पैठण येथील समृद्ध राजवटीचे प्रतीक असलेला प्राचीन तीर्थस्तंभ

पैठण येथील समृद्ध राजवटीचे प्रतीक असलेला प्राचीन तीर्थस्तंभ

प्राचीन तीर्थस्तंभ –

पैठण येथील समृद्ध राजवटीचे प्रतीक असलेला प्राचीन तीर्थस्तंभ शेवटचा घटका मोजत आहे. राज्य पुरातत्व विभागाने रासायनिक लेप प्रक्रिया करून अनेक वर्षे उलटली आहेत. सध्या स्तंभाचे पापुद्रे निघत असून, सुंदर नक्षीकामाला इजा पोचली आहे.बाराव्या शतकातील नितांतसुंदर वास्तू नामशेष होण्याच्या स्थितीत आहे.

प्राचीन प्रतिष्ठान नगरीचे वैभव दाखवणाऱ्या शेकडो वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या. समृद्धी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठानचे वर्चस्व सिद्ध करणारा तीर्थस्तंभ बाराव्या शतकात उभारण्यात आला. पैठणच्या या तीर्थस्तंभाचे वेगळेपण देशभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करते, मात्र ‘पिकतं तिथं विकत नाही’ या म्हणीप्रमाणे तीर्थस्तंभाची दशा झाली आहे. स्तंभाचे ठिकठिकाणी पापुद्रे निघाले असून तातडीने रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज आहे. पायथ्याचा काही भाग तुटल्याने चक्क सिमेंटने डागडुजी करण्यात आली होती. या कामाचेही आता तुकडे पडत आहेत. चार टप्प्यात उभारलेल्या स्तंभावर आकर्षक नक्षीकाम आहे. वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊन नक्षीकाम पुसट होत आहे.

नगर परिषदेने तीर्थस्तंभ परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. पण, कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नसल्यामुळे सौंदर्यीकरणाची दुर्दशा झाली. दिवे, लोखंडी जाळ्या गायब झाल्या असून कारंजे बंद आहेत. स्तंभाच्या सभोवती गाजरगवत आणि कचरा पसरला आहे. मोकाट जनावरांचा मुक्त वावर असलेल्या स्तंभ परिसरात पर्यटकांची निराशा होते. चार भागातील स्तंभ ६.३७ मीटर उंच आहे. स्तंभावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ सूचित केले आहे. तसेच सप्तमातृका, नृत्यरत गणपती, श्रीदेवी-भूदेवी, शिव व इंद्र, भैरव यांची शिल्पे आहेत. स्थापत्य शैलीचा अजोड नमुना असलेल्या स्तंभाचे तातडीने जतन करण्याची स्थ‌िती निर्माण झाली आहे.

इ. स. पूर्व बाराव्या शतकातील तीर्थस्तंभ पैठणला ‘दक्षिणकाशी’ सिद्ध करणारा भक्कम पुरावा आहे. काळाच्या ओघात स्तंभात स्थित्यंतरे झाली आहेत. हा ठेवा जतन करणे आवश्यक आहे. या स्तंभावरील शिल्प अभ्यासकांना प्रेरित करतात.

Pramod Tekale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here