मारबत व बडग्याची मिरवणूक –
पोळ्याचा दुसरा दिवस लहानग्यांचा ‘तान्हा पोळा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नागपूर शहरात भव्य आणि नेत्रदीपक असा ‘मारबत व बडग्या’चा उत्सव साजरा होतो. काठ्या, बांबू, तरट आदी साहित्याचा वापर करून मारबत देवी आणि बडग्याचे मोठे पुतळे तयार केले जातात. त्यावर फाटके कपडे व चिंध्या गुंडाळून त्यांना विविध रंगांनी सजवले जाते. काळी मारबत आणि पिवळी मारबत हे नागपूर शहराच्या या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. दरवर्षी मारबत व बडग्याची मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी केवळ नागपूर शहरातूनच नव्हे, तर दूरवरच्या गावखेड्यांतूनही हजारो लोक आपल्या लहानग्यांना घेऊन शहरात येतात.
नागपूरचा वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध ‘मारबत व बडग्या’चा उत्सव हा मूलतः विदर्भातील गावखेड्यांमध्ये प्रचलित असलेल्या एका जुन्या लोकपरंपरेचे विस्तारित आणि भव्य रूप मानले जाते. या परंपरेत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कडुलिंबाच्या किंवा जंगली तुळशीच्या लहान फांद्या आणल्या जातात. त्यांच्या कोवळ्या पानांना मारबतीचे केस मानून त्याने घर झाडले जाते. त्यानंतर संध्याकाळी मातीच्या भांड्यात घराघरातून माश्या, डास व इतर कीटक गोळा केले जातात. त्यात लसूण, मिरची, तांदळाची साळी, मोहाची फुले आदी टाकून हे भांडे गावाच्या वेशीबाहेर नेऊन फोडले जाते.
या प्रथेमागे वर्षभर माश्या, डास, कीटक आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगराईपासून गावाची सुटका व्हावी, अशी लोकधारणा आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगराईपासून संरक्षण मिळावे, यासाठी ही परंपरा प्रतिकात्मक स्वरूपात विदर्भातील अनेक गावांमध्ये पूर्वापार पाळली जात असल्याचे मानले जाते.
राजकीय आणि सामाजिक रूप
मूलतः सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाची असलेली ही परंपरा १९व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय स्वरूप धारण करू लागली, असे मानले जाते. नागपुरात प्रचलित असलेल्या एका समजुतीनुसार, बांकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या निषेधार्थ तिच्या नावाची मोठी ‘मारबत’ आणि तिच्या पतीच्या नावाचा ‘बडग्या’ उभारून त्यांची मिरवणूक काढली जात असे. संध्याकाळी या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाई.
इतवारी येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीची मिरवणूक १८८१ मध्ये, तर मस्कासाथ येथील तऱ्हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक १८८४ मध्ये सुरू झाल्याचे मानले जाते.
मारबत व बडग्या यांना वाईट शक्तींचे प्रतीक मानून त्यांची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली जाते आणि शहराबाहेर त्यांचे दहन केले जाते. या परंपरेमागे रोगराई, प्रदूषण आणि विविध संकटे दूर व्हावीत तसेच शहर स्वच्छ राहावे, अशी लोकभावना जोडलेली आहे.
“माश्या-कुशा घेऊन जाऽऽ रे बडग्या,
ईडा-पिडा, रोगराई घेऊन जाऽऽ गे मारबत!”
अशा घोषणा देत निघणारी ही मिरवणूक नागपूरपुरती मर्यादित न राहता पूर्व विदर्भातील अनेक भागांत उत्साहाने साजरी केली जाते.
असंतोष व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम
मारबत-बडग्याच्या मिरवणुकीला दीर्घ राजकीय परंपरा लाभली आहे. विविध काळात राजकीय व्यक्ती, सामाजिक प्रश्न आणि तत्कालीन परिस्थितीविरोधातील जनभावना व्यक्त करण्यासाठी या उत्सवाचा वापर झाला. मागील काही दशकांत हा उत्सव राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असंतोष व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम ठरला आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी, भ्रष्टाचार, महागाई, महिलांवरील अत्याचार, बालमजुरी, तसेच विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांविरोधात घोषणा देत, या समस्या आणि संकटे ‘घेऊन जाऽऽ गं मारबत’ अशी आर्त विनवणी केली जाते. म्हणूनच नागपूरचा मारबत-बडग्या उत्सव हा केवळ एक लोकउत्सव नसून विदर्भाच्या लोकपरंपरा, सामाजिक भावना आणि जनआवाजाचे प्रतीक म्हणूनही पाहिला जातो.
(लेखन व संपादन – अमित भगत)
