महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पद्मगंधा | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1204 2 Min Read

पद्मगंधा –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१५ –

कोरवली गावातील अमोगसिद्ध मंदिराच्या भिंतीवरील अनेक देवांगणा मध्ये सौंदर्यप्रसाधनात मग्न असणाऱ्या काही सुरसुंदरी आहेत. त्यामध्ये पद्मगंधा नावाची एक स्वर्गीय अप्सरा आहे किंचित ठेंगणी वाटणारी पण सुडौल बांध्याची ही अप्सरा मंदस्मित करीत आपल्या हातावरील पद्मावर नजर रोखून उभी आहे. नजरेमध्ये भरणारी तिच्या नाजूक तनूची लयबद्धता व कमनियता फार कौशल्याने दाखविली आहे. तिच्या ठेंगण्या बांधण्यास उंची भासवण्यासाठी तिच्या मस्तका मागे कोरलेले प्रभावलय देखणे व सुबक आहे.

पहिले आणि तिसरे वलय उभ्या रेषांनी शिल्पांकित केले, तर मधले वलय कमलदलाप्रमाणे भासणार्‍या नाजूक पाकळ्यांनी तयार केलेले आहे. त्यामध्ये अत्यंत भावपूर्ण आणि बोलका असा या सुरसुंदरीचा चेहरा पाहिल्यावर असे वाटते की,  ज्याप्रमाणे सरोवरात कमलपुष्प उमलते त्याप्रमाणे येथे पाषाणपुष्प उमलले आहे. मस्तकावरील कुंतलांची केलेली विलोभनीय रचना तिच्या मुखकमलास उठाव देणारी आहे. अगदी नाजूकपणे तिने पकडलेले पुष्प तिच्या त्या करास वक्रता देणारे आहे. कोपर्‍यात हात दूमडून एकटवटवीत  सुंदर फूल ज्या खूबीने तिने हातात धरले आहे, त्यामुळे तिच्या दोन्हीहि दंडाची आणि हातांची शोभा अवर्णनीय ठरली आहे.

उजवा हात तिने अतिशय सहजपणे आपल्या मांडीवर अलगद  टेकवीला आहे. तिच्या सहज अविर्भावात विलक्षण नाजूक भाव स्पष्ट झालेला आहे. तिच्या संपूर्ण देहाला त्यामुळे एक वेगळीच झळाळी आलेली आहे. तिचे रेखीव पाय  मूळ सौंदर्याला अधिकच खुलवणारे आहेत. दोन्ही करांची आणि दोन्ही पायांची नाजूक बोटे कल्पकतेने कोरलेली आहेत.

अशी ही सुबक ठेंगणी तनया अंगभर आभूषणे आणि वस्त्र परिधान केलेली आहे. या पद्मगंधेच्या कंठातील कंठाहार आणि त्याखाली असणारा उपग्रीवा अलंकार अगदी ठसठशीत आहे.स्तनहारहि तिने परिधान केलेला आहे. त्यामध्ये घातलेले बाजूबंध अर्थात केयूर मौल्यवान खड्यांनी तयार केले आहे असे वाटते. कर्णभूषणे, कटी सूत्र, मुक्तदाम आणि उरूद्दामाच्या खाली असणारा तिच्या वस्त्राचा सोगा कलाकारांनी न विसरता पण तिच्या लयदारपणास शोभेसा शिल्पांकित केला आहे. अशीही पद्मगंधा आपल्या सौंदर्याचा कदापी गर्व न दाखवता या ठिकाणी स्थित झालेली आहे. ही पद्मगंधा एका विशेष हेतूसाठी याठिकाणी कोरलेली आहे का ?असेच वाटते.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment