श्री मयुरेश्वर, मोरगांव

By Discover Maharashtra Views: 3507 4 Min Read

श्री मयुरेश्वर, मोरगांव

पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला ‘भूस्वनंदा’ या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.

श्री क्षेत्र मोरेश्वराची कथा | श्री मयुरेश्वरची कथा

आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले.

श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर

अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे.  हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मुर्त्या आहेत.

श्री मोरेश्वर पूजा आणि उत्सव

सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुअपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते.

मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमुर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात श्री मयुरेश्वर मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात.

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

जवळची इतर दर्शनीय स्थळे
  • पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर. अंतर अंदाजे १२ किमी
  • जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे देऊळ. अंतर अंदाजे १७ किमी
  • जेजुरीपासून दोन किमी अंतरावर लवथळेश्वर हे शिवमंदिर. अंतर अंदाजे १९ किमी
  • सासवड येथीर संत सोपान महाराज यांची समाधी. अंतर अंदाजे ३४ किमी
  • नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला. अंतर अंदाजे ४२ किमी

साभार – आर्ट ऑफ लिव्हिंग

महाराष्ट्रातील गडकिल्ले पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

खांदेरीचा रणसंग्राम वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment