सरदार रायाजी पाटील शिंदे वाडा, वारी, अहमदनगर

सरदार रायाजी पाटील शिंदे वाडा, वारी, अहमदनगर

सरदार रायाजी पाटील शिंदे वाडा, वारी –

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरीच्या पूर्वकाठावर ‘वारी’ नावाचं गाव आहे. तेथे सरदार रायाजी पाटील शिंदे यांचा वाडा आहे. रायाजी हे ग्वाल्हेरकर शिंद्यांचे सरदार. महादजी शिंद्यांच्या पदरी जी विश्वासू सरदारमंडळी होती त्यात अंबुजी इंगळे, राणेखान, जीवबादादा बक्षी, खंडेराव हरी, रायाजी पाटील, रामजी पाटील, लाडोजी शितोळे, देवजी गवळी अशी काही नावे प्रामुख्याने सांगता येतील. यात रामजी पाटील व रायाजी पाटील या नावांत गल्लत होण्याचा संभव असतो.

रामजी पाटील हे महादजींतर्फे पुण्यात वकील होते. त्यांचं आडनाव जाधव. ते मूळ संगमनेर तालुक्यातील पानोडी गावचे. तर रायाजी पाटील यांचं आडनाव शिंदे. रायाजी बहुदा शिंद्यांच्या भावकीतलेच म्हणजे सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडचे असावे. महादजींचे ते अत्यंत विश्वासू. उत्तरेत पानिपतोत्तर काळात मराठ्यांचे वर्चस्व पुनःप्रस्थापित करण्यासाठी झालेल्या अनेक मोहिमांत रायाजींचा महत्वाचा सहभाग होता. 1785 च्या आग्र्याच्या लढाईत त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांना कोपरगावजवळील ‘वारी’ गाव जहागीर मिळाले. त्यांनी गावात पेठ वसवली. पुढे 1802 सालच्या होळकरांच्या स्वारीने गावचे बरेच नुकसान झाले. रायाजींचे वंशज आजही येथे असून त्यांचे दोन वाडे गावात आहेत. वाड्यांची मात्र बरीच पडझड झाली.

संदर्भ- मराठी रियासत, खंड 7- गो. स. सरदेसाई

– सुमित डेंगळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here