वसंत उत्सव

वसंत उत्सव

वसंत उत्सव –

भारतीय संस्कृतीमधील जवळपास बहुतेक उत्सव हे ऋतूचक्र तसेच कृषीशी निगडीत आहेत हे आपण जाणतोच, वसंत उत्सव हा निसर्गाचा उत्सव. वसंतागमनोत्सव हा होळीपासून सुरू होतो अशी धारणा आहे. या वसंतोत्सवाचा उल्लेख हा छत्तीसगड राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील सीताबेंगरा गुहेतील इसवी सनपूर्व ३ ऱ्या शतकातील एका अभिलेखात मिळतो. या अभिलेखात या उत्सवाचे नाव दुले वसन्तिया असे नोंदवले आहे. शिवाय हा उत्सव पौर्णिमेला साजरा होत असे याचा महत्वपूर्ण उल्लेख देखील यात आहे…

७ व्या शतकात हर्षवर्धन राजाने रचलेल्या रत्नावली या नाटकात देखील या उत्सवाचे वर्णन आहे, ” महिला आणि पुरुष हे सामूहिक गाणी गात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्यातून एकमेकांवर रंग सोडत होते शिवाय रंगबेरंगी कपडे आणि दागिने घालत अशोक फुलाचे गजरे केसात मळून महिला रंगाने भरलेल्या पिचकाऱ्यांनी पुरुषांवर आक्रमण करत असत तेंव्हा लाल आणि पिवळ्या रंगाने शहर रंगून जात असे ” साधारणपणे या उत्सवाचे हे वर्णन हर्षदेव रचित रत्नावली या नाटकात नोंदवले आहे.

वात्स्यायन कामसूत्रात कंशुक म्हणजे पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या रंग खेळला जात असे अशी नोंद आहे, वात्सायनाच्या कामसूत्रात (१·४·४२) निरनिराळ्या प्रांतांत प्रचलित असलेल्या वीस खेळांची वर्णने केली आहेत आणि त्या खेळांत होलका ह्या खेळाचा समावेश केला आहे आणि त्या खेळांत फाल्गुन पौर्णिमेला एखाद्या शिंगातून अथवा त्याच्या सारख्या साधनाने एकमेकांच्या अंगावर रंगित पाणी उडविण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. कालिदासाने देखील या उत्सवाला तर ऋत्युत्सव असे नाव दिले आहे शिवाय त्यासमयी रंगांची उधळण होत असे अशी नोंद केलेली आहे..

समाजमाध्यमातून तसेच अनेक माध्यमातून भारतीय संस्कृतीमधील ऋतूचक्र, कालगणना व कृषीसंबंधित सणउत्सवाची हेटाळणी आणि बदनामी केली जाते हे दुर्देवी आहे, काळानुसार सण उत्सवाच्या स्वरूपात बदल होत  असतो तरी त्यातील त्रुटी वगळता योग्य वाटेल त्यामार्गाने आपण भारतीय संस्कृतीचे हे रूप जपले पाहिजे..

– राज जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here