इतिहासमहाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभवमहाराष्ट्रातील गडकिल्ले

मी किल्ला बोलतोय…

मी किल्ला बोलतोय

काहीतरी अनपेक्षित वाटलं ना… वाटणारच… जेव्हा तुम्ही मला भेटायला येता तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमचे मजेदार किस्से ऐकतो… पण आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे… माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत…

आजकाल बहुतेक किल्ल्यांना पर्यटनाचे दिवस आले आहेत… तुम्ही ट्रेकिंगला जाताना कोणता किल्ला करायचा, कस जायचे, किती खर्च, किती लोक घेऊन जायचे एकंदरीत असा सर्व हिशोब चालू होतो. मग गुगल किंवा मित्रांना विचारून एखाद बेस्ट ट्रेकिंग स्पॉट ठरवता आणि मग तिथून प्लानिंग ची जुळवा जुळवी करायला सुरुवात होते…

महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले हे २ ते ३ हजार वर्षापूर्वीचे आहेत, म्हणजेच सातवाहनकालीन, राष्ट्रकूट, यादवकालीन इत्यादी. तुम्ही सर्वच प्रत्येक वेळी माझा अभ्यास करून जाताच असे नाही. परंतु हे करणे खरंच गरजेचे आहे. माझे महत्त्व हे अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही.. असो… तुम्हाला फक्त मज्जा आणि मस्तीच करायची असते…
खरतर हि खूप चांगली गोष्ट आहे, आजकालच्या तरुण पिढीला माझ्याबद्दलची असलेली हि ओढ .. पण….
तुम्ही माझे आजचे स्वरूप पाहिलेच असाल, वर्षे सरता सरता माझा कणाच ढासळून जात आहे जेथे कधी काळी स्वराज्याची स्वप्नेच रेखाटली गेली नाही तर ती पूर्ण देखील झाली.. माझी झालेली हि नासधूस म्हणजे फक्त माझा अपमानच नाही तर स्वराज्याचा अपमान आणि स्वराज्याचा अपमान म्हणजेच माझ्या महाराष्ट्राचा देखील अपमान झालाच कि हो… जाऊद्या तुम्हाला काय त्याच… तुमची मस्त पिकनिक होऊन जाते ना किल्ल्यांवर.
माझ्या सारख्या कित्त्येक किल्ल्यांवर आपल्या महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचा इतिहास सुवर्ण शब्दात लिहिला गेला आहे आणि माझी हि आताची परिस्थिती… कोण म्हणेल कि येथे माझा शिवबा राहत होता.. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळे, सेनापती यांचे सुवर्णस्पर्श मला लाभले आहे..
तो एक काळ होता ज्यावेळी मला महाराष्ट्राचे खरे वैभव मानत , महाराष्ट्राला लाभलेला सह्याद्री याच वैभवाचे प्रतिक आहे. स्वराज्य मिळवण्यात माझी महत्वाची भूमिका होती हे तर तुम्हाला ठाऊक असेलच… तेवढं तर तुम्ही शाळेत शिकेलाच असाल ना?
तुमच्यासारखी काही तरुण पिढी मला भेटण्याचं उद्देशाने येते आणि माझेच सौंदर्य वाईट करून जाते.. शिवाजी महाराजांनी माझी खूप काळजी घेतली, संवर्धन केले आणि ते देखील कोणताही स्वार्थ न बाळगता पण आता काही तरुण मंडळी सर्रास आपली आणि आपल्या प्रियकरांची नावे लिहून जातात.. काय गरज ह्याची? किल्ला तुम्ही बांधला का? कोणता किल्ला आहे मला दाखवा जेथे शिवरायांनी स्वःताचे नाव लिहिले आहे?
कधी काळी स्वराज्याची गर्जना आणि आई भवानी चा जयघोष हा ऐकावयास मिळत होता पण आता कधी कधी फक्त अपशब्द ऐकायला मिळतात… या पेक्षा मोठे दुर्दैव काय अजून…
सर्वात वाईट तर तेव्हा वाटते जेव्हा महाराजांसारखी दाढी मिशा ठेवणारी तरुण मंडळी हे कृत्ये करतात.. गटारी असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत असो ह्यांचा एखादा गड किंवा किल्ला ठरलेला असतो.. धूम्रपान, मद्यपान…चालूच असते ..जेथे कधी काळी स्वराज्यासाठी मावळ्यांनी तलवारी उचलल्या होत्या तिथे आताची पिढी हातात बाटल्या घेऊन फिरतात…
पण अभिमान देखील तेवढाच वाटतो जेव्हा काही तरुण मंडळी माझ्या संवर्धनाची काळजी घेतात, माझे महत्त्व पटवून देतात.. मला पाहण्यासाठी येताना माझा नीट अभ्यास करतात…साचलेला कचरा साफ करतात… अशा लोकांमध्ये मला माझे शिवराय दिसतात..
खूप काही सांगायचे असते… खूप काही आठवणी असतात ज्या मला तुमच्या सोबत व्यक्त करून घ्याव्या अशा वाटतात.. मग पुढच्या वेळेस भेटायला येताना कोणतेही वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घ्या… कारण तुमचा इतिहास हा माझ्या या मोडक्या अस्तित्वामुळे आज तुम्हाला माहित आहे.. आणि तो टिकवून ठेवणे हे देखील तुमची जबाबदारी… सरकार आहेच कि माझा ढासळता कणा सावरायला… तुम्ही फक्त माझे पावित्र्य राखा…
– मयुर खोपेकर

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close