महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,948

पांडववाडा, एरंडोल

By Discover Maharashtra Views: 2629 4 Min Read

पांडववाडा, एरंडोल –

जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी. एरंडोलचे प्राचीन नाव ऐरणवेल किंवा अरुणावती असे होते. ते अंजनी नदीच्या काठी वसले आहे. महाभारताच्या आधी पांडव अज्ञातवासात असतांना ते याच एक चक्रानगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा दंतरथा आहे.

एरंडोलमध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोलपासून १५ किलोमीटरवर असलेल्या पद्मालय येथे जाऊन भीमाने बकासुराचा वध केला. आजही पद्मालयापासून दीड किलोमीटरवर भीमकुंड, भीमाचे जाते, तसेच भीम आणि बकासुर यांच्या युद्धांच्या खुणा पहायला मिळतात. एरंडोल येथे भीमाची वाटी अजूनही दिसते. वाड्याच्या जवळच असलेल्या विहिरीला द्रौपदीकूप असेही म्हणतात. अनेक पर्यटक महाभारतकालीन पांडववाडा आणि पद्मालय येथे भेट देतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा शासकीय गॅझेटमध्ये (राजपत्रामध्ये) पांडववाडा असा उल्लेख आहे.

पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते. वाड्याच्या शेजारी धर्मशाळा आहे. असे केवळ हिंदू मंदिरांच्या शेजारीच आढळते. आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे. तेथील भिंतींना अनेक खिडक्या आहेत. या प्राचीन खिडक्यांना समईच्या, तसेच कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आहे. वाड्याच्या शेवटी मंदिराप्रमाणे गर्भागृह आहे. त्याच्या शेवटी मूर्ती ठेवण्याची जागा ही हिंदु वास्तूरचनेप्रमाणे आहे.

महाभारतकाळात एकचक्रनगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या एरंडोल या शहराला ऐतिहासिक दरवाजे व खिडक्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शिल्पकलेतून साकारलेले अनेक दरवाजे विविध भागात आहेत. बाहेरून दगडी कोटबांधणी असलेल्या अंजनी नदीच्या तिरावर वसलेल्या या शहरात बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा, देवगिरी दरवाजा, कासार दरवाजा उर्फ कासोदा दरवाजा, चार दरवाजा, रंगारी खिडकी यांचेसह इतर काही दरवाजे इतिहासाचे साक्षीदार आहेत.

चार दरवाजा (चौक):- चार दरवाजा (चौक) हा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. हा दगडी दरवाजा असून त्यावरील शिल्पावर नक्षी तसेच इतर कला प्रकार कोरलेले आहेत. हे चारही दरवाजे एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. या दरवाजातूनच संपूर्ण रहदारी होत असल्याने बदलत्या परिस्थितीत तो आता तोकडा पडत आहे.

कासोदा दरवाजा –

हा दरवाजा आता पडका झाला असला तरी त्याच्या दोन्ही बाजूस भव्य असे बुरुज आहेत. या दरवाजाच्या आत शिरून थोड्या अंतरावर गेल्यावर पांडववाड्याची भव्य वास्तू पाहावयास मिळते. या दरवाजास पूर्वी कासार दरवाजा असेही म्हणत असत.

देवगिरी दरवाजा –

हा दरवाजा अंजनी नदी काठावर आहे. नदी पात्रातून गावात शिरण्यासाठी १०० फूट लांब व ३० फूट उंच असा धक्कावजा दगडी रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेहून परतल्यावर या दरवाजामार्गे त्यांनी प्रस्थान केल्याची माहिती मिळते.

रंगारी खिडकी (दरवाजा)

या दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवगिरी दरवाजाप्रमाणे दगड वजा फरशी बसविण्यात आली आहे. हा दरवाजा पुरा भागाच्या मध्यवर्ती भागात येण्याचे प्रवेशद्वार आहे.

अमळनेर दरवाजा –

येथे एक बुरुज असून हा दरवाजा अमळनेरला जाण्याचा मार्ग आहे. शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी चारही बाजूने तटबंदी होती. परंतु कालौघात ती नष्ट झालेली आहे. याशिवाय गांधीपुरा भागात पद्मालय दरवाजा, बेलदार दरवाजा, कागदी दरवाजा आदी पडलेले, पाडून टाकलेले आणि पडक्या स्थितीत अस्तित्त्वात असलेले असे काही दरवाजे आहेत. एरंडोलवासी या दरवाजांचा इतिहास आठवत कालक्रमण करीत आहेत.

संदर्भ:
सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती (२३.२.२०१४)
लोकमत January 05, 2017.

माहिती संकलन  –

Leave a comment