महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०७

By Discover Maharashtra Views: 1283 12 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०७ –

आवेगाने युवराजांना छातीशी बिलगते घेत महाराज लगबगीने घोगरट म्हणाले – “जगदंब, जगदंब. शंभूः, सबूर व्हा! ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत. शांत व्हा.”

महाराजांचे हातच बोलके झाले. युवराजांना समजावणी देत तुसते थोपटत राहिले. नेताजींच्या बरोबर रजपुतांच्या गोटात, कऱ्हेपठारवर ओलीस राहायला जाणारे, लहानखुरेच; पण निडर संभाजीराजे, आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या डोळ्यांनी बघत, मोजड्या आणून समोर ठेवणारे संभाजीराजे, संन्यासी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घेतलेले, मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे, प्रतापगडी आईचा पोत मिटत्या डोळ्यांनी बेभान नाचविणारे संभाजीराजे, भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत, ताठ मानेने “आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत” म्हणणारे संभाजीराजे अशी युवराजांची अनेक रूपे छत्रपतींच्या मनी एकमागाने नुसती घोळत राहिली.

“तुम्हाला माहीत नाही, आम्ही तुमच्यासाठी केवढी उमेद बाळगून आहोत.” सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचे केशरी टोप न्याहाळत महाराज पुन्हा पायफेर टाकू लागले. त्यांच्या ओठी घोळणारे बोल तसेच तुटले. सईबाईंच्या आठवणीने पायफेर थांबला.

“तुमच्या – तुमच्या मासाहेबांना आम्ही शब्द दिला आहे. आम्ही तुमचे आबा आहोत पण – पण आऊ होताना आमचे हात थिटे पडताहेत. आमच्या मासाहेब गेल्या नि तुमच्या पाठीचा जिवाभावाचा आधार गेला. म्हणूनच तुम्हाला खूप सावधानगीनं असलं पाहिजे.” न कळणाऱ्या रितेपणाची शांतताच शांतता पसरली.

“तुमच्याविशी कोणेप्रकारचा शक आमच्या मनी स्वप्नातही येणं शक्य नाही. तुमचा स्वभाव आम्ही जाणतो. म्हणूनच आज तुमचीच आम्हाला अधिक चिंता वाटते. युवराज, माथ्यावरचं छप्परच दगा देत कोसळू लागलं, तर तक्रार करावी ती कुणाबद्दल? सारं समजून असा. हुशार असा. जा. निर्धोकपणं थाळा घ्या. घाबरू नका, आम्हास खूप आराम आहे. आईची आणि समर्थांची कृपा घेऊन आम्ही उदंड जगणार आहोत. या तुम्ही.” छत्रपतींनी आपल्या राजअंशाचा खांदा हलकेच थोपटला. शांत, भरल्या चित्ताने संभाजीराजे दालनाबाहेर पडले.

विचारगत महाराज मंचकावर विसावले. दाट चिंतेची जाळी त्यांच्या चर्येवर चढली. चैन पडेना. पुन्हा उठून ते एका चौरंगावर ठेवलेल्या नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगा जवळ आले. त्याच्या दर्शनाबरोबर एका विचित्र धीराच्या विचाराने त्यांचे मन ताठर, निर्धारी झाले.

पोसाने झाकलेला छत्रपतींचा थाळा खांद्यावर घेऊन, दुसऱ्या हाती पाण्याचा गडवा घेतलेला थाळेवाला आला. एका चौरंगावर थाळा ठेवून त्याने पोस हटविला. वाफांची मंद वळी उठली. थाळेवाल्याने प्रत्येक पदार्थ महाराजांना समक्ष चाखून दाखविला. पाण्याचा घोटघशाआड घेतला. काहीच न बोलता मुजरा देत तो मागे हटत दालनाबाहेर पडला.

तस्त-तांब्या घेऊन दुसरा एक खिदमतगार मागोमाग आत पेश झाला. महाराजांनी तस्तात हात धुतले, पोसाला पुसले. चौरंगालगत मांडलेल्या चंदनी पाटावर एक पायाची घडी घालीत महाराज थाळ्याला बसले. तस्तवाला बाहेर पडला. जाताना त्याने दालनाचा दरवाजा हलकेच ओढून घेतला.

पितरांचा अन्नांश तबकाबाहेर चौरंगाच्या काठाळीवर ठेवून पाण्याने मंडल टाकीत महाराजांनी चित्राहुती दिली. अन्नमंत्र पुटपुटत मिटल्या डोळ्यांनी दोन आचमने ओठांआड घेतली. तसे करताना त्यांच्या मनाला एक निसटती चुटपुट चाटून गेली. “ध्यानी राहिलं नाही मनाच्या घोळात. युवराजांना थाळ्यासाठी आज इथंच सोबतीला घ्यायला पाहिजे होतं.’ दालनाचा दरवाजा कुरकुरला म्हणून महाराजांनी तिकडे नजर दिली. दरवाजात महाराणी सोयराबाईसाहेब उभ्या होत्या! त्यांच्या दर्शनाबरोबर महाराजांची नजर समोरच्या तबकावर फिरली. कसलातरी विचार एका क्षणात बांधून झाला. सोयराबाई क्षणभर घोटाळल्या. काहीतरी विचाराने परतायला निघाल्या.

“या” महाराजांनी त्यांना परतू दिले नाही. त्या आवाजातील संथपणाने धीर आलेल्या सोयराबाई ओठांच्या मुळातून कळेल न कळेलशी लकेर उठवीत नेहमीच्या दिमाखी कदमबाज चालीने आत आल्या.

“स्वारीनं एकांगी थाळा घेण्याचा निर्णय केला हेच ठीक झालं.” चौरंगाजवळ उभ्या राहात त्या म्हणाल्या

“होय. आता आमचा भरोसा आम्हालाच! काय बोललं जातंय ऐकलं नाही

तुम्ही?” महाराज नेहमीसारखे बोलत तबकातील वाडगे चौरंगावर ठेवू लागले.

“राणीसाहेब, किती दिवस झाले… तुम्ही आम्ही संगतीनं थाळ्यास नाही बसलो!” शांतपणे महाराज बोलले. दरवाजाकडे बघत त्यांनी साद दिली. “कोण आहे तिकडे?” महाराजांचे उष्टे तबक उचलायला बाहेर खडा असलेला थाळेवाला “जी”, म्हणत लगबगीने आत आला.

“जा. राणीसाहेबांचा थाळा लावून आण. चौरंग मांड.” त्याला आज्ञा मिळाली.

आपल्या पायावरची आळत्याची नक्षी मोठी होत-होत आपणालाच गुरफटून टाकत करकचून आवळते आहे, या विचाराने सोयराबाई सुन्न झाल्या. “राणीसाहेब, आमच्या रामराजांना नाही आणलंत तुम्ही आमच्या भेटीसाठी?”

त्यांना तिसरीकडेच नेत कसलीही चलबिचल न दाखविता छत्रपतींनी विचारले. “त्यांना प्रवास झेपत नाही.” सोयराबाईंना काहीतरी उत्तर देणे भागच होते.

आज्ञेप्रमाणे थाळेबाला थाळा घेऊन आला. चौरंग मांडून त्याने त्यावर तबक, गडवा ठेवला. रिवाजाप्रमाणे तो बाहेर पडला. “या.” चौरंगाकडे हात देत महाराज सोयराबाईंच्या कडे न बघताच म्हणाले. आळत्याच्या नक्षीचे पाय क्षणभर चळवळले! अंगीचा जरीकिनारी तहबंद आतून घामाने डबरून आला. समोरच्या राजस्त्रीच्या तोंडून फाटके, बोंदरलेले कसनुसे शब्द आले

– “स्वारीला सांगणं विसरूनच गेलो आम्ही! आम्ही नवस बोललो आहोत. उपवास आहे आमचा!”

डोळ्यांतून ठिणग्याच ठिणग्या उसळणारे महाराज तबकावर नजर ठेवून शांतपणे म्हणाले, “अस्सं? मग आम्ही घेऊ?”

तद जी “कसला नवस बोललात?”

“स्वारीला आराम पडावा म्हणून बाघजाईला साकडं घातलं होतं आम्ही. धास्त बाटते स्वारीच्या जिवाची आम्हाला. सावधानगीची इशारत द्यायला आलोत आम्ही.”

“कसली सावधानगी?”

“युवराज… युवराज दिसतात तेवढे सिधे नाहीत!”

“खामोश!” थरथर कापणारे महाराज समोरचे तबक परते सारत ताडकन पाटावरून उठले. “शरम नाही येत जबान वाऱ्यावर सोडायला?” संतापाने मस्तक भिनलेल्या छत्रपतींना थरथरीमुळे नीट बोलताही येईना सोयराबाईना अंगावर उकळत्या तेलाचा शिडकावा झाल्याचा भास झाला. त्याही थरथरू लागल्या. कधीच न अनुभवलेल्या भीतीने!

“कुणासमोर, कुणाबद्दल, कोण ढंगानं जबान ढिली सुटते आहे, याचं भान ठेवा. तुम्ही मानता तसे युवराज पोरके नाहीत. दगाफटका करणारे, कपटी नाहीत. हुशारीनं तुम्ही खेळू बघता ती चाल जनानी आहे. एक ना एक दिवस ती तुमच्याच अंगावर फेरचाल करील. अण्णाजींच्या घरची सुवासिन हकनाक कशी बळी गेली हे तुम्ही विसरला असला तरी आम्ही नाही! युवराजांच्या निवाड्याच्या दिवशी तुम्ही रामराजांना राजसदरेवर आमच्यासमोर का घातलंत तेही आम्ही खूब समजून आहोत. याहीपेक्षा तुमची मजल कुठवर जाऊ धजते, हे आमच्यापेक्षा तुम्हीच मनोमन खूप जाणता!” पुढचे बोलणे जड झाल्याने महाराज थांबले.

खालमानेच्या सोयराबाईच्या डोळ्यांतून ऊनजाळ धारा वाहू लागल्या. पायावरची आळत्याची नक्षी दिसेनाशी झाली. संतापाच्या शिगेला पोहोचलेले छत्रपती, आजवर रोखण्यास असह्य झालेले त्यांच्या करणीचे माप जळजळीत शब्दांत त्यांच्या पदरी घालू लागले. “तुम्ही शंभूराजांना सवते मानता, पाण्यात बघता. तुम्ही विसरता सावत्रपणाच्या वागण्यानं घडलेलं रामायण. ही दौलत ना आमची आहे, ना युवराजांची, ना रामराजांची – कैक जिवांनी प्राण खर्ची घालून ती उठविली आहे. आई भवानीच्या नावानं आम्ही, बाळराजे, युवराज सारेच भोसले, तिचे भुत्ये आहोत. तोच वारसा आहे साऱ्यांचा. दौलतीच्या लोभानं तुमचा तोल ढळत चालला आहे. युवराजांना बदनाम करणाऱ्या चाली तुम्ही बांधताहात. आम्हास त्या ध्यानी येणार नाहीत, असा सोयीचा समज करून घेताहात तुम्ही!” महाराज स्वत:शीच हसले. कसेतरीच. त्यांचाच जीव कोंडणारी विचित्र शांतता क्षणभर दाटली. ती असह्य झाल्याने महाराज पायफेर टाकीत स्फटिक शिवलिंगाच्या चौरंगाजवळ आले. बेलफुलांतून अर्धवट दिसणाऱ्या त्या स्फटिक पिंडीच्या दर्शनाबरोबर शुभ्रसफेद कबूतर फडफडत निळ्या आकाशात झेपावावे, तशी मासाहेब जिजाऊंची आठवण त्यांच्या मनाच्या खोलवटातून उसळली. डोळे पिंडीवर जखडून पडले. मन दाटून आले. सुटले सोयराबाईंना पाठमोरे झालेल्या महाराजांच्या तोंडून पिळवट, घोगरट शब्द सुटले –

“आमच्या मासाहेब गेल्या… वाटलं होतं त्यांची जागा तुम्ही झेपेल तेवढी भरून काढाल, साऱ्यांना माया, दिलासा देऊन! तुम्ही त्यांचे अधिकार घेतलेत. त्यांच्याएवढा मायेचा मोठा पदर घेणं, तुम्हाला कधी साधलं नाही. किमान तुम्ही राणीसाहेब आहात याचा तरी विसर पडू देऊ नका. आम्ही छत्रपती आहोत. साऱ्यांचे पालक. तुम्ही महाराणी आहात. या कर्तव्याच्या अर्ध्या भागीदार. पालन करणं होत नसेल, तर गुमान धरा. नसत्या घालमेली पैदा करून घरच्या बाबीत गैरमेळ पाडू नका. या उप्परही तुमचे हट्ट, हेका सुटणार नसेल तर – तर महाराणी म्हणूनसुद्धा तुमचा मुलाहिजा धरणं, आम्हास शक्‍य होणार नाही. या तुम्ही….” महाराजांची अस्वस्थ बोटे कवड्या चटाचटा चाळवू लागली. सोयराबाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी एक थिजला, सुन्न पुतळा उभा होता. त्याला शेवटची निर्धारी समज मिळाली.

“उद्या उगवतीबरोबर तुमचे मेणे रायगडाची वाट धरतील. इथं तुमची आता मुळीच गरज नाही. आम्ही तशी आज्ञा हंबीररावांना देऊन ठेवली आहे. तुम्ही गैरमेळाचं कसं बोलता – समक्ष आमच्यासमोर – तेही जाताना ऐकून जा. वाघजाईचा नवस तुम्ही, समर्थकृपेने आम्ही उतारावर पडलो, तेव्हाच फेडला आहे! उपवास दुसरा कशाचातरी असेल. तुम्हीच विचार करून कसला ते ठरवा!”

सोयराबाईंना आता उभे राहणेच कठीण झाले होते. पिंढऱ्यात गोळे धरल्यासारखे त्यांना वाटू लागले. पदराच्या शेवाचा बोळा तोंडात दाबून त्या बाहेर जायला निघाल्या. त्यांच्या कांकणाच्या हालचालीबरोबर वळते झालेल्या छत्रपतींनी त्यांना “थांबा” अशी जरब देत दालनाच्या उंबरठ्यातच रोखून ठेवले.

कोनाड्यात अंगभर जळणारा पलोताच जसा त्यांनी शब्दांच्या रूपाने निर्वाणीचा म्हणून दौलतीच्या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या महाराणींच्या कानांत ठाशीवपणे पिळून टाकला – “नीट कान खोलून ऐका – युवराज संभाजीराजांनी दिलाच, तर विषाचा पेला आम्ही – आम्ही भरल्या दरबाराच्या साक्षीनं, मंत्रिगणांसमक्ष आनंदानं दरबारी महालात सिंहासनावर बसूनसुद्धा घेऊ… कारण – कारण त्या सिंहासनासाठी नऊ वर्षांची उमर असताना ते रजपुतांच्या गोटात ओलीस राहिलेले आहेत. अंगी कफनी चढवून मथुरेहून या मुलखापर्यंत एकटे वणवण भटकलेले आहेत! !”

महाराजांचा निरोप घेतलेले संभाजीराजे किल्ले सातारा उतरून रायगडाच्या रोखाने चालू लागले. येसूबाई, पुतळाबाई यांचे मेणे धरून हत्यारबंद धारकरी चटके पाय उचलीत होते. विचारात असलेल्या संभाजीराजांची मुद्रा बांधल्यासारखी झाली होती. कितीही निर्धार केला, तरी संभाजीराजांच्या डोळ्यांसमोरून मासाहेब सोयराबाई हटत नव्हत्या. त्यांना हटकणे जमेनासे होताच ते कसल्यातरी आवेगाने हातांतील कायद्यांना दमजोर खेच देत होते. तोंडातील दातेरी, लोखंडी लगामपट्टी कचताच स्वारीचे जनावर कळवळ्याने फुरफुरत होते. आणि विचारांमागून विचार संभाजीराजांच्या पाठीवर स्वार होऊन नको तेव्हा कायदे खेचून, नको तिथे काच देत होते. वर्मी कळ बसावी, असे टाचा भरीत होते… मन फरफटीला लागले होते –

“का – का घडावं असं? कुणाचा कसूर नडतो आहे? अशा का वागतात मासाहेब? आम्ही त्यांचे कुणीच नव्हेत? आमचं राहू द्या. खुद्द आबासाहेबांची काय खातर करताहेत त्या? कुठं जाणार आहे त्यांची हवस? रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. का घडावं असं? महाराजसाहेबांना विष-प्रयोग होतो?

त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो? काय चाललं आहे, तेच समजत नाही. आता इतर कुणाची नाही पण… पण आमचीच आम्हाला धास्त वाटते! वाटतं आम्हीच काहीतरी वावगं करून बसू! वाटतं मासाहेबांच्या, सामने उभं राहून, मनी घोळतं सारं साफ सांगून टाकावं. आमच्या युवराज पदासाठीच त्या बेचैन असतील, तर ते रामराजांना बहाल करून मोकळं व्हावं….

“थोरल्या आऊसाहेबांच्या आठवणीनं काळीज गलबलतं. केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक-एक बोल! या वेळी त्या हयात असत्या तर? छे! त्या असत्या तर महाराज साहेबांच्या जिवाशी असा क्रूर खेळ करण्याची मजलच झाली नसती कुणाची. आमच्यावर वहीम बोलताना तर दहा वेळा विचार करावा लागला असता, कुठल्याही लटक्या जिभेला!

छी! आम्ही… आम्ही अभक्ष्यप्रयोग केला म्हणे महाराज साहेबांना! यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याच वेळी आम्हाला कडेलोटाची वा तोफेच्या तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होतं! हे असं ध्यानीमनी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर ना येती. मासाहेब – मासाहेब, नको त्या कारणासाठी काळजाचा लचका तोडला आहे तुम्ही आमच्या. माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात. आम्हाला नवल बाटतं ते आबासाहेबांचं. एवढं झालं; पण एक ब्रसुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही. सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी? की काहीच बोलता येऊ नये, तशी त्यांची गत झाली आहे? आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभं करण्यात आलं तसं – तसं मासाहेबांना उभं करण्यात येईल? नाही! नाही. आम्हीसुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वरमानेनं बोलू शकलो नाही! आबासाहेब हे करू शकतच नाहीत. कसला खोडा पडला हा.!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment