महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,317

हलशीचा किल्ला | माचीगड

By Discover Maharashtra Views: 3641 5 Min Read

हलशीचा किल्ला | माचीगड | Machigad

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. कदंब राजवंशातील राजा रविवर्मनची हि राजधानी आज येथे असलेल्या अनेक प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पण या गावामागे पश्चिमेला असलेल्या टेकडीवरील दुर्ग मात्र तितकाच अपरीचीत असल्याने पर्यटकांची पावले या गिरीदुर्गाकडे वळत नाहीत. हलशी गावामागे साधारण २ कि.मी.अंतरावर असलेल्या हा किल्ला हलशीचा किल्ला म्हणुन ओळखला जातो पण गावातील बहुतांशी लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती नाही. गडाच्या पायथ्याशी माची नावाचे वसले असुन हा गड या गावाच्या नावाने म्हणजे माचीगड म्हणुन जास्त प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी या गडाचा उल्लेख “हणमंत गुडगागलू” या नावाने देखील येतो.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेला हा गड बेळगावहुन ४० कि.मी.वर तर खानापुर या तालुक्याच्या शहरापासुन नंदगड मार्गे १५ कि.मी.अंतरावर आहे. नंदगड किल्ल्यासमोर एका लहान टेकडीवर असलेला हा किल्ला व हलशी गावात असलेली प्राचीन मंदीरे नंदगडासोबत एका दिवसात सहजपणे पाहुन होतात पण सोबत खाजगी वाहन असणे गरजेचे आहे कारण या भागात वाहनाची सोय नाही. नंदगड ते माचीगड हे अंतर फक्त ४ कि.मी.आहे. माचीगड गावात भगवान सुब्रमण्यम यांचे एक मंदिर आहे. गावातुन गडावर जाण्यासाठी मळलेली वाट असुन या वाटेवर नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने साधारण १० मिनिटात आपण गडाच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. दगडाचे बांधकाम पहाताच गडाची प्राचीनता लक्षात येते.

११ व्या शतकाआधी बांधलेल्या या दुर्गाच्या बांधकामात मोठमोठे दगड एकमेकांवर केवळ रचलेले असुन ते सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. गडाचा मुख्य दरवाजा दोन बुरुजाच्या आधारे बांधलेला असुन या बुरुजाचा पुढील भाग आता मोठ्या प्रमाणात ढासळलेला आहे. पहिल्या दरवाजाच्या आतील बाजुस काटकोनात दुसरा दरवाजा बांधलेला असुन मधील भागात तटाला लागुन नंतरच्या काळात स्थापन केलेली मारुतीची मुर्ती आहे. गडाच्या आतील दरवाजाचा वरील भाग पुर्णपणे ढासळला असुन केवळ चौकट शिल्लक आहे. गडात प्रवेश केल्यावर समोरच नव्याने बांधलेले देवीचे मंदीर आहे. मंदिरासमोरील बुरुजावरून खालील बाजुस माचीगड समोर नंदगड तर उजवीकडे हलशी गाव नजरेस पडते. येथुन तटाच्या काठाने गडफेरीस सुरवात केल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याकडून खाली उतरल्यावर डावीकडील तटबंदीत एक लहान दरवाजा आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर समोरच गडाचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. चौकोनी आकाराच्या या दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन त्यावर कमळाचे फुल कोरलेले आहे.

दरवाजा पाहुन पुढे जाताना गडावरील खडकांचा भिंत म्हणुन वापर करत काही वास्तु बांधलेल्या दिसतात. वाटेत उजवीकडे कोरडे पडलेले पाण्याचे तळे आहे. येथे गडाचा सर्वात उंच भाग डावीकडे ठेवत आपण गडाच्या पश्चिम भागात असलेल्या तटबंदीजवळ पोहोचतो. गडाच्या उतारावर असलेली हि लांबलचक रचीव तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीत आपल्याला बाणांचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या तसेच एक शौचकुप पहायला मिळते. येथुन गडाच्या पुढील भागात असलेल्या उंच खडकावर चढल्यावर झाडीने भरलेला गडमाथा दिसतो . गडाचा माथा पुर्वपश्चिम असुन साधारण ३ एकरवर पसरलेला आहे. येथुन तटबंदीला वळसा मारत दरवाजाकडे परतल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास पाउण तास पुरेसा होतो.

इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात आजच्या कोल्हापुरावर शातकर्णी किंवा आंध्रभृत्या राजा यांचे राज्य असावे. आंध्रभृत्या राजाकडून कदंब राजाने हा प्रदेश जिंकून घेतला व हलशी हे राजधानीचे शहर केले. हलशी येथे सापडलेला गोव्याचा राजा जयकेशी याच शिलालेख कित्तुर किल्ल्यातील संग्रहालयात पहायला मिळतो. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) येथे राज्य करत होती. नंतरच्या काळात या किल्ल्याचा फारसा उल्लेख येत नाही. इ.स.१७५६ मध्ये सावनूरच्या नबाबाचा हा प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला पण त्यांनी कित्तूर व गोकाक ही गावे मात्र येथील मुळ देसायांच्याच ताब्यात ठेवली. १७८५ मध्ये टिपूने हा प्रांत जिंकुन घेतला पण इ.स. १७९२ मध्ये मराठयांकडून पराभव झाल्याने श्रीरंगपट्टणच्या तहानुसार हा भाग पुन्हा मराठ्यांकडे आला. इ.स.१८०० च्या सुमारास काही दिवस हा भाग कोल्हापुरच्या धोंड्या वाघाच्या ताब्यात होता.

माचीगड जवळील नंदगड किल्ला इ.स.१८०९ मध्यें कित्तुरच्या देसायांनीं बांधला. बारावा देसाई शिवलिंगरुद्र सर्जा हा १८२४ मध्ये निपुत्रिक मेल्याने त्याची आई राणी चेन्नम्माने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन गादीवर बसवले पण ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा धारवाडचा कलेक्टर थॅकरेने हे दत्तकविधान मान्य केले नाही व कित्तुरची देशमुखी जप्त केली. यावर राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध उठाव केला. हा उठाव कित्तुरचे युद्ध म्हणुन प्रसिध्द आहे. नंदगडशी असलेली या गडाची जवळीक पहाता कित्तुरच्या स्वतंत्रलढयाच्या संग्रामात या गडाने देखील भाग घेतला असावा.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment