महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पुरंदर | Purandar Fort

By Discover Maharashtra Views: 4164 16 Min Read

पुरंदर | Purandar Fort

शिवकाळात स्वराज्य उभारणी करण्यात गडकोटांचा सहभाग अतीशय महत्वाचा आहे. यात प्रत्येक गडाने काही ना काही भुमिका निभावलेली आहे. रायगड,राजगड,तोरणा,लोहगड यांच्या रांगेत महत्वाचा असलेला अजुन एक गड म्हणजे किल्ले पुरंदर(Purandar Fort). मुरारबाजीच्या पराक्रमाने पावन झालेला व पुरंदरच्या तहाने इतिहास प्रसिद्ध असलेला किल्ले पुरंदर. पुरंदर किल्ल्याची महतीच अशी आहे कि किल्ला असलेला हा तालुका आज किल्ल्याच्या नावाने ओळखला जातो. याचे तालुक्याचे ठिकाण मात्र सासवड आहे.

सध्या पुरंदर व त्या शेजारील वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात असुन सुरक्षेच्या कारणास्तव फक्त पुरंदर किल्ला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळातच पहाता येतो. वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पुरंदर किल्ला पहाण्यासाठी परवानगी असली तरी गडावरील खंदकडा, केदार दरवाजा आणि बावची माची हि ठिकाणे सुरक्षेच्या कारणास्तव तारांचे कुंपण घालुन बंद करण्यात आली आहेत. तसेच भैरवखिंड आणि वज्रगड परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. बालेकिल्ल्यावर छायाचित्र घेण्यास पुर्णपणे बंदी असुन तेथे मोबाइल/कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे. आपण सैन्यदलाच्या परीसरात आहोत हे ध्यानात ठेऊन नियमांचे काटेकोर पालन करावे.

नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन गावातुन गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. गावातुन किल्ल्याच्या दरवाजात येणाऱ्या पायवाटा दरवाजाला तारेचे कुंपण घातल्याने उपयोगाच्या नाहीत. त्यामुळे चालत आल्यास गाडीरस्त्याने नव्याने बांधलेल्या मुरारगेट पर्यंत चालत यावे लागते. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पुण्याहुन पुरंदर किल्ला ४५ कि.मी.अंतरावर असुन खाजगी वहानाने थेट पुरंदर किल्ल्याच्या माचीवर जाता येते. अन्यथा पुणे ते नारायणपूर अशी बससेवा असुन नारायणपूर गावातुन गाडीरस्त्याने चालत माचीवर येण्यास दीड तास लागतो. मुरारगेट वर आपली व गाडीची तपासणी करूनच गडावर प्रवेश दिला जातो. पुण्याहुन किल्ला केवळ तासाभराच्या अंतरावर असल्याने व गाडी थेट गडावर येत असल्याने सुट्टीच्या दिवशी गडावर पर्यटकांची चांगलीच वर्दळ असते. गडावर पिण्याच्या पाण्याची चांगली सोय असुन जेवणासाठी उपहारगृह आहे.

पुरंदर किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडले आहेत. किल्ल्याची माची पुरंदर, महांकाळ व बावची अशी तीन भागात विभागलेली असुन बालेकिल्ला खांदकडा, राजगादी व केदारेश्वर अशा तीन भागात आहे. यातील केवळ पुरंदर माचीवर प्रवेश असुन दक्षिणेकडील महांकाळ व बावची या दोन्ही माचीवर प्रवेशबंदी आहे. मुरारगेटने किल्ल्याच्या पुरंदर माचीवर प्रवेश केल्यावर समोरच डोंगराच्या टोकाशी असलेला चिलखती बुरुज म्हणजे शेंदऱ्या बुरुज. येथुनच आपली गडफेरी सुरु होते. रस्त्याने सरळ जाताना वाटेच्या उजवीकडे पद्मावती तलाव असुन त्यापुढे गेल्यावर उजवीकडे इंग्रजांच्या काळात बांधलेले चर्च पहायला मिळते. त्यापुढे रस्त्याच्या डाव्या बाजुस माचीची तटबंदी असुन त्यात गोलाकार आकाराचा बुरुज आहे. रस्त्याच्या पुढील चौकात मुरारबाजी देशपांडे यांचा दोन्ही हातात तरवार घेतलेला आवेशपुर्ण पुतळा असुन त्यामागे त्यांचे समाधी मंदिर आहे. रस्त्याने थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूस म्हणजे दरीकाठाच्या दिशेने किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करणारा उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस तारांचे कुंपण घालुन येथुन गडावर होणारा प्रवेश बंद करण्यात आला आहे.

बुरुजाच्या आधारे बांधलेल्या या दरवाजाच्या आत पहारेकऱ्याची देवडी असुन आतील तटबंदीत एक लहान देवळी आहे. दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. हा दरवाजा सर दरवाजा किंवा बिनी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजा पाहून पुढे गेल्यावर वाटेच्या डावीकडे दुसरे चर्च पहायला मिळते. चर्चकडून सरळ रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते. मंदिर पाहुन थोडे पुढे गेल्यावर रस्त्याला लागुन उजव्या बाजुस चौकोनी आकाराची एक बंदिस्त दिसते. हि विहीर मसणी विहीर म्हणुन ओळखली जाते. पुढे आल्यावर रस्त्याच्या उजवीकडून एक पक्की पायवाट आपण आलो त्या दिशेला म्हणजे मागे जाताना दिसते. या वाटेने गेल्यावर आपण पुरंदरेश्वर मंदिराजवळ पोहोचतो.

मंदिराभोवती प्राकाराची भिंत असुन दगडी बांधकामातील या मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग पडले आहेत. मंदिराबाहेर नंदिमंडप असुन आत शिवलिंग व दीड फुट उंच इंद्राची मुर्ती आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख येतात. मंदिराच्या मागील बाजुस पेशवे घराण्याचे खाजगी रामेश्वर मंदिर आहे. मंदिराजवळ असलेल्या उपहारगृहात आपली चहा नाश्त्याची चांगली सोय होते. या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी बांधलेल्या दुमजली वाडय़ांचे अवशेष दिसतात. या वाडयातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडयाच्या मागील बाजुस एक विहीर पहायला मिळते. वाडा पाहुन झाल्यावर पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे. रस्त्याने पुढे जाताना डाव्या बाजुस गडावरील सर्वात मोठा असलेला राजाळे तलाव दिसतो. बालेकिल्ल्याच्या डोंगर उतारावरून वहात आलेले पाणी दगडी नाळीने या तलावात सोडलेले असुन उतारावरून वहात आलेली माती या तलावात जाऊ नये यासाठी हे पाणी पहिले एका टाक्यात व तेथे संथ झाल्यावर नंतर तलावात सोडलेले आहे. हा तलाव आजही वापरात आहे.

तलावाकडून सरळ पुढे आल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेल्या भैरवखिंडीत पोहोचतो. या खिंडीच्या पूर्व बाजुस असलेला डोंगर म्हणजे किल्ले वज्रगड तर डावीकडील डोंगराची सोंड म्हणजे बालेकिल्ल्याचा खांदकडा. भैरवखिंडच्या पुढील भागात प्रवेशबंदी आहे. आपली आतापर्यंत भटकंती झाली ती पुरंदर माची, मुरारगेट ते भैरवखिंड अशी पसरलेली असुन केवळ याच माचीची तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. येथुन पुढील महांकाळ माची भैरवखिंड ते केदार दरवाजापर्यंत पसरली असुन त्यापुढील बावची माची केदार दरवाजा ते फत्ते बुरुजापर्यंत पसरली आहे. येथुन मागे फिरून पुरंदेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाहनतळावर यावे. या वाहनतळा समोरून बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट आहे. येथुन पुढील भागात छायाचित्रणास बंदी असल्याने आपल्याकडील मोबाइल-कॅमेरा गाडीत ठेवावे किंवा येथील सुरक्षा चौकीत जमा करावे. येथुन मळलेल्या वाटेने १५ मिनिटात आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजाखाली असलेल्या बांधीव पायऱ्याजवळ पोहोचतो.

पायऱ्याच्या या वाटेवर डाव्या बाजुस चौकोनी आकाराचे सुकलेले पाण्याचे टाके असुन पुढे डावीकडे देवळीत हनुमानाची मुर्ती आहे. या मुर्तीच्या शरीरावरील कोरीव अलंकार व मिशी पहाता हि मुर्ती पेशवेकाळातील असावी. पायऱ्या चढुन आपण दोन बुरुजात बांधलेल्या गडाच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. गडाचा हा भाग म्हणजे काटकोनात बांधलेली तीन दरवाजांची माळ असुन यातील पहिला दरवाजा दिल्ली दरवाजा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा तर तिसरा दरवाजा निशाण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. पहिला दरवाजातुन आत आल्यावर डाव्या बाजुस कड्यालगत पत्रे ठोकलेले दिसतात. हि खांदकडयावर जाणारी वाट असुन आता खांदकडयावर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आहे.पण उजवीकडील बुरुजावर चढले असता खांदकडयाचा टोकापर्यंत भाग दिसुन येतो. या बुरुजाच्या अलीकडे एक व वाटेवर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत.

कड्याच्या टोकाला असलेला खांदकडा बुरुज भैरवखिंड व वज्रगड यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला आहे. खांदकडयावर प्रसंगी खाली उतरण्यासाठी चोर दरवाजा असल्याचे उल्लेख येतात. येथुन पुढे दुसरा गणेश दरवाजा असुन दरवाजाच्या डाव्या बाजुस कोनाडयात झिज झालेली गणेशमुर्ती आहे. पुढील उत्तराभिमुख निशाण दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुच्या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच झेंड्याची जागा दिसते. या बुरुजाला निशाण बुरुज नाव आहे. येथुन पुढे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस दोन तर उजव्या बाजुस एक असे तीन उध्वस्त वास्तू अवशेष पहायला मिळतात. येथुन पुढे आपण वाटेवरच असलेल्या एका टाक्याजवळ येतो. येथुन समोर पाहीले असता राजगादी टेकडी दिसते. या टाक्या जवळुन दोन वाटा दिसतात. यातील उजवीकडील वाट राजगादीच्या उजव्या बाजुने शेंदऱ्या बुरुजावर जाते तर डावीकडील वाट केदारेश्वर मंदिराकडे जाते.

शेंदऱ्या बुरुजाकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस पाण्याची दोन टाकी आहेत. शेंदऱ्या बुरुज व त्याखालील भाग दुहेरी तटबंदीने बंदीस्त केला असुन येथुन पुरंदर माचीवरील मुरारगेट व पदमावती तलावाचा संपुर्ण परीसर नजरेस पडतो. या बुरुजातून खालील चिलखती तटबंदीत उतरण्यासाठी लहान मार्ग आहे. या शेंदऱ्या बुरुजातच नाथनाक व देवकाई यांचा बळी दिल्याची कथा सांगितली जाते. या बुरुजापुढे कड्याच्या टोकावर बोर टाक म्हणुन पाण्याचे टाके आहे. येथून समोरच्या टेकडीवरील केदारेश्वर मंदिर दिसते. शेंदऱ्या बुरुज पाहुन मागे फिरावे व मुख्य वाटेवरील टाक्याच्या डावीकडील वाटेने आपली पुढील गडफेरी सुरु करावी. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे फाटा असुन हि वाट राजगादीच्या टेकाडाकडे जाते तर सरळ जाणारी वाट राजगादीला वळसा घालुन केदारेश्वर मंदिराकडे जाते.

आपण प्रथम उजवीकडे समोरच्या टेकडीवर जाणाऱ्या वाटेने वर चढावे. येथे एका वास्तुचा चौथरा असुन थोडे पुढे गेल्यावर दारूकोठाराची भग्न इमारत आहे. थोडे वर चढून गेल्यावर आपण राजगादी टेकडीच्या माथ्यावर येतो. या ठिकाणी छत्रपतीचा वाडा असल्याने या टेकडीला राजगादी नाव पडले असावे. टेकडीच्या उजव्या बाजुस बऱ्यापैकी तटबंदी असुन या तटबंदीत एक शौचकुप आहे. राजगादीची टेकडी पाहून आल्या वाटेने खाली उतरावे व राजगादीची टेकडी उजवीकडे ठेवुन केदारेश्वर मंदिराकडे निघावे. या वाटेवर काही वास्तुंचे चौथरे असुन पुढे एकाखाली एक पाण्याची दोन टाकी आहेत. यातील एका टाक्यास म्हसोबा टाके नाव आहे. यातील खालील टाक्याकडून सरळ चालत गेल्यावर अजुन एक पाण्याचे टाके लागते. या टाक्याच्या पुढील बाजुस तारेचे कुंपण घालण्यात आले असुन खाली उतरत जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. पण येथुन दोन बुरुजात असलेला केदार दरवाजा व त्याच्या आसपासच्या तटबंदीचे सुंदर दर्शन होते.

केदार दरवाजाच्या खालील बाजुस बावची माची असुन दरवाजात बांधकाम करून त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. शिवकाळात महत्वाचा असलेला हा दरवाजा आता अज्ञातवासात गेला आहे. दरवाजाच्या वरील बाजुस थोरल्या माधवराव पेशव्यांनी बांधलेला मुखी/मुकारशी तलाव असुन त्याच्या उजव्या बाजुस बालेकिल्ल्याच्या सोंडेवरील फत्ते बुरुज आहे. केदार दरवाजाचे दर्शन करून टाक्याकडील मुळ वाटेवर यावे. येथुन साधारण १५ मिनिटे चालत आपण राजगादी टेकडी व केदारेश्वर मंदिर टेकडी यामधील खिंडीत येतो. येथुन केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी घडीव दगडात ७० पायऱ्याचा जीना बांधलेला आहे. या जिन्याने आपण केदारेश्वराच्या पुर्वाभिमुख मंदिराजवळ पोहोचतो.

मंदिराचा परिसर अतिशय लहान असुन घडीव दगडांनी फरसबंद केलेला आहे. मंदिराचे बांधकाम गर्भगृह व सभामंडप असे दोन भागात केले असुन गाभाऱ्यात शिवलिंग व सभामंडपात नंदी आहे. मंदिरासमोर नंदिमंडप असुन त्या शेजारी दगडी दीपमाळ आहे व एक चौथरा असुन काही अंतरावर दुसरा समाधी चौथरा आहे. केदारेश्वराचे मंदिर किल्ल्यावरील सर्वोच्च शिखर असुन या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४४८२ फुट आहे. केदार टेकडीच्या मागे टोकावर असलेल्या बुरूज कोकण्या बुरूज तर उजवीकडील बुरुज हत्ती बुरुज म्हणुन ओळखला जातो. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड हे किल्ले व कऱ्हापठार परिसर दिसतो. संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो.

इतिहासात ‘अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कऱ्हा पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा’, असे यथार्थ वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. पुरंदर किल्ल्याचा संबंध थेट पुराणाशी जोडला जातो. पुराणातील एका कथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने ज्या पर्वतावर तपसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर म्हणजे इंद्र व इंद्राचे शस्त्र म्हणजे वज्र यासाठी पुरंदरासमोर बांधलेल्या गडाचे नाव वज्रगड ठेवले गेले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपुर गावातील प्राचीन केदारेश्वर मंदिर पहाता या गडाची निर्मिती यादवकाळापूर्वी चालुक्य अथवा राष्ट्रकुट यांच्या काळात झाली असावी.

यादव साम्राज्याच्या अस्तानंतर बहमनी सुलतान अलाउद्दीन हसन गंगू याच्या काळात इ.स. १३५० मध्ये बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदर ताब्यात घेतला व त्याचे नव्याने बांधकाम केले. इ.स.१३८४ मध्ये महमूदशाह बहमनीच्या काळात हे काम चालु असताना येथील शेंदऱ्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असल्याने बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई हे दांपत्य त्यात जिवंत गाडण्यासाठी दिले व त्यांचा बळी घेऊन हा बुरूज उभा राहिला. बहामनी सत्ता संपुष्टात आल्यावर इ.स. १४८६ मध्ये मलिक अहंमद याने किल्ला ताब्यात घेतल्यावर पुढील कित्येक वर्षे हा किल्ला निजामशाहीत होता. इ.स. १६२९ मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

शिवाजी राजांनी आदिलशाही किल्ले ताब्यात घेतल्याने इ.स.१६४९ मध्ये आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास रवाना केले. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ला निवडला पण गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. यावेळी पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मुलांमध्ये हक्कावरून गृहकलह सुरु झाला याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले व किल्ला स्वराज्यात आणला. पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली व त्याचा बेलसर येथे पराभव केला. राजगडचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्वराज्याचा सुरवातीचा कारभार या गडावरून सुरू झाला. १६५५ मध्ये शिवरायांनी नेताजी पालकरला किल्ल्याचा सरनौबत नेमले.

वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. ३० मार्च १६६५ रोजी दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यास वेढा घातला व १५ दिवसांनी म्हणजे १४ एप्रिल १६६५ ला वज्रगड ताब्यात घेतला. यानंतर दिलेरखानाने पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माची ताब्यात घेतली. या माचीवर झालेल्या घनघोर लढाईत मुरारबाजीं देशपांडे वीरगतीस प्राप्त झाले. १३ जुन १६६५ रोजी पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या तहात महाराजांनी पुरंदर व इतर २२ किल्ले मुघलांच्या ताब्यात दिले. ८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला पुन्हा स्वराजात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इ.स.१६८९ साली औरंगजेबाने पुरंदर जिंकला व त्याचे नामकरण आझमगड केले. इ.स.१७०५ मध्ये शंकराजी नारायण यांनी महाराणी ताराबाईच्या वतीने मुघलांकडून किल्ला जिंकून घेतला.

इ.स. १७०७ मध्ये छत्रपती शाहु महाराजांचे किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते. इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदाची वस्त्रे दिल्यावर पंतसचिवांच्या ताब्यात असलेला पुरंदर पेशव्यांच्या अखत्यारीत दिला व बाळाजी विश्वनाथ यांचा परीवार पुरंदरवर वास्तव्यास आला. १७२७ साली चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली. १८ एप्रिल १७७४ रोजी सवाई माधवराव यांचा पुरंदरवर जन्म झाला. इ.स.१७७६ मध्ये झालेला इंग्रज-मराठा तह दुसरा पुरंदर तह म्हणून प्रसिद्ध आहे. १६ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला तेथे लष्करी तळ उभारला. १९६१ साली भारत सरकारने संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे हस्ते गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी सुरु केली. १९ एप्रिल १९७० रोजी गडावर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला.

पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वांत महत्वाची घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांनी निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाशी दिलेला लढा व त्यात त्यांना आलेले वीरमरण. या लढ्याचे सभासद बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे. या युद्धाचे वर्णन करताना सभासद म्हणतो – ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी त्यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले तसेच बहिले मारले.‘ मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,‘अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो‘ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?‘ म्हणोन नीट खानावरी चालिला खानावरी तलवरीचा वार करावा. तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला‘. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीला १६ मे १६६५ रोजी या लढाईत वीरमरण आले.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

@JIDDIMARATHA
Leave a comment