महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,854

सह्याद्री

By Discover Maharashtra Views: 1426 3 Min Read

सह्याद्री –

भगवान शंकरांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले जाते- ज्ञानगंगा मस्तकातून ज्याच्या वाहते, जे चारित्र्याचे उज्ज्वल शिखराधिष्ठित आहेत, उत्तुंग व धवल अशा शिखरावर विराजमान आहेत. साधेपणा हाच त्यांचा शृंगार आहे, विभूती हेच वैभव, सृजनरक्षण व खलनिर्दालन हे व्रत आहे, प्रेम हा स्थायीभाव, जगरक्षणासाठी हलाहल प्राशन करणारे, जगरक्षणहितैषीपणा ही ज्यांची कल्याणवृत्ती, बालेन्दुला मस्तकी धारण करून खऱ्या कर्मयोग्यास मान देणारा, कल्याण व ज्ञान यांचे साक्षात मूर्तिमंत रूप असणाऱ्या, संहारासाठी त्रिशूळ व संगीतासाठी डमरू धारण करून संहार व संगीत बाळगणाऱ्या, मृत्यू भयानक घटना नाही याचे ज्ञान देण्यास स्मशानवास करणारा व मृत्यू म्हणजे जीवा-शिवाची भेट हे याद्वारे सूचित करणारा तो भगवान शंकर.(सह्याद्री)

शंकराचं जेव्हा जेंव्हा मी हे वर्णन वाचतो तेंव्हा तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर सह्याद्री चा कोणताही खडक, कातळ, टेकडी, किंवा आभाळ चिरत जाणारा डोंगर डोळ्यासमोर येतो. कापसाने पिंजून निघावं असं भरून आलेलं आभाळ. सुखावून जाणारा गार वारा. दरीतून उठणारे कधी धुक्याचे तर कधी शुभ्र ढगांचे लोट आणि प्रसन्न मनानं दर्शन देणारं सह्याद्री च रौद्र पण तितकंच गोजिरं रूप. सह्याद्री च्या कोणत्याही डोंगर रांगांमध्ये मग ते कोकण कडा, हरिहर, कलावंतीण, लिंगाणा, प्रबळगड, मढे घाट, पन्हाळा, सूर्यकिरण ही पोहोचू शकत नाही अशी सांदण दरी सह्याद्री चं शांत दर्शन जर घ्यायचं असेल तर रात्रीच दुधाळ चांदण्यांच्या प्रकाशात शांत ध्यानस्थ बसलेल्या योगीराजाप्रमाणे सह्याद्री च दर्शन घडतं. सह्याद्री च्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र खळखळणारे धबधबे पाहून महादेवाच्या जटातून गंगा अवतरल्याचा भास होतो.

पुण्याहून महाड ला जाताना मध्ये वरंधा घाट लागतो. घाटातच वाघजाई देवीचं मंदिर आहे. या मंदिराच्या बरोबर समोर जवळपास २००फूट खोल दरी आहे आणि त्याच्या पलीकडे प्रचंड मोठा डोंगर आहे. चांदण्याच किरण त्या दरीच्या तळापर्यंत पोहोचलं होतं आणि चांदण्याच्याच मंद धूसर प्रकाशात समोरचा डोंगर न्हाऊन निघत होता. शिवलिंगाच्या आकाराचा त्या डोंगराकडे पाहिल्यावर मी जणू महादेवाला च पाहतोय असा भास झाला. महादेवाची मांडी घालून पाठ ताठ ठेवून ध्यानस्थ मुद्रा ज्याप्रमाणे असते अगदी तशीच मुद्रा मला दिसत होती शांत, संयमी आणि स्थितप्रज्ञ.

उपनिषदांमध्ये मध्ये जे लिहिलं आहे ते शंकराचं वर्णन आहे की सह्याद्री चं

‘‘रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नम:।
रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नम:।
रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नम:।

© अचिंत्य

Leave a comment