महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,411

जिजाऊंचे बालपण

By Discover Maharashtra Views: 4665 5 Min Read

जिजाऊंचे जन्म व बालपण

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला – भाग 3

जिजाऊंचे बालपण – लखुजी राजांना चार पुत्र होते तरीही लखुजीराजे मात्र सदैव दुःखी असत.कारण त्यांना एक तरी कन्यारत्न हवे होते.लखुजीराजे यांच्या राणीसाहेब म्हाळसाबाई या लेकीच्या आगमनासाठी तळमळत होत्या. म्हाळसाबाई या वृत्तीने अतिशय धार्मिक होत्या. कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी म्हाळसा बाईने अनेक व्रतवैकल्ये केली होती.नवस बोलले होते. कारण हा राजा अतिशय सच्चा आणि सतगुणी होता. सुलतानांच्या जुलमी राजवटीत असा राजा मिळणे फार फार भाग्याचे लक्षण होते. त्यांचे रयतेवर आत्यंतिक प्रेम होते. पोटच्या लेकरांसारखे ते प्रजेला सांभाळत होते .प्रजेचे दुःख पाहून राजाच्या डोळ्यात पाणी तरळत होते. काटा रयतेला बोचला तर त्याच्या वेदना राजाला होत असत.

एक दिवस रेणुका देवी नवसाला पावली. सिंदखेडच्या राजवाड्यात म्हाळसा राणीसाहेब यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला. सारी शुभ नक्षत्रे, सारे शुभ क्षण, ह्यासाठीच खोळंबले होते. कन्या अतिशय सुंदर होती. रेखीव होती. गोरीपान ,नाजूक कळीच जशी ! सुंदर काळा केशसंभार, विशाल भाल,सरळ चाफेकळी नाशिका, काळेभोर टपोरे मृगनयन, गुलाबकळी सारखे लालचुटुक ओठ, गुलाबी गाल , नाजुक जिवणी,लांबसडक बोटे.खरोखरच दृष्ट लागावी अशीच मूर्ती होती ती. साक्षात मूर्त जगदंबाच कन्या अतिशय शुभलक्ष्मी होती. युगायुगांचा अंधार दूर करणारी ही कन्या होती. तिच्या पोटी साक्षात शिवशंकर अवतार घेतील. फार भाग्यवान आहे ही लेक .मुळे गुरुजीनी जिजाऊंची पत्रिका सांगितली. राजे, लेकीला ज अक्षर अतिशय लाभदायक आहे .जी नेहमी जय मिळवते ती जिजा! कन्येचे जिजाऊ नाव ठेवले.

लखुजीराजे यांनी अत्यंत उत्साहात बारशाचा थाट केला. त्या दिवशी नगरवासियांनी दीपोत्सव साजरा केला .भारताच्या इतिहासाला वेगळे वळण मिळून पारतंत्र्याचा अंधार दूर करणार्या या वीरमातेचा जन्म लखुजीराजे यांच्या पोटी झाला होता. जिजाऊंची जन्मघटिका म्हणजे राज्यघटिका होती. लाखात एखाद्याच्या नशिबी हा योग येतो.अशा योगावर जन्मलेली व्यक्ती सर्वगुण संपन्न व स्वकर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडिवते.

जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला तो काळ पारतंत्र्याचा होता. अशा वातावरणात स्त्री शिक्षणच काय, पुरुषांनाही शिक्षण दिले जात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना युद्ध कलेचे, साक्षरतेचे धडे लखुजीराजे यांनी दिले होते. जिजाऊसाहेब घोड्यावर बसण्यात तर अगदी पटाईत होत्या. त्यांनी मोगली सैन्य पाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात प्रसिद्ध आहेत.जिजाऊ साहेब तलवार चालविणे, भालाफेक,धनुष्यबाण चालविणे इत्यादी प्रशिक्षणात तरबेज होत्या. त्यावेळची परिस्थिती युध्दजन्य व धामधुमीची असल्याने स्त्रियांनाही युद्धकलेचे शिक्षण घेऊन पारंगत व्हावे लागे; कारण परकीय राजवटी कडून राजघराण्यातील स्त्रिया व मुलींना आपले रक्षण करता यावे हाच त्यामागचा हेतू होता. म्हणूनच जिजाऊसाहेबांना युद्धाचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन लखुजीराजांनी त्यांना त्या काळातही पारंगत केले होते.

लखुजीराजे व आई म्हाळसा बाई यांच्या सहवासात शौर्याच्या कहाण्या ऐकत जिजाऊंचे बालपण मजेत गेले होते. लखुजीराजे यांचा चौसोपी वाडा ,सरंजाम ,नोकर – चाकर , हत्ती, घोडे,चित्तथरारक कवायती , संगीतशाळा ,नगारखाना इ.गोष्टी जिजाऊ यांच्या बालमनावर नक्कीच चांगले संस्कार करून गेल्या.
राजवाड्यात आपली गाऱ्हाणी घेऊन येणारे लोक ,मुत्सद्दी व पराक्रमी लोकांची वर्दळ, लढायांचे डावपेच, विविध विषयांची चर्चा या सर्व गोष्टीला न्यायबुद्धीने उत्तर देण्याची लखुजीराजे यांची हातोटी इ.गोष्टी जिजाऊंच्या बाल मनावर ठसत होत्या.
.लखुजीराजे यांच्या पदरी अत्यंत निष्ठावंत पंडित होते.त्यातूनच जिजाऊ त्यांच्यामधे ज्ञानाची, प्रकाशाची ज्योत तेवत राहीली.
लखुजीराजे जाधव मोहिमेवर जात असताना त्यांच्या अनुपस्थितीत सिंदखेडचा राज्यकारभार सर्व स्त्रियाच पहात होत्या. आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाल्यास त्यांच्या घरच्या स्त्रिया हाती शस्त्र घेऊन शत्रूशी निकराने सामना करत. प्रसंगी न्यायनिवाडा करण्याची जबाबदारीही स्रिया पार पाडत होत्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची जाधवरावांच्या स्त्रियांची नेहमीच तयारी असे. लखुजीराजे आपल्या स्त्रियांना समानतेचा दर्जा देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढवत होते. आणि त्या परिस्थितीचे योग्य ते संस्कार बाल जिजाऊ वर झाले होते.

जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. नाईक निंबाळकर घराणे मुळात सधन व प्रतिष्ठित होते. त्या संस्कारात म्हाळसाबाई यांचे बालपण गेल्यामुळे जिजाऊसाहेबांना चांगल्या प्रकारे संस्कार व युद्धकलेचे शिक्षण मिळून त्या पारंगत झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांचे बोलणे अतिशय प्रभावी असे. आपल्या प्रभावी बोलण्यामुळे त्या भल्याभल्यांना चकित करून सोडत. सर्वसामान्य मुलीप्रमाणे भातुकलीचा खेळ न खेळता त्या तलवारबाजी करून, घोड्यावरून रपेट करू लागत. जिजाऊंना कानडी ,उर्दू, फारशी ,हिंदी भाषेचे ज्ञान अवगत होते. भविष्यात उच्च विचार नीतिमूल्यांची जपणूक, मानवी समतेची दृष्टी लाभावी या हेतूने म्हाळसा राणीसाहेब त्यांच्यावर संस्कार करत होत्या.म्हाळसा राणीसाहेब जेवढे देत त्यापेक्षा अधिक जिजाऊ ग्रहण करत होत्या. ज्ञान मिळवण्याची प्रखर ईच्छा जिजाऊंना शांत बसू देत नव्हती. वाचन, मनन, चिंतन वाचलेल्या, ऐकलेल्या माहितीबद्दल जिजाऊ सतत विचार करत असत. जिजाऊंचे विचार सामान्य नव्हते तर ते भविष्य घडविणारे होते. परिस्थिती बदलणारे होते.

महाराष्ट्रातील ज्या अनेक घराण्यांनी इतिहास घडवला त्या सिंदखेडकर जाधवरावांच्या घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला होता. जाधव रावांचा वंश म्हणजे रत्नाची खान होती.जाधवरावांच्या घराण्यातील वीरप्रसू मातांच्या कुशीत एकामागे एक रणधुरंदर असे पराक्रमी पुरुष जन्माला आले होते .याच लखुजीराजे यांच्या पोटी जिजाऊंनी जन्म घेतला. जिजाऊंचा जन्म ही भारतीय इतिहासाला कलाटणी देणारी घटनाच म्हणावी लागेल.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment