धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०६ –

मंचकावर लेटलेल्या क्षात्रतेजावर नजर खिळून पडलेले कल्याणस्वामी देवदूताच्या पावलाने मंचकाजवळ आले. काठाळीजवळ बसत त्यांनी आपला कमलपाकळी सारखा तळहात छत्रपतींच्या कपाळावर ठेवला आणि जशी जिजाऊंनी घातली असती तशी माया भरली, हलकीच साद घातली – “सिऊबाराजे!”

चेतनेचे गरुडपीस लेटल्या क्षात्रतेजावर फिरले! महाराजांनी पापण्या उघडल्या. काळ्याशार, दाटल्या ढगांतून पुनवेचा चंद्र दिसावा, तसे कल्याणस्वामी दृष्टीस पडताच त्याही स्थितीत ते संस्कारसंपन्न क्षात्रतेज पायधूळ घेण्यासाठी उठण्याची धडपड करू लागले.

“राजे, नमस्कार पावला. लेटून राहा.” कल्याणस्वामींनी त्यांना उठू दिले नाही.

“शिंपला आणि दूध घ्या.” कल्याणस्वामी स्वत:शीच बोलल्यासारखे बोलले. काखेची झोळी त्यांनी पुढे घेतली. पळसपानांच्या दोन पुरचुंड्या तिच्यातून बाहेर काढल्या.

“दिली मात्रा टिकत नाही. उलटून पडते. तब्येत जोखमीत आहे. स्वामींना… स्वामींना…” पुरचुंड्या बघून न राहवल्याने बोलणाऱ्या शिवराम वैद्यांना पुढे बोलवेना.

“ते आम्ही जाणतो. गुरुदेवांनी त्यासाठीच आम्हाला हे भस्म आणि चूर्ण देऊन पाठविलं आहे.” दुधात खललेले चूर्ण कल्याणस्वामींनी ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत छत्रपतींच्या ओठांपार दिले. डोळे मिटलेल्या, क्षीण चर्येच्या छत्रपतींच्या नरड्याची घाटी क्षणभर लकलकली. ते बघताना संभाजीराजांच्या उरात वेदनेची एक मासोळी सळसळत गेली. गुहेतून यावेत तसे छत्रपतींच्या तोंडून क्षीण रामबोल आले – “जय जय रघुवी र समर्थ! !”

कुणाचाही आधार न घेता शरीर पेलत महाराज शांतपणे लेटते झाले. वैद्यांनी सुस्कारा सोडला. देवमहालीच्या भवानीच्या मूर्तीकडे बघावे, तसे संभाजीराजे कल्याण स्वामींच्या दाढीधारी, सतेज, बैरागी मुद्रेकडे बघतच राहिले. “थोरला महाल’ काढल्या पायांनी हळूच त्या दालनाबाहेर पडत होता!

“शंभू” पहाटवेळेच्या गारव्याला धरून शांत साद आली. रात्रभर जागत डोळे धरून मंचकाच्या काठाळीवर बसलेल्या संभाजीराजांचा, गारव्यावर बसल्या-बसल्या डोळा लागला होता. त्या सादेने संभाजीराजांची झापड पिटाळून लावली.

“महाराजसाहेब कसं वाटतं?” एका शब्दातच कितीतरी सवाल दडून होते. “खूब आराम आहे आम्हांस.” छत्रपतींच्या उभट, पिवळसर चर्येवर, कुठंतरी कळेल न कळेल अशी विश्वासाची लकेर होती.

“स्वामी कुठं आहेत?”

“जी. आहेत. एका कोठीत पेटत्या धुनीसमोर ते रात्रभर ध्यान धरून बैठक घेऊन आहेत. वर्दी देऊ?” समाधानाने संभाजीराजांची चर्या उजळली होती. बाहेर झाडापेडांवर पक्ष्यांचा कलकलाट उठला होता. “नको. आत्ताच नको. त्यांचं ध्यान पुरतं झालं की मात्र लगेच द्या. सांगा, आम्हाला चरणदर्शनाशिवाय चैन नाही.”

“जी!” संभाजीराजे हमामखान्याच्या रोखाने बाहेर पडले. मुद्रा खंगाळून कल्याणस्वामींच्या कोठीसमोर त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत फेर टाकीत राहिले. दिवस अर्धा कासरा चढून आला. कोटोतून रामबोल उठले. कल्याण स्वामींच्या दर्शनासाठी संभाजीराजांचेच मन ओढीला लागले होते. ते कोठीआत आले. “स्वामी” कल्याण स्वामींच्या पायांवर कपाळ ठेवताना संभाजीराजांच्या तोंडून शब्द फुटेना.

“युवराज, छत्रपतींची हवाल?” त्यांना हलकेच वर घेत स्वामींनी विचारले.

“जूम आराम पडला आहे तब्येतीस. महाराजसाहेब आमच्याशी बोलले. आपल्या दर्शनासाठी बेचैन आहेत.”

“चला. युवराज, या क्षणी तुम्ही धरला आहे, तोच विचार छत्रपतींनीही मागे धरला होता. वैराग्याचा! गुरुदेवांनी तेव्हा त्यांना हिताचा बोध दिला. तेच आम्ही तुम्हाला सांगू. राजधर्म तुमचा धर्म आहे. संकटाशीच त्याची सांगड असते. तुम्हीही वैरागीच आहात – जगदंबेचे. तुम्हांला – तुमच्या महाराजांना मारू म्हणणाऱ्याचे हात दोन आहेत.

राखणाऱ्या जगन्मातेचे हात आठ आहेत, हे विसरू नका. चला.” मनकवड्यासारखे स्वामी बोलून गेले. कोठीबाहेर चालू लागले. त्यांनी पाठीशी बांधलेल्या व्याघ्रचर्मावरचे पट्टे न्याहाळत मनातील शंका, उबग निपटून गेलेले संभाजीराजे आपसूक चालले. समोरच्या व्याघ्रचर्माने त्यांच्या मनी फेर टाकला – ‘महाराजसाहेबांची काय आणि आमची काय; हयात ही या व्याघरचर्मासारखीच! सुखदु:खाचे काळे-बाळे पट्टे.

कल्याणस्वामींनी महाराजांना आशीर्वाद दिले. वैद्यांच्या हाती व्याधी उतारावरची चूर्ण-मात्रा ठेवून ते सर्वांचा निरोप घेऊन गड उतरू लागले. त्यांना रिवाजी सोबत देण्यासाठी संभाजीराजे त्यांच्याबरोबर महादरवाजापर्यंत येऊन थांबले

“युवराज, या तुम्ही.” संभाजीराजांचे भरीचे खांदे थोपटून कल्याणस्वामींची चक्रवर्ती पावले पुढे चालू लागली. त्यांची आकृती डोळ्यांआड होईपर्यंत युवराज दरवाजातच जखडल्या पायांनी खिळून खडे होते. त्यांच्या मनाच्या कोठीत मात्र त्यांना घुमता रामबोल ऐक्‌ येत होता – ‘तुम्हीही बैरागीच आहात – जगदंबेचे!!

पंधरवडा परतला. महाराजांचे अंग धरू लागले. हलके अन्न पोटात ठरू लागले. एव्हाना पश्चिम दर्यावरून टोपीकरांचे खलिते वखारी-वखारींना जहाजांतून खूशखबर देत होते – “बंडखोर शिवाजी साताऱ्याच्या किल्ल्यावर विषबाधेने मृत्युमुखी पडला! तरीही आपण बिनघोर झालो असे नाही! त्याचा मुलगा संभाजी राज्यपदी चढला आहे! बापासारखाच तो तापदायक आहे! असे म्हटले जाते की, त्यानेच आपल्या बापाला विष देऊन मारविले आहे!!”

मोगली ठाण्यांवरचे सांडणीस्वार सुरत, बुऱ्हाणपूरच्या रोखाने खलित्यांच्या थैल्या कमरेला बांधून खुशीचे हिसके हिंदोळे घेत दौडत होते. खलित्यांतील मजकूर होता –

“काफराना सेवा जहरी आफतसे दफा हो गया। उसके कमीने बच्चेनेही उसको जहर पिला दिया। रहमदिल खुदातालानेही कम्बख्तको ये खयाल दिया)”

या अफवा होत्या हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पण त्या वाऱ्यावर पिकलेल्या अफवा नव्हत्या. सातारच्या किल्ल्यावरूनच त्या रीतसर उठल्या होत्या! महाराजांना दिवट्याचा मुजरा द्यायला संभाजीराजे त्यांच्या दालनी आले. आता महाराज दालनातच हिंडू-फिरू लागले होते. युवराजांनी महाराजांना रिवाज दिला. धूपदान घेतलेला धूपजी दालनात आला. धूप देऊन निघून गेला.

“महाराजसाहेब…” संभाजीराजांच्या बोलण्याने पाठीशी हात गुंफवून संथ येरझारा घेणारे छत्रपती थांबले.

“बोला.”

युवराजांनी धारकऱ्यांच्या पुतळ्यावरून निसटती नजर फिरवली. महाराजांनी ते हेरून हलकी टाळी दिली. पहारेकऱ्यांचा हवालदार ती टाळी पकडत पुढे आला. मुजरे भरून आज्ञेसाठी उभा राहिला.

“आम्हास एकांत पाहिजे हवालदार.” राजांना हे बोलताना आपल्या अंगीचा जामा काखेजवळ ढगळ पडला आहे, हे फार जाणवले. पळभर ते अस्वस्थ झाले. पुतळे हलले. एक-एक करता पहाऱ्याचा झाडून सारा धारकरी दालनाबाहेर पडला. “इकडील राबता आता फेर वर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा. दरवाजा लोटून घ्या.” सर्वांत मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली. दालन एकांती झाले. तणावाचे काही क्षण कुचमले.

“बोला.” राजबोलांनी शांततेला टाच भरली. तरीही युवराज गुमान होते. “कसं बोलावं’ हे त्यांना साधेना. मग सवयीचा सहज बोल उमटला – “आबासाहेब”

“हं!”

“आबासाहेब, आपणाला सावधानगीची इशारत द्यायला आम्ही आलोत. राहवलं नाही म्हणून -”

“कसली सावबधानगी?” छत्रपती शिवर्पिडीसारखे शांत होते.

“आम्हास तुम्ही हवे आहात आबासाहेब. आपल्या… आपल्या जीविताची आम्हाला धास्त वाटते. व्याधी… व्याधी.”

“शंभू, व्याधी साधी नव्हती. आम्ही जाणतो! त्यामागची खलबतंही आम्ही बरे समजून आहोत. दातांखाली फसली म्हणून जीभ तोडता येत नाही. म्हणूनच आम्ही कोंडमारा घेत सबूर आहोत. सावधानगी आम्हांस तर घेतली पाहिजेच, पण आमच्याहून तुम्हाला ती अधिक घेणे आहे!”

संभाजीराजांचे डोळे राजांच्या डोळ्यांतील बाहुल्यांशी केवढेतरी बोलून गेले.

“तुम्ही जाणता तुमच्याबद्दल काय बोललं जातं आहे ते?” रुग्णाईतच पण तो आवाज करडा होता.

“जी. काय-काय बोललं जातं?” छत्रपती काय सांगणार या अंदाजानेच संभाजीराजांच्या अंगी काटा सरकला. डोळे दाटून आले. आवाज बोंदरला. “तुम्ही तुम्हीच आम्हाला अभक्ष्य प्रयोग करविला आहे!” उतरत्या निशाणासारखे थंड बोल राजांच्या तोंडून आले. पाठोपाठ केवढातरी लोंबकळता सुस्कारा सुटला.

“आ  बा!” पाठीवर भिजवलेल्या आसुडाचा फटका फुटावा, तसे संभाजीराजे कळवळले. मस्तकी मुंग्याच मुंग्या धरल्या. कानांच्या पाळ्यांत, घशात, छातीभर उकळत्या शिश्याच्या रसाचे पाट फिरले. पोतासारखा तो भवानीचा भुत्या अंगभर थरथरला. दुसऱ्याच क्षणी संभाजीराजांच्या हातांची मिठी महाराजांच्या पायांना पडली. उभे अंग गदगदून आले. तोंडी तुरणुसाचे रणुसाचे बोते मारलेल्या तोफनळीसारखा घसा कोंडून पडला. “आबा” हा साधा शब्दही बाहेर सुटण्याच्या धडपडीत कोंडमरला. राजआसवे राजांच्या चक्रवर्ती पायांवर टपटपली. ते उमदे राजमन घुसमटून- घुसमटून गेले. वरचे सोशीक आभाळ ओळंबले. खुद्द महाराज छत्रपतींचाच आवाज भरून आला. युवराजांच्या पाठीवरून कडेधारी हाताची थरथरती बोटे फिरविताना महाराजांनाही काय बोलावे, ते सुचले नाही. एक सावळा आणि एक केतकी वर्णाचा चेहरा सरसरत सामोरा आल्याचा भास झाला. सईबाईची आणि मासाहेबांची आठवण त्यांच्या रुग्णाईत शरीराला थरकवून गेली. मनाच्या तळघरात पडलेले जुन्या हत्यारांसारखे बोल थडथडत वर आले – “साक्षात रुद्र जन्मास आला आहे. गडकोटावर राहील, पण… पण आसगणांकडूनच फसगत होण्याचा योग दिसतो या कुंडलीत!”

“शंभू उठा, सबूर व्हा!” युवराजांना थोपटत महाराजांनी वर घेतले.

“आम्हास नजर द्या.” महाराजांचे बांधले बोल दालनास थरकवून गेले.

महाराजसाहेबांच्या डोळ्यांना डोळे भिडले मात्र. संभाजीराजांना राजे, मथुरेहून परत आलेल्या शंभूबाळाला छातीशी घेण्यास उतावीळ होऊन राजगडाच्या पायथ्याशी आलेल्या आबासाहेबांसारखे वाटले. संभाजीराजे गदगदत म्हणाले, “महाराज, आता… आता तुम्हीच आपल्या हाती – हाती आम्हास प्याला द्यावा… विषाचा! या… या…आरोपाला मात्र… आमच्याजवळ… सफाई नाही! यापेक्षा मरणे कमी जाचाचे….”

क्रमशः

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here