महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,381,119

राजगडानं पाहिलेले माझं राजं

By Discover Maharashtra Views: 4523 10 Min Read

राजगडानं पाहिलेले माझं राजं

राजगडा….. स्वतः महाराज तुझ्या सहवासात जवळ जवळ २३-२४ वर्षे राहिलेत. सुखाची घागरच जणू तुझ्या पदरात पडावी असे काही ते सारे क्षण असावेत. स्वराज्याच्या राजधानीचा पहिला मान तुला राजांनी दिला. काय अभिमान वाटला असेल तुला. स्वराज्याचे सर्व कारभार, स्वराज्याची वाटचाल आणि महत्त्वाच्या मोहिमेचे मनसुबे  देखील तुझ्याच साक्षीत तर झाले. अख्या पंचक्रोशीत तुझ्याच नावाचा डंका वाजला गेला असेल. शेवटी राजधानी तू. तुझ्या त्या रांगड्या आणि बेलाग कड्यांना पाहून शत्रू देखील भयभीत झाला असेल . तुझे ते राकट रूप आजही भयभीत करते. याउलट तुझ्या जोडीला असलेल्या संजीवनी आणि सुवेळा या आजही मला आकर्षित करतात. खरं सांगायचं झालं तर माझं जणू काही प्रेमच आहे या माच्यांवर. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहावा तो फक्त आणि फक्त तुझ्या या माच्यांच्या सानिध्यात. जे काही परमसुख बोलले जाते ते हेच तर नसावे? मी बऱ्याचदा अनुभवलंय.

तुला हि आठवतंय अगदी वयाच्या १३-१४ वर्षी महाराजांनी सैन्य उभारणी सुरु केली ती सुद्धा तू पाहिलेच असशील. अरे, खेळण्याचे वय ते. या अशा लहान वयात महत्त्वाची कामगिरी करणारे राजे हे अखंड पृथ्वीवर एकमेव असावेत. तसे या जगात बहुतांश राजे होऊन गेले पण आपल्या राजांची बातच निराळी. हे मी काही प्रेमापोटी म्हणत नाही. जो पराक्रम राजांनी केलाय तो वाचून आहे मी अन त्याच्याच आधारावर मी हे विधान केले आहे. कधी कधी वाटते कि इतर किल्ले तुझ्यावर जळत असावेत नाही म्हणजे महाराजांचा सहवास तुला अधिकच लाभला. असो गमतीचा विषय. पण सर्वच किल्ल्यांवर महाराजांनी जीवापाड प्रेम केलंय. राजांवर देखील तू जीवापाड प्रेम केलंस. अगदी पोटच्या पोराप्रमाणे संभाळ केलास. इतिहासातही महत्वाच्या आणि सुवर्णाक्षरात कोरलेल्या त्या प्रत्येक घटनेचा तू साक्षीदार ठरला याहून दुसरे सुख ते काय. स्वराज्याला विरोध करणारे ते जावळीकर मोरे, त्यांचा पराभव करून आल्यावर तुला किती आनंद झाला असावा. स्वराज्यावर चालून येणाऱ्या त्या गनिमांना कसा धडा शिकवायचा याची सरदार आणि मावळ्यांसोबत केलेली आखणी खरंच कौतुकास्पद असावी, नाही का?

राजगडा, सांग ना रे कसा होता माझा राजा? लहानपणापासून तू पाहत आला आहेस. एक प्रसंग आला होता बघ, तो अगदी महाराजांच्या जीवावर ओढणारा होता आणि हा प्रसंग जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला गेला. गडावर बातमी आली अफझल खानाने भेटायला बोलावले म्हणून. बातमी ऐकून तू देखील थोडाफार घाबरला असशील. पण मनातून खंबीर होतास कि हि मोहीम सुद्धा महाराज नक्कीच यशस्वी करून येतील. भेटीचा दिवस ठरला. गडावर आईभवानीची पूजा करून आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन महाराज खानाला भेटायला निघाले. जाताना नक्कीच तुला एक निरोप देऊन गेले असतील कि आज जर माझे काही बरे वाईट झाले तर माझ्या स्वराज्याची आणि मावळ्यांची काळजी घे. त्यांच्या या वाक्यावर तुला रडू कोसळलं असणारच. तू पाहिलास महाराजांना अफजलच्या भेटीला जाताना. महाराज गडउतार झाल्यापासून आऊसाहेब आणि राणीवसा काळजीने व्याकुळ झाले असतील. आऊसाहेबांची नजर सदैव गडाच्या पायथ्याशी असेल. आता माझं लेकरू येईल. आता मी त्याला मिठीत घेईन या आशेने आऊसाहेब तर वारंवार तुझ्या तटा-बुरुजांवर फेऱ्या मारत असतील. शेवटी माय रं ती. मायलेकाची ती माया पाहून तुलाही अश्रू फुटले असतील. तुलाही वाटलं असेल आऊसाहेबांना थोडा धीर द्यावा आणि सांगावे कि माझा राजा सुखरूप येईल. पण तुलाही ते जमले नसावे, ध्यानी मनी महाराजांचे ते बोल आठवत असावेत. अखेर तोफेचा आवाज आला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. अफझलच मुंडक छाटलं आणि ते जेव्हा तुझ्या दरबारी आणलं गेलं तेव्हा तुझ्या डोळ्यातील आनंदापुढे जणू काही हे आकाशच ठेंगणे झाले असावे.

सांग ना रे कसा होता माझा राजा? माझ्या राजाच्या आयुष्यात सुख तर कमीच याउलट धावपळ, मोहीमा, घोड्यावर बसून रपेट मारणे, लढाई यातच राजाने आपले आयुष्य खर्ची केले. मला अजून एक प्रसंग आठवतोय, तो म्हणजे महाराजांनी औरंगजेबला आग्रा येथे दिलेली भेट. खरंतर सर्वांनीच महाराजांच्या या धाडसी निर्णयाला नकार दिला होता. अगदी तू सुद्धा. तुला माहित असेलच औरंगजेब आणि त्याची कूटनीती. सर्वांच्या काळजाचा ठोका तेव्हा चुकला जेव्हा महाराज म्हणाले शंभू राजे सुद्धा आमच्या सोबत येणार आहेत. त्यांच्या या विधानावर आऊसाहेब नक्कीच रागावल्या असतील. अहो, आऊसाहेबच काय सर्व राणीवसा यांनी सुद्धा महाराजांना थोडा दम भरला असेल. परंतु महाराज ते, भविष्यात डोकावून पाहणे हे तर त्यांना उत्तम जमते. महाराजांनी आऊसाहेबांना शब्द दिला कि, आम्ही शंभूराजांची पूर्ण काळजी घेऊ. महाराज गडउतार झाले त्याच क्षणापासून तुझी धड-धड वाढू लागली असेल. डोळ्यातील आसवे लपवत मनोमनी म्हणाला असशील “राजं लवकर या.”

महिने उलटली. अधून मधून सुख-दुःखाच्या वार्ता महाली येत होत्या. तुझे कान त्या खबऱ्यांकडे असायचेच. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी काही गोसावी आऊसाहेबांना भेटायला आले . परंतु महाराजांची काहीच खबर अद्याप आली नव्हती. आऊसाहेब महाराजांच्या चिंतेत व्याकुळ असताना गोसावी बाबाना तू आऊसाहेबांच्या महाली जाताना पाहिलेस आणि क्षणभर मनी आनंद दाटला असेल. साहजिकच आहे, ज्या राजाला तू लहानपणापासून पाहत आला होतास त्या राजाला कोणत्याही रूपात तू अगदी सहज ओळखत असणार. गडावर आनंद साजरा झाला. ढोल नगारे वाजले. अगदी गावोगावी साखऱ्या वाटल्या गेल्या. सर्व सुखावली. परंतु शंभू राजे अद्यापही गडावर आले नव्हते. त्यांची काळजी मात्र सर्वाना होती. हो पण त्यांचे गुपित हे फक्त आऊसाहेब, तुला आणि काही मात्तबर मंडळींनाच ठाऊक होते.

बघता बघता स्वराज्याच्या सीमा वाढू लागल्या. सीमे सोबतच घोडदळ, पायदळ वाढू लागले. स्वराज्याच्या विस्ताराला नवनवीन माणसे मिळू लागली. स्वराज्याचा कारभार आता तुझ्यादेखत वाढत चालला होता. जागेची कमी पडू लागली. वाढत्या स्वराज्याच्या यशस्वी कामगिरीच्या बातम्या आता शत्रूंच्या महाली पोहोचू लागल्या. राजधानी सुरक्षित ठिकाणी हलवावी लागेल अशा चर्चा तुझ्या कानी येऊ लागल्या. तुझ्या मनात काय विचार आले असतील ते तुलाच ठाऊक. साहजिकच तुला वाईट वाटलेच. तुझ्यासोबतच तिन्ही माच्या देखील रडल्या असाव्यात. राजा आपल्याला सोडून जाणार या एका चिंतेने तू हिरमुसला. परंतु स्वराज्याच्या हितासाठी तू राजाला मनमोकळेपणाने जाऊ दिले. कारण तुझा राजा फक्त गड सोडून जाणार, तुला नाही हे ठाऊक होते. तुझ्याबद्दलचे प्रेम त्यावेळीही राजांच्या मनात होतेच. राजधानी रायगडी हलवण्याचे आदेश निघाले. तू राजांना यापुढेही पाहणार कारण तुझ्या समोरच नवीन राजधानी तयार होत होती. रायरीच्या डोंगरावर महाल, वाडे, कचेरी, बाजारपेठ बनताना तू पाहत होतास. राजेशाही मंडळी राजगड सोडून रायगडी आल्या. जाताना मात्र सर्वांचे पदस्पर्श तुझ्या महादरवाजाला लाभले. अगदी राजांपासून ते आऊसाहेब आणि राणीवसा… किती रे भाग्यवान तू. काळजावर दगड ठेऊन आणि डोळ्यातील आसवे लपवत सर्वांना आनंदात गडावरून सोडले. पण जाताना तू रायगडाकडे एक शब्द मागितल्यास तो म्हणजे “जसे मी माझ्या राजाचे संगोपन केले. जीवापाड प्रेम केले अगदी तसेच तू सुद्धा करायचे” आणि हसत समोरून रायगड म्हणाला असेल “तू जसा राजास सांभाळले , तसेच मी सुद्धा जीवापाड सांभाळेल.” त्याच्या या बोलण्यामुळेच तुला धीर आला असेल. तुझी चिंता देखील मिटली असावी.

वर्ष लोटली. तू सुद्धा न चुकता सकाळी राजांच दर्शन घेत असणार. एके दिवशी रायगडावर कसली तर लगभग होताना तुला दिसली. तोरणे, फुलांच्या माळा, पडदे अन बरेच काही. तेवढ्यातच तुझ्या कानी एक बातमी आली. आपले राजे आता छत्रपती होणार आहेत. तुझी छाती अभिमानाने किती फुलली असणार. आपल्या राजांनी आता तक्तावर बसावे हि तुझी इच्छा असणारच. राजांना कित्येक वर्ष मेहनत करताना तू पाहिलेस. अखेर तो दिवस आला. रायगडावरून वाजलेले ते नगारे तुझ्या कानी नक्कीच पडले असतील. अरे काय तो क्षण आणि काय तो सोहळा. देश विदेशात या सोहळ्याच्या चर्चा रंगल्या गेल्या. स्वराज्याला जणू काही नवीन सूर्यच मिळाला. रायरेश्वराच्या डोंगरात घेतलेल्या त्या शपथीचे त्या दिवशी सत्यात रूपांतर झाले आणि महाराष्ट्र सुखावला. आपल्याला वाली मिळाला या आशेने सर्व जनतेने राजांना भरपूर प्रेम आणि आशीर्वाद दिले. राजाभिषेकदिनी जेव्हा महाराज श्रीजगदीश्वर भेटीला गेले तेव्हा समोर तुला पाहून नक्कीच भावुक झाले असतील आणि तुम्हा दोघांच्या आसवांचा बांध तिथेच फुटला असावा. तू राजांना मुजरा केला राजांनी दुरवरूनच तुला आलिंगन दिले. खरं सांगू का राम – भरत भेटीपेक्षा हा प्रसंग खूप भावनिक होता.

खूप दिवस झाले रायगडावरून माझ्या राजाची काही खबर येत नाही या चिंतेने तू व्याकुळ झालास. नेहमीप्रमाणे जगदीश्वर भेटीला येणारे महाराज गेली कित्येक दिवस का येत नाहीत. क्षणभर मनात विचार आला असेल कि खरंच राजे आपल्याला विसरले कि काय. नवीन राजधानीत रमून तर नाही ना गेले. काय झालं असेल माझ्या राजाला. कोणीतरी सांगा मला. कुठं हाय माझा राजा? …. आणि….. त्या चैत्र शुद्ध १५ हनुमान जयंती दिनी जगदीश्वराच्या बाजूलाच एक चिता तुला पेटताना दिसली. क्षणभर काळजाचा ठोका चुकला. नको नको त्या विचारांचे वादळच तुझ्या मनी उठले असावे . कोणाची ती चिता? जिवाच्या आकांताने तू रायगडाला विचारतोय पण समोरून काहीच प्रतिउत्तर येत नाही. तुझ्या मनाची ती अवस्था पाहून शेवटी रायगड म्हणालाच – “राजगडा आपलं राजं गेल आपल्याला सोडून, संबंद्या स्वराज्याला पोरकं करून राजं गेलं.” हि बातमी ऐकताच बेलाग म्हणूंन गौरविलेल्या राजगडा, तुझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुझ्यासोबतच तुझ्या तिन्ही माच्या देखील रडल्या असतील. चितामधून उठणाऱ्या प्रत्येक ज्वाला तुला राजांसोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणांची आठवण करून देत असावीत. ती जळती चिता पाहून तुलाही आता कशामध्ये रस वाटत नसावा. राजाला छत्रपती होताना मनभरून पाहिलेस पण आता राजाच असं दर्शन न घडावे म्हणून तू सुद्धा त्याच्या सोबतच ह्या सह्याद्रीत आपला प्राण सोडला असावा आणि चिरनिद्रा घेतलीस.

लेखनसीमा, माहिती साभार – मयुर खोपेकर

Leave a comment