महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,020

रायगडचे पारतंत्र्य

By Discover Maharashtra Views: 3615 9 Min Read

रायगड पडला… रायगड पडला… रायगड पडला…

११ मे १८१८ मुंबईत सर्वत्र बातमी पसरली. सकाळीच इंग्रजी अधिकाऱ्यांकडून तशी अधिकृत खबर आली. मन अस्वस्थ होऊ लागले, मनात विविध प्रश्नांचे झरे ओसंडून वाहू लागले. स्वराज्याची राजधानी अशी कशी पडू शकते? नक्की काय झालं? कधी झालं? अशा अनेक प्रश्नांनी मन अधिकाधिक बेचैन होऊ लागले. म्हंटल जाऊन बघूच नक्की आपल्या रायगडला काय झालं? म्हणून त्याच रात्री रायगडसाठी मुंबईहून प्रस्थान केले.

१२ मे १८१८ सकाळी गडाच्यापायथ्याला येऊन पोहोचलो. चित्त दरवाजा जवळ सर्वत्र तोडफोड आणि जाळपोळ झालेली दिसत होती. दरवाजाचे अवशेष आणि बुरुजांच्या चिरा अगदी ढासळून इतरत्र विखुरले गेले होते. ३-४ ब्रिटीश अधिकारी चित्त दरवाजाजवळ एका बाजुस उभे होते. धनगराच्या वेशात तिथं अगदी कोपऱ्यात उभी असलेली लोक आपापसांत काहीतरी कुजबुजत होती. ती काय बोलत आहेत ते ऐकण्यासाठी मी त्यांच्या मागे गेलो आणि कोणाच्या नजरेस पडणार नाही याची दक्षता घेऊन एका कोपऱ्यात उभा राहिलो.

पहिला – “२-३ दिस झालं आगीचं गोळं किल्यावर सारखं पडत व्हुत. त्यी गोरी लोकं बी गडावर गेली व्हुती! लई नुकसान केलंय गडाचं, अगदी पार समशान करून टाकल्यानी.”

दुसरा – “व्हयं, अन आता तर कुणाला बी वर जाऊ देईना लोक.”

मी जवळच उभा राहून त्यांचे हे भाषण ऐकत होतो. तितक्यात खाली असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोठ्याने आवाज देऊन त्या दोघांना तिथून पिटाळून लावले. मी लगेच सावध होऊन त्या सर्वांची नजर चुकवत कसाबसा चित्त दरवाजा चढण्यास सुरुवात केली. पुढे काही सावधगिरीची फार गरज नव्हती कारण मला समजले होते कि वर कुणीच नाही. चिंता होती ती फक्त चित्त दरवाजा ओलांडायची अन तो मी कसाबसा गोऱ्या अधिकाऱ्यांची नजर चुकवत ओलांडला. दरवाजाची अवस्था फार वाईट करून टाकली होती. भिंती, पायऱ्या, चिरा अगदी जमीनदोस्त केल्या होत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी.

चित्त दरवाजा थोडा वर चालून आल्यावर मी खुबलढा बुरुजापाशी येऊन थांबलो. मावळ्यांनी पहिला मोर्चा इथेच लावला होता असे कळाले. तोफा आणि गोळे बुरुजावर विखुरले होते. अगदी शेवट्पर्यंत आपले मावळे रायगडसाठी लढत होते याचाच तो पुरावा. इंग्रजांच्या तोफा आणि बंदुकांचे मारे सर्वात जास्त झेलले असतील तर या बुरुजाने. अजूनही तो तटस्थ उभा होता मारा अंगावर घेण्यासाठी आणि आपल्या राजाचा गड राखण्यासाठी. बुरुजाची अशी अवस्था बघून मन दुःखी होत होते. तिथे फार वेळ न घालवता तसाच मी पुढे चालत राहिलो.

बराच वेळ पुढे चालत गेल्यावर मी महादरवाजवळ येऊन पोहोचलो. दरवाजा फार काही चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हता. अर्धवट मोडकळीस आलेला. परंतु दरवाजाची गोमुखी मांडणी तशीच होती, बुरुज देखील चांगल्या स्थितीत होते. दरवाजासमोर काढलेली सुबक अशी रांगोळी काहीशी विस्कटली होती. रांगोळीतले रंग त्यादिवशी रंगहीन झाले होते. दरवाजावरील फुलांच्या माळा ह्या तशाच होत्या. बहुतेक किल्लेदाराने ते दोन दिवसापूर्वीच लावल्या असाव्यात परंतु त्या माळांतील फुल हिरमुसली होती. बेरंगी झाली होती. होणारच ती, रायगडची पार दशा करून सोडली होती टोपीकर इंग्रजांनी. प्रथम दरवाजाच्या उंबरठ्यावर नतमस्तक झालो आणि आत गेलो, तशीच एक मंद वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. त्या हवेमध्ये सुद्धा एक वेगळाच स्पर्श जाणवला, तो स्पर्श होता पारतंत्र्याचा. बाजूला दोन देवड्या होत्या. द्वार रक्षकांच्या काही वस्तू तिथेच होत्या. जेवणाची भांडी तशीच पडली होती. ताटातील भाकरी ती सुद्धा अर्धवट खाल्लेली. बाजूलाच एक पाण्याने भरलेलं मडकं होत ते सुद्धा फुटलेलं. मावळे देखील तहान भूक विसरून रायगड लढवण्याचा प्रयत्नात होते. त्या २-३ दिवसांत कोणालाच अन्न गोड लागलं नसेल.

महादरवाजा ओलांडला अन पुढे चालू लागलो. अधी मधी कुठे थांबायचं नाही असं ठरवलं, कारण संपूर्ण लक्ष होत ते मुख्य बालेकिल्ल्यावर. म्हणून चालण्याचा वेग वाढवून मी हत्ती तलाव पार केला आणि मग सरळ होळीच्या माळावर येऊन थांबलो. तिथे जे काही पाहिलं ती सर्व दृश्य मनाचा थरकाप उडवणारी होती. सर्वत्र आगीचे लोळ पसरले होते. वाडे, बाजारपेठा जळत होत्या. गडावर एक चित पाखरू देखील उडत नव्हते. सर्व झाडे झुडुपे जाळून गेले होते. पुढे गेलो, आई शिर्काईच्या मंदिराजवळ काही वेळ जाऊन बसलो. मंदिराचे बरेच नुकसान झाले होते. समई गाभाऱ्यात पडली होती. तेलाचे एक एक थेंब त्या समईतून गळत होते. मंदिरातील फुलांच्या माळा सुद्धा जळून गेल्या होत्या. ती प्रत्येक दृश्ये मनाला वेदना देत होती. मग आईच्या मंदिरातील जळलेली फुले आणि काही वस्त्रे साफ करून तिथे एक दिवा पेटवला.

शिर्काईचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. पाऊले आपसुकच नगारखान्याच्या दिशेने जाऊ लागली. परंतु मन हे देखील तितकेच भयभीत होत होते. कोणताही विचार न करता मी पुढे चालू लागलो आणि थेट नगारखान्याच्या समोर उभा राहिलो. समोरील दृश्य पाहून डोळ्यातील आसवांचा बांध फुटू लागला. समोर राजांच सिंहासन जळत होत. सिंहासनावरील सुशोभित असे लाकडी खांब जळत होते. नगारखान्याच्या आत प्रवेश केला. संपूर्ण सदर जळून राख झाली होती. दफ्तरातील व्यवहाराची पत्रे अर्धवट जळलेल्या अवस्थेत इथे तिथे वाऱ्याच्या सानिध्यात फिरत होती. तोफेच्या गोळ्यांचे तुकडे देखील इतरत्र पसरली होती. तेव्हाच अचानक एक अर्धे जळलेले पत्र माझ्या जवळ आले, ते उचलले त्यातील मजकूर नीट दिसत नव्हता परंतु गडावरील नोंदी, पहारे, मावळ्यांचे वार्षिक वेतन असा पुसट उल्लेख होता. चालत चालत मी सिंहासनासमोर येऊन थांबलो. राजाभिषेकावेळी बसवण्यात आलेले हे सिंहासन आज माझ्या डोळ्यादेखत जळत होतेआणि मी हतबल होतो. वाटलं नव्हत या सिंहासनाची अशी दुरवस्था होईल. प्रथम हे सुवर्ण सिंहासन झुल्फिकारखान याने उध्वस्त केले त्यानंतर पेशव्यांनी त्याची खूप देखभाल केली आणि आता तेच इंग्रजांनी पुन्हा उध्वस्त केले.

नगारखान्यातून बाहेर पडलो तोच बाजारपेठेत आलो. बाजारपेठेची सर्वत्र दुरावस्था झालेली पाहून खूप वाईट वाटले. जळलेली घरे, वाडे, सर्वच अगदी भयावह वाटत होते. बाजारपेठेची पाहणी करता करता पुढे निघालो. मंदिरासमोर येऊन थांबलो तिथे काहीतरी कुजबुजल्यासारखा आवाज येत होता. मी मंदिराच्या मागे जाऊन पाहिले तर तिथे दोन माणसे लपून बसलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत होती. कपडे फाटलेले होते. मला पाहून ते अजून घाबरले आणि तिथून पळून जाऊ लागले. मग मी आवाज दिला आणि त्यांना थांबायला सांगितले. त्यांना विचारले हा काय प्रकार आहे. कसे झाले हे सर्व? त्या माणसांच्या चेहऱ्यावर रडू कोसळले आणि ते रडत रडत सांगू लागले.

त्यातील एक म्हणाला- “आमी समदी धनगर लोक इथंच गडाच्या खळग्यांत झोपुड बांधुन रायचो. त्या दिशीं पोटल्याच्याडोंगरावरून आवाज आला – आवाज पण लई मोठा व्हुता. धम्मsss आम्हासनी आदी वाटला कि इज कोसाळली.. पण तसा नाई झाला.. पुन्यांदा आवाज झाला तवा बाहीर बघितला आणि पाईला तवा आगीचा गोळा गडावर येत व्हुता. एक न्हाई… दोन न्हाई… पुसकल गोळं गडावर पडली. तवा आम्ही समदी हादरली. असं कदी झाल न्हवुता. पोटल्याचा डोंगूर कधी बाटला न्हवुता. तित टोपकर पोचलं नि गडावर आग बरसाया लागलं. आमी इतकी दिस गडाच्या आसऱ्यात व्हुतो अन आता त्याच्याच अंगावर आगीचं गोळ बरसाय लागलं तर आमी जावं तरी कुटं? एकुदा गोळा यायचा आणि खळग्यात फुटायचा.. समदं निखारं झोपड्यांत जायचं. घर जाळायली.. पोरा, म्हातारी घाबरून गेली. कुटं जायचं म्हणून रडाय लागली. तशी समदी धनगर हिमतीची व्हुती. कुणी कड्यात लपलं, कुणी गुयेत. किलयेदारानं अन मराठानी गड सोडला. टोपकरान संबंद्याना खाली उतरवला. आमी वाघ दरवाजानी चडलीव आणि वर आलु. आता इतच राहणार. संबंद्याना बोलून घेणार इथं”

त्यांचे दुःख मला त्यांच्या बोलण्यातून जाणवू लागले होते. होणारच कि, इतके वर्ष हि लोक गडाच्या कुशीत वस्ती करून राहत होते. गडालाच त्यांनी आपले माय बाप मानले होते. मग असा अचानक हल्ला झाल्यावर हि लोक सुद्धा दुःखी झालीच. मी पुढे काही विचारणार इतक्यातच ती लोक घाई गडबडीने तिथून निघून गेली. मी मंदिरात गेलो. मंदिर तसे सुस्थितीत होते. जास्त हानी झालेली दिसत नव्हती. मग पुन्हा तिथून मी राजसदरेजवळ गेलो. जळत्या सिंहासनासमोर मी बसलो. दुःखी झालेले मन स्वतःशीच बोलू लागले. काय दशा केली माझ्या रायगडाची. कोण म्हणेल हि स्वराज्याची राजधानी होती. टोपीकरांनी सर्वच उध्वस्त करून टाकले. हे तेच तक्त जिथं राजांचा अभिषेक झाला होता. ” राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट…” हा तोच गड, श्रीमान रायगड. स्वराज्याचे तक्त व्हावे ते रायगडीच अशी महाराजांची इच्छा होती आणि ते महाराजांनी साकार करून दाखवले.

इंग्रजांनी रायगड पाडला खरा परंतु तो जमीनदोस्त करू शकले नाही. आजही रायगडच्या चिरा, कडे, बुरूज, तटबंदी खंबीरपणे आपल्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. कालही रायगड इतिहासात ज्वलंत होता, आजही आहे आणि येणाऱ्या कित्येक पिढयांना तो आपल्या पराक्रमाची कथा सांगण्यास खंबीरपणे उभा राहणार आहे.

लेखनसीमा, माहिती साभार – मयुर खोपेकर

Leave a comment