कवि भूषण आणि औरंगजेब भेट भाग २

By Discover Maharashtra Views: 3605 4 Min Read

कवि भूषण आणि औरंगजेब भेट भाग २

कवि भूषणने त्याची पहिली कविता भर दरबारी औरंगजेबास सुनावली त्या कवितेचा एकेक शब्द शहास कट्यारी सारखा लागत गेला, हे काय सांगावयास पाहिजे? त्याचे विकृतानन आणि भूभ्रमण यांनी व्यक्त होणा-या त्याच्या प्रज्वलीत क्रोधाची पर्वा न करतां कवि भूषणने लगेच दुसरी कविता म्हटली ती अशी :-

हात तसबीह लिये प्रात उठै बंदगीको,आपही कपट रूप कपट सुपजके |
आगरे मे जाय दारा चौक मे चुन्हाय लिन्हो, छत्र हू छिनायो मानो बूढे मरे बापके ||
कीन्हो है सगोत घात सोतो मै नाहि कहो पील पै तुराये चार चुगलके गपको |
भूषण भनत शठछंदी मतिमंद महा, सौ सौ चुहै खायके बिलारी बैठी तपके ||

मराठी अर्थ :- वरील कवितेत भूषण कवि म्हणतात कि, हे औरंगजेबा तू रोज सकाळी उठून हांतात स्मरणी घेऊन ईश्वर प्रार्थना करतोस परंतू हे केवळ एक ढोंग आहे. कारण तू स्वत: च एक कपटाचे केवळ रूप आहेस. आग्र्यात जाऊन दाराला भर चौकांत तू चिणून टाकले. तसेच चहाडखोर लोकांच्या सागण्यावरून किती गोत्रजांना तू हत्तीच्या पायाखाली दिले त्या सर्वांची नावे मी नाही सांगू शकत. थोडक्यांत सांगावायचे म्हणजे तूं शठछंदी व मूर्ख आहेस. शेकडो उंदिर खाऊन पुन्हा टपून तपश्चर्या करणा-या मांजरी सारखा तू बसला आहेस.

कवि भूषण यांच्या शब्दांची धार आता फारच तीक्ष्ण होऊ लागली होती. ते शब्द जणू काही कट्यार बनून औरंगजेबावर वार करीत होते. कवींनी केलेल्या पहिल्याच कवितेने औरंगजेबाच्या शरीराचा दाह झाला होता. त्यातच कवींनी दुस-या कवितेच्या शेवटी शहास उद्देशून जी अंतीम रचना केली की :-

” सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के “…

आता मात्र बादशहाचा राग अनावर झाला आणि ते शब्द सुद्धा असह्य भासू लागले सुरुवातीस त्याने दिलेल्या वचनास विसरून क्रोधाने तो बेभान झाला आणि सत्यवचनी कविश्वराचा म्हणजेच कवि भूषण यांचा शिरच्छेद करावयास तरवार उपसून सिंहासनावरून उठला. हा प्रकार पाहताच ग्वाहीदार अमीर उमरावांनी आणि वचन प्रिय रजपूतांनी मध्यस्ती करून शहास प्रसन्न केले व तो प्रसंग टाळला. त्यामुळे दिल्लीत किंवा दिल्लीच्या भोवतांलच्या प्रदेशात राहणे इष्ट नव्हे असे जाणून कवींनी औरंगजेबाचे कट्टे शत्रू व हिंदुपदपादशाहीचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाण्याचा संकल्प केला व त्याप्रमाणे आपल्या केसर घोडीवर बसून रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहचले.

वर जे काही भूषण कवि व बादशाह याच्यामधील प्रसंगाचे वर्णन केले तो प्रसंग घडलाच नाही असें ‘भूषण ग्रंथावलीचे कर्ते महाशय मिश्रबंधू यांस वाटते. भूषण कवि व औरंगजेब ही भेटच त्यांस अग्रह्य वाटते. ते म्हणतात “भूषणकवि चित्रकूटाधिपती रूद्रगमाकडून निघालेते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले ते औरंगजेबाकडे गेले नाहीत. पंडीत महाशयांनी आपल्या विधानाला काही आधार दिला नाही.

भूषण कवींनी शहाच्या दोषनिदर्षनात्मक म्हटलेल्या ज्या दोन कविता वर दिल्या आहेत त्या मिश्र महाशयांनी स्वसंपादीत प्रतीत संकलीत केल्या आहेत. या दोन्ही कविताचे स्वरूप पाहता त्या कविने शहाच्या समक्ष म्हटलेल्या दिसतात. विशेषत: ” भूषण कवि सांगतात, औरंगजेबा ऐक ” हे पहिल्या कवितेतील उद्गार तर त्या दोघाची समक्ष स्थीतीच व्यक्त करितात. त्यचप्रमाणे शेकडो उंदीर खाऊन तू तप करण-या मांजरी सारखा (टपून) बसला आहेस! हेही उद्गार त्यांची उपस्थिती दर्शवतात.

लेखनसीमा

संदर्भ – शिवराजभुषण (दु. आ. तिवारी)
संकलन – मयुर खोपेकर

Leave a comment