प्रवासमहाराष्ट्र दर्शनमाझी भटकंती

महागणपती मंदिर (वाई)

महागणपती मंदिर

कृष्णेच्या काठावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे तसेच इथल्या वैशिष्टयपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी ही आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर असणरे महागणपती अथवा ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात.

गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती; असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे.

गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे.

गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. पूर्वेस महाव्दार व वरती नगारखान्याची खोली आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रुंद अशी भित आहे. महाव्दारातून आत गेल्यावर दगडी मंडप, दोन दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. या नंदीची भव्य मूर्ती कुळकुळीत अशा चकचकीत पाषाणाची व सुबक आहे. गाभार्यांत खालवर खाली शिवलिग आहे. महाराष्ट्रातील चुनेगच्चीयुक्त मूर्तिसंभारासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिराच्या शिखरावरील मूर्तिकाम सुस्थितीत आहे. देवदेवता, सरदारसरंजामदार, ऋषिमुनी, दशावतार, राधाकृष्ण, सरस्वती, गणपती, महिषासुरमर्दिनी इत्यादी मूर्ती मंदिराच्या वास्तूला अनुरूप ठरतील अशाच बेताने स्थापिल्या आहेत.

वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Discover Maharashtra Team

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close