळिवाच्या सुंसाट वाऱ्याच्या धारेत सापडल्यासारखे फरफटत म्हणता-म्हणता पार डोंगरकडापल्याड निघूनही गेले. त्यांचा त्यांनाच जाणवावासा एक हलका सुस्कारा सुटला. छातीवरच्या माळेशी गूढ कुजबुजून तोही मुरून गेला… “यांचा दुसरा बाशिंग योग बघताना केवढ्या सुखदिल झाल्या असता तुम्ही! हे काव्य बांधतात… आम्हाला ते साधत नाही. हे काही न बोलता, पण नजरेच्या एका फेकीनं तुम्ही आम्हाला ॑॑असतंत!’ सईबाईच्या आठवणीने महाराजांची पाठीशी बांधलेली गुंफणीतील बोटे चाळवली गेली.

आपला काव्याचा विषय महाराजांना पसंत पडला नसावा, या गैरसमजाने संभाजीराजे मात्र शरमिंदे झाले! खालच्या मानेने बोलून गेले, “चुकलं आमचं, हा विषय बांधण्यात!” संभाजीराजांची नजर फेर टाकणाऱ्या महाराजांच्या अनवाण्या पायांबरोबर लटकत राहिली. ते फिरते थोर पाय थांबले. संभाजीराजांच्या जवळ आले. आजानुबाहूचा तळहात हळुवार युवराजांच्या खांद्यावर चढला.

“शंभू, केवढे भाग्यवान आहात तुम्ही! काव्य केवळ जाणता येऊन काय कामाचं? ते बांधताच आलं पाहिजे! काही चुकलं नाही तुमचं. जगदंबेनं ही देणगी तुम्हास बहाल केली आहे. ती कारणी लावून गागाभट्टांनी केलं, तसं कारभारी करिण्याच्या चोखपणाचं वर्णन करणारं काव्य बांधून घ्या.”

कळायला कठीण असलेल्या आपल्या महाराज साहेबांच्या डोळ्यांत अभिमानी नजरेने झेप घेऊन संभाजी राजांनी त्यांचा ठाव घेण्याचा यत्न केला. त्यांना ते डोळे गंगासागरासारखे वाटले. त्यात गंगेचे साफपण होते. सागराचा बेमर्याद पसारा होता. काहीतरी शोधत असल्या सारख्या महाराजांच्या पापण्या आक्रसल्या. बाहुल्यांचे तेजाळ पुखर त्यातूनही उठून दिसत होते. “तुम्हास आठवतं?” महाराजांचा आवाज पालटत घोगरट झाला होता.

“काय?”

“समर्थांनी आम्हास लिहिलेलं पत्र ऐकून तुम्ही एक मागणं आमच्याकडं घातलं होतंत. आऊसाहेबांच्या संबंधानं असं काही लिहावयास आम्ही समर्थांना सांगावं म्हणून. साक्षात समर्थांपाशीही तुम्ही शिवथर घळीच्या भेटीत या भातेनं मागणं घातलं होतंत शंभू….”

व्ह जी

“तुम्ही… तुम्हीच का नाही आऊसाहेबांच्यावर एखादं साजरं काव्य बांधीत?”

“आबा” पामी जाम अररट याद घालीत नजर त्यांच्या पायांवर टाकली.

“काय झालं?” त्यांच्या मुद्रेररचे पालटलेले भाव बघताना महाराज चरकले.

“आम्ही ती कोशिस कैकवार करून बघितली. हाती पीस धरून आऊसाहेबांचं रूप आठवू लागलो की, आमच्या देहामनाचंच पीस होऊन जातं. ‘शंभू शंभू’ एवढेच साद घातल्यासारखे बोल कानी घुमत राहतात. मग समोरच्या कागदावर आमच्या हातून फक्त “जगदंब, जगदंब’ एवढेच शब्द एकसरीनं लिहिले जातात. ते – तेच आम्हाला काव्यासारखे वाटू लागतात. पिसाची चाल खुंटून पडते.”

“ठण ठण ठण’ पाचाडच्या सदरेवर घाटवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे उठविलेले टोल वाऱ्यावर स्वार होऊन रायगडाच्या निळ्या चढणीवर नातेबंधनाचे गूढ काव्य रेखीत महालात येऊन घुसले!

“युवराज, जैसे स्वीया नायिकाके अष्टभेद काव्यशास्त्रमें मानते है। वैसे नायकके भी चार स्वभावी भेद विख्यात है।” संभाजीराजांनी घातलेल्या सवालाला कवी कुलेश उत्तर देत होते. संभाजीराजे आणि कवी कुलेश यांचे काव्यावरचे संभाषण पावसाळी वातावरण धरून रंगात आले होते. युवराजवाड्याची सदर धरून – खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी अशी मंडळी खडी होती.

महाराज आपल्या साहेबवाड्यात रघुनाथपंत हणमंते, हंबीरराव, अण्णाजी, दत्ताजीपंत, येसाजी यांच्याशी कसल्यातरी खलबतात बसले होते.

“नायकांचे कोणचे चार स्वभावी भेद मानतं शास्त्र; कविराज?” उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेश शांना विचारले.

“धीरोदात्त, धीरप्रशांत और धीरोद्धत ऐसे चार भेद है, युवराज। कलाप्रिय, मृदू सुभाववाले, सौंदर्यप्रिय बीर पुरुषको धीरललित नायक माना जाता है। क्षमाशील, बलवान, दानशूर और अपने गुणोंका अभिमान कभी प्रकट नही करनेवाले शूर पुरुषोत्तमको धीरोदात्त कहते है। पुण्यवान, संयमी, सात्त्विक, चारित्र्यसंपन्न, दयावान, समस्त लोगोंको आश्रयस्थान लगनेवाला, इंद्रपराक्रमी पुरुषश्रेष्ठ धीरप्रशांत नामसे विख्यात है। मायावी बोलनेवाला, चंचल सुभावका, अभिमानी, आत्मगौरवकी भाषा करनेवाला, प्रचंड सामर्थ्यशाली पुरुष धीरोद्धत माना जाता है, शास्त्रमें” कवी कुलेश बोलत राहिले.

संभाजीराजांनी कानांवर पडलेल्या ‘धीरप्रशांत नायकाची लक्षणे महाराजांच्याशी मनोमन ताडून बघितली. त्यांना समाधान वाटले.

“धीरोदात्त’ या इतर तिन्ही नायकांहून भिन्न प्रकारावर ते काही बोलायला लागणार, एवढ्यात पाऊसधारांची सरसर तोडीत असलेला अस्पष्ट कालवा त्यांच्या कानी पडला. कसलीतरी धावाधाव चालली होती. गडाच्या अठरा कारखान्यांतील माणूस पालखी दरवाजाच्या रोखाने चटक्या पावलाने निघालेले होते. दबके… कुजबुजते अस्पष्ट बोल संभाजीराजांच्या कानांवर पडू लागले.

“कवा? पार भिजल्यात… वळखाय न्हाई येत. काय दशा जाली ही!”

कुणालाच काही बोध होईना. बाहेर बालेकिल्लाभर कसलीतरी गडबड माजली होती. “काय झाले?’ संभाजीराजांच्या कपाळी विचाराने आठ्या चढल्या. पाठोपाठ कारभारी महादेव यमाजी उपरणे सावरीत लगबगीने सदर बैठकीत घुसले. “सरकार, सरलष्कर गड चढून आलेत.” सांगायचे ते नीट बांधता न आल्याने मुजरा देत ते अर्थबोध न होणारे काही बोलून गेले.

“मतलब?” संभाजीराजांनी त्यांना येसाजी, हंबीरराव गडावरच आहेत याची जाण देण्यासाठी दुरुस्त केले.

“आपले सरलष्कर नव्हे स्वामी… त्यांचे… मोगलाई कडचे. ने… नेताजीराव…!”

“कारभारी! काय म्हणता? नेताजीकाका? गडावर?” विस्फारल्या डोळ्यांनी झटका बसल्यासारखे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. रजपूत मिर्झा राजाचा शामियाना, काळ्या-बाळ्या धूरनळीचा मोगली हुक्का, रंजुकी. निखारा, किल्ले पुरंदर, कितीतरी गोष्टी संभाजी राजांच्या मनात क्षणभरात सरसरून गेल्या. दूरवर पेटलेल्या तोफांचे क्षीण – सुमार बार ऐकू यावेत, तसे त्यांचे त्यांनाच न कळणारे, कुठे, कधी ऐकले न आठवणारे बोल ढवळून काढू लागले. “मानूस जिथं उपजतं; ती जागा साद घालती मानसाला धाकलं राजं!”

युवराजवाड्याची सदर सोडून संभाजीराजे थेट पालखी दरवाजाच्या रोखाने चालू लागले. जमली मंडळी त्यांच्या मागाने आपसूक खेचल्यासारखी चालली. एव्हाना महमद कुलीखान ऊर्फ नेताजी पालकर आणखी दोन असामींसह बालेकिल्ल्याच्या हमचौकात आला होता. त्या तिघांच्याही अंगावर मोगली पेहराव होते पावसाच्या मारगिरीने ते चिंब पेहराव त्यांच्या अंगांना चिकटले होते.

महमद कुलीखानाने खालगर्दनीने, गुपचूपपणे गड चढून येण्याचा प्रयत्न केला होता. पण पूर्वील मर्दान्या सरलष्कर नेताजी पालकरांना आपली “चाल’ पालटता आली नव्हती. गडावरच्या जाणत्यांनी त्यांना महादरवाजातच ओळखले होते. पावसाळी वाऱ्यासारखी ती बातमी सपकारा टाकीत गडभर पसरली होती.

हमचौकातील चौतर्फाच्या इमारतींच्या सदरी माणसांनी हां-हां म्हणता दाटून गेल्या. पावसाची तुटकी सर, पडलेल्या गर्दनीवरच्या मोगली किमॉशावर घेत महमद कुलीखान दोन असामींच्यामध्ये हमचौकात उभा होता. अंगावर पडणाऱ्या पाणधारांनी त्याच्या उरातील डोंब विझवण्याऐवजी भडकून उठत होता. कोरल्या दाढीवरून घरंगळणाऱ्या पाणथेंबात त्याच्या डोळ्यांतून सुटलेले कडकडीत अश्रुथेंब मिसळत होते. फरसबंदीवर पडून सभोवती फिरविलेल्या पाटातील गढूळ पाण्यात सामील होत होते. एवढी माणसे गर्दी करून चौअंगाने दाटली होती. पण… पण एकाचीही छाती नव्हती,

“कुलीखान’ झालेल्या नेताजींशी शब्दानं बोलण्याची.

एकेकाळी राजगडाचा शिरपेच असलेला नेताजी, कुलीखान म्हणून पायपोसासारखा भिजत बालेकिल्ल्याच्या हमचौकात उभा होता. त्याला बघून जमले एकजात माणूस हळहळत होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १११.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here