महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,732

पृथ्वी वरील स्वर्ग

By Discover Maharashtra Views: 1529 6 Min Read

पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे भोर तालुक्यातील मु-हा रायरेश्वर –

महाराष्ट्राच्या सौंदर्यस्थळा पैकी बहुतांशी स्थळे ही सह्याद्रीच्या कडे कपारी,घाट माथ्यावर ,अंगा खांद्यावर आहेत.निसर्गाच्या विविध आविष्कार बरोबरच मानवी जीवनाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या जलस्त्रोंतांची उगम स्थान,औषधी वनस्पती,विविध प्रकारचा रानमेवा,रानभाजी,कंदमुळे,वृक्ष वेली,शुद्ध हवेच्या निर्मितीचे ठिकाण म्हणजेच सह्याद्री.तीनही ऋतूत सह्याद्रीचे रूप स्वतंत्र पण तरीदेखील मानवी मनाला भूरळ पाडणारे व जीवनात संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देते.उन्हाळ्याच्या दिवसांतील बेलाग कडे राकट सौदंर्य देतात तर पावसाळ्यात त्याच कड्यातून अवखळपणे तालावर कोसळणारे धबधबे.(पृथ्वी वरील स्वर्ग रायरेश्वर)

भोर तालुका म्हणजे देश व कोकण याला जोडणारा प्रदेश.सह्याद्रीच्या द-या खो-यांचा समृद्ध वारसा व शिवकाळांच्या सुवर्ण क्षणांचा साक्षीदार म्हणजे हा तालुका.मावळातील मावळी मनाच्या व संस्काराचा वारसा सांभाळणारा भाग.याच भागातील मावळ्यांनी छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला प्रांरभापासून साथ दिली आणि एक स्वतंत्र मराठ्यांचे राज्य निर्माण झाले.संपूर्ण हिंदुस्थान परकीय आक्रमकांच्या अमला खाली असताना एकमेव मराठा राजा सिंहासनाधिश्वर झाला ही सामान्य घटना नव्हती.मराठा इतिहासाला दिशा देणाऱ्या या भोरच्या भूमीने अनेक नररत्नांना जन्म दिला.

पुणे जिल्हा, सातारा जिल्हा व रायगड जिल्हा यांच्या सीमेवर असलेल्या भोर तालुक्यात मु-हा रायरेश्वर म्हणजेच रायरेश्वरचे पठार येते.याची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे ४७०० फुट इतकी आहे.भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे २६ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे.रायरेश्वरला जाताना श्री क्षेत्र आंबावडे या गावातून डांबरी सडक जाते.आंबावडे गावातील प्राचीन श्री नागेश्वरचे दर्शन घेण्यासाठी धवलगंगा ओढ्यावरील झुलता पुल ओलांडून जावे लागते.पुलाच्या दुसऱ्या बाजूला ब्रम्हीभुत श्रीमंत संकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी आहे.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर निर्माण झालेल्या परिस्थिती महाराष्ट्राच्या रक्षणार्थ ज्या काही नरवीरांनी अलौकिक कार्य केले त्यात अग्रभागी होते संकराजी नारायण.समाधी व नागेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन आपण रायरेश्वरच्या प्रवासास निघतो.कोर्ले गावातून भोर तालुक्याच्या हद्दीतून एक कच्चा रस्ता जातो मात्र तो अतिशय खराब असल्याने गुराख्या शिवाय कोणीही याचा वापर करीत नाही.दुसरा चांगला डांबरी रस्ता वाई तालुक्यातील ओहळी या गावाहून जातो तो रायरेश्वरच्या शिडी पर्यत घेऊन जातो.पठारावर पोहोचण्यासाठी सुरवातीस काही सिमेंटच्या पायऱ्या व त्यानंतर लोखंडी शिडीचा वापर करावा लागतो.रायरेश्वरच्या पठारावर पोहोचल्यावर हवेतील गारवा जाणवतो.

एका बाजूला कृष्णा नदीचे खोरे दिसते.लहान लहान गावे,गावातील कौलारू घरे,त्यांना जोडणारी सडक,हिरवीगार डोलणारी शेतातील पिके,शेतावर काम करणारे शेतकरी,व्वा •••• काय वर्णावे ते निसर्गाचे रूप.मागे फिरून पाहिले तर समोरून दिसणारा वाई तालुक्यातील केंजळगड म्हणजे डोईवर ठेवलेल्या काळ्या कातळातील टोपी समान.मोठ्या शहरात ज्या प्रमाणे सिमेंटचे पदपथ असतात त्याप्रमाणे पठारावर पर्यटक व स्थानिकांना चालण्यासाठी सिमेंटचा लहानसा रस्ता आहे.या रस्त्याने चालू लागल्यावर थोड्याच अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूस एक पाण्याचे तळे लागते.स्वच्छ जलसाठ्यात आकाशाचे व ढगांचे प्रतिबिंब खुलून दिसते.त्यानंतर पठारावरील एक वाहळ लागते.येथील घनदाट वृक्षराईच्या शितल छायेतून उजव्या बाजूच्या चढणीस लागतो.तेथे चौकोनी आकाराचे बांधीव पाण्याचे टाके आहे.एका कोपऱ्यात असलेल्या गोमुखातून जमिनीच्या उदरातील पाणी सतत या टाक्यात पडत असते.हेच पाणी रायरेश्वरावरील सुमारे चाळीस कुटुंबाच्या पाण्याची गरज वर्षभर भागवित असते.येथील पाणी रायरेश्वरच्या डोंगर उतारावर असलेल्या वाड्या वस्त्यांना लोखंडी जलवाहिकेने पुरविले जाते.

येथून थोडे वर आल्यावर रायरेश्वर येथील जंगम लोकांची घरे व श्री रायरेश्वरच्या शंभू महादेवाचे पुरातन मंदिर दिसून येते.पूर्वाभिमुख रायरेश्वराचे मंदिर सखल भागात आहे.मंदिराच्या चौहोबाजूस मोठी दगडी पवळी आहे.मंदिर पडवी,सभामंडप व गर्भगृह अशा स्वरूपात असून लोखंडी पत्र्याच्या प्रशस्त पडवीत पोहोचतो.तेथील डाव्या बाजूस असलेल्या दगडी भिंतीत एक शिलालेख कोरलेला असून रंग व जीर्ण झाल्याने वाचण्यास शक्य होत नाही.आत मधे प्रवेश केल्यावर मध्यभागी उंचावर एक धातूची मूर्ती दिसून येते तर छताचे हेमाडपंथीय बांधकाम लक्ष वेधून घेते.सुमारे दोन ते तीन फूट खोलीवर गर्भगृह असून श्री शंभू महादेवाची पिंडी आहे.पिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो.समोरील कोनाड्यात श्री गणेश व इतर देवतांच्या मूर्ती आहेत.मनोभावे रायरेश्वराचे दर्शन घेतल्यावर एक आत्मिक समाधान वाटते.

या मंदिराचा जीर्णोद्धार भोर संस्थान काळात म्हणजेच इ.स.१८८३ साली केल्याचे उल्लेख आढळून येतात.यांच्या समोर जननी देवीचे छोटे खानी मंदिर आहे.मंदिराच्या डाव्या बाजूला विशाल निसर्ग निर्मित तळे आहे मात्र यात चार पाच महिनेच पाणी असते.या मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस जंगम लोकांची सुमारे चाळीस घरे आहेत.तीव्र उताराचे छप्पर,दगड वीट बांधकामातील भिंती व अति पावसाळा असल्याने भितींच्या सुरक्षितेसाठी नेचा किंवा कारवीचे कुड केलेले आहेत.जंगम हा लिंगायत समाज कर्नाटकातील पौरोहित्य करणारी कुटुंबे शाहजी महाराजांच्या कालखंडापासून रायरेश्वरच्या शंभू महादेवाच्या पूजाअर्चा करीता येथे राहत आहेत.आज मात्र येथील जंगम कुटुंबातील बहुतेक सदस्य पुणे मुंबई या सारख्या महानगरात रोजी रोटीसाठी गेलेला आहे.येथील लोक गाय,बैल व म्हैस या पाळीव प्राण्यांना सांभाळून आहेत मात्र शेळी,बकरी व कोंबडी याचे पालन करीत नाही.येथे पावसाचे प्रमाण जास्त असूनही भात शेती केली जात नाही कारण पावसाळ्यात धुक्याचे फार मोठे साम्राज्य असते.

मंदिराच्या पुढे एक ओढा ओलांडून गेल्यावर एका खडकात लहान लेणी सदृश्य खडक खोदलेला आहे.पुरातन काळात कोकणातील व्यापारी या मार्गाने प्रवास करताना विसावा घेत असावेत.रायरेश्वर पठाराची लांबी सुमारे अकरा कि.मी. व रुंदी दिड कि.मी.आहे.महाराष्ट्रातील धारक-यांची पंढरी म्हणून रायरेश्वरचा उल्लेख केला जात असल्याने वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.जुलै ते आॕगष्ट दरम्यान रायरेश्वरचे पठार विविध फुलांचा फुलोत्सव साजरा करीत असतो.जमिनीच्या प्रत्येक भागावर वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फुले आणि फुलपाखरे पाहण्यासाठी नक्की एकदा रायरेश्वरला भेट दिली पाहिजे.पावसाळ्यात शंभू महादेवाच्या जटेतून गंगा निर्माण व्हावी तद्वतच पांढरे शुभ्र धबधबे वाहत असतात.

(“ऐतिहासिक भोरःएक दृष्टीक्षेप ” या माझ्या पुस्तकातून)

© सुरेश नारायण शिंदे,भोर

Leave a Comment