महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,483

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

By Discover Maharashtra Views: 6351 9 Min Read

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग १२

लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊसाहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या .अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. केवळ आऊसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती. शिवबा ही स्वराज्यकार्यात स्वतःला झोकून देत होते. कुणासाठीही न थांबणारा काळ पुढे पुढे जात होता.अगदी परवा – परवा पर्यंत लहानगे वाटणारे शिवबा आता चांगलेच मोठे झाले होते.अहो, आता शिवबा चांगले 10 वर्षाचे झाले होते .आणि एकदम जिजाऊ ह्या राजकारण कुशल स्त्रीमधील आईने उचल खाल्ली.अहो,आता शिवबाचे लगीन नको का लावायला ? केवढे मोठे झाले आता.हेच वय असतेना लग्नाचे! या गोष्टी त्या वेळी केलेल्याच बर्या असतात.(छत्रपती शिवाजी महाराज सईबाई विवाह)

कर्नाटकात भोसलेकुलावतंस शहाजीराजांकडे खलिते रवाना झाले. खलीते वाचून शहाजीराजेही थक्क झाले .आपले शिवबा एवढे मोठे झाले हे त्यांना खरेच वाटेना. पण त्यावेळी राजे स्वाऱ्यांमध्ये अतिशय व्यस्त होते. त्यांनी राणीसाहेबांना कळविले, सूनबाई आपण आपल्या मर्जीने नेमस्त करणे.आम्हास इच्छा असूनही ह्या लढाईच्या कामांतून सध्या जराही फुरसत नाही .आमचा आपल्या निवडीवर पुरा विश्वास आहे.भोसले कुळाला साजेसे घराणे शोधणे. बाकी सर्व कार्य सिद्धीस नेण्यास श्रीशंभू समर्थ आहेत.
हा खलिता मिळताच शहाजीराजांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाने जिजाऊसाहेब तृप्त झाल्या.आता आऊसाहेबांनी त्या दृष्टीने वधू शोधमोहिम सुरू केली………

एके दिवशी फलटणचे मुधोजी नाईक निंबाळकर राज्यकारभारात काही सल्ला घेण्यासाठी अन आऊसाहेबांना भेटण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन लाल महालात आले होते. सारी मुले अंगणात खेळत होती . जिजाऊसाहेब कौतुकाने हा खेळ पाहत होत्या. आणि मनात विचार चालू झाले या साऱ्या मुलांमधली परकर- पोलके नेसलेली एक चुणचुणीत मुलगी आऊसाहेबांच्या मनात भरली. फार फार गोड मुलगी आहे ही.अतिशय सुंदर- नाजूक! देवघरातील लवलवती सोनसळी ज्योतच जशी! फार नामी दिसेल जोडा ! अन सुनेच्या निमित्ताने लेक घरात येईल .आम्हास तर खूप हौस लेकीची .आम्ही तिचे सारे काही करू.अगदी मोठ्या राजीखुशीने.

आऊसाहेबांनी घाई -घाईने मुधोजीरावांना खाजगीच्या महाली वर्दी पाठवली. नुकतेच आऊसाहेबांबरोबर सदर बैठकीवरून उठून मधोजी नाईक निंबाळकर विचार करीत विश्राम घेत होते .तोच आऊसाहेबांचे बोलावणे आले.अन तेही खाजगीच्या महालात! मुधोजीरावांना क्षणभर समजेना, काही उमजेचना ! पण ते तसेच उठले.आऊसाहेबांच्या महालाकडे निघाले. आऊसाहेबांच्या इशाऱ्यानुसार आसनस्थ झाले. आऊसाहेबांनी बोलायला सुरुवात केली.मुधोजीराजे,आजवर तुम्ही भोसल्यांची नेक सेवा बजावलीत पण त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही द्यायच्या ऐवजी तुमच्याकडूनच काही मागाव म्हणतो. द्याल ?नाईक निंबाळकर खरेतर ह्या गूढ बोलण्याने चांगलेच बुचकळ्यात पडले. पण तरीही घाईने म्हणाले,आऊसाहेब अहो,हे काय विचारणे झाले.? मंद हसत आऊसाहेब म्हणाल्या मुधोजीराजे पुन्हा एकदा विचार करा ,एकदा शब्द दिला तर मागे फिरवता येणार नाही. मुधोजीराजे म्हणाले नाईकनिंबाळकर यांचा शब्द आहे. आमच्या प्राणासकट आपणास जे हवे ते आम्ही दिले असे समजा.आऊसाहेब मोठ्या प्रेमाने म्हणाल्या ,मुधोजीराजे आपल्या शब्दांनीच आम्ही भरून पावलो.आता आम्हास बाकी काही नको.घृष्णेश्वराच्या कृपेने भोसल्यांना सारे काही उदंड मिळाले आहे .परंतु लेक मात्र मिळाली नाही. म्हणूनच तुमच्या घरातील सर्वात मौल्यवान ठेवा, तुमच्या सई आम्ही आमच्या शिवबासाठी वधू म्हणून मागतो आहोत. द्याल?
क्षणभर मुधोजीराजे यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.या सार्या कल्पनेनेच त्यांना भरून आले. शिवाजीराजांसारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून मिळायला साता जन्माच भाग्य लागत .

मुधोजीराजांच्या मनात हे सारे विचार घोड्यापेक्षा दुप्पट वेगाने दौड घेत होते. मुधोजीराजांनी प्रस्ताव एकदम मंजूर केला. राजे म्हणाले आमची सई मोठी भाग्यशाली म्हणून शिवाजीराजांसारखे पती, आपल्यासारख्या प्रेमळ सासूबाई, अन भोसल्यांसारखे तालेवार सासर मिळते आहे तर हा रिश्ता आपल्या मनासारखाच घडेल.
सईबाई या मुधोजीराजांच्या एकुलता एक कन्या होत्या .सईबाई नक्षत्रा सारख्या सुंदर होत्या . जिजामातेला वाटले जोडा छान शोभेल. बालवयात लग्न ही त्यावेळची सर्वसामान्य प्रथा होती. विवाह सोहळा थाटामाटात पुणे मुक्कामी लाल महालात संपन्न झाला . शिवरायांच्या पत्नीच्या नात्याने सईबाई यांनी भोसले घराण्यात प्रवेश केला . जिजाऊसाहेबांच्या मातोश्री म्हाळसा बाई आणि जिजाऊंसाहेबाच्या सासुबाई उमाबाईसाहेब या दोघीही फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातीलच.मुधोजी नाईक निंबाळकर म्हणजे “राव वणंगपाळ, बारा वजिरांचा काळ “अशी ख्याती असलेल्या वणंगपाळ ऊर्फ वणगोजी नाईक निंबाळकरांचे सुपुत्र ! शहाजी राजांच्या मातोश्री उमाबाईसाहेब या वणगोजी राजांच्या भगिनी म्हणजे जिजाऊसाहेबांच्या मातोश्री होत्या. म्हाळसाबाईंसाहेब ह्या वणगोजी राजांच्या आणि उमाबाई साहेबांच्या आत्या होत्या. एकंदरीतच जाधवराव व भोसले कुळात फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील मुली आल्या होत्या.

दोघांच्या पत्रिका तर अगदी उत्तम जुळत होत्या सारे ग्रह शुभ स्थानी होते .सईबाई सोन्याच्या पावलांनी चालत येणार होत्या हा विवाह व्हावा हे साक्षात परमेश्वरानेच ठरवले होते.
या विवाहाचे वर्णन तत्कालीन कवी परमानंदाने “शिवभारत ” या ग्रंथात असे केले आहे की,सईबाई यांना नुकतेच नवयौवन प्राप्त झाले आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजीमहाराजांना सती, शीलवती , रमणीय , रुपवती व अत्यंत गुण शालिनी अशी नाईक निंबाळकर घराण्यातील भार्या प्राप्त झाली. तसेच रुक्मिणी प्राप्त झाल्याने श्रीकृष्णास जसा आनंद झाला ,तसा शिवाजी महाराजांना झाला.

“शिवभारत” या ग्रंथातील लग्नाच्या वर्णनाप्रमाणे , ‘कलाबूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते . फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करत होते .कारण शहाजीराजांनी लग्न प्रसंगी मोकळेपणाने खर्च करण्याची आज्ञा दिली होती. नवी जहागिर वसत होती . म्हणून त्या निमित्ताने सारे एकत्र लग्नाला गोळा करून प्रत्येकाच्या मनातला जिव्हाळा वाढवून, जहागिरीचा पाया मजबूत करण्याचा जिजाऊंचा विचार होता. लग्नाची तयारी मोठ्या प्रमाणावर चालली होती. मासाहेब यांच्या नजरेखाली सुबक दागिने घडत होते. हिरे, माणके ,मोती, रत्न यांची खैरात चालली होती. असलेला वेळ कमी पडत होता. महाल सुबक रंगाने रंगवले जात होते. स्वयंपाक घर मांडवात हलवले गेले. नाना तर्हेचे फराळाचे सामान तयार होते. राहुट्या उभारल्या जात होत्या ,मांडवाचे कापड , कमानी ,पडदे , आडपडदे याबरोबरच हंड्या – झुंबरानी काचघर भरले जात होते. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाईसाहेब येऊन दाखल झाल्या होत्या. लाल महालाला वेगळेपण प्राप्त झाले होते.जिजाऊंचा भार एकदम कमी झाला होता.

या लग्नाला शहाजीराजांनी यावे अशी जिजाऊंची खूप इच्छा होती परंतु आदिलशाहाने शहाजीराजांची दक्षिणेवर रणदुल्लाखाना बरोबर रवानगी केली त्यामुळे शहाजीराजे शिवाजीमहाराजांच्या लग्नाला येऊ शकले नाहीत. परंतु शहाजीराजांनी अनेक मौल्यवान दागदागिने पाठवले होते. अगदी नजीकच्या विवाहमुहूर्त काढण्याचे सुचवले होते. फलटणकर नाईक-निंबाळकर यांना शहाजीराजांनी खलिता पाठवला आणि होऊ घातलेल्या सोयर्यांचे अभिनंदन केले होते.
लग्नात शिवबा आणि सईबाई लक्ष्मी नारायणासारखे शोभत होते. सईबाई म्हणजे मूर्तिमंत राजलक्ष्मी! दुसरी उपमाच नाही .अवघ्या स्वराज्याचा तारणहार ! निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधारु ,यशवंत, कीर्तिवंत ,सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत ,नीतीवंत ,सह्याद्रीचा सिंह, जाणताराजा पती म्हणून लाभल्यामुळे सईबाईसाहेबांनी मोठ्या आनंदाने मनात काही आडाखे बांधून मोठ्या निश्‍चयाने भोसले यांच्या घरात प्रवेश केला होता.

शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शना कडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते .सईबाईराणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी ,सचिव ,सखी व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांचे स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले होते. दहा वर्षाचे राजे तर सात वर्षाच्या सईबाई राणीसाहेब होत्या. सईबाई राणीसाहेब या आपले दु:ख गिळून दुसर्यांच्या सुखात विरघळणार्या राणी होत्या.त्या अत्यंत शांत ,सोशिक व सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात, जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या.

त्यांनी शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्या विषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊमाँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच त्या आपले सुख मानत होत्या.फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणतात “शिवाजी महाराज राम असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील, जर शिवाजी महाराज विष्णू असतील तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील, जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील इतके घट्ट प्रेम या दोघांचे होते.”
छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई साहेब यांच्या विवाहाने राजमाता जिजाऊसाहेब कृत कृत्य झाल्या.

लेखन – डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर ,पुणे ( इतिहास अभ्यासक)

Leave a comment