म्यान दरवाजा

म्यान दरवाजा

म्यान दरवाजा –

म्यान म्हणजे कोष. प्रायः असिकोष, किल्ले राजगडच्या शिवापट्टणकडील महाद्वाराचा हा संरक्षक दरवाजा आहे. यदाकदाचित् गनीम शिवापट्टणकडून वर चढून म्यान दरवाजाजवळ आलाच तर त्याला मागेपुढे, आजूबाजूला सरकण्यास जागा नाही. गडास भिडू पहाणारा गनीम भांबावून जावा म्हणून ह्याच्या मार्गाची बाह्य रचना हूकासारखी आहे. म्यान दरवाजास बिलगणारा शत्रू पुढून म्यान दरवाजावरून मागून बालेकिल्ल्यावरून आणि उजवी कडून महाद्वार पायऱ्यांच्या तटबंदीतील जंग्यांच्यामधून केलेल्या तोफा, बंदुका, तिरंदाजी, गोफणगुंडे ह्यांच्या माऱ्यात सापडावा हा उद्देश.

हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. किल्ले राजगडच्या आसमंतातल्या बारा मावळाला हा दरवाजा ज्ञात होता. जे इमानी होते ते ह्याच्या आंत राहिले, आणि जे बेईमानी होते ते ह्या दरवाजातून खाली उतरले. ह्यावर कोणतेहि शुभदर्शक प्रतिक नाही. म्यान दरवाजाचा दरवाजा खिळीचा लाकडी होता. त्याला दिंडी होती. त्याच्यामागे लाकडी अडसर होता. आंत प्रवेश केल्यावर डावीकडे पहारेकऱ्यांचा कक्ष आहे. त्या कक्षावर चुन्याचे धाबे होते. तसाच दरवाजावरही सज्जा आहे. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत सज्जातून आणि चुनेगच्चीवरून खालील

रहाळावर नजर राखता येत होती. पायथ्याच्या शिवापट्टणहून गडावर येणारा मार्ग मुद्दाम नागमोडी वळणावळणाचा राखला होता. खालून वर चढणाऱ्या शत्रूस चढण्यास विलंब लागावा आणि तो सातत्याने वरील पहारेकऱ्यांच्या तोफा, बंदुका, धनुष्यबाण, गोफणगुंडे आणि हुक्के म्हणजे रॉकेट ह्यांच्या माऱ्यात राहावा. हा उद्देश होता.

म्यान दरवाजावरील पहारेकरी उर्फ द्वारपाळ उर्फ बंकी गडात प्रवेश करूं इच्छिणाऱ्याची पूर्ण प्राथमिक चौकसी करून वरील महाद्वारावरील दौलतबंकी उर्फ महाद्वारपाळप्रमुख ह्यास बातमी देत असत. त्याची परवानगी येईपर्यंत आगंतुकास रोखून ठेवीत.ह्या दरवाजाखालील पाली उर्फ शिवापट्टण नगरांत शिवरायांनी आपला पहिला घोडदळाचा सरनौबत माणकोजी दाहातोडे ह्याचे कोपरापासून दोन्ही हात तोडून आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला. कारण तो हुकूम मानिनासा झाला होता. ह्या घटनेला छत्रपतिशंभाजीमहाराज पुत्र छत्रपतिशिवाजी उर्फ शाहूमहाराज ह्यांच्या काळांतील एका कागदाने साक्ष दिली.

– गुरुवर्य आप्पा परब (राजगड स्थळदर्शन )

Photo – अतुल अनंत मोरे  (श्री कला )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here