मराठा सैनिक

मराठा सैनिक

मराठा सैनिक –

मराठा सैनिकांचे वर्णन समकालीन दख्खनी हिंदी कवी मुल्ला नुस्त्रती यांच्या काव्यातून व युरोपियन प्रवासी डॉ. फ्रायर यांच्या लेखातून आढळून येते . याआधारे मराठा सैनिकाविषयीं व त्यांच्या लढाऊ बाण्याविषयी अभिमानास्पद वर्णनाचा अनुभव घेता येतो. समकालीन दख्खनी हिंदी कवी मुल्ला नुस्त्रती यास मराठ्यांच्या अंगभूत गुणांनी भुरळ पाडली होती. आपल्या कवितेतून मराठा सैनिकांचे विलोभनीय आणि वीरश्रीयुक्त बहारदार वर्णन दख्खनी हिंदी कवी मुल्ला नुस्त्रती याने केले आहे.(मराठा सैनिक)

मराटे चपल मादवाँ पो सवार पर्‍या
ज्युं कि जिन्नां के रानां तल्हार /
दिसेना वो जल्दी के वक्त अपने आप
बिरादर हैं सावां के चोरां के बाप /
हर यक मादवाँ उनकी गोया परी
दिखावे चंदर कों अपस दिलबारी /
करे फिर जो काव्यां कि खूबी अयां
पडे पेंच में देख आबे रवाँ /
करे दौड में आ को बारे सूं बात
मुंडासा ले उस का उडे हात हात /
हर यक नेता बाजी में रावुत बडा
खुलेगा चंदर हत से काडे कडा /
जो धन – फौज के नाज में मुए निपट
तो नेत्यां की उंगली सुं खोले घुंघट /

मराठे अत्यंत चपळ घोड्यावर स्वार होतात. या घोड्या जणू पिशाच्यांच्या मांडी खालील परी व अप्सरा होत. मराठे इतके चपळ असतात की त्वरेच्या वेळी ते आपले आपणालाही दिसत नाहीत. ते साधुंचे सज्जनांचे बंधु व चोरांचे बाप असतात. मराठ्यांची प्रत्येक घोडी जणू काय परी असते व ती चंद्राला आपला चष्का लावते. मराठा आपल्या गनीमी काव्यांची खुबी जेव्हा प्रगट करतो , ते पाहून नदी प्रवाहाचा भोवरा पेचात पडतो . मराठा दौड करीत असताना वार्‍याशी गोष्टी करतो. त्यावेळी त्याचे मुंडासे हात हात वर उडत असते. प्रत्येक मराठा भाला फेकीत पटाईत व राऊत असतो. हा मराठा खुलून जातो तेंव्हा तो आकाशातील चंद्राच्या हातातील कडे काढून आणतो. हा आपल्या फौजेच्या गर्वात व अभिमानात असतो. आपल्या फौजरूपी प्रेयसीच्या तोर्‍यातच मरत असतो व आपल्या भाल्याच्या अंगुलीने तिचे घुंगट खोलतो.

युरोपियन प्रवासी डॉ. फ्रायर मराठा सैनिकांचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात

“मराठी सैनिकांच्या काही उणिवा सोडल्या तर तो एक उत्तम सैनिक होता.” चणीने हा मराठा सैनिक लहानसर व बारीक अंगकाठीचा होता. उलट मुघल आणि दख्खनी मुसलमान उंच आणि धिप्पाड होते. परंतु मराठ्यांचे धैर्य , काटकपणा , अपूर्व उत्साह, समयसूचकता या गुणांमुळे त्याच्या लहानखोर बांध्याची उणीव भरून निघाली होती. नैतीक धैर्य खचून जाईल अशा मराठ्यांच्या आनकलनीय डावपेचांमुळे मैदानावरील बरोबरीच्या सामन्यास लढा देण्यातदेखील अखेर विजापूर व मोगल असफल झाले. पुढे डॉ. फ्रायर म्हणतो “ शिवाजीच्या माणसांना खडतर जीवन , जलद, आगेकूच आणि कमीत कमी सुखसोई यांची सवय असल्यामुळे,ती कसल्याही लष्करी कारवाईला अधिक लायक होती. परंतु दुसरे ( मोगल ) भोजनाची व लूटमार करण्याची संधी एकाचवेळी आली तर प्रथम ते जेवण उरकतील . मराठे मोठ्या दिमाखाने घोड्यावर स्वार होत असत, त्यांची शस्त्रे घेऊन प्यादे त्यांच्या पुढे धावत आणि त्यांच्या खुसमस्कर्‍या समवेत येणार्‍या स्त्रिया त्यांच्यापासून दूर नसत. शत्रूचा पाठलाग करण्याऐवजी ते शत्रूची वाट पाहात राहतील पण शत्रू सामोरा आला की ते त्याच्याशी चांगला सामना देतील,शिवाजीचे लष्कर अचानक हल्ला करण्यात आणि लूटमार करण्यात तरबेज होते परंतु समोरासमोर उभे ठाकून शत्रूशी लढण्याचे ते टाळत असत . असे असले तरी ते झुंजार लढ्वय्ये होते , ही मान्य करावे लागेल. पण नंतरच्या काळात पानीपतावर लढणार्‍या मराठा सरदारांना मात्र अशा ऐषाआरामाची आवड निर्माण झाली, ही एक उल्लेखनीय बाब आहे. शिवाजीच्या लष्करात मात्र कुणबिणी आणि कलांवंतिणींना सक्त मनाई होती .

संदर्भ :-
दख्खनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख :- देवीसिंग व्यंकटसिंग चौहान
सेनापति हंबीरराव मोहिते :- डॉ. सदाशिव शिवदे
मराठा सैनिक छायाचित्र :- साभार विकिपीडिया.

श्री नागेश सावंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here