महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

युगुल शिल्प | मिथुन शिल्प

By Discover Maharashtra Views: 1346 3 Min Read

युगुल शिल्प | मिथुन शिल्प –

भारतीय बौद्ध मूर्तीकलेने भारताच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावलेली दिसून येते. मूर्ती ज्या काळात घडवली गेली त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिणाम देखील मूर्तीकलेवर पडलेले दिसून येतात. ज्या काळात मूर्ती घडवली जात असत, त्या काळातील वस्त्र, अलंकार, राहणीमान इत्यादीची माहिती मूर्तीवरून प्राप्त होते यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. महाराष्ट्रातील बहुतांशी लेण्या ह्या बौद्ध कालीन समाजदर्शन घडवणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात असणाऱ्या लेण्यांमधील शिल्पकला अतिशय मनमोहक आहे.(युगुल शिल्प | मिथुन शिल्प)

पुणे जिल्ह्यातील कार्ला या ठिकाणी असणाऱ्या लेणी मधील हे मिथुन शिल्प कलेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. कार्ला लेणीत असणारा चैत्य सर्वपरिचित आहे. त्यातील शिल्पकला ही नजरेची पारणे फेडणारी आहे. त्यापैकी आज आपण एक मिथुन शिल्प पाहणार आहोत.

कार्ला लेणी च्या भिंतीवर अनेक मिथुन शिल्प आढळून येतात. त्यापैकी आज आपण फोटोत दिलेल्या शिल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. हे शिल्प एका स्त्री व पुरुषाचे आहे. दोघेही समपाद अवस्थेत उभे असून, स्त्रीचा उजवा पाय सरळ रेषेत असून डावा पाय किंचित गुडघ्यातून वाकवून शरीराचा संपूर्ण तोल स्त्रीने उजव्या पायावर तोलून धरला आहे. ही द्विभूज असून तिने उजवा हात  आपल्या कमरेवर ठेवून डावा हात पुरुषाच्या कमरेभोवती घातला आहे. कानात चक्राकार कुंडले, कपाळावर मधोमध मोठी बिंदी, हातात कोपरापर्यंत बांगड्या, कमरेभोवती नेसूचे वस्त्र, पायात मोठे मोठे तोडे इत्यादी अलंकार तिने परिधान केलेले आहेत. डोक्यावर पदर घ्यावा तसा तिने पदर घेतलेला असून त्या पदराच्या वस्त्राचा पूर्ण भाग तिने पाठीमागे सोडलेला आहे.

चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. नेसूच्या वस्त्राचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध सोडलेला अंकित केला आहे. या मधील पुरुष देखील द्विभूज असून त्याने त्याचा उजवा हात स्त्रीच्या खांद्यावर ठेवला आहे व डाव्या हाताने वस्त्राचा सोगा पकडलेला आहे. याच्या कानात कुंडले, हातात गोलाकार कंगणांची माळ इत्यादी अलंकार याने परिधान केलेले आहेत. कमरेभोवती गुंडाळलेल्या वस्त्राचा सोगा त्याने हातात पडल्याचे स्पष्ट दिसते.धोतर जसे कमरे भोवती गुंडाळतात तसे हे वस्त्र आहे. डोक्यावर विशिष्ट प्रकारचा फेटा परिधान केलेला आहे. त्याच्या मधोमध रुबाबदार तुरा अंकित केलेला आहे. या पुरुषाचा चेहरादेखील शांत आहे. पुरुषाचा स्त्रीच्या खांद्यावर असलेला हात व स्त्रीचा पुरुषाच्या कमरेभोवती असणारा हात त्यांच्यातील विश्वासाची साक्ष देतो. या शिल्पावरुन तत्कालीन वेशभुषा कशी होती याचा अंदाज येतो. अशी शिल्पे लेण्यांमधून बऱ्याच प्रमाणात आढळून येतात.

डाँ. धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यास, मोडी लिपी व धम्म लिपी तज्ञ ,सोलापूर

Leave a comment