नुपूरपादिका | कोरवलीच्या सुरसुंदरी

नुपूरपादिका | कोरवलीच्या सुरसुंदरी

नुपूरपादिका –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.३ –

कोरवलीच्या मंदिरावरील असणाऱ्या सुरसुंदरी मध्ये नुपूरपादिका हे एक अत्यंत सुंदर असे शिल्प आहे. हे शिल्प मंदिराच्या उत्तर दिशेच्या मंडोवरावर स्थित आहे. शिल्प पूर्णतः  भंगलेले असले तरीदेखील  अतिशय सुंदर व सुबक वाटते .नुपूरपादिका हे स्वर्गीय अप्सरेच्या शिल्प अनेक मंदिरावर पहावयास मिळते.  महाराष्ट्राच्या बाहेरील मंदिरांवर देखील या सुंदरींनी आपली हजेरी लावलेली आहे. आपले पैंजण पायामध्ये बांधण्याच्या नादामध्ये मग्न झालेल्या या सुंदरीच्या अनेक मूर्ती शिल्पकाराने तयार केलेल्या दिसतात. या नुपूर पादिकेचे सुद्धा दोन प्रकार असतात. आपल्या पायाभोवती पैंजण गुंडाळणाऱ्या सुरसुंदरी आणि घोट्याच्या वर पादांगत घालणाऱ्या सुरसुंदरी .या सुरसुंदरींची गणना सौंदर्यप्रसाधनात गढून गेलेल्या पण तारुण्यसुलभ अशा अप्सरांमध्ये केली जाते.

आपल्या शृंगाराचा शेवटचा भाग म्हणून त्यात पादांगद किंवा पैंजण घालत असतात. अतिशय मोहक, चित्ताकर्षक जीवाला वेड लावणाऱ्या अशा या नुपूरपादिकेच्या कितीतरी विलोभनीय देखण्या मूर्ती सर्व कसब पणाला लावून कलाकारांनी घडवलेल्या आहेत. शिल्पप्रकाश ग्रंथातील सर्व लक्षणांना अनुसरून असणारी नुपूरपादिका कोरवली येथे आहे. हे मंदिर उध्वस्त होत असताना त् या शिल्पाची देखील तोडफोड झालेली असावी. तरीही तिची शिल्पशास्त्रीय अनेक वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात.सुडौल परंतु पुष्ठ बांध्याची हि नवयौवना आहे.

आपल्या कुंतलाच्या नाजूक नाजूक लहान बटा करून तिने त्या महिरपाप्रमाणे आपल्या मस्तकावर आणि कपाळावर बसवल्या आहेत.  पाठीमागच्या कुंतलांचा भलामोठा अंबाडा तिने एका बाजूस सोडला आहे.रेखीव भुवया व मत्स्य आकाराचे बोलके डोळे तिच्या हसर्‍या वदनास शोभा देणारे आहे. तिची लोंबती कर्णभूषणे आकर्षक वाटतात. डावा पाय किंचितसा कोपऱ्यामध्ये दुमडून ती उभा आहे. उजवा पाय तिने आपल्या डाव्या मांडीपर्यंत वर उचलला आहे आणि पायातील नुपूर काळजीपूर्वक बसवण्याचा ती प्रयत्न करीत आहे. परंतु भंजनामुळे तिच्या हालचाली नीट पाहता येत नाहीत. तरीही ती नजरेस भरते.

काही अभूषण स्पष्टपणे दिसतात. त्यावरून असे अनुमान निघते की, इतर सुंदरी प्रमाणेच हिलाही कलाकाराने दागदागिने व उंची वस्त्रे चढवलेली आहेत. स्कंदमाला,केयुर,कटकवलय आणि एका पायातील पादजालक व  पादवलय उठून दिसतात. अशी हि नुपूरपादिका  कोरवली येथे मंदिराच्या बाह्य अंगावर शोभून दिसते. स्त्री सौंदर्याचा हा ही एक उत्तम नमुना आहे. नखशिकांत शृंगार करून आपल्या मूळच्या अभिजात सौंदर्याला तिला खुलवायचे असेल असेच हिला पाहून वाटू लागते हे  विशेष होय.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here