महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्रीमंत रायाजीराव राजे जाधवराव भुईंजकर

By Discover Maharashtra Views: 1270 3 Min Read

छत्रपती शाहूंचे विश्वासू सरदार श्रीमंत रायाजीराव राजे जाधवराव भुईंजकर –

२५ फेब्रुवारी १७२८.

भुईंजकर जाधवांची शाखा जिजाऊंचे वडील लखुजीराजेंच्या थोरल्या शाखांपैकी एक शाखा आहे. लखुजीराजेंचे थोरले पुत्र दत्ताजीराजे यांचे सुपुत्र राजे यशवंतराव हे आजोबा लखुजीराजेंसोबत देवगिरीच्या किल्ल्यावर निजामाशाहीकडून कपटाने मारले गेले. याच यशवंतरावांचे पुत्र लखुजीराजे दुसरे अर्थात लखमोजी राजे हे भुईंजकर जाधवराव घराण्याचे मुळ पुरुष. लखमोजींचे सुपुत्र खंडोजी यांचेकडे श्री राजाराम छत्रपतींच्या काळात सिंहगडाची किल्लेदारी होती. याच खंडोजींचे सुपुत्र श्रीमंत रायाजीराव राजे जाधवराव भुईंजकर हे श्री शाहू छत्रपतींच्या दरबारात मानाचे सरदार होते.

रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले. ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची  नेमणूक व पाटीलकी वतनाचे उत्पन्न मिळून रायाजीरावांना १५  लाख रुपयांचा एकूण सरंजाम होता. छत्रपती शाहूराजांच्या राज्य विस्ताराच्या मोहिमेत रायाजीराव लढायांवर जात असत. युवराज फत्तेसिंह बाबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रायगड मोहिमेत देखील रायाजीरावांचे उल्लेख सापडतात.

भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी “पालखेडची लढाई”. पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छ.शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते.

२५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधील पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरण आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून भुईंज येथे प्रशस्त छत्री/समाधी गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.

सदरहू घुमट अजूनही सुस्थितीत आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस तोंडात व पायाखाली हत्ती दाबणारे शरभ शिल्प आहे. त्यास “षट्गजविजयी शरभ” असे म्हटले जाते. असे शरभ शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ती वास्तू सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते. प्रवेशद्वारावर अत्यंत दुर्मिळ असे सशस्त्र गणेश तर उजव्या बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे. आतमध्ये व्दिलिंगी शिवलिंग आणि सपत्नीक सशस्त्र वीराची मुर्ती आहे‌ यावरुन रायाजीरावांच्या पत्नी देखील सती गेल्या असाव्यात असा अंदाज बांधता येतो. आतमधून गुंबत/शिखरावर जाणारा एक मार्ग आहे.

– स्वप्नील महेंद्र जाधवराव –

संदर्भ:
मराठ्यांची धारातिर्थे – Pravin Bhosale.
शिवपत्नी महाराणी सईबाई – Suvarna Naik Nimbalkar.

Leave a comment