महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,891

बलकवडे वाडा, दारवली

By Discover Maharashtra Views: 3677 4 Min Read

बलकवडे वाडा, दारवली…

मुळशीतील दारवली गावाच्या मध्यभागी ३०-४० फूट उंचीवरील भागात सुमारे ६ एकर जागेत या वाड्याचे अवशेष दिसून येतात. वाड्याचे पश्चिमेकडील भव्य प्रवेशद्वार त्याच्या वैभवाचा दिमाख दाखवीत भक्कम पायावर उभे आहे. या प्रवेशद्वाराची उंची २० फूट असून काळ्या पाषाणातील त्याचे बांधकाम दोन-अडीचशे वर्षांनंतरही सुस्थितीत दिसते. प्रवेशद्वाराच्या कमानीवरील कमळाचे सुंदर शिल्प आणि दरवाजावरील गणेशपट्टी स्पष्टपणे दिसून येते. ग्राममुख असलेला हा दरवाजा मुळा नदीच्या काठावर वसलेले दारवली गाव नजरेसमोर उभे करतो. दरवाजाच्या दोहो बाजूंस दगडी तटबंदीचे अवशेष नजरेत भरतात. दोहो अंगांस घडीव जोत्यांच्या देवड्या असून आजही संरक्षकांच्या स्थानांची ओळख करून देतात. अडसरांच्या दोन्ही बाजूंच्या जागांवरून दरवाजाचा अडसर किती मोठा होता याची कल्पना येते.

दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही अंगांस पहारेकऱ्यांच्या ओवऱ्या असून तेथून पुढे सरकल्यावर वाड्याच्या मुख्य प्रांगणात आपण जातो आणि पडीक अवस्थेतील एका भव्य चौसोपी वाड्याचे चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते.

वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्व बाजूस असल्याचे त्याच्या एकंदर रचनेवरून जाणवते. त्याचे तोंड पुण्याकडे असल्याने त्यास पुणे दरवाजा असे म्हणत असत. हा वाडा पंधराखणी, चौसोपी, तिघई, दुपाखी म्हणजे १८० खणांचा व दोन्ही बाजूंस ओवरीयुक्त असा भव्य होता. वाड्याची लांबी व रुंदी १५० बाय १५० फुटांची असून त्याच्या भिंती आजही काही प्रमाणात आपणास दिसतात. पाच-साडेपाच फुटांच्या भक्कम चौथऱ्यावर हा वाडा दिमाखाने उभा असावा असे वाटते.

वाड्याच्या चौकात कारंजे असल्याच्या खुणाही दिसून येतात. हा प्रदेश प्रचंड पावसाचा असल्याने चौकातील पाणी बाहेर काढण्यासाठी बंदिस्त गटारे बांधली होती. वाड्याला दक्षिणेकडे एक दरवाजा होता. वाड्याच्या भोवताली फिरल्यावर घोटीव पाषाणातील तटबंदी पाहून आश्चर्यचकित होतो.

मुख्य चौथऱ्याजवळ आल्यावर या वाड्याचे निर्माते सुभेदार होनाजी बलकवडे (सिंहगड विजेते नावजी बलकवडे यांचे पुत्र) यांच्या समाधीस आपण मुजरा करतो. होनाजीने निर्माण केलेली काळभैरवनाथ व विठ्ठल मंदिर आजही सुस्थितीत असून मंदिरासमोर अनेक वीरगळ बलकवडे घराण्यातील वीरांच्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत.

वाड्याचा ऐतिहासिक रंग –  सुभेदार होनाजी बलकवडे, सुभेदार येसाजी, किल्लेदार पिलाजी हे तिथे बंधू या वाड्यात वास्तव्य करीत होते. ज्वलज्वलनतेजस संभाजी राजांच्या कारकीर्दीत उदयास आलेले नागोजी बलकवडे यांनी औरंगजेबाशी संघर्ष करून लोहगड, सिंहगड, कोरीगड, सुधागड हे किल्ले परत जिंकून घेतले. जंजिरेकर सिद्दी आणि जुन्नरकर बेग यांचा पराभव केला. या पराक्रमाबद्दल छ. राजाराममहाराजांनी त्यांना दारवली, मुलखेड व सावरगाव ही गावे इनाम म्हणून दिली. त्यांची तिन्ही मुले सुभेदार येसाजी, होनाजी व पिलाजी यांनीही चांगला पराक्रम गाजविला. चिमाजी अप्पांच्या गुजरात मोहिमेत त्यांनी सुरत परगण्यातील गनदेवी हा प्रांत जिंकला.

बाजीराव पेशव्यांच्या जंजिरा मोहिमेत त्यांनी पराक्रम करून अवचितगड, सूरगड, चण्हेर-बिरवाडी, तळा, घोसाळा व मानगड हे किल्ले जिंकले. चिमाजी अप्पांच्या वसईच्या मोहिमेत या तीन बंधूंनी पोर्तुगीजांविरुद्ध मोठ्ठा लढा दिला. वेसावा, तांदूळवाडी, कालदुर्ग, ठाणे कोट, मनोर, घोटावडा, गोरक्षगड, सिद्धगड, डहाणू ही ठाणी जिंकून पोर्तुगिजांची कोकणातील सत्ता खिळखिळी केली व वसईच्या किल्ल्याच्या विजयात मोलाची भर घातली. या तिघांनी आपल्या वडिलांनी पराक्रमाने इनाम मिळालेल्या दारवली या गावी वरील भव्य वाडा बांधला. मराठेशाहीच्या इतिहासात दारवली गावाचे नाव अजरामर झाले. या गावचे एक सुपुत्र ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे या वंशातील एक आहेत.

संदर्भ

१) पेशवे दप्तर खंड- बलकवडे घराण्याची कागदपत्रे

२) शिवचरित्र साहित्य खंड-५

३) महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे

Credit – Vikas Choudhari &  ऐतिहासिक वाडे व गढी Group

Leave a comment