महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

रमा माधव

By Discover Maharashtra Views: 2410 7 Min Read

रमा माधव –

माधवरावांचा जन्म १६ फेब्रुवारी सन १७४५ सालचा. पेशव्यांच्या कठीण काळाचा फायदा उचलण्यासाठी निजाम रणांगणात उतरला, व त्याचे पारिपत्य करण्यासाठी श्रीमंत माधवरावांनी लढाईची तयारी सुरू केली, रघुनाथरावांनी अनपेक्षितपणे केलेल्या तहामुळे निजामाचा पुरता बिमोड झाला नाही. पेशव्यांसाठी दुसरा शत्रू ठरला तो म्हणजे हैदर अली. आपल्या घरभेदी स्वभावामुळे व सखाराम बापू बोकील यांच्या सल्ल्यानुसार रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी केली व माधवरावांना राज्यहितासाठी रघुनाथरावांना शरण जावे लागले, काही कारणास्तव रघुनाथराव आणि निजाम यांच्यामध्ये बेबनाव सुरू झाला व रघुनाथराव पुन्हा माधवरावांच्या पक्षात दाखल झाले. याच दरम्यान निजामाने पुण्यात हैदोस घातला होता, पर्वती देवस्थान लुटले गेले व त्याच्या वर्मावर वार करण्यासाठी पेशव्यांनी औरंगाबादवर हल्ला चढवला व खंडणी वसूल केली. यानंतर राक्षसभुवनच्या लढाईत पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. आता निजामाचा धोका कमी झाल्यामुळे माधवरावांनी आपले लक्ष कर्नाटकाकडे वळविले.(रमा माधव)

राक्षसभुवनच्या लढाई नंतर माधवरावांनी पुणे शहराची नवनिर्मिती केली, तसेच आपल्या पराक्रमाची साक्ष सर्वांस घडवली. पुण्यात सदाशिवराव भाऊंच्या तोतयाची चौकशी होऊन तो न्यायाधीशांकरवी खोटा ठरल्यावर त्याला नगरच्या किल्ल्यात डांबून ठेवण्यात आले. रघुनाथरावांचा घरभेदीपणा तसेच त्यांच्या मनात असलेली सत्तेची लालसा पेशवाईला सतत आतून पोखरण्याचे काम करीत होती, तरीही वेळोवेळी आपल्या काकांशी समजूतदारपणे वागत त्यांच्या स्वभावाला वेळीच आवर घालत माधवरावांनी पेशवाईला कोलमडू दिले नाही.

या कर्तबगार पेशव्याला साथ लाभली ती सौ. रमाबाई यांची. रमाबाई या धार्मिक वृत्तीच्या, नेमनिष्ठ पतिव्रता होत्या. त्यांनी पंचयात्रा केल्याचीही नोंद सापडते. तसेच त्या संसारी होत्या, त्यांना राजकारण आणि सामाजिक गोष्टींमध्ये फारसा रस नव्हता. पेशवाईची घडी नीट बसवत असता, माधवरावांना आतड्यांच्या क्षयरोगाने (टी.बी) ग्रासले, त्यामुळे १७७१-७२चा काळ हा औषधोपचार, हवाफेर, प्रकृतीसाठी धर्मकृत्ये, अनुष्ठाने यातच गेला. आतड्यांचा रोग असल्याने पोटात असह्य वेदना होत असत. राजवैद्यांच्या औषध उपचारानंतर विलायती वैद्याचे सल्ले व औषधांचा प्रयोगही माधवरावांवर सुरू होता. प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेल्यामुळे त्यांनी थेऊर येथे श्रीगजाननाच्या चरणांशी आश्रय घेण्याचे ठरवले. मधल्या काळात माधवरावांच्या प्रकृतीस उतार पडावा म्हणून रमाबाईंनी पेशव्यांचे कुलदैवत श्री हरिहरेश्वरची यात्रा केली होती. शेवटच्या काळात बोलण्याची शक्ती श्रीमंतांच्या शरीरात राहिली नव्हती, त्यांनी बिछाना सोडून भूमीवर निजणे पत्करले.

माधवरावांच्या प्रकृतीत सुधारणा यावी म्हणून रमाबाई सतत उपास-तापास व धार्मिक कृत्ये करीत होत्या ज्यामुळे त्याही शरीराने क्षीण बनल्या. आयुष्याची शेवटची घटका मोजत असता, शनिवारवाडा सोडून गेलेल्या आपल्या मातोश्री गोपिकाबाई यांच्याशी सतत पत्रव्यवहार चालू ठेवावा तसेच भाऊंच्या मागे राहिलेल्या पार्वतीबाईंचा मान कायम राखला जावा, धाकट्या नारायणाचा आधार बनले व सदाशिवभाऊंच्या मृत्यूनंतरचे विधी करण्याच्या सूचना कारभार्‍यांना देऊन ‘गजानन गजानन’ असे शब्द उच्चारीत लढवय्या, शूर, पराक्रमी, मुत्सद्दी व कर्तबगार पेशव्यांनी अल्पवयात वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच देह ठेवला (१८ नोव्हेंबर १७७२) व रमाबाईंनी पतीसोबत सहगमन केले. आजही थेऊर येथे चिंतामणी मंदिराच्या आवारात सती रमाबाई यांचे वृंदावन नदीजवळ पहायला मिळते.

माधवरावांच्या कारकिर्दीत त्यांनी पानिपतवरील सर्व कलंक पुसून काढत दिल्लीची मोहीम फत्ते केली. निजाम हैदरसारख्या बाह्य शत्रूंचा पुरता बिमोड केला. रघुनाथरावांमुळे गृहकलहाला उघडपणे सुरुवात झाली होती, याच गृहकलहाला थोपवत माधवरावांनी यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवली. स्वभावाने धाडसी, करारी, न्यायनिष्ठ माधवराव यांची माणसांची निवडदेखील कधीही चुकली नाही. पानिपतच्या युद्धात झालेल्या कर्जफेडीसाठी त्यांनी स्वतःच्या खासगी संपत्तीचा दरवाजा खुला करून संपूर्ण कर्ज भरून काढले. अल्प समयातच राज्यकारभाराची विस्कटलेली घडी त्यांनी व्यवस्थित बसवली.

राज्यात एकजूटही निर्माण केली. माधवरावांच्या नेमणुकीखाली मराठी सरदारांनी दिल्ली काबीज करून दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचेच भगवे निशाण फडकवले, पानिपतनंतर दहा वर्षांत दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व स्थापन झाले व या विजयानंतर अत्यानंदित होऊन श्रीमंतांनी मोहिमेतील सर्व सेनापती व सरदारांना सोन्याची फुले उधळत पुण्यात आणावे अशी आज्ञा केली. पेशवाईतील पुरुषांकडे पाहता एकाहून अधिक लग्नांचा उल्लेख सापडतो तसेच नाटकशाळेचा उल्लेख आहे, ज्याला माधवराव अपवाद ठरतात. ते अत्यंत निष्कलंक चारित्र्याचे, एकपत्नी राज्यकर्ते होते.

रमाबाईं माधवरावांच्या मृत्यूनंतर  सती गेल्या. रमाबाईंनी सर्वांच्या मनामध्ये नाजूक आणि हळवे असे घर केले आहे .इतिहासात क्वचितच असे एक दूसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले आणि बोलले जाते. पेशव्यांच्या इतिहासात लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून रमा या नावाला जो मान दिला गेला आहे तो अन्य कुठल्याच स्त्रीला दिला गेला नाही. सर्व गुण संपन्न  अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी रमा.

रमा एक काव्य आहे. रमा आणि माधव या तरूण जोडी चा मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव होता.

माधवरावांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी सती जाण्याचा हट्ट धरला. सतीची तयारी झाली .पाहता पाहता वनव्या प्रमाणे रमाबाईंच्या सहगमनाची वार्ता पसरली. दुःखाला किंचित अवरोध पडून त्याची जागा आश्चर्याने घेतली. वाणे आणली जात होती. रमाबाईंनी वाने  दिली.माधवरावांच्या बरोबर  रमाबाईंचे दर्शन घेण्यास गर्दी होत होती. वयाचा,मानाचा,जातीचा मुलाहिजा न धरता , जो तो  रमाबाईंच्या चरणांना स्पर्श करीत होता.समोरून येणार्रा  प्रत्येकाला रमाबाईं  काही ना काही अंगावरील दागिने उतरून देत होत्या .

पालखी उचलली गेली. पालखी मागोमाग रमाबाई जात होत्या .जो पुढे येईल त्याला ओंजळीने नाणी वाटत होत्या .बाया-बापड्यांना अंगावरील दागिने उतरून देत होत्या. नदीपर्यंत जाईपर्यंत त्यांच्या कानातल्या कुड्या खेरीज काही राहिले नाही .साऱ्या वाटेवर दुतर्फा शिपाई उभे होते. घाटावर पाय ठेवायला जागा नव्हती. नदीच्या दोन्ही काठांवर माणूस मावत नव्हते एवढी प्रचंड गर्दी झाली होती. नदीचे पात्र शांतपणे वाहत होते .वारा सुटला होता. घाटावर पुरुषभर उंचीची चंदनाची चिता रचली होती. अकरा आहुतींनी युक्त असा तुपाचा होम  करून अग्नीला प्रदक्षिणा घालून रमाबाई धर्मशिळेवर उभ्या राहिल्या.

गळ्यातल्या सौभाग्यलेण्याखेरीज  त्यांच्या अंगावर दागिना उरला नाही. समोरच्या अथांग जनसमुदायाला त्यांनी हात जोडले ,आणि शिडीवरून चितारोहन केले. माधवरावांचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन रमाबाई बसल्या होत्या. माधवरावांचा शांत चेहरा त्या निरखीत होत्या. जनसमुदायातून उठणारा आक्रोश त्यांच्या कानावर पडत नव्हता.

आकाशाकडे जाणाऱ्या ज्वालांनी पडदा धरला .चितेभोवती  हिरवे टोकदार वासे घेऊन उभे असलेले राखंणदार, ढोलकरी चकित नजरेने त्या ज्वालांकडे पाहत होते. नगारे , ढोलकीवाले ,टिपऱ्या सरसावून उभे होते. फुटणार्या लाकडा खेरीज काही  आवाज कानावर येत नव्हता.पाहता पाहता ज्वाला ज्वाला धडाडू लागल्या…  काही दिसेना झाले.-  क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या  सोबतीने फडफडणाऱ्या  रेशमी श्वेतपदरांचे !

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक सुरेश निंबाळकर

Leave a comment